जंतरमंतर चिथावणीखोर घोषणा; ६ जणांना अटक

जंतरमंतर चिथावणीखोर घोषणा; ६ जणांना अटक

नवी दिल्लीः समान नागरी कायदा देशात लागू करण्याची मागणी करत मुस्लिम धर्माविरोधात जंतर मंतरवर चिथावणीखोर घोषणा देण्याप्रकरणी मंगळवारी दिल्ली पोलिसांनी ६ जणांना अटक केली. हा कार्यक्रम भाजपचे नेते व सर्वोच्च न्यायालयाचे वकील अश्विनी उपाध्याय यांच्या उपस्थितीत पार पडला होता.

अटक झालेल्यांची नावे दीपक सिंह (हिंदू सेनाचे अध्यक्ष), विनीत क्रांती, प्रीत सिंह, दीपक कुमार, विनोद शर्मा (सुदर्शन वाहिनीचे प्रमुख) अशी आहेत.

‘भारत जोडो आंदोलन’ असे या कार्यक्रमाने नाव देण्यात आले होते पण प्रत्यक्षात भाजपचे माजी प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांच्या उपस्थितीत मंचावरून मुस्लिमांविरोधात चिथावणीखोर, भडकाऊ घोषणा दिल्या. या कार्यक्रमाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला त्यात काही जणांकडून मुस्लिमांना ठार मारायला हवे, असे दिसून येत आहे. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एफटीआयआयचे माजी संचालक व भाजपचे नेते गजेंद्र चौहानही उपस्थित होते.

हा संपूर्ण कार्यक्रम दिल्ली पोलिसांच्या परवानगी विना, बेकायदा व कोविड-१९ प्रतिबंधक नियमांचा भंग करून घेण्यात आला होता. हा कार्यक्रम रविवारी झाला व व्हीडिओ व्हायरल होऊनही दिल्ली पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नव्हती. पोलिसांनी गर्दीही जमू दिली.

सोमवारी सकाळी पोलिसांनी काही अज्ञातांविरोधात फिर्याद दाखल केली होती. नंतर एक दिवसांनंतर ६ जणांना अटक करण्यात आली.

या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यास गेलेले नॅशनल दस्तक या यू ट्यूब चॅनेलचे वार्ताहर अनमोल प्रीतम यांना उपस्थित जमावाने घेरले व त्यांना जय श्रीरामच्या घोषणा द्यायला लावल्या. या प्रसंगाचा व्हीडिओही सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे. जमावातील काहींनी प्रीतम यांना जिहादी म्हणूनही संबोधले.

या एकूण घटनेबाबत अश्विनी उपाध्याय यांनी सांगितले की आमचा कार्यक्रम दुपारी १२ वाजताच संपला आणि घोषणाबाजी ही संध्याकाळी ५ वाजता झाली. आमचा कार्यक्रम रॅली पार्क हॉटेलच्या बाहेर होता तर घोषणाबाजी संसद हाऊस पोलिस ठाण्याच्या आसपास झाली.

अश्विनी उपाध्याय हे व्यवसायाने वकील असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून एक देश, एक कायदा हवा अशी मागणी केली होती. पण त्यांनी ही याचिका नंतर मागे घेतली आहे.

मूळ बातमी

COMMENTS