न्यू य़ॉर्कमध्ये सलमान रश्दींवर जीवघेणा हल्ला

न्यू य़ॉर्कमध्ये सलमान रश्दींवर जीवघेणा हल्ला

न्यू यॉर्कः जगप्रसिद्ध ब्रिटिश-भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यू यॉर्क येथे एका कार्यक्रमादरम्यान माथेफिरूने हल्ला केला. या हल्ल्याचा एक व्हीडिओह

उद्योगांसाठी सवलतींचा वर्षाव, पण उपयोग कितपत?
मुंबईत कोरोनाचा विस्फोटः २०,१८१ नवे रुग्ण आढळले
कोविड-१९ वर परिणामकारक एचसीक्यूएसचा तुटवडा

न्यू यॉर्कः जगप्रसिद्ध ब्रिटिश-भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यू यॉर्क येथे एका कार्यक्रमादरम्यान माथेफिरूने हल्ला केला. या हल्ल्याचा एक व्हीडिओही व्हायरल झाला असून रश्दी हे न्यू यॉर्क येथे श्वुहटॉकुव्हा इन्स्टिट्यूटमध्ये भाषणासाठी आले होते. व्यासपीठावर ते आले असताना एक हल्लेखोर आला आणि त्याने रश्दी यांना बुक्क्या मारून त्यांच्या मानेवर एका वस्तूने हल्ला केला. रश्दी यांच्यावर कोणत्या हत्याराने हल्ला केला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पण त्यांच्या मानेच्या उजव्या बाजूवर एका टोकदार वस्तूने अनेक वेळा भोसकल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. या हल्ल्यानंतर रश्दी जागीच कोसळले, त्या जागी रक्ताचे थारोळे पसरले होते असे एका महिला डॉक्टरने सांगितले. रश्दी यांना तशा स्थितीत हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात नेण्यात आले आहे. रश्दी यांना सीपीआर दिलेला नाही, रुग्णालयात नेताना त्यांची नाडी सापडत होती, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. या दरम्यान हल्लेखोरालाही ताब्यात घेण्यात आले व त्याला न्यू य़ॉर्कमध्ये पोलिस कोठडी देण्यात आली आहे. हल्लेखोराचे नाव अद्याप समजलेले नाही.

१९८८ साली रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकाने इस्लामी जगतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पुस्तकावर इस्लामी मूलतत्ववाद्यांनी रोष व्यक्त करत त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. त्यात एक वर्षानंतर १९८९ साली इराणचे सर्वेसर्वा अयोतल्ला खोमेनी यांनी रश्दी यांना जीवे मारण्याचा फतवा काढला होता. त्यानंतर रश्दी यांचा ९ वर्षे ठावठिकाणा नव्हता. नंतर त्यांनी ब्रिटनचा आश्रय घेतला होता व तेथे अनेक वर्षे पोलिस संरक्षणात राहात होते. त्यांनी ब्रिटनचे नागरिकत्वही मिळवले होते.

रश्दी सध्या अमेरिकेत राहात असून त्यांना तेथे संरक्षण देण्यात आले आहे.

रश्दी यांनी आजपर्यंत अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. २००७ साली त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल ब्रिटन सरकारने रश्दी यांचा सन्मान केला होता. त्याची मुस्लिम जगतात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. स्वतः रश्दी हे मतस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात, त्यांनी सॅटेनिक व्हर्सेस बद्दल आजतागायत मुस्लिम जगताची माफी मागितलेली नाही.

छायाचित्र – अल जझिरा साभार

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0