मुंबईकरांचे सखे शेजारी

मुंबईकरांचे सखे शेजारी

मुंबईसारख्या मनुष्यवस्तीच्या गर्दीच्या शहरातही जवळपास ३००च्या आसपास रहिवाशी आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या जाती आढळतात. उन्हाळ्यात ऐकू येणारे तांबट पक्षी (कॉपरस्मिथ बार्बेट), खाडीच्या प्रदेशात आढळणारे रोहित पक्षी (फ्लॅमिंगो) असोत, पावसाळ्याच्या आसपास येणारा दुर्मिळ असा तीन-बोटी खंड्या (ओरिएंटल डवार्फ किंगफिशर), किंवा धान्यांच्या दुकानांसमोरच्या चिमण्या, या सगळ्यांना मुंबई आपलीशी वाटते.

गुपित महाधनेशाचे
पक्ष्यांच्या प्रजाती लुप्त होण्याचा दर पूर्वीपेक्षा शंभर पट
माझा बदललेला पत्ता…

मुंबईच्या अगदी नमुनेदार अशा वन बीएचकेच्या खिडकीतून दिसणारे एक तुकडाभर जग. पण त्या लहानशा चौकटीतही सहजतेने मावतात अनेक रंगीबेरंगी, छोटे-मोठे, काही सुमधुर आणि काही कर्कश असे शेजारी. “तो बघ अगं, माडाच्या टोकावर भारद्वाज बसलाय. जोडी आहे त्यांची, मी बघितलीये मागच्याच आठवड्यात.” माझी आई सकाळचा चहा घेता घेता बऱ्याचदा अशी घराच्या खिडकीतून केलेली निरीक्षणे नोंदवते. या वर्षी आईला आम्ही एक दुर्बीण भेट दिली, त्यामुळे पक्षीनिरीक्षणाच्या उत्साहात अजूनच भर. पण बघायला गेलं, तर माझ्या आईसारखे काही मुंबईकर नेहमीच घराच्या आजूबाजूच्या पक्षी, प्राणी आणि झाडे यांच्यावर लक्ष ठेवत आलेले आहेत. मुंबईसारख्या मनुष्यवस्तीच्या गर्दीच्या शहरातही जवळपास ३००च्या आसपास रहिवाशी आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या जाती आढळतात. उन्हाळ्यात ऐकू येणारे तांबट पक्षी (कॉपरस्मिथ बार्बेट), खाडीच्या प्रदेशात आढळणारे रोहित पक्षी (फ्लॅमिंगो) असोत, पावसाळ्याच्या आसपास येणारा दुर्मिळ असा तीन-बोटी खंड्या (ओरिएंटल डवार्फ किंगफिशर), किंवा धान्यांच्या दुकानांसमोरच्या चिमण्या, या सगळ्यांना मुंबई आपलीशी वाटते. हे मुंबईकरांचे शेजारी अनेकदा त्यांचे मित्र होऊन जातात. असेही काही लोक आहेत ज्यांमध्ये विशेषतः कावळे, चिमण्या, आणि खारी यांच्याबद्दल खास स्नेहभाव असतो. असं कदाचित यामुळेही असेल की मुंबईच्या धावपळीच्या जगात अशा प्राण्यांना पाहून काही क्षण विसावा आणि आनंद मिळतो.

लाल बुडाचा बुलबुल

लाल बुडाचा बुलबुल

कबुतर, मैना, पोपट आणि चिमण्या यांच्याशिवाय खास शहरांमध्ये सापडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक म्हणजे बुलबुल. लाल बुडाचा बुलबुल आहे तसा लहानसा पक्षी पण त्याचा आवाज मात्र अगदी खणखणीत आणि मधुर. त्याच्या खणखणीत आवाजामुळेच कंदाची हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलं असावं –

उड़ें अज्ञात दिशा की ओर पखेरू प्राणों के पर खोल, सजग करती जगती को आज, रही बुलबुल डालों पर बोल!”

