भूतकाळाला विसरूया, भव्य राममंदिर उभे करूया – भागवत

भूतकाळाला विसरूया, भव्य राममंदिर उभे करूया – भागवत

भागवतांनी काशी व मथुरावर थेट उत्तर दिले नाही. आंदोलनाचे काम संघाचे नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाचे संकट पण अयोध्येत राम नवमी धुमधडाक्यात होणार
‘राजकारणासाठी श्रीरामाच्या नावाचा उपयोग थांबेल’
‘राम मंदिर आंदोलन स्वातंत्र्य आंदोलनापेक्षा मोठे’

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करत देशातल्या जनतेची भावना, त्यांच्या श्रद्धांना न्यायालयाने न्याय दिला अशी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक दशके सुरू असलेल्या या प्रकरणावरील न्यायालयीन संघर्षावर आता कायद्याने अंतिम निर्णय दिला असून आहे. हा निकाल मान्य करून भूतकाळ विसरून सर्वांना भव्य राममंदिर निर्माण करावे लागेल असे ते म्हणाले. मात्र भागवतांनी काशी व मथुरावर थेट उत्तर दिले नाही. आंदोलनाचे काम संघाचे नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

भागवत म्हणाले, “जय-पराजयाच्या दृष्टीने या निर्णयाकडे पाहू नये. न्यायालयाच्या निर्णयामुळे जनतेला न्याय मिळाला आहे. भूतकाळ विसरून आपण पुन्हा एकत्र येऊया. सर्वांनी संयमाने या निकालाचा आनंद व्यक्त करावा. कोणाच्याही भावनांचा अनादर होईल, असे वर्तन करू नये. देशाच्या जनतेने इतके वर्ष जो संयम बाळगला त्यांबद्दल त्यांचे अभिनंदन. देशाचे वातावरण खराब होईल, असं कोणतंही वर्तन होऊ नये. सर्वांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखावा, योग्य निर्णय देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे आभार.”

सर्वोच्च न्यायालयावर सर्व थरातून प्रतिक्रिया येत आहेत. 

निर्णयावर समाधानी नाही : सुन्नी वक्फ बोर्ड

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सुन्नी वक्फ बोर्ड समाधानी नाही पण ते या निकालाचा आदर करतात अशी प्रतिक्रिया वक्फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी यांनी दिली. मंदिर-मशिदीची वादग्रस्त जमीन व त्याच्या व त्याच्या आतल्या प्रांगणातील जमीन ज्यावर नमाज केला जात होता ती जमीन दुसऱ्या पक्षाला दिल्याच्या निर्णयावर आम्ही समाधानी नाही. हा निर्णय ना त्रुटी आहे ना न्याय्य आहे. आम्ही या खटल्याचे संपूर्ण निकालपत्र वाचून त्याला कायदेशीर आव्हान दिले जाऊ शकते का याची चाचपणी करणार असल्याचे जिलानी यांनी सांगितले. मशीद उभारण्यासाठी ५ एकर जागा देण्याचे निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे पण मशिदीची कोणती किंमत होत नाही असे ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने जे निकालपत्रात सांगितले आहे ते देशाच्या भविष्याला फायद्याचे आहे त्यावर आम्हाला टीका करायची नाही. हा निकाल कोणाचा जय किंवा पराजय नाही असेही मत जिलानींनी दिले.

तर या प्रकरणातली याचिका फेटाळलेल्या निर्मेाही आखाड्याने आमची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असली तरी आम्हाला त्याची खंत वाटत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

कोणाचा जय नाही की पराभव : पंतप्रधान नरेंद्र मोदी

रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यावरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निकालाकडे कुणी जय किंवा पराभवाच्या दृष्टीकोनातून पाहू नये. रामभक्ती असो वा रहीमभक्ती ही वेळ सर्वांनी भारतभक्ती सशक्त करण्याची आहे. सर्व देशवासियांनी शांतता व सद्भावाचे वातावरण ठेवावे अशी प्रतिक्रिया दिली.

हा निकाल मैलाचा दगड – गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल हा ऐतिहासिक असून तो भारताच्या वाटचालीतला एक मैलाचा दगड म्हणून ओळखला जाईल. या निर्णयाने भारताची एकता, अखंडता व या देशाच्या महान संस्कृतीला अधिक बळ मिळेल अशी प्रतिक्रिया दिली.

तुषार गांधींची तिखट प्रतिक्रिया

दरम्यान रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यावरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर म. गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. जर म. गांधी यांच्या हत्येचा खटला आज सर्वोच्च न्यायालयात लढला गेला असता तर न्यायालयाने, ‘नथुराम गोडसे हे खूनी होते पण ते देशभक्त होते’ असा निकाल दिला असता, असे प्रतिक्रिया तुषार गांधी यांनी दिली.

न्यायालयाच्या निर्णयावर असमाधानी : असीउद्दीन ओवेसी

एमआयएमचे प्रमुख असाउद्दीन ओवेसी यांनी सर्वोच्च न्यायालयावर आपण असमाधानी असल्याचे सांगत ज्यांनी बाबरी मशीद पाडली त्यांनाच ट्रस्ट बनवण्याचा आदेश दिला. जर मशीद पडली नसती तर न्यायालयाने काय निर्णय दिला असा प्रश्न उपस्थित केला. ओवेसी यांनी मशीदाला पाच एकर जमीन देण्याच्या न्यायालयाच्या निकालावरही मत करताना आम्हाला जमिनीची भीक नको असल्याचे स्पष्ट केले पण हे आपले व्यक्तिगत मत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे पण ते अचूक नाही’, या माजी सरन्यायाधीश वर्मा यांच्या पुस्तकातील वाक्याचा त्यांनी दाखला दिला.

निकालाला आव्हान देणार नाही : शाही इमाम अहमद बुखारी

जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मुस्लिमांच्या बाजूने लागला नाही पण सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे त्यामुळे त्यांचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल. तो हिंदुस्थानातील मुसलमानही मान्य करतील. या निर्णयावर पुन्हा वादविवाद सुरू केल्यास पूर्वीचीच परिस्थिती निर्माण होईल. हा निर्णय देशाची जनता  व शांततेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याविरोधात पुन्हा अपिल करण्याची इच्छा नाही असे त्यांनी सांगितले.

भाजपचे नेत्या उमा भारती यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत करत अशोक सिंघल यांचे स्मरण केले. या महान कार्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी आपली आहुती दिली त्यांना मी अभिवादन व श्रद्धांजली व्यक्त करते असे त्या म्हणाल्या. उमाभारती यांनी अडवाणी यांचेही अभिनंदन करत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी या महान कार्यसाठी आपले सर्वस्व दावणीला लावले होते, अशी प्रतिक्रिया दिली.

हिंदू महासभेचे वकील वरुण कुमार सिन्हा यांनी न्यायालयाचा हा निकाल ऐतिहासिक असल्याचे सांगत न्यायालयाने आपल्या निकालातून एकतेतून विविधतेचा संदेश दिल्याचे मत व्यक्त केले. हा दिवस हिंदूंसाठी आनंदाचा आहे, आता ट्रस्ट बनेल आणि मुस्लिमांना मशिदीसाठी वैकल्पिक जमीनही मिळेल असे ते म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0