नवी दिल्लीः प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी एक वादग्रस्त मजकूर सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्यानंतर बंगळुरूमध्ये उसळलेल्या दंगलीची चौकशी आता पोलिसांकड
नवी दिल्लीः प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी एक वादग्रस्त मजकूर सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्यानंतर बंगळुरूमध्ये उसळलेल्या दंगलीची चौकशी आता पोलिसांकडून सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी कर्नाटकातील मुस्लिम समाजाच्या हितसंबंधाबाबत काम करणार्या सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या संघटनेची या दंगलीतील सहभागाबाबत चौकशी सुरू केली आहे.
जेव्हा फेसबुकवर प्रेषितांचा अवमान करणारी पोस्ट प्रसिद्ध झाली तेव्हा एसडीपीआय या संघटनेचे काही पदाधिकारी डी.जे, हल्ली पोलिस ठाण्यात पोहचले व त्यांनी तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी फिर्याद दाखल करण्यास विलंब केला. त्यात मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची वार्ता पसरली. यामुळे एसडीपीआयच्या पदाधिकार्यांनी संशयिताला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी पोलिसांकडे केली. यात परिस्थिती चिघळली व पोलिस ठाण्यात हिंसाचार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेचे व्हीडिओ फुटेज आमच्याकडे आहे व ५० पोलिसांना किरकोळ दुखापत झाल्याचे एका पोलिस अधिकार्याचे म्हणणे आहे.
पोलिसांनी एसडीपीआयचा स्थानिक नेता मुझम्मिल पाशा, जफर अहमद यांना अटक केली. पण पाशा यांचा हिंसेत सहभाग नव्हता असा दावा अहमद यांनी केला आहे.
एसडीपीआयचे सरचिटणीस अब्दुल हन्नान यांनी पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही, असा आरोप केला आहे. आम्ही मंगळवारी ७ वाजता पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली होती पण त्यावेळी उपस्थित पोलिस अधिकार्यांनी आम्हाला थांबण्यास सांगितले. रात्री ११.३० पर्यंत संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले गेले नव्हते त्यामुळे परिस्थिती चिघळली असे हन्नान यांचे म्हणणे आहे.
दरम्यान काँग्रेसने या दंगलीमागे भाजप असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे नेते डी. के, शिवकुमार यांनी काँग्रेस आमदाराचा पुतण्या हा भाजपशी संबंधित असून तो भाजपला पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे.
तर काँग्रेसचे आमदार मूर्ती यांनी आपल्या घरावर आलेला जमाव सुमारे ३ हजारांचा होता व त्यांच्या हातात धारदार शस्त्रे, काठ्या, रॉड व पेट्रोल बॉम्ब होते असे सांगितले. माझा पुतण्याशी गेली १० वर्षे काहीच संबंध नाही असेही त्यांचे म्हणणे आहे.
मुस्लिम बहुल मतदारसंघातून सुमारे ८० हजाराचे मताधिक्य घेत मूर्ती २०१८च्या निवडणुकीत विजयी झाले होते.
सामाजिक कार्यकर्ते शफी अहमद यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, मूर्ती यांना मिळालेले हे यश विरोधकांना खुपणारे होते. त्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी हे प्रयत्न असू शकतात.
मूळ बातमी
COMMENTS