माझा बदललेला पत्ता…

माझा बदललेला पत्ता…

रेषाळ (पट्टेवाला) गवती वटवट्या या नावातच हा पक्षी गवताळ प्रदेशात रहाणारा असावा असे समजते, ते खरे ही आहे. पण याचे शास्रीय नांव याचा खराखुरा अधिवास सांगते. Megalurus Palustris म्हणजे लांब शेपटीचा पाणथळ गवती परिसरात अधिवास करणारा, असे म्हणता येईल. याचाच अर्थ हा पक्षी गवताळ माळरानात सापडत नाही.

गुपित महाधनेशाचे
मुंबईकरांचे सखे शेजारी
‘सांभर’मधील पक्ष्यांच्या मृत्यूंच्या कारणाबाबत मतभेद

मी देवभूमीकडचा रेषाळ (पट्टेवाला) गवती वटवट्या. नुकताच माझा पत्ता बदललाय. मी तापीखोऱ्याचा रहिवासी झालोय. मला तापीखोरे चांगलच भावलंय. मी महाराष्ट्राचा झालोय.

मी मराठी झालोय.

मी मराठी म्हणत अभिमानाने जगणाऱ्या मराठी माणसास जेव्हा देवभूमीचा वटवट्या तापीखोऱ्यात हजेरी लावून म्हणतो, मी पण मराठी. तेव्हा खरंच याचा अभ्यास करायलाच हवा, असे सारखं वाटू लागले.

महाराष्ट्रातच नाहीतर मध्य भारताला याचा सुगावा २०१७ पासूनच लागला होता. तापी खोरे या पक्ष्याची जोपासना करीत होते.

Striated Grassbird,  (Megalurus Palustris) रेषाळ गवती वटवट्या

माझ्या आजवरच्या पक्षीनिरीक्षणाने मला बरेच शिकविले. माझ्या नियमित (Patch Birding) परिसर पक्षीनिरीक्षणाने मला  नवनवीन पक्षीविश्व बघावयास मिळाले. त्यातूनच महाराष्ट्राला स्मरला “गवती वटवट्या.”

‘गवती वटवट्या’

मला दिसलेला गवती वटवट्याचे प्रमाणित नांव Striated GrassBird ( स्ट्राइटेड ग्रासबर्ड) आणि शास्रीय नांव Megalurus Palustris आहे. मी यास “पट्टेवाला / रेषाळ ” गवती वटवट्या म्हणतोय. Striated चा ही अर्थ पट्टे असलेला असा होतो. यानिमित्ताने या वटवट्याचे ही पक्षीतज्ज्ञांनी मराठीत बारसे करणे अपेक्षित आहे.

रेषाळ (पट्टेवाला) गवती वटवट्या या नावातच हा पक्षी गवताळ प्रदेशात रहाणारा असावा असे समजते, ते खरे ही आहे. पण याचे शास्रीय नांव याचा खराखुरा अधिवास सांगते. Megalurus Palustris म्हणजे लांब शेपटीचा पाणथळ गवती परिसरात अधिवास करणारा, असे म्हणता येईल. याचाच अर्थ हा पक्षी गवताळ माळरानात सापडत नाही.

आपले पक्षीनिरीक्षण लहानपणापासूनच सुरू होते आणि माझे ही तसेच झाले. पण शिक्षण, नोकरी, छोकरी,मु लं यातून वेळ काढत हे चालूच होते. उघड्या डोळ्यांनी केलेली नियमित पक्षीनिरीक्षणे नंतर कधीतरी कामात येतील यांची कल्पना नसतानांच कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात रूजू झालो. आजूबाजूचा कालव्यांचा परिसर, दलदल आणि चारही बाजूला पसरलेली जंगले मला शांत बसू देत नव्हती. जंगल भ्रमंतीसह माझी पक्षीनिरीक्षणाची ओढ वाढत गेली. पक्षीमित्रांची ओळख होत असतांनाच भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर येथे बदली झाली. मी माझ्या लहानपणच्या तापीखोऱ्यात परतलो होतो. सारी जुनी ठिकाणे पुन्हा फिरू लागलो जेथे माझे लहानपणचे मित्र भेटू लागले. पण आता मी त्यांना नावाने ओळखू लागलो होतो. येथे येताच सवड न दवडता मी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर हा परिसर पक्षीअभ्यासासाठी निवडला. आणि अथक प्रयत्नांतून आज सलग पाच वर्षांच्या पक्षीनोंदी उपलब्ध झाल्यात. या अभ्यासातून रेषाळ (पट्टेवाला) गवती वटवट्या मी महाराष्ट्रातील पक्षीमिंत्रासमोर आणत आहे.

