भगतसिंग आणि त्यांचा क्रांतिकारी विचार

भगतसिंग आणि त्यांचा क्रांतिकारी विचार

शहीद भगतसिंग हे नाव भारतात, क्रांती या शब्दाला पर्यायवाची शब्द म्हणून वापरला जातो. पण त्यांच्या क्रांती या संकल्पनेच्या आणि क्रांतिकारी कार्यक्रमाची हवी तेवढी स्पष्टता जनमानसात नाही.

शीला दीक्षित यांचे निधन
पुण्यात गोली मारो गँग – तुषार गांधी
मेहबूबा, ओमर नजरकैदेत

भगतसिंग यांना एकूण तेवीस वर्ष पाच महिने आणि काही दिवसांचेच आयुष्य लाभू शकले. भगतसिंग यांनी हौतात्म्य पत्करलं आणि शौर्याच्या काही कृती केल्या यापर्यंतच त्यांच्या क्रांतीकार्याला न बघता त्यांचा क्रांतिकारी विचार काय होता हे जाणून घेणं आजही प्रासंगिक ठरतं. त्यांनी आपल्या क्रांतीकार्याची सुरवात वयाच्या पंधराव्या वर्षापासुच केली. त्यांचा वैचारिक प्रवासही त्याच वयात सुरु झाला. स्वतंत्र भारत कसा असावा, या बद्दल ज्या कोणी राष्ट्रीय नेत्यांनी मुलभूत विचार केला त्यापैकी भगतसिंग यांचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागतं. त्यांच्या विचारकृतीने सामाजिक पुनर्रचनेचा अभिनव प्रयत्न केला होता.

‘क्रांती म्हणजे मूलगामी व्यवस्था परिवर्तन’.  मूलगामी परिवर्तन ही गोष्ट आहे ती समाजाच्या सर्वागांना व्यापते. मानवी जीवनात आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांकृतिक बदल घडवून आणणे क्रांतीमध्ये अभिप्रेत असतं.  समाजातील दबलेल्या, शोषित आणि पिडीत समूहांच्या खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याचा, मुक्तीचा विचार आणि कृतीकार्यक्रम जो कोणी व्यक्ती देते तिला आपण क्रांतिकारक म्हणतो.

महाविद्यालयीन वयात भगतसिंग यांनी प्रचंड वाचन केलं आणि स्वतःची एक दृष्टी विकसित केली. वयाच्या सतराव्या वर्षापासूनच त्यांनी लेखनाला सुरवात केली. त्यांनी विविध टोपणनावांनी ‘किरती’ (लाहोर), अर्जुन (दिल्ली) प्रताप (कानपूर), महारथी (दिल्ली) चांद (अलाहबाद) या नियतकालीकांमधून लेखन केले. भगतसिंग याचे बहुतेक लेखन अगदी १९६० च्या दशकापर्यंत उपलब्ध नव्हते. त्याचे भाऊ कुलबीर सिंग, भाचे जगनमोहन सिंग  यांनी त्यांची जेल डायरी आणि हस्तालीखिते सांभाळून ठेवली होती, जेल डायरीचे हस्तलिखीत भूपेंद्र हुजा यांनी प्रथम संपादित करून १९९४ मध्ये प्रकाशित केलं. भगत सिंग यांचे कुटुंबीय आणि काही अभ्यासकांच्या प्रयत्नामुळे आपल्याला त्यांच्या विचारांचे दर्शन घडू शकले.

वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी साप्ताहिक मतवाला मध्ये ‘युवक’ या शीर्षका अंतर्गत एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी युवकांवर क्रांतीची जबाबदारी असते असं म्हटल आहे. त्यांनी जगभरातील  क्रांतिकारकांचे दाखले देऊन सांगितले की तरुणांनी क्रांतीसाठी सज्ज झाले पाहिजे. आणि शेवटी फासावर जाण्याआधी त्यांनी ‘युवा राजकीय कार्यकर्त्यांना पत्र’ लिहिले होते. त्यांचं क्रांतीकाराकांना केलेले पाहिलं आवाहन आणि कार्यकर्त्यांना लिहिलेले शेवटचे पत्र या दरम्यानच्या काळात ठोस असा क्रांतीकार्यक्रम विकसित केला होता.

भगतसिंग यांची स्वातंत्र्याची कल्पना ही फक्त देशापुरता मर्यादित नव्हती तर ती अत्यंत व्यापक आणि वैश्विक स्वरुपाची होती. त्यांनी अवघ्या अठराव्याचं वर्षी ‘मतवाला’ मध्ये बलवंत सिंग या टोपण नावाने लिहिलेल्या ’विश्वप्रेम’ या लेखात याची विस्तृत चर्चा केली आहे. त्यांना विश्वबंधुत्वाची स्थापना करायची होती. पण राष्ट्रीय स्वातंत्र्याला ते विश्वबंधुत्वाची पूर्वअट मानतात. ते म्हणतात “विश्वबंधुता याचा अर्थ मी समानतेशिवाय दुसरा मानत नाही. जोपर्यंत काळा-गोरा, सभ्य असभ्य, शासक- शासित, धनवान-निर्धन, स्पृश्य-अस्पृश्य तोपर्यंत कुठले विश्वबंधुत्व आणि कुठे विश्वप्रेम?”

नौजवान भारत सभा आणि हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोशिएशनचं काम करत असतांना भगतसिंग यांनी १९२६ ते २८ च्या दरम्यान  ‘कुका विद्रोह’, गदर चळवळ, काकोरीच्या वीरांचा परिचय करून देणारे आणि  सुरवातीच्या क्रांतिकारकांचे हौतात्म्य आणि बलिदान यांच्या बद्दल लेख लिहिले. फक्त क्रांतीकारकांना सलाम करण्याची भूमिकाच या लेखांमध्ये नाही तर त्यांच्या विचार आणि कार्याचा आदर्श जनतेसमोर ठेवण्यासाठी भगतसिंग हे  लेख लिहित होते.

त्यांची स्वातंत्र्याची कल्पना सुरवातीच्या काळापासूनचं अगदी सुस्पष्ट होती. त्यात ब्रिटीशांचे राज्य म्हणजे वसाहतवाद. आणि साम्राज्यवाद म्हणजे काही राष्ट्रांना गुलाम बनवणारी व्यवस्था यापासून मुक्ती मिळवणे हा पहिला टप्पा होता. दुसरा टप्पा होता समाजवादावर आधारित समाजाची पुनर्निर्मिती. या दोघा आदर्शांपर्यंत पोहचण्यासाठी वैचारिक संघर्ष करावा लागणार होता. हा मुख्यतः वैचारिक संघर्ष असल्याचे त्यांचे मत होते.

भगतसिंग आणि सशत्र प्रतिकार असं जे एक समीकरण बनलं होतं त्यात भगतसिंगचं पुढील लिखाण बघितल्यास अमुलाग्र परिवर्तन झाल्याचं लक्षात येतं. बॉम्ब आणि पिस्तुलीने क्रांती होत नाही तर विचारांनी होते असे त्यांचे मत झाले होते.  ते म्हणतात “माझ्या क्रांतिकारक जीवनाचे अगदी आरंभीचे काही दिवस वगळता मी कधीच दहशतवादी नव्हतो. माझी अशी खात्री आहे, की त्या पद्धतीने आपण काहीही मिळवू शकणार नाही. हिन्दुस्थान रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या इतिहासावरून हे अगदी स्पष्ट होते. आमच्या सर्व कार्याचे उद्दिष्ट एकच होते त्या महान राष्ट्रीय आंदोलनाची सैनिकी शाखा या नात्याने आपले स्थान त्यामध्ये निर्माण करणे”.  पुढे ते म्हणतात “चिकित्सकपणा आणि विचारशक्ती हे दोन गुण क्रांतिकारकांसाठी अपरिहार्य आहे’. भारतीय क्रांतीचे बौद्धिक अंग हे नेहमीच कमकुवत राहिले यासाठीच क्रांतीकारकाने अभ्यास आणि मनन चिंतन ही आपली पवित्र जबाबदारी मानली पाहिजे.”

भगतसिंग यांच्या मते क्रांती म्हणजे केवळ एखादा उठाव किंवा रक्तरंजित लढा नव्हे. शोषणाची व्यवस्था नष्ट करून त्याच्या जागी नव्या आणि जास्त सुयोग्य पायावर आधारित अशा समाजाचा पद्धतशीर आखलेला कार्यक्रम. त्यासाठी त्यांनी नौजवान भारत सभेद्वारा लोकशिक्षणाचे अनेक प्रयत्न केले. ट्रॅक्ट (tract) सोसायटीची स्थापना केली आणि पत्रकांच्या माध्यमातून जनतेला संघटीत करण्याचे काम केले. सामान्य जनतेला बदल आणि परिवर्तनासाठी सज्ज करणे हे क्रांतिकारकांचे काम आहे असे त्यांचे मत होते. क्रांती करण्यासाठी जनताच पुढे येते. प्रत्यक्ष ज्यांना क्रांती करायची आहे असे लोक खेडेगावातील शेतकरी आणि श्रमिक आणि कारखान्यात काम करणारे कामगार आहेत. या निष्कर्षापर्यंत येण्यासाठी त्यांनी जेलमध्ये असतांना विपुल वाचन केलं. त्यांच्या जेल डायरीत जवळपास १०७ पुस्तकांची टिपणं आढळतात, भगतसिंग लाहोरच्या द्वारकादास ग्रंथालयातून पुस्तके मागवीत असत. त्यात Tolstoy, William wordsworth कार्ल मार्क्स, एंगल्स, ट्रॉट्स्की ते अप्तन सिंक्लैर, बर्ट्रांड रसेल अशा अनेक कवी, तत्वज्ञ आणि लेखकांचा समावेश होता. त्यांच्यात झालेल्या वैचारिक परिवर्तनाची कबुली देतांना ते म्हणतात, “आमच्या आधीच्या लोकांमध्ये फक्त स्वप्नाळू हिंसक कृतींवर भर होता, त्याची जागा आता गंभीर विचारांनी घेतली. गूढवाद आणि आंधळी निष्ठा विरून गेली. वास्तववाद ही आमची निष्ठा बनली. अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर करणे समर्थनीय ठरले. अहिंसा हे सर्व लोकचळवळींसाठी अपरिहार्य धोरण ठरले. हे सर्व कार्यपद्धतीविषयी झाले. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या आदर्शासाठी आम्ही लढत होतो, त्याबद्दल आम्हाला स्पष्ट कल्पना आली. त्या काळात प्रत्यक्ष कृतीच्या क्षेत्रात फारसे काम नसल्यामुळे जगातल्या क्रांत्यांमधल्या आदशांचा अभ्यास करायला भरपूर वेळ मिळाला”.

असेम्ब्ली बॉम्ब खटल्यात दिल्ली कोर्टासमोर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी साक्ष दिली, तेव्हा त्यात त्यांनी ‘आम्ही कशासाठी लढत आहोत’ याचे स्पष्टीकरण दिले आहे, “क्रांती’साठी रक्तरंजित युद्ध अनिवार्य नाही, तसेच यामध्ये व्यक्तिगत प्रतिहिंसेला कसलेही स्थान नसते. क्रांती म्हणजे केवळ बॉम्ब व पिस्तुले यांचा पंथ नव्हे. आमच्या मते क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाज-व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन. समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्यांच्या प्राथमिक हक्कांपासून वंचित ठेवले जाते. शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळाच्या कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हडपून टाकतात. दुसऱ्याचे अन्नदाते असणारे शेतकरी आज त्यांच्या कुटुंबासह एकेका दाण्यासाठी मोताद बनले आहेत. जगभरच्या बाजारपेठांसाठी कपडे उपलब्ध करून देणाऱ्या विणकऱ्याला आपले व आपल्या पोराबाळांचे शरीर झाकण्याइतकेदेखील कापड मिळत नाही. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वतः मात्र घाणेरड्या वस्त्यांत राहून आपली जीवनयात्रा समाप्त करतात आणि धनिक वर्ग मात्र चैन करतो”, अशा भयंकर विषममतेकडे भगतसिंग अचूकपणे बोट ठेवून माणसाद्वारे माणसाचे होणारे शोषण थांबेल असा समाजाची कल्पना करतात.

सामाजिक परिवर्तनाबद्दल भगतसिंग यांची भूमिका दोन पातळ्यांवर महत्वाची ठरते एक म्हणजे सामाजिक विषमता आणि दोन धर्म. यासंदर्भात त्यांची ‘मी नास्तिक का आहे’, ‘अस्पृश्यता समस्या’, ‘धर्म आणि आपला स्वातंत्र्यसंग्राम’, ‘धर्मांध दंगली आणि त्यावरील उपाय’ असे काही अत्यंत महत्वाचे लेख आहेत. धर्म आणि स्वातंत्र्यसंग्राम या लेखात धर्माची प्रासंगिकता काय आणि राष्ट्रीय आंदोलनात त्याची काय भूमिका असू शकते याची त्यांनी चर्चा केली आहे. धर्म ही खाजगी बाब आहे असं ते त्यात म्हणतात. पुढे ते रशियन लेखक टॉलस्टॉय यांची साक्ष काढत धर्माच्या विविध अंगांवर प्रकाश टाकतात.

१. धर्मातील आवश्यक बाबी- अर्थात सत्य बोलणे, चोरी न करणे, गरिबांना मदत करणे, प्रेमाने राहणे, इत्यादी.

२. धर्माविषयीचे तत्त्वज्ञान- जन्म, मृत्यू, पुनर्जन्म, विश्वाची रचना या बाबींचे तत्त्वज्ञान. यात मानव आपल्या इच्छेनुसार विचार आणि आकलन करण्याचा प्रयत्न करतो.

३) धार्मिक कर्मकांडे – रीतिरिवाज, इत्यादींचा यात अंतर्भाव होतो. धर्माचे तत्वज्ञान आणि कर्मकांड यांच्यासोबत अंधश्रद्धेचे मिश्रण होत असेल तर तशा धर्माची आपल्याला आवश्यकता नाही असं भगतसिंग म्हणतात, धर्माचे सारतत्व आणि धर्माचे तत्वज्ञान यांच्यात स्वतंत्र विचार मिळून धर्म बनत असेल तर तसा धर्म अभिनंदनीय आहे.

तत्कालीन धर्मांध दंगली बघून भगतसिंग विचलित होत होते. कारण त्यांनी जो देश घडवण्याचं स्वप्न बघितलं होतं ते समानतेवर आधारलेलं, द्वेषविरहित आणि धार्मिक सलोखा असलेला समाज अशा स्वरूपाचं होतं. त्यांनी तत्कालीन दंगलींसाठी धर्मांध नेते आणि पत्रकार यांना जबाबदार धरले होते . “लोकांना शिक्षण देणे, त्यांच्यामधील संकुचित प्रवृत्ती दूर करणे, धर्मांध भावना दूर करणे, परस्पर मिळून मिसळून राहण्याची वृत्ती वाढविणे आणि भारताची सामूहिक एकता घडविणे हे वृत्तपत्रांचे आद्य कर्तव्य आहे; पण आज त्यांनी अज्ञान वाढविणे, संकुचितता वाढविणे, धर्मांध बनविणे, मारामाऱ्या घडवून आणणे आणि भारताची सामूहिक राष्ट्रीयता नष्ट करणे हेच आपले प्रमुख कर्तव्य मानले आहे. यामुळेच भारताच्या सद्य:स्थितीचा विचार करता डोळ्यांतून रक्ताश्रू वाहू लागतात आणि हृदयात प्रश्न उभा राहतो की, भारताचे होणार तरी काय?”

परंतु पुढे भगतसिंग तरुणांना घेऊन आशावादीही आहेत. तरुण एकमेकांना धार्मिक चष्म्यातून न बघता सर्वप्रथम माणूस आणि नंतर भारतवासी म्हणून बघतात. भारतवासीयांनी या दंगलींमुळे घाबरून जाता कामा नये, तर दंगलीसाठी पोषक वातावरणच निर्माण होणार नाही, यासाठी सज्ज होऊन प्रयत्न केले पाहिजेत. असं ते म्हणतात.

