नेहरूंचे स्थान प्रत्येक भारतीयाच्या मनात

नेहरूंचे स्थान प्रत्येक भारतीयाच्या मनात

‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ या संस्थेने भारताच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात देशाचे पहिले पंतप्रधान, इतिहास-संस्कृती-राजकारण-समाजकारण-आधुनिकता-विज्ञानवादाची मांडणी करणार्या व स्वातंत्र्य चळवळीत अमूल्य योगदान असणार्या प. नेहरुंचे छायाचित्र खोडसाळपणे प्रसिद्ध केले नाही. पण नेहरूंचे स्थान आजही जागतिक इतिहासात आणि समस्त भारतीयांच्या मनात अजरामर असेच आहे.

कर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी
मान्सून केरळमध्ये, राज्यात आठवडाभरात पावसाची शक्यता
कलम ३७० वर बोलाल तर पुन्हा तुरुंगात जाल

‘इंडियन कॉन्सिल ऑफ हिस्टॉरीकल रिसर्च’ या भारत सरकारच्या संस्थेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष सोहळ्याच्या बॅनरमध्ये नेहरूंच्या फोटोला स्थान दिले नाही. मोदींच्या नेतृत्वाखालील भारत सरकारला वा भारतीय संस्थांना नेहरूंबद्दल आकस, द्वेष वा तिरस्कार हा काही नवीन नाही. त्यामुळे त्यांची ही कृती अजिबात अस्वाभाविक नाही. त्यामुळे त्यावर टिका करण्यापेक्षा त्याकडे एक स्वाभाविक बाब म्हणून दुर्लक्ष करणे चांगले!

नेहरूंचे एक भारतीय नि जागतिक इतिहासाचे भाष्यकार म्हणून काय योगदान आहे, हे पाहणे महत्त्वाचे. आजचा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, नेहरूंनी त्यांच्या आयुष्यातील भारतीय स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या जवळपास दहा वर्षाच्या कारावासात विपुल लेखन केले आहे. या सर्व लेखनाची पार्श्वभूमी ही आपसूकच स्वातंत्र्य लढ्याची आहे, त्यामुळे त्यांचे लेखन हे स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचा व अध्ययनाचा भाग बनले आहे. त्यांनी एकूण तीन ग्रंथ लिहिले आहेत. ‘ग्लिम्प्सेस ओवर वर्ल्ड हिस्ट्री’, ‘टोवर्डस फ्रीडम’ हे आत्मचरित्र आणि ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’. या शिवाय कारागृहातून त्यांनी लिहिलेली पत्रे ‘बंच ऑफ ओल्ड लेटर्स’ म्हणून प्रसिद्ध आहेत. शिवाय नेहरूंच्या सर्व पत्रांचा, भाषणांचा, वृत्तपत्रात प्रसिद्ध लेखांच्या आधारे नेहरूंच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक इतिहासाची मांडणी लक्षात येते. यातूनच त्यांच्या भारताबद्दलच्या विचारांचीही कल्पना येवू शकते. त्या अर्थाने त्यांचे ‘Tryst With Destiny’ अर्थात ‘नियतीशी संकेतभेट’ हे नेहरूंच्या भारत विषयक विचारांचे प्रारूप वा प्रास्ताविक जागतिक इतिहासात अजरामर ठरलेले आहे !

नेहरूंना पहिला कारावास ६ डिसेंबर १९२१ रोजी घडला. त्यानंतर २१ मे १९२२ ते २९ जानेवारी १९२९ या काळात त्यांनी जागतिक इतिहासावरच्या तब्बल ५५ मोठ्या ग्रंथांचे वाचन केले. त्यातून त्यांचा जागतिक इतिहासकाराचे अभ्यासक असा विकास होत गेला. या अभ्यासकाचे लेखकात रूपांतर होण्यास वेळ लागला नाही. त्यांच्या मुलीला – इंदिरेला जग समजावून सांगावे, जगाचा इतिहास, मानवाच्या उत्क्रांतीचा, निसर्ग व्यवहाराचा इतिहास सांगावा म्हणून त्यांनी पहिला ग्रंथ लिहीला, त्याचे नांव ‘इंदिरेस पत्रे’!

