सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर

सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर

न्यू यॉर्कः जगप्रसिद्ध ब्रिटिश-भारतीय लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. त्यांना बोलताही येत नाही. शुक्र

समितीशी चर्चा नाहीचः शेतकरी संघटना ठाम
हरीयाणामध्ये शेतकऱ्यांवर लाठीमार
सर्व जिल्ह्यांत ‘पुस्तकांचे गाव’

न्यू यॉर्कः जगप्रसिद्ध ब्रिटिश-भारतीय लेखक सलमान रश्दी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. त्यांना बोलताही येत नाही.

शुक्रवारी एका कार्यक्रमात त्यांच्यावर एका माथेफिरूने हल्ला करून त्यांना भोसकले होते. या घटनेनंतर रश्दी यांना ताबडतोब हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते उपचाराला प्रतिसाद देत असून त्यांना एक डोळा गमवावा लागण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

रश्दी हे न्यू यॉर्क येथे श्वुहटॉकुव्हा इन्स्टिट्यूटमध्ये भाषणासाठी आले होते. व्यासपीठावर ते आले असताना एक हल्लेखोर आला आणि त्याने रश्दी यांना बुक्क्या मारून त्यांच्या मानेवर व पोटात एका वस्तूने भोसकले. या हल्ल्यात ते जागीच कोसळले. पोलिसांनी तत्काळ हल्लेखोराला ताब्यात घेतले. हल्लेखोराचे नाव हादी मतार (२४) असे असून हा हल्लेखोर न्यू जर्सी येथे फेअर व्ह्यू परिसरात राहणारा आहे.

हादी मतारच्या हल्ल्यात रश्दी यांच्या हाताची नस गंभीरपणे दुखावली आहे, तसेच त्यांच्या आतड्यालाही भोसकल्याने दुखापत झाली आहे. या हल्ल्यामुळे रश्दी यांना डोळा गमवावा लागेल अशी भीती डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे.

मूळचे मुंबईत जन्मास आलेल्या सलमान रश्दी यांचे नाव १९८१ साली प्रकाशित झालेल्या ‘मिडनाइट चिल्ड्रन्स’ या पुस्तकामुळे जगभर झाले. या पुस्तकाच्या जगभरात ५० लाखाहून अधिक प्रती आजपर्यंत खपल्या आहे. त्यानंतर त्यांच्या १९८८ साली प्रसिद्ध झालेल्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकाने इस्लामी जगतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पुस्तकात प्रेषित पैगंबरांवर निंदाजनक टिप्पण्णी करण्यात आली होती, त्यामुळे या पुस्तकावर इस्लामी मूलतत्ववाद्यांनी रोष व्यक्त करत त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. त्यात एक वर्षानंतर १९८९ साली इराणचे सर्वेसर्वा अयोतल्ला खोमेनी यांनी रश्दी यांना जीवे मारण्याचा फतवा काढला होता. रश्दी यांच्यावर ३ लाख डॉलरचे इनामही खोमेनी यांनी जाहीर केले होते. त्यानंतर रश्दी ९ वर्षे अज्ञातवासात होते.

सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचा अनुवाद करणाऱ्या जपानी नागरिकाला १९९१ मुस्लिम मुलतत्ववाद्यांनी ठार मारले होते. त्यानंतर इटालीचा एक अनुवादक व या पुस्तकाचा नॉर्वेजियन प्रकाशक विल्यम नायगार्ड यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाला होता. हे दोघे मात्र हल्ल्यात वाचले होते.

इस्लामी मूलतत्ववाद्यांच्या जीवे मारण्याच्या इशाऱ्यानंतर रश्दी यांनी ब्रिटनचा आश्रय घेतला होता व तेथे अनेक वर्षे पोलिस संरक्षणात राहात होते. त्यांनी ब्रिटनचे नागरिकत्वही मिळवले होते.

पण रश्दी सध्या अमेरिकेत राहात असून त्यांना तेथे संरक्षण देण्यात आले आहे.

रश्दी यांनी आजपर्यंत अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. २००७ साली त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल ब्रिटन सरकारने रश्दी यांचा सन्मान केला होता. त्याचीही मुस्लिम जगतात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. स्वतः रश्दी हे मतस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात, त्यांनी सॅटेनिक व्हर्सेस बद्दल आजतागायत मुस्लिम जगताची माफी मागितलेली नाही. रश्दी यांनी स्वतःला नास्तिक म्हणूनही घोषित केले होते. आपण मुस्लिम धर्माच्या कोणत्याही प्रथा-परंपरा पाळत नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान रश्दी यांच्या हल्ल्यावर इराणने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0