खरतरं माझी मुलगी लौकिकाने सर्वप्रथम शिंप्याचे पारिजातकावरील घरटे दाखवून माझी पक्षीनिरीक्षणे वाढवलीत.

रेषाळ (पट्टेवाला) गवती वटवट्याच्या मागावर ही आम्ही दोघे परिसर पक्षीनिरीक्षणे सुरू झाल्यापासूनच होतो. नियमित विविध अधिवासांना भेटी देतांना तापी खोऱ्यात Locustellidae म्हणजे किटक खाणारा गायक पक्षी आढळला. पण अपूर्ण माहिती आणि संसाधने यामुळे यावर लगेच शिक्कामोर्तब करता आले नाही. ७ डिसेंबर २०१७ ला हा काहीसा नवीन पक्षी झुडपाच्या शेंड्यावर बसून आवाज देत असतांना बघताच उत्सुकता वाढली. कोण असेल बरं हा? याला ओळखण्यासाठी काय करता येईल म्हणून भ्रमणध्वनीवर त्यांच्या आवाजाची नमुने घेतले. बऱ्याच पक्षीमित्र आणि अभ्यासकांना ती ऐकविली आणि मिशीवाला गवती वटवट्या असावा असे निष्पन्न निघाले. पण नंतरच्या भेटीत आणि थोड्या अभ्यासानंतर हा तो नव्हेच या निर्णयापर्यंत मी पोहचलो. पुन्हा निरीक्षणे वाढवावी लागणार होती पण साहेब सहा-आठ महिने उपस्थिती दाखवत नव्हते. म्हणजे वेळखाऊ काम होते. २०१७ ते २०२१ अशी पाच वर्षे मी आणि माझी मुलगी याच्या मागावर आहोत.

२०१९च्या शेवटाला साहेबांच्या उपस्थितीची चाहूल लागली होती पण खात्री देता येत नव्हती. त्यामुळे ठराविक अधिवासांना भेटी देण्याचे प्रमाण वाढविले. रेषाळ (पट्टेवाला) गवती वटवट्या असल्याची खात्री झाल्यावर २५ जानेवारी २०२० ला अगदी सकाळी तापी खोऱ्यात पोहचलो. पाच किलोमीटरचा परिसरातील चप्पा चप्पा धुंडाळला आणि अचानक साहेबांचे दर्शन झाले.

आजूबाजूला खोल पाणी आणि दाट पाणगवत, पाण वनस्पतीत हा लपलेला होता. प्रत्येकी २०-२५ मिनिटांच्या कालावधीनंतर हा बाहेर येत असे आणि मिनिटभर आवाज देऊन पुन्हा नाहीसा होत असे. त्यामुळे सतत वाट बघून छायाचित्रे आणि आवाजाचे नमुने घेणे जिकिरीचे झाले होते. प्रत्येकी २० मिनिटानंतर फक्त मिनिटभर दर्शनचा लाभ याप्रमाणे ५ तास एकाच जागी ऊभे राहून छायाचित्रण, चलचित्रण आणि आवाजाचे नमुने घेत राहिलो. दुपारचे २ वाजलेले, घरून काळजीचे फोन सुरू झाले पण साहेबरावांनी संमोहित केले होते. एकाच जागी तिष्ठीत उभा होतो. आणि ५ तासांच्या खात्रीशीर मेहनतीनंतर महाराष्ट्रातील रेषाळ (पट्टेवाला) गवती वटवट्याच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब होणार याची खात्रीही झाली होती.

स्वतःची खात्री झाल्यावर महाराष्ट्रातील पक्षी अभ्यासक, पक्षी तज्ज्ञ यांना जमापुंजी सादर करून खातरजमा केली. या वटवट्याच्या जुन्या नोंदी पण कळल्या. निरीक्षणे सुरूच होती. मे-जून महिना उजाडत एकाचे दोन आणि दोनाचे चार अशा ४ वटवट्यांची नोंद एकाचवेळी झाली.

त्यामुळे ऑक्टोबर ते जून या काळात हा वटवट्या आपल्या अस्तित्वाची नोंद देत असून फेब्रुवारी ते मे-जूनपर्यंत विणीचा हंगामही पार पाडीत आहे. सततच्या लपाछपीने संख्येचा अंदाज येत नव्हता. पण ३१ मे आणि १ जून २०२०ला एकाच वेळी ४ वटवट्यांना कॅमेरात कैद करण्यात यश मिळाले.

आजपावेतो एकाचवेळी एकाच ठिकाणी ९ पक्षी असल्याची खातरजमा झालीय. माझ्या परिसरातील १५-२० किलोमीटरच्या तापीखोऱ्यात यांच्या नोंदी मिळत आहेत.