अस्पृश्यता समस्या या लेखात त्यांनी अस्पृश्यता प्रश्नाबाबत अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. तत्कालीन भेदाभेदीचे उदाहरणं देऊन ते पुढे त्यांच्या राजकीय हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे असं म्हणतात. आपण सर्वांना माणूस म्हणून सारखी प्रतिष्ठा दिली पाहिजे, स्वातंत्र्य मिळवण्याची इच्छा असलेल्यांनी स्वतः प्रयत्न केले पाहिजे त्यांनी सामाजिक आंदोलनातून क्रांती उभी केली पाहिजे असा निर्णायक तोडगा भगतसिंग अस्पृश्यतेच्या समस्येवर देतात .

‘मी नास्तिक का आहे’, हा शहीद भगतसिंग यांचा गाजलेला निबंध आहे.  या निबंधाचे वैशिष्ट्य म्हणजे ते धर्मावर टीका करत नाहीत तर त्याची चिकित्सा करून तर्कशुध्द पद्धतीने विचार केला पाहिजे असं आग्रहाने मांडतात. विश्वाच्या उत्पत्तीबद्दल जाणून घेण्यासाठी चार्ल्स डार्विन यांचा ‘सजीवांची उत्पत्ती’ हा ग्रंथ वाचावा असा सल्ला ते वाचकांना देतात. वैज्ञानिक दृष्टीकोन आणि तर्कशुध्द विचार करण्यातून  उच्च प्रतीच्या मानवी नैतिकतेची प्रस्थापना करू शकतो असं त्याचं ठाम मत होतं.

उपलब्ध माहितीवरून भगतसिंग यांनी तुरुंगामध्ये असताना चार ग्रंथांचं लेखन केलं होतं असं लक्षात येत. ‘आत्मकथा’ ‘The door to death’ (मृत्यूचे द्वार’ ‘The ideal of socialism’ (समाजवादाचा आदर्श) ‘स्वाधीनता संग्राम में पंजाब का पहला उभार’. दुर्दैवाने आज त्यांची हस्तलिखितं उपलब्ध नाहीत. असं असलं तरी त्यांनी तुरुंगामधून जी पत्र लिहिली आहेत त्यातून त्यांना कुठल्या प्रकारचे राजकीय सामाजिक आणि आर्थिक बदल हवे होते त्याचा परिचय आपल्याला होतो. यात  ‘क्रांतिकारी कार्यक्रमाचा मसुदा’ आणि ‘युवा राजकीय कार्यकर्त्यांना पत्र’ हे अत्यंत महत्वाचे दस्तावेज आहेत. या दोन्ही भागात भगतसिंग क्रांतिकारी पक्ष कसा असावा, त्याची राजकीय कार्यपद्धती काय असावी, त्याने कुठली निश्चित ध्येयधोरणे आखावीत याची चर्चा केली आहे. या कार्यक्रम पत्रिकेत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे क्रांतीच्या आदर्शाशी थोडीही तडजोड न करता त्यांनी वास्तववादी भूमिका सुद्धा घेतल्या आहेत. तत्कालीन राजकीय परिस्थिती बघता त्यांनी क्रांतिकारी पक्ष बांधण्याची आवश्यकता बोलून दाखवली आहे. त्याच्या आधारे राजकीय सत्ता हातात घेणे हे पहिले काम असेल असं ते म्हणतात. आणि मग काही निश्चित मूल्यांच्या आधारावर समाजाची पुनर्रचना करायची. ही चर्चा भगतसिंग यांच्याच शब्दात बघणे अधिक उदबोधक ठरेल.

“पायाभूत कार्य- कार्यकर्त्यांसमोर सर्वांत पहिली जबाबदारी ही आहे, की जनतेला लढाऊ संघर्षासाठी तयार करणे आणि सज्ज ठेवणे, आपल्याला अंधश्रद्धा, भावनिक गोष्टी, धार्मिकता किंवा अलिप्ततेच्या आदर्शाच्या आधारे काम करण्याची गरज नाही. आपल्याला जनतेला फक्त चटणीबरोबर भाकरीचा वायदा करायचा नाही. हे वायदे संपूर्ण व ठोस असतील आणि त्यावर आपण प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे बोलू. आपण कधीही त्यांच्या मनावर भ्रमाची जळमटे जमू देणार नाही. क्रांती लोकांसाठी असेल, काही ठळक मुद्दे हे असतील

अ) सरंजामशाहीचा अंत.

(आ) शेतकऱ्यांची कर्जे रद्द करणे.

इ) क्रांतिकारी राज्यव्यवस्थेकडून जमिनीचे राष्ट्रीयीकरण ज्यायोगे सुधारित आणि सामूहिक शेती प्रस्थापित करता यावी.

ई) राहण्यासाठी घरांची हमी.

उ) शेतकऱ्यांकडून घेतले जाणारे सर्व कर बंद केले जातील. फक्त एकेरी भूमिकर घेतला जाईल.

ऊ) कारखान्यांचे राष्ट्रीयीकरण आणि देशात नवीन कारखाने सुरू करणे.

क) सार्वत्रिक शिक्षण.

ख) कामाचे तास आवश्यकतेनुसार कमी करणे.

जनता अशा कार्यक्रमाला नक्कीच पाठिंबा देईल. आता सर्वांत आवश्यक कार्य काय असेल, तर लोकांपर्यंत पोहोचणे. एका बाजूने माथी मारले गेलेले अज्ञान आणि दुसरीकडून बुद्धिजिवींची उदासीनता, यामुळे शिक्षित क्रांतिकारकांमध्ये आणि विळा हातोडा घेणाऱ्या त्यांच्या अर्धशिक्षित अभागी साथीदारांमध्ये एक खोटी भिंत उभी केली गेली आहे. क्रांतिकारकांना ही भिंत तोडावीच लागेल. यासाठी खालील कार्याची गरज आहे

(१) काँग्रेसच्या व्यासपीठाचा लाभ घेणे.

(२) ट्रेड युनियनांवर ताबा मिळवणे आणि नव्या युनियन्स व संघटनांना लढाऊ संघर्षात्मक रूपात उभे करणे.

(३) राज्य पातळीवरील युनियन करून त्यांना वरील मुद्द्यांच्या आधारे संघटित करणे. (४) जनतेपर्यंत पोहोचण्याची संधी ज्यांच्या आधारे मिळेल, अशा प्रत्येक प्रकारच्या सामाजिक व स्वयंसेवी संघटनांमध्ये (अगदी सहकारी संस्थांमध्येदेखील) गुप्तपणे दाखल होऊन त्यांचे कामकाज अशा प्रकारे चालवणे, की जेणेकरून खरे मुद्दे आणि उद्दिष्टे यांना पुढे नेता येईल.

(५) प्रत्येक ठिकाणी कारागिरांच्या समित्या, कामगार आणि बौद्धिक काम करणाऱ्यांच्या युनियन्स स्थापन करणे.”

सुरवातीला म्हटल्याप्रमाणे भगतसिंग यांना त्यांनी मांडलेला विचार संस्थांच्या स्वरूपात स्थापित करायचा होता. क्रांतिकारक त्याला म्हणतात, जो काहीतरी ठोस कार्यक्रम देतो, जो जनतेला संगठीत करतो आणि अव्याहतपणे जो लोकांना परिवर्तनाकडे घेऊन जातो. म्हणून भगतसिंग यांची ओळख कृतीशील क्रांतिकारक अशी केली पाहिजे. अशा युगप्रवर्तक विचाराकाचे अमूल्य विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत जितके ते त्यांच्या हयातीत होते.

(१७ डिसेम्बर २०२१ रोजी आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित झालेल्या व्याख्यानचा संपादित भाग.)

भाषांतरीत उद्धरणे साभार –  शहीद भगतसिंग समग्र वांग्मय – संपा. दत्ता देसाई, मनोविकास प्रकाशन, पुणे, २०१६.

मूळ दस्ताएवजांचा स्त्रोत. प्रा. चमनलाल

इतर संदर्भ :

Kama Maclen, A revolutionary history of interwar India, Penguin books, London, 2015.

  1. Irfan Habib, To make the deaf hear idealogy and programme of Bhagatsingh and his comrades, three essays collective, New Delhi, 2007.

Kuldip Nayar, without fear : life and trial of Bhagat singh, Haerper Collins, Delhi, 2000.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0