भाजपकडून मत्सराच्या विषाणूचा प्रसार – काँग्रेसची टीका

भाजपकडून मत्सराच्या विषाणूचा प्रसार – काँग्रेसची टीका

नवी दिल्ली : देशभर पसरलेल्या कोरोना विषाणूविरोधात एकजूट व सामूहिक लढाईची गरज असताना भाजप हा धार्मिक तेढ व मत्सराचा विषाणू पसरवत असल्याचा गंभीर आरोप का

‘राजकीय संन्यास घेईन पण भाजपशी युती नाही’
आरोपामुळे वानखेडेंचीच एनसीबीकडून चौकशी
अमरिंदर सिंग यांची ‘पंजाब लोक काँग्रेस पार्टी’

नवी दिल्ली : देशभर पसरलेल्या कोरोना विषाणूविरोधात एकजूट व सामूहिक लढाईची गरज असताना भाजप हा धार्मिक तेढ व मत्सराचा विषाणू पसरवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी केला. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी संबोधले. या संवादात केंद्रातील भाजप सरकारकडून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी व शेतकर्यांसाठी केंद्राने तत्काळ मदत जाहीर करावी अशीही विनंती त्यांनी केली.

लॉकडॉऊनच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील १२ कोटी जनता बेरोजगार झाली. या बेरोजगारांच्या खात्यात ७,५०० रु. जाण्याची गरज होती. पण काँग्रेसच्या या सूचनेकडे सरकारने जाणूनबुजून दुर्लक्ष केले. उलट भाजपकडून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचे काम सुरू आहे. या घडीला देशात कोरोनाविरोधात सामूहीक लढाईची गरज आहे पण या पक्षाकडून धार्मिक तेढ व मत्सराचे विषाणू पसरवले जात असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.  आता देशातील सामाजिक सौहार्द जेवढे बिघडवले जाईल त्याचे नुकसान भरून काढण्यासाठी काँग्रेस पक्षाला व सर्वांनाच मोठी मेहनत घ्यावी लागेल, असेही त्या म्हणाल्या.

सोनिया गांधी यांनी सरकारच्या प्रयत्नांवर टीका करताना कोरोना महासाथीचा फटका बसलेल्या शेतकरी, मजूर, स्थलांतरित, असंघटित क्षेत्रातील श्रमिक या घटकांचा उल्लेख करत या वर्गासाठी सरकारने वेळीच पावले उचलली नसल्याचे म्हटले. लॉकडाऊनमुळे वाणिज्य, उद्योग व व्यापार पूर्णपणे ठप्प झाला आहे व कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला आहे, त्यांच्यासाठी सरकारने अत्यंत अल्प मदत केली आहे पण ती करतानाही सरकारच्या भूमिकेत करुणा, विशाल मन, संवेदना दिसून आली नाही असे त्या म्हणाल्या.

पंतप्रधानांचे काँग्रेसच्या सूचनांकडे दुर्लक्ष

सोनिया गांधी यांनी आपल्या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करत मोदींनी काँग्रेसने केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. कोरोना संसर्ग शोधण्यासाठी अधिकाधिक चाचण्यांची गरज आहे व बाधितांचे विलगीकरण करणे गरजेचे आहे पण सरकारकडे कोरोना चाचणी किटची कमतरता आहे व जी आहेत त्यांची गुणवत्ताही खराब आहे. या घडीला लॉकडाऊनमुळे शेतकर्यांपुढे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. सरकारने शेतमालाच्या किमान दराबाबत स्पष्ट असे काही निर्णय घेतलेले दिसत नाहीत. १२ कोटी बेरोजगार लोकांना कोणतीही आर्थिक मदत नाही, अशा नागरिकांच्या खात्यात ७,५०० रुपये सरकारने भरण्याची गरज आहे. कारण हाच वर्ग देशाच्या जीडीपीतील एक तृतीयांश योगदान देतो. त्यांचे आर्थिक नुकसान टाळायचे असल्यास त्यांच्यासाठी विशेष पॅकेजची गरज आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

या संवादात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या कठीण काळात राज्य व केंद्र यांच्यात योग्य सहकार्य असण्याची गरज असल्याचे सांगितले. देशातील संसाधनांच्या उपलब्धतेवर कोरोनावरचा विजय अवलंबून असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

राहुल गांधी यांनी या संवादात स्थलांतरित मजुरांचा मुद्दा उपस्थित करत लॉकडाऊन हे पॉज बटन आहे असल्याचे सांगितले. देशात जेथे हॉट झोन आहेत तेथे लॉकडाऊन करण्याची गरज असून ग्रीन झोनमध्ये संपूर्ण व्यवहार सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा अशी विनंती त्यांनी केली.

दरम्यान सोनिया गांधी यांच्या आरोपावर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. आमचा पक्ष विभाजनाचे राजकारण करत नसून कोविड-१९च्या विरोधात एकजुटीने लढत आहे. या बिकट परिस्थितीत काँग्रेसने हलक्या दर्जाचे राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0