हा गवती वटवट्याच्या भारताच्या उत्तर पूर्व भागात नोंदी आहेत. पण मध्य भारतात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात याची eBird India Platform नुसार नोंद नसल्याचेही अभ्यासले. गेल्या ५ वर्षांच्या अभ्यासपूर्ण निरीक्षणांतून अजून बरीच माहितीसमोर येईलच.

eBird ने ही भुसावळच्या तापीखोऱ्यातील (पट्टेवाल्या/रेषाळ) गवती वटवट्याच्या अस्तित्वाची अधिकृत दखल घेतली आहे. https://ebird.org/india/species/strgra1

तर अशा या २२ ते २५ से.मी. आकाराच्या (पट्टेवाला) गवती वटवट्या – StriatedGrassbird – (Megalurus Palustris) ने उत्तरपूर्व भारतासह मुख्यत्वे महाराष्ट्रातही आपल्या अस्तित्वाची नोंद दिली आहे.

सोबत दिलेल्या छायाचित्राप्रमाणे आणि नावाप्रमाणे लांबशेपटीचा उथळ पाणलोट क्षेत्रातील पाण गवतात राहणारा हा पक्षी लालसर तपकिरी रंगछटेचा असतो. डोक्यावर ही याच रंगाची छटा असते. भुवई पांढरट रंगाची जाड रेषेने व्यापलेली असते. छातीवर बारीक तपकिरी रेषा दिसतात. पाठीच्या भागावर याच तपकिरी काळसर रेषा स्पष्ट आणि जाड होत जातात. वयस्क पक्ष्यांच्या लांब शेपटीवर काळ्या ठसठशीत रेषेच्या भोवताली लालसर तपकिरी पट्ट्यांची सलग रांग असल्याचेही जाणवते, म्हणूनच की काय आंग्लभाषेतील नावानुसार याला पट्टेवाला/रेषाळ गवती वटवट्या म्हणावेसे वाटते. याचे नानाविध आवाज ऐकण्याचाही योग आला. काही वेळा आवाज तर देत असतो पण आपल्याला स्पष्ट ऐकू येत नाहीत. त्यांचे मंजुळ गाणे, धोक्याच्या सूचनात्मक आवाजाचे नमुने उपलब्ध झाले आहेत.

आयूसीएन रेड लिस्ट (IUCN RED LIST)-२०१६ नुसार हा गवती वटवट्या LC- Least Concern category मध्ये जरी येत असला तरी IUCN- अंदाजे संख्या या विषयावर “माहिती उपलब्ध नाही” म्हणत आहे. त्यामुळे उत्तरपूर्व भारत आणि भारताच्या पूर्वेकडील देशांमध्ये अस्तित्वात असलेला पक्षी महाराष्ट्रात दिसणे आणि तेही औष्णिक विद्युत केंद्राजवळील परिसरात दिसणे ही माझ्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरते.

अधिवास तर समजला, संख्येतही वाढ दिसत आहे, त्यामुळे पुढील अभ्यासाची दिशा ठरविता येणार आहे.

अधिवासात असणारे संभाव्य धोक्याविषयी पण बोलता येईल. येथे गाळपेरा भागातील माती वीट भट्ट्यांसाठी नेली जाते. रेतीचे उत्खनन केले जाते. जनावरे चारा शोधत पाण्यामध्ये तुंबण्यासाठी येत असतात. या शिवाय मुंगुस, साप, शिकारी व इतर पक्षी यांचेही अस्तित्व या परिसरात आहे. भुसावळ शहरासाठी पाण्याची आवर्तने हतनुरमधून सोडली जातात. त्यावेळी पाण्याची पातळी वाढल्याने गवती वटवट्यास आपली जागा सोडावी लागते.

भुसावळ औष्णिक केंद्र आणि पुढे भुसावळ शहराचे पाणी त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ दीपनगर प्रशासनासह नेहमीच जागृत असते.

तर असा हा (पट्टेवाला) रेषाळ गवती वटवट्या भविष्यात अजून बरीच गुपितं सांगणार आहे.

लक्ष्मीकांत राजाराम नेवे, सरकारी विद्युत निर्मिती क्षेत्रात कार्यरत असून पक्ष्यांचा शास्त्रीय अभ्यास करण्याची आवड आहे.) [email protected]

कृपया या गवती वटवट्याविषयी कोणा पक्षीमित्रांच्या पूर्वीच्या नोंदी असल्यास संदर्भासह वरील इ-मेलवर पाठवाव्यात. NatureNotes

ही मालिका ‘नेचर कजर्वेशन फाउंडेशन’ द्वारे राबवलेल्या ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहिण्याची तुमची इच्छा असल्यास खालील फॉर्म भरा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0