‘इंदिरेस पत्रे’ हे पुस्तक महात्मा गांधींनी वाचले आणि जगाचा इतिहास सर्व भारतीय जनतेला समजावून सांगावा असा आग्रह त्यांनी नेहरूंना केला. महात्मा गांधींच्या या आग्रहाचा सन्मान करताना साकारले गेलेले पुस्तक म्हणजे ‘जागतिक इतिहासाचे ओझरते दर्शन’ (‘ग्लिम्प्सेस ओवर वर्ल्ड हिस्ट्री’) हा ग्रंथ!

नेहरूंनी हा ग्रंथ पत्ररूपात नैनी, बरेली, देहरादून या कारागृहातून लिहिला असून त्यात १९३० ते १९३३ सालातील वर्तमान जगाचा इतिहास सुमारे १९६ पत्रात आणि १,१९२ पानांत मांडला आहे. हा ग्रंथ १९३४ साली प्रकाशित झाला, त्या वेऴी नेहरू कारागृहात होते.

‘जागतिक इतिहासाचे ओझरते दर्शन’ या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे की, त्या काळापर्यंत लिहिलेला जगाचा इतिहास हा केवळ युरोपियन दृष्टिकोनातून लिहिला गेला होता. त्यात युरोपियन म्हणजे सुसंस्कृत व उर्वरीत जग मागास असा तिरस्कार दिसून येत असे. नेहरूंनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा गौरवशाली इतिहास समोर मांडून भारतीय संस्कृती ही ग्रीक नि रोमन संस्कृतीइतकीच वा त्या पेक्षाही सरस होती हे सांगितले. नेहरूंच्या लेखनात मानवजातीच्या प्रगतीचे पौर्वात्य विश्लेषण दिसून येते, ही महत्त्वाची बाब आहे.

नेहरूंचा हा ग्रंथ जगभर खूप लोकप्रिय झाला. केवळ भारतीय वा राजकीय नेते नव्हे तर इतिहासाचे संशोधक, तत्वज्ञ यांनीही या ग्रंथास मान्यता दिली. नेहरूंचे जागतिक इतिहास लेखनातील योगदान मान्य करणारीच ही कृती होती. अनेक जागतिक इतिहासकारांनी यावर लेखन केले. जे.एफ. होराबीन या जॉर्ज ऑरवेलच्या सहका-याने या पुस्तकाच्या सन १९३९च्या आवृत्तीत स्वत: काढलेले नकाशे समाविष्ट केले.

नेहरूंची जागतिक इतिहासकार ही ओळख निर्माण झाली ती, ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये नेहरूंच्या पुस्तकावर आलेल्या रिव्ह्व्यूमुळे! त्यात नेहरूंची तुलना थेट एच. जी. वेल्स यांच्याशी केली होती. ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने आजवर जागतिक इतिहासावर लिहिलेले सर्वात महत्त्वपूर्ण पुस्तक असे वर्णन केले. तर ‘International affairs’ या नियतकालिकाने जागतिक मानवहितकारी तत्वज्ञान आणि राजकारण यांचा एकत्रित आविष्कार म्हणजे नेहरूंचे जागतिक इतिहासावरील पुस्तक असे वर्णन केले. तर Saul K. Padover या जागतिक राजकीय नि सामाजिक इतिहासकाराने या पुस्तकावर ‘Nehru- on World History’ असा ग्रंथ लिहिला.