थोडंसं लक्ष दिलं तरीही या पक्ष्यांचा कलकलाट मुंबईच्या गोंगाटातही सहज ऐकू येतो. बुलबुल इतर पक्ष्यांपेक्षा वेगळा दिसतो तो त्याच्या काळ्या डोक्यावरच्या छोट्याशा शेंडीमुळे. आणि अर्थातच त्याच्या लालेलाल बुडामुळे. कीटक, फळे, फुले इत्यादी या पक्ष्याचे मुख्य खाद्य आहे, त्यामुळे तो सहसा बागांच्या आसपास जास्ती प्रमाणात आढळतो. बगिच्यांमध्ये, सार्वजनिक उद्यानांमध्ये आणि मोठ्या बिल्डिंग कॉम्प्लेक्समध्ये लावलेल्या फुलझाडांच्या जवळपास दिसणारा अजून एक अतिशय सुंदर पक्षी म्हणजे सनबर्ड किंवा पंचरंगी सूर्यपक्षी (पर्पल-रम्पड सनबर्ड). मागच्याच  महिन्यातच आमच्या ५ व्या मजल्यावरच्या फ्लॅटच्या खिडकीत या पक्ष्यांची एक जोडी येत असे. या जातीच्या पक्ष्यांमधील नर आणि मादा दिसायला वेगवेगळे असतात आणि त्यामुळे सहज ओळखू येतात. पंचरंगी सूर्यपक्ष्याचा नर हा अधिक रंगीबेरंगी असतो. त्याच्या डोक्याच्या बारच्या बाजूचा भाग हा चमकदार निळ्या-हिरव्या रंगाच्या छटांचा असतो तर गळ्याखालचा भाग गडद जांभळा, आणि उरलेले शरीर पिवळ्या आणि करड्या रंगाचे असते. मादा मात्र अधिक सौम्य पिवळसर करड्या रंगाची असते. या पक्ष्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांची लांब, वाकलेली चोच. या चोचीचा वापर करून सूर्यपक्षी फुलांमधील मध पिऊ शकतात आणि त्या शिवाय लहान आकाराचे कीटक आणि कोळी पकडतात.

पक्षी निरीक्षणासाठी कधी कधी एक खिडकीही पुरेशी असते

पक्षी निरीक्षणासाठी कधी कधी एक खिडकीही पुरेशी असते

अशा रंगीबेरंगी पक्ष्यांशिवाय इतर सामान्य आणि सर्वत्र आढळणारे पक्षीही शहरातील पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. उदाहरणार्थ, घारी शहरातील कचरा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. छोटे सस्तन प्राणी आणि पक्षी, स्वयंपाकघरातील कचरा, हाडे इत्यादी यांचे मुख्य खाद्य. त्यामुळे बऱ्याचदा डम्पिंग ग्राऊंडच्या जवळ हे रुबाबदार पक्षी दिसतात. त्याचप्रमाणे पांजरा किंवा बार्न आऊल नावाचे छोटे घुबड हे उंदीर आणि घुशी यांचे प्रमाण कमी ठेवण्यास मदत करते. पण उंदीर-घुशी मारण्यासाठी वापरण्यात येण्याऱ्या विषामुळे आणि कीटकनाशकांमुळे ह्यांना बराच त्रास सहन करावा लागतो. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या अंधेरी जवळच्या भागात आम्हाला बऱ्याचदा रस्त्यावर मरून पडलेली घुबडे मिळत. कधी कधी अर्धमेल्या अवस्थेत, दिशेचे भान गेलेल्या अवस्थेत मिळत. मग लक्षात आले की हे त्या भागात वापरल्या जाणाऱ्या उंदरांसाठीच्या विषामुळे होत होते. त्यामुळे आपण जेव्हा एखादा पक्षी पाहतो, तेव्हा त्याचे पर्यावरणाशी असलेले नातेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

"टुक, टुक" अशा सततच्या गाण्यामुळे नाव पडलेला तांबट पक्षी मुंबईत उन्हाळ्यात सहज दिसतो.

“टुक, टुक” अशा सततच्या गाण्यामुळे नाव पडलेला तांबट पक्षी मुंबईत उन्हाळ्यात सहज दिसतो.

शहरातील अजून एक सामान्य पण अतिशय मोहक असा पक्षी म्हणजे बगळा. बगळ्यांचे विविध प्रकार मुंबईत आढळतात. त्यात गायबगळे आणि छोटे बगळे जास्त प्रमाणात आढळून येतात. पाण्याच्या आसपास, तसेच गवताळ प्रदेशात (उदाहरणार्थ आरे कॉलनी) यांचा जास्त वावर असतो कारण यांचे खाद्य आहे छोटे मासे आणि कीटक. रुस्टींगच्या  वेळी म्हणजेच विसावा घेण्याच्या वेळी उंच आणि मोठ्या झाडांच्या टोकावर जाऊन बसतात. एकदा मे महिन्याच्या तीव्र उन्हामध्ये मला एक रस्त्यावर पडलेला बगळा मिळाला. मी त्याला उचलून घरी आणले. उन्हामुळे बहुतेक त्याला हीट स्ट्रोक किंवा डिहायड्रेशन झाले असावे असे आम्हाला वाटले. मग त्याला थोडे साखरेचे पाणी दिले आणि थंड अंधाऱ्या जागी ठेवले. आम्ही सकाळी उठलो तेव्हा बगळ्याला थोडी तरतरी आली होती आणि तो चक्क सोफ्यावर चढून बसला होता, अगदी ऐटीत. आईने त्यामुळे त्याचे नामकरण ‘रावसाहेब’ असे केले. पुढचे दोन दिवस आम्ही रावसाहेबांना छोटे मासे खाऊ घातले, पाणी पाजले, आणि मग जिथे मिळाले होते तिथे परत सोडले. अजूनही त्याची लांब मान, पांढरे शुभ्र शरीर आणि त्याच्या मोहक हालचाली आम्हा सगळ्यांच्या लक्षात आहेत.

मुंबईत सहज आढळून येणारे अजून काही खास पक्षी म्हणजे हिवाळ्याच्या काळात जास्त दिसणारा पिवळाधम्मक हळद्या (गोल्डन ओरिओल), लहानसा, झुडुपांमध्ये आढळणारा शिंपी पक्षी (टेलरबर्ड), पहाटेच्या वेळी जास्त सहज दिसणारा, शेपटी फुलारून उद्या मारणारा नाचण (फॅनटेल फ्लायकॅचर), आणि लांब शेपटी वर-खाली करणारा धोबी पक्षी (वॅगटेल). धोबी पक्ष्याचे खास मालवणी नाव मला आईकडून कळले. एकदा तिच्या नेहमीच्या खिडकीतून दिसणाऱ्या खाजणावर नजर टाकताना ती म्हणाली – “अगं, तो बघ तिकडे मातीच्या वाटेवर एक बोचेमुरडू बसलाय.” थोडे अश्लील वाटत असले, तरीही त्या पक्ष्याला अगदी अनुरूप  वाटणारे नाव ऐकून मला हसू आले. हे धोबी पक्षी बऱ्याचदा पाण्याच्या जवळपास आढळतात आणि ते सतत त्यांची शेपूट धोब्याच्या सोट्याप्रमाणे वर-खाली करतात, कदाचित त्यामुळेच त्यांना धोबी असे नाव ठेवण्यात आले असावे. पण बोचेमुरडू खासंच, न विसरता येण्याजोगं, नाही का?

आमच्या आईच्या उत्साहामुळे कुटुंबातील इतर सदस्यही हळूहळू पक्षीनिरीक्षण करायला लागले आहेत. पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी शहरी भागातील लोकांनी आपसापात बोलणे आणि त्यांच्या घरच्याच नाहीत तर हृदयाच्या खिडक्या उघडणे महत्त्वाचे आहे. एवढे सुंदर आणि साधे जीव आपल्या आजूबाजूला असताना आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपले आयुष्य अधिक चांगले करण्याची आणि आपल्या पर्यावरणाची थोडीफार जबाबदारी घेण्याची, तसेच निसर्गाशी नाते जोडण्याची एक महत्त्वाची संधी चुकवणे आहे असे मला वाटते. मुंबईकरांचे तसे या बाबतीत चांगले नशीब आहे, अजूनही हे शहर छोट्या-मोठ्या अनेकविध प्राणी पक्ष्यांनी भरलेले आहे. पण ज्या वेगाने इथली उद्याने, आरे कॉलनीसारख्या जागा, जंगलं आणि खाडीजवळील खाजणाचे भाग कमी होत आहेत, ते लक्षात घेता कदाचित फक्त पक्षीनिरीक्षण नाही तर पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि मुंबईसाठी अजून मोठी पावले घेणे पुढच्या काळात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

ओवी थोरात, आंध्र प्रदेशमधील क्रिया विद्यालयात पोस्ट-डॉक्टरेटसाठी संशोधनाचे आणि पर्यावरणाविषयीच्या शिक्षणाचे काम करत आहेत.

(सर्व छायाचित्रे – ओवी थोरात) NatureNotes

ही मालिका ‘नेचर कजर्वेशन फाउंडेशन‘ द्वारे राबवलेल्या ‘नेचर कम्युनिकेशन्स‘ या कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहण्याची तुमची इच्छा असल्यास खालील फॉर्म भरा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0