मोदी यांनी लावलेले रोपटे पारिजातकाचे नव्हते

मोदी यांनी लावलेले रोपटे पारिजातकाचे नव्हते

पारिजातकाला हरसिंगार या नावाने (Nyctanthes arbor-tristis नायक्टॅन्थेस आर्बर-ट्रिस्टिस) या नावानेही ओळखले जाते. मात्र मोदी यांनी लावलेले रोपटे हरसिंगारचे नव्हते. त्याची विभाजित पाने (बोटाच्या पेरांप्रमाणे असलेली पाच ते सात पाने) विचार करण्यास भाग पाडणारी आणि गोरखचिंचेसारखी दिसणारी होती.

अयोध्या खटल्याचा पुनर्विचार करण्याची सिविल सोसायटींची मागणी
रामजन्मभूमी : विचित्र तर्क असलेला निकाल
अयोध्या: सरकार व न्यायसंस्थेला जमले नाही ते भारतातील मुस्लिमांनी करून दाखवले

५ ऑगस्टला अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारिजातकाचे रोप लावल्याचा सोहळा झाला होता. हा सोहळा झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांत दिल्ली एनसीआर परिसरात पारिजातकाच्या रोपांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

सुरूवातीला या रोपाच्या प्रसार माध्यमांमधील छायाचित्रांमुळे ओळख पटत नव्हती. काहीतरी जुळून येत नव्हते. पारिजातकाला हरसिंगार या नावाने (Nyctanthes arbor-tristis नायक्टॅन्थेस आर्बर-ट्रिस्टिस) या नावानेही ओळखले जाते. मात्र मोदी यांनी लावलेले रोपटे हरसिंगारचे नव्हते. त्याची विभाजित पाने (बोटाच्या पेरांप्रमाणे असलेली पाच ते सात पाने) विचार करण्यास भाग पाडणारी आणि गोरखचिंचेसारखी दिसणारी होती. हरसिंगारची पाने अविभाजित असतात.

वनस्पती तज्ज्ञांच्या मते खात्री करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जाऊन तपासणी करणे हा होता आणि अयोध्येला अलीकडेच भेट दिल्यावर समस्या सुटली. नव्याने लावण्यात आलेले रोप राज्य वनविभागाकडून पाठवण्यात आलेले होते आणि पूर्णपणे वृक्षरक्षक जाळीने झाकलेले होते कारण त्याला माकडांपासून सुरक्षित ठेवायचे होते, असे एका सुरक्षा रक्षकाने सांगितले. नव्याने लावण्यात आलेले रोप हे निश्चितच गोरखचिंचेचे होते.

हिंदू पुराणानुसार पारिजातकाचे महत्त्वः

एक पवित्र झाड मानले गेलेल्या पारिजातकाला हिंदू पुराणात खूप महत्त्व आहे. पुराणात (मुख्यत्वे विष्णू पुराण, हरिवंश आणि भागवत) यांच्यामध्ये त्याच्याशी संबंधित अनेक आश्चर्यकारक आणि परस्परविरोधी कथानके आहेत.

पारिजातकाचे झाड समुद्र मंथनादरम्यान वर आले. इंद्राने आपल्या स्वर्गातील बागेत ते लावले. एका भेटीदरम्यान कृष्ण आणि त्याची पत्नी सत्यभामाला ते दिसले. सत्यभामेला आपल्याकडे ते हवे असल्याच्या इच्छेपासून दूर ठेवणे शक्य नसलेल्या कृष्णाने ते उखडले आणि परतीच्या वाटेवर असताना इंद्राने आपल्या मौल्यवान वस्तूसाठी त्याचा सामना केला. तो लढाईत हरला आणि पारिजात द्वारकेला पोहोचले. कृष्णाच्या मृत्यूनंतर ते पुन्हा स्वर्गात स्थापित झाले.