नेहरू जागतिक इतिहासाचे लेखक यशस्वीपणे होऊ शकले, याचे महत्त्वाचे कारण त्यांची प्रभावी आणि शैलीदार इंग्रजी भाषा ! आजच्या इंग्रजीपेक्षा ती वेगळी आहे, कारण ज्या विसाव्या शतकाच्या सुरवातीला युरोपिय लेखकांची वा साहित्यिकांची ज्या प्रमाणे लेखनशैली होती तशीच ती भाषा आहे. त्यांच्या लेखनात फ्रेंच, जर्मन, रशियन, स्पॅनिश भाषातील कादंब-या, नाटके, कविता यांचा संदर्भ आहे. यातून त्यांच्या चौफेर वाचनाचा प्रत्यय वारंवार दिसून येतो. त्यामुळे ते रटाळ वा कंटाळवाणे न वाटता रंजक आणि लाघवी वाटते. नेहरूंनी स्वतःला कधीही इतिहास संशोधक म्हटले नाही मात्र ते अभ्यासक होते आणि त्या अध्ययनातून आणि निरीक्षणातून त्यांनी लेखन केले, ज्याचा मुख्य आधार त्यांची मानवकेंद्री चिंतनाची बैठक आणि संवेदनशीलता आहे. आश्चर्य वाटेल, पण नेहरू समीक्षक देखील आहेत. अनेक नामवंत लेखकांच्या, साहित्यिकांच्या पुस्तकांचे परीक्षण आणि काही पुस्तकाच्या प्रस्तावना त्यांनी लिहिल्या आहेत. अनेक वेळी ‘Forworded by J. Nehru’ अशा स्वरूपात पुस्तकांची जाहिरात केली जात असे. व्हिक्टर वॅलेसच्या ‘Path Of Peace’ या पुस्तकाची प्रस्तावना खास त्याच्या आग्रहावरून नेहरूंनी लिहिली होती.

अमेरिकी लेखिका डोरोथी नॉर्मन यांनी नेहरूंचा एक किस्सा सांगितला आहे. ‘The Good Earth’ या जगप्रसिद्ध कादंबरीच्या लेखिका पर्ल बक यांनी नेहरूंच्या स्वागतासाठी न्यू यॉर्कमध्ये एक मेजवानी आयोजित केली होती. त्या मेजवानीची निमंत्रितांची यादी पाहून नेहरू नाराजीने म्हणाले की, या यादीत असेच जुने लेखक आहेत, ज्यांचे लेखन मी वाचलं आहे, वा ज्यांना मी ओळखून आहे. पण यात कोणीही तरूण, प्रोग्रेसिव्ह लेखक, संपादक वा प्रकाशक दिसून येत नाही.

व्यासंग व्यापक असल्यामुळे विषयांचे बंधन नेहरूंना कधीच नव्हते. इतिहास, वर्तमान, जागतिक आणि राष्ट्रीय राजकारण, सामाजिक चळवळी, धर्मचिंतन व विवेकवाद, काव्य, नाट्य यावर ते लिहित व बोलत असत. वेद, उपनिषद, वेदांतापासून ते कालिदासाच्या संस्कृत काव्यापर्यंत आणि सिग्मंड फ्रॉइडच्या ‘इडिपस कॉम्प्लेक्स’ मानसशास्त्रीय संकल्पनेपासून नि:शस्त्रीकरणापर्यंत त्यांचे चिंतन, मनन आणि लेखन सतत चालू असे.

व्यापक चिंतन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक पाश्चात्य विचासरणी यातून त्यांनी स्वीकारलेला आधुनिक राजकारणाचा विचार अशी नेहरूंच्या व्यक्तिमत्वाची मुख्य ओळख आहे. ती त्यांच्या साहित्यात दिसते. नेहरू आणि गांधीजी यांची भेट झाली नसती तर नेहरूंचा दृष्टिकोन निव्वळ पाश्चात्य राहिला असता. मग फार फार तर नेहरू ‘ग्लिम्प्सेस’ लिहू शकले असते आणि त्यांचे आत्मचरित्रही निव्वळ युरोपातील अनुभवाची मांडणी एवढेच राहिले असते. पूर्वेकडील संस्कृती आणि पश्चिमेकडील संस्कृती यांचे त्यांच्या अंतर्मनातील द्वंