काळा तेंडुलकर

काळा तेंडुलकर

जयंत अस्सल होता आणि मातीचाही होता. सोन्याचे पत्रे चिकटवून घेण्याचा त्याचा कधीही अट्टहास नसायचा. तो मातीचा होता म्हणूनच अस्वस्थतेची बीजं त्या मातीत रूजून उगवून येत आणि मातीचा होता म्हणूनच कधीकधी त्याच्याशी वाद घालण्याइतका त्याचा रागही येत असे.

‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात तरुणांची निदर्शने
‘मलाही जातीय शक्तींना गोळ्या घालायच्या आहेत’
पंतप्रधान तुरुंगाच्या वाटेवर…

कधीतरी गमतीत, थट्टामस्करीच्या मूडमध्ये जयंतला मी म्हटलं, की तू आमचा काळा तेंडुलकर आहेस. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. म्हंजे काय? असा घोगरा प्रश्न पाठोपाठ आला. म्हटलं, की म्हंजे तू आपल्या पिढीतला प्रतिभावान लेखक आहेस… तेंडुलकरांच्या तोडीस बसू शकशील पुढेमागे असा. म्हणून आमचा तेंडुलकर. पण काळा का म्हटलंस? जयंतनं पिच्छा न सोडता विचारलं. तू ‘तें’ सारखा गोरा नाहीस म्हणून हे माझं उत्तर ऐकून ‘आयला’ असं टीपिकल उद्गारून जयंत मनापासून हासला. ते हासणं माझ्या बोलण्याला होतं, की तेंडुलकरांशी केलेल्या तुलनेला होतं हे माहीत नाही. आता अलीकडे तेंडुलकरांवरील ‘बापमाणूस’ हे पुस्तक वाचताना जयंतचा लेख समोर आला. तो वाचता वाचता एका उल्लेखापाशी थबकले. काळा तेंडुलकर हा तो उल्लेख. सुरेश गोसावी या सहकाऱ्याला काळा तेंडुलकर म्हणत असू असं जयंतनं त्यात लिहिलंय. किंचित हासू फुटलं… वाटलं आत्ता फोन करून जयंतला काळा तेंडुलकर अशी‌ हाक मारावी. पण हात उचलेनात. कॅन्सरशी झुंज देत असलेला जयंत डोळ्यांसमोर उभा राहिला. एक खिन्न उदासी दाटली, आयला…. आणि सोबत त्याचं हासणं कानांत गुंजत राहिलं.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या आमच्या कार्यालयात चहा पिता पिता अशा त्याच्याशी अशा वरवर फुटकळ वाटणाऱ्या गप्पा हा माझ्यासाठी रिलॅक्स होण्याचा भाग होता. या बडबडीत चेष्टा मस्करी असायची आणि त्याचबरोबर चालू घडामोडींवर, छोट्या-मोठ्या वादविवादांवर आपापली मतं मांडणंही असायचं. आमची दोस्ती केवळ कार्यालयीन सहकार्यापुरती मर्यादित नक्कीच नव्हती. बाहेरच्या जिवंत जगात आमचं मतैक्य असण्याच्या, सोबत असण्याच्या अनेक गोष्टी होत्या. एकमेकांना सामावणारी अनेक वर्तुळं होती.

जयंत साधारण ९७-९८च्या सुमारास ‘लोकसत्ता’तून ‘मटा’मध्ये दाखल झाला. कमलाकर नाडकर्णी निवृत्त होत होते आणि जयंत पवार हाच ‘मटा’चा पुढील नाट्यसमीक्षक असायला हवा अशी त्यांची जोरदार शिफारस होती. जयंतचा ‘लोकसत्ता’मधील कॉलम, त्याही आधी ‘महानगर’मधील लेखन, त्याच्या एकांकिका यातून त्याचा चांगलाच परिचय होता. नाट्यवर्तुळात होणाऱ्या सेमिनारमध्ये जयंतचं पेपर वाचन किती प्रगल्भ असे हे नाडकर्णींच्या कौतुकपूर्ण वर्णनातून ऐकत असू. असा हा जयंत पवार आपला कार्यालयीन सहकारी असणार याचा आनंद निश्चितच होता. तो दैनंदिन सहकारी झाल्यानंतर लगेचच्या काही वर्षांत त्याचं ‘अधांतर’ हे नाटक रंगभूमीवर आलं. माझा जोडीदार मनोहर कदम ते पाहून आतून प्रचंड हालला होता. नाटक, नाटकातील संवाद, पात्रं हे सारंच अस्सल होतं. नाटकातील एका प्रसंगात जावई (अनिल गवस ते काम करीत) हातात पेढ्याचा पुडा केविलवाणा धरत बसकण मारत ‘आऱ्या झाला’ म्हणत कपाळ बडवतो… अंगावर येणारा हा प्रसंग. मनोहर म्हणाला, ‘जयंता अस्सल या मातीतला आहे गं… आऱ्या झाला हा शब्दप्रयोग असाच माणूस वापरू शकतो!’

जयंत अस्सल होता आणि मातीचाही होता. सोन्याचे पत्रे चिकटवून घेण्याचा त्याचा कधीही अट्टहास नसायचा. तो मातीचा होता म्हणूनच अस्वस्थतेची बीजं त्या मातीत रूजून उगवून येत आणि मातीचा होता म्हणूनच कधीकधी त्याच्याशी वाद घालण्याइतका त्याचा रागही येत असे. त्याच्या स्वतःच्या अशा पक्क्या भूमिका असत आणि एका हद्दीनंतर तो समोरच्या व्यक्तीशी वाद घालणं सोडून देत त्याच्या अल्पाक्षरी शैलीत ‘बरं’ असं म्हणत चेहऱ्यावर सूक्ष्म नाराजी दर्शवत आपल्या वाटेनं चालू पडे. थोडं खोलात सांगायचं, तर देशातील २०१४च्या सत्तांतरानंतर वाढलेला धर्मांध उन्माद, धोक्यात येत चाललेले माध्यमस्वातंत्र्य याचा निषेध म्हणून देशभरातील आणि महाराष्ट्रातीलही साहित्यिकांनी सरकारी पुरस्कार परत केले. या कृतीची सुरुवात हिंदी लेखक उदय प्रकाश यांनी केली. उदय प्रकाश हे खरं तर जयंतचे आवडते लेखक. त्याचे काही मित्र त्याला मराठीतील उदय प्रकाश असं चिडवतही. तो भाग जाऊ दे. पण मराठीतही अनेक मान्यवर लेखकांनी हीच भूमिका घेतली. जयंतकडे सारे अपेक्षेने बघत होते. पण त्याची भूमिका वेगळी होती. आपलं लेखन हाच आपला निषेध अशी काहीशी ती‌ होती. त्याने सरकारला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जाणीव करून देणारं एक सखोल पत्र तयार केलं. त्यावर लेखक- कलावंतांच्या सह्या घेतल्या. पुढे त्याच्या पुढाकाराने अशी पत्रकं वेळोवेळी निघाली. आझाद मैदानावर लेखक- कलावंतांचं निषेध धरणंही आयोजित झालं. मीही त्यात सहभागी होते. पण मेट्रो रेल्वेचे पत्रे ठोकलेल्या मैदानाच्या एका कोपऱ्यात भोवऱ्यासारखं स्वतःशीच गरगरत राहणारा असा निषेध माझ्यासह अनेकांना भावला नव्हता. पुरस्कारवापसी बाबत वेगळ्या कोनातून पुष्कळ लिहिणं शक्य आहे, पण ते नंतर कधीतरी. मात्र जयंतची भूमिका मला अनाकलनीय वाटली, तसं मी त्याला सांगितलं आणि आम्ही‌ दोघांनी आपापल्या पद्धतीने आपलं म्हणणं कायम ठेवत मैत्र जपलं. या घटनेनंतर जयंतने तरुण रंगकर्मींना उत्तेजन देऊन काही वाचनाचे, सादरीकरणाचे कार्यक्रमही केले.

जयंतप्रमाणे माझीही वाढ, शिक्षण, वावरणं गिरणगावात झालं. त्याची शाळा शिरोडकर हायस्कूल तर माझी आर. एम. भट हायस्कूल. या दोन शाळांत अनेक पातळ्यांवर ठसन असायची. एकमेकांना ग्राम्य भाषेत डिवचायचो. असा विषय निघाला, की जयंत म्हणे, शिरोडकर खऱ्या अर्थाने बहुजन संस्कृती होती आणि मिश्कील होत तुम्ही भटाची कारटी असं चिडवे. ही थट्टामस्करी चालू असे. शिरोडकर मधलाच संजय पवार, अच्युत पालव, विजय कदम यांचे संदर्भ निघत. जयंतच्या ‘अधांतर’वर महेश मांजरेकर यांनी ‘लालबाग परळ’ सिनेमा केला. त्यात आर. एम. भटच्या अंकुश चौधरीनं भूमिका केली. अशा सलोख्याच्या नोटवर गप्पांचा समारोप होई.