दुसऱ्या कथेनुसार नारदमुनींनी कृष्णाला पारिजातकाचे फूल भेट दिले आणि त्याने ते रूक्मिणीला दिले. आपल्याकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल नाराज झालेल्या सत्यभामेने ते झाड आपल्यालाच हवे म्हणून हट्ट धरला आणि इंद्राच्या बागेतून ते आणण्यासाठी कृष्णावर ती नाराज झाली. तोपर्यंत रूक्मिणीलाही ते हवे होते. या दुहेरी स्थितीत अडकलेल्या कृष्णाने ते झाड अशा प्रकारे हुशारीने लावले की त्याची मुळे सत्यभामेच्या अंगणात राहतील पण फुले रूक्मिणीच्या अंगणात पडतील.

दुसऱ्या एका कथेनुसार, मंदार पर्वतराजींमध्ये शंकराने आपली पत्नी उमाला खूश करण्यासाठी पारिजातकाचे जंगल तयार केले. सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश किंवा वारा तिथे पोहोचू शकत नाही. शंकराच्या शक्तींमुळे हे जंगल स्वप्रकाशित आहे. शंकराची शक्ती आणि बाहेरील वाईट प्रभावांपासून मुक्त असलेली ही झाडे इंद्राच्या पारिजातकाच्या तुलनेत उत्कृष्ट दर्जाची आहेत. मानवी रूप धारण करण्याची क्षमता असलेली ही फुले ईश्वर भेट देतो तेव्हा त्याची पूजा करतात. शंकर, उमा आणि त्यांच्या गणांशिवाय फक्त नारदाला तिथे जाण्याची परवानगी आहे. अंधक नावाचा एक शक्तिशाली असुर आपल्या ताकदीनिशी या जंगलात प्रवेश करायचा प्रयत्न करतो. परंतु शंकर त्याचा शिरच्छेद करतो.

एकदा कश्यप ऋषी आपली पत्नी अदिती हिची निष्ठा पाहून खूश होतात आणि तिला एक वर मागण्याची परवानगी देतात. तिच्या मागण्या खूप जास्त असल्याचे लक्षात आल्यावर कश्यप ऋषी पारिजातकाचा शोध लावतात. त्यात कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची क्षमता असते. आपल्या आश्रमापासून नदीच्या पलीकडे ऋषींनी त्याची निर्मिती केल्यामुळे त्याचे नाव पारिजात म्हणजे पलीकडच्या किनाऱ्यावर जन्मलेले असे ठेवण्यात येते.

अंतिम कथा पारिजातक नावाच्या राजकुमारीशी संबंधित आहे. ती सूर्याच्या प्रेमात पडते. पण काही काळ घालवल्यानंतर त्याचा तिच्यामधील रस संपतो. हे दुःख पचवू न शकल्यामुळे ती आगीत उडी मारते आणि आत्महत्या करते. तिच्या राखेतून पारिजातकाचे झाड उगवते. त्याची सुंदर सुगंधी फुले फक्त रात्रीच उमलतात आणि सूर्योदयापूर्वी खाली पडतात. त्यांना सूर्याला पाहण्याची इच्छा नसते आणि तेवढी शक्तीही नसते. त्यामुळे त्याला दुःखाचे झाड म्हटले आहे.

अमरकोशामध्ये पारिजातकाला पाच कल्पवृक्षांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. त्याची अन्न, पेय, चांगले कपडे, सोने, दागिने किंवा सुंदर संगीत देण्याची क्षमता आहे. ते भूक किंवा दुःख मिटवू शकते आणि त्याचा आकार आणि रचना बदलण्याची क्षमताही आहे. (जैन धर्मामध्ये त्याला दहा कल्पवृक्षांपैकी एक असे म्हटले गेले आहे.) उदाहरणार्थ इंद्राचे पारिजात द्वारकेला झाकून टाकण्याइतके मोठे किंवा अंगठ्याच्या आकाराइतके छोटे होऊ शकते. त्याचे खोड सोनेरी असून तांब्यासारखा लाल रंग आणि तरूण पाने आणि सुगंधी फुले आहेत जी कधीही कोमेजत नाहीत.

पारिजातकाची वनस्पतीशास्त्रातील ओळख

प्रकाशित केलेल्या अनेक संदर्भांमध्ये हरसिंगरला खरा पारिजात असे संबोधले आहे. विविध नावांनी ओळखले जाणारे हे झाड जसे नाइट जस्मिन, दुःखाचे झाड, शेवली आणि शेफाली हिमालयाच्या खालच्या पट्ट्यांमधील एक छोटे स्थानिक झाड आहे परंतु ते संपूर्ण भारतभरात आढळते. पूजेत मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या पांढरट फुलांना एक गोड सुवास असतो. ही फुले संध्याकाळी उमलतात आणि सकाळी लवकर पडतात तेव्हा त्यांचा सुगंध परिसरात पसरतो.

या फुलांच्या पाकळ्या एका सुंदर शेंदरी रंगाच्या देठाला गोल जोडलेल्या असतात. त्याची दोन बियांची फळे गोल आणि चपटी असतात. ती परिपक्व होतात तसे तपकिरी आणि कडक होतात. पाने षटकोनी खोडाला प्रत्येक टोकाला जोड्यांमध्ये लागलेली दिसतात. ओबडधोबड खोड असल्यामुळे त्यांचा वापर लाकडाला तसेच हस्तिदंताला पॉलिश करण्यासाठी केला जातो आणि सुश्रूत संहितेनुसार निम शस्त्रक्रिया प्रक्रियांसाठी त्वचा घासण्यासाठीही ती वापरतात.

खात्री करण्यासाठी उदाहरणार्थ भारतीय कोरल वृक्ष (एरिथ्रिना व्हेरिगटा) आणि फिडलवूड (सिथारेक्सिलम स्पिनोसम) पारिजात असल्याचे सुचवण्यात आले होते. परंतु ते काही त्याचे स्पर्धक नाहीत. अगदी गोरखचिंच (एडानसोनिया डिजिटाट) हेही प्रस्तावित करण्यात आले आहे आणि काही ठिकाणी त्याला कल्पवृक्ष किंवा पारिजातही म्हटले गेले आहे. एक उदाहरण म्हणजे लखनऊजवळील किंटूर येथील एक झाड आहे. स्थानिक लोकांसाठी ते एक खास झाड आहे आणि ते अर्जुनाने इंद्राच्या बागेतून ५००० वर्षांपूर्वी त्याची आई कुंतीसाठी आणले. तिला त्याच्या फुलांनी शंकराची पूजा करायची इच्छा होती.

अलीकडील रेडिओकार्बन दिनांकातून त्याचे वय सुमारे ८०० वर्षे असल्याचे दिसले आहे. प्रयागराजजवळील (पूर्वीचे अलाहाबाद) सुलतानपूरमध्ये गोरखचिंचेचा एक वेगळा प्रकार पारिजात म्हणून पुजला जातो. स्थानिक पूजेची अशाच प्रकारची उदाहरणे गुजरात, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये दिसून येतात. मात्र, नंतर झालेल्या चर्चेनुसार ही उदाहरणे नियमाला अपवाद आहेत.

गोरखचिंच या नावाने ओळखला जाणारा बाओबाब आफ्रिकन स्थलांतरित असून त्याचे भारतात भौगोलिक अस्तित्व विखुरलेले आहे. ते मुख्यत्वे पश्चिम आणि नैऋत्य किनाऱ्याच्या दिशेने आहे. तसेच इंडो-गंगेच्या त्रिभुज प्रदेश, मध्य भारत आणि दक्षिण पठारावर विखुरलेल्या स्थितीत दिसते. त्याच्या आफ्रिकेतील मूळ प्रदेशात हा सुंदर बाओबाब त्याचा प्रचंड मोठा आकार आणि आयुष्यमान यांच्यासाठी तसेच पूर्वजांचे स्वर्गस्थ होण्याचा मार्ग आणि जादुई गोष्टींसाठी मानला जातो. त्याचे अन्न, औषधी आणि कलात्मक मूल्य खूप आहे.