गिरणगावात बालपण-तरुणपण घालवलेल्या बहुतांश प्रत्येकाला परस्परांबद्दल आस्था असते. गिरणगावातली माणसं कडाडून भांडतात आणि प्रसंगी पाठीशी भक्कमपणे उभी राहतात. तिथली सुखदुःख सर्वांची सामूहिक असतात. जयंतच्या या आपुलकीचा अनुभव मला माझ्या ‘जहन्नम’ या कथासंग्रहाच्या वेळी आला. ‘लोकवाड्मय गृहा’ने साठोत्तरी मालिकेत हा संग्रह प्रकाशित केला. सतीश काळसेकर यांचा त्यात पुढाकार. कथांचं संपादन (म्हणजे निवड) पुष्पा भावे यांचं. पुष्पा बाईंनी प्रस्तावना लिहायची होती. बाईंनी लिहिली. पण हात आखडता घेऊन लिहिली. काळसेकर अस्वस्थ झाले. त्यांना किमान दहा ते बारा पानी मूल्यमापन हवं होतं. बाई दीड पानांत आटोपल्या होत्या. वाढवा अशी विनंती केल्यावरही दोन महिन्यांनी अवघे दोन परिच्छेद वाढवले. काळसेकरांना हे मानवत नव्हतं. माझं म्हणणं, की असू दे. असं तर असं. पण त्यांचं म्हणणं, कथांचं उचित मूल्यमापन व्हावं. काळसेकरांशी असं बोलणं होऊन मटा कार्यालयात पाऊल टाकलं आणि समोर जयंत दिसला. त्याच्याशी घडलेलं बोलले. आणि अचानक माझ्या मनात काय आलं माहीत नाही, ‘तू लिहिशील का माझ्या संग्रहासाठी?’ असं त्याला विचारलं. त्यानं खरंच लिहिलं. लिहिण्याआधी माझ्याशी सविस्तर बोलला. आणि जे लिहिलं, ते वाचून मी माझ्याशी थबकले. एक निखळ मित्र, एक सच्चा लेखक, एक साक्षेपी समीक्षक, एक जाणकार वाचक अशीच व्यक्ती असं लिहू शकते. हे मान्यच करायला हवं की मला मूठभर बळ मिळालं. समकालीन, समवयस्काबद्दल लिहिणं ही कसोटी असते. जयंताने अशा कितीतरी कसोट्या लिलया आणि आस्थेनं पार पाडल्या आहेत.

केवळ ही एकच आठवण नाही. विशेषतः पत्रकारिता ही इव्हेंटबाजी आणि जाहिराती यांच्या कचाट्यात सापडल्याच्या कालखंडात माझ्यासारख्या निखळ पत्रकारिता करू पाहणाऱ्यांची कोंडी व्हायला सुरुवात झाली. या कोंडीत होणारी घुसमट जयंत नुसता साक्षीदार होऊन पाहत नव्हता, त्यानं शक्य त्या पातळीवर माझ्यासारख्यांची पाठराखणही केली. पण पुढे पुढे त्यालाही मर्यादा आल्या असणार.

जयंताचं सर्वच लेखन आशय, शैली यात उजवं आहे. पण मला सर्वाधिक आवडलेली त्याची अभिव्यक्ती म्हणजे ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’. वास्तव, कल्पित, खरंखुरं,‌ भ्रामक, जागेपण, स्वप्न अशी सरमिसळ असलेलं हे जाणीव- नेणीव यांच्या मूर्तअमूर्त पातळीवरील व्यक्त होणं म्हणजे लेखक एकाच वेळी किती विविध पातळ्यांवर संचारू शकतो त्याचा प्रत्यय आहे. ‘अधांतर’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’ (दीर्घांक), ‘दरवेशी’ (एकांकिका), ‘पाऊलखुणा’ (‘वंश’ या नाटकाचे व्यावसायिक रूप), ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ (कथासंग्रह), ‘बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक’ (भा़षाविषयक), ‘माझे घर’, ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’ (कथासंग्रह) ‘वंश’, ‘शेवटच्या बीभत्साचे गाणे’ (दीर्घांक), ‘होड्या’ (एकांकिका) इतकी सामग्री त्याच्या नावावर आहे. त्याच्या प्रत्येक लेखनकृतीत वाचणाऱ्याला अस्वस्थ करण्याची प्रचंड ताकद आहे.

तो कथाकार होता. पण मुख्यत्वे नाटक आणि वर्तमानपत्री माध्यमात वावरला. गेल्या दशकभरात माध्यमांच्या होत असलेल्या उताराकडील वाटचालीबाबत तो अस्वस्थ असे. नोकरी करण्याच्या मध्यमवर्गीय सार्वत्रिक अपरिहार्यतेतून त्यानंही काही कार्यालयीन जबाबदाऱ्या निभावल्या, पण हे खरं तर आपलं आणि आपण नोकरी करत असलेल्या माध्यमाचंही काम नव्हे हे त्याला पक्कं ठाऊक होतं… नव्हे मान्य होतं. पत्रकारिता, साहित्य, संस्कृती या कशाशीही संबंध नसलेली माणसं आज या क्षेत्राची मुखंड बनली आहेत हे त्याच्या बोलण्यात असे आणि मग तडतडून लेखनात उतरे. ‘शेवटच्या बीभत्साचे गाणे’ त्यातूनच साकारलं. आजुबाजूला खोटेपणा, दिखावा, दांभिकपणा, धर्मांधळेपणा, संपत्तीचं ओंगळ केंद्रीकरण अशा अराजकाचं थैमान असताना जयंत पवार या लेखकाचं लिहितं असणं नितांत गरजेचं होतं. ते आता थांबलं आहे. पण जयंताच्याच आंतरिक धारणेनुसार फिनिक्सच्या या राखेतून मोर उठेल अशी आपणच आपली समजूत घालूया.

प्रतिमा जोशी, या ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0