त्याचा वापर पर्जन्यजल साठवणूक, निवारा आणि पवित्र स्थान म्हणूनही होतो. त्याची रात्रीच्या वेळी फुलणारी सुंदर फुले लांबच लांब पट्ट्यात उलट्या दिशेने पडतात. त्याची दुधीसारखी फळे, त्यात काळ्या बिया असून खाण्यायोग्य, मऊसूत व्हिटॅमिन सी समृद्ध गरात दिसतात. ती अन्न म्हणून खाण्यासाठी अनेक ठिकाणी वापरली जातात. मात्र, भारतात त्या झाडाचा फार क्वचित वापर झालेला दिसतो.

बाओबाब आणि त्याचा भारतातील प्रवेश

बाओबाबच्या आफ्रिकन उगमाबद्दल लिहित असताना अनेक प्रकाशित स्त्रोतांनी अज्ञात अरब व्यापाऱ्यांनी हे झाड भारतात आणल्याचे नमूद केले आहे. परंतु भारतात कोणतेही व्यावहारिक मूल्य नसलेले झाड त्यांनी का आणले याची काहीही कल्पना नाही. त्याचवेळी भारत आणि आफ्रिकेचा समुद्रामार्गे थेट ऐतिहासिक संपर्क असून त्यातून लोक, उत्पादने आणि कल्पना सातत्याने ने-आण केल्या जात होत्या.

प्राध्यापक हरिप्रिया रंगन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ऑस्ट्रेलियात केलेल्या अलीकडील संशोधनात बाओबाबच्या जनुकीय अभ्यासाला आफ्रिका आणि भारतीय सागरी जगातील व्यापार, देवाणघेवाण आणि सांस्कृतिक कार्यपद्धतींशी जोडले आहे. थोडक्यात, असे दिसून येते की, भारतातील बाओबाबचे आफ्रिकेच्या विविध प्रदेशांमध्ये मूळ आहे आणि चार मोठ्या ऐतिहासिक कालावधींमध्ये भारतीय समुद्रातून हा वृक्ष भारतात आणला गेला आहे.

अ. दहाव्या शतकापूर्वी- ज्वारी, नाचणी, बाजरी आणि चणे यांच्यासारखी अन्नधान्ये आफ्रिकेतून भारतात आली तेंव्हा.

ब. १०वे ते १६वे शतक- शक्तिशाली इस्लामी व्यापारी जाळ्यांनी पूर्व आफ्रिकन किनारपट्ट्यांना पश्चिम आणि मध्य भारतातील थेट मोठी बंदरे आणि राज्यांशी जोडले तेंव्हा.

क. १६वे ते १७वे शतक- पोर्तुगीजांनी आफ्रिकन किनारपट्ट्यांवर नियंत्रण प्राप्त केले आणि व्यापारातील एकाधिकारशाही मिळवली तेंव्हा आणि,

ड. १८वे ते २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत- व्यापार आणि स्थलांतर सातत्याने डच, फ्रेंच आणि ब्रिटिश वसाहतवाद्यांच्या प्रभावाखाली होते तेंव्हा.

आफ्रिकेतील विविध भागांमधील समुद्री प्रवाशांनी गोरखचिंचेच्या काही बिया अनेक मोठ्या प्रवासांमध्ये इतर अन्नासोबत नेल्या. गोरखचिंचेच्या जनुकीय रचनेतून या भौगोलिक संपर्काची खात्री होते आणि त्यातून भारतात खलाशी, सैनिक, नोकर, गुलाम, व्यापारी अशा विविध स्वरूपात आलेल्या, एकमेकांमध्ये मिसळलेल्या आणि पसरलेल्या अनेक आफ्रिकन लोकांचे प्रतिबिंब दिसून येते. स्थानिक ठिकाणी प्रभाव असलेला धर्म स्वीकारून ते मुस्लिम, हिंदू किंवा ख्रिश्चन झाले आणि त्यांना संयुक्तरित्या हबशी किंवा सिद्धी असे म्हटले गेले.

आज पश्चिम भारताच्या अनेक भागांमध्ये गोरखचिंचेच्या पायाशी सिद्धीच्या छोट्या कबरी आहेत ज्या उत्तर मोझॅम्बिकमधील ग्रामीण कुटुंबियांनी बांधलेल्या त्यांच्या पूर्वजांच्या कबरींसारख्याच आहेत. त्यातील अनेक लोक हे मुस्लिम सिद्धी संत बावा घोर, त्यांची बहीण माई मिस्रा आणि भाऊ बाबा हबश यांची पूजा करतात तर इतर लोक खुदियार या पाण्याच्या स्थानिक देवतेची पूजा करतात. ही देवता पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतील मामीवाता (माता जल) यांच्याशी जुळणारी आहे.

काही ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम भाविक पूजा करतात. ही पूजा आफ्रिकेतील बाओबाबच्या झाडाशी संबंधित असलेल्या पूजेसारखीच आहे. इतर ठिकाणी गोरखचिंचेला रूखदा दादा किंवा आजोबा झाड असे म्हटले आहे. त्याखाली उत्तर मोझॅम्बिकमध्ये दिसणाऱ्या कबरींसारख्या कबरी आहेत. कर्नाटकातील सावनूर या छोट्या गावात तीन मोठे गोरखचिंचेचे वृक्ष आहेत. तिथे असे मानले जाते की कृष्णाने हे बी आफ्रिकेतून आणले आणि येथे लावले.

बाओबाब म्हणजेच पारिजात आहे का?

आपल्या पुराणातील कथा अत्यंत चमत्कारिक आहेत. परंतु ते अधिकृत वैज्ञानिक माहितीला जागा ठेवत नाहीत. त्यामुळे व्यक्तिस्वरूप अर्थ लावण्यास जागा राहते. भारताच्या अनेक भागांमध्ये हरसिंगरला पारंपरिक स्वरूपात पारिजात मानले जाते. ती एक स्थानिक प्रजाती असल्यामुळे ती पुरातन भारतीयांना ओळखीची होती आणि पारिजातकाच्या काही जुन्या माहितीशी जुळणारी तरी आहे.

त्याचवेळी आफ्रिकन बाओबाबचा या संदर्भात खूप कमी दावा सांगता येईल. आज ज्या ठिकाणी बाओबाब आहेत तिथे आफ्रिकन भारतीय समाजाचे अस्तित्व नसू शकते कारण अनेक वर्षांत भूवापराच्या पद्धती बदलल्या हेत. परंतु त्यांचे अस्तित्व निश्चितच सिद्धींचा इतिहास आणि संस्कृतीशी जोडलेले आहे.

अंतिमतः तुम्हाला वाटते त्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. अयोध्येतील देवळातील पदाधिकाऱ्यांच्या मते पारिजात म्हणजे बाओबाब आहे, तर तसे ठीक. आपण बाकीचे लोक ते हरसिंगर असल्याचे मानू शकतो.

(एस. नतेश हे वनस्पती शास्त्रज्ञ आहेत आणि दिल्ली विद्यापीठात त्यांनी शिकवले आहे. त्यानंतर ते भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागात अनेक विभागांना शिकवत होते. सध्या ते आयआयटी दिल्लीच्या डीएसटी सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चमध्ये काम करतात. भारताच्या ऐतिहासिक झाडांवरील त्यांचे पुस्तक २०२१ मध्ये रोली बुक्सकडून प्रकाशित होणार आहे.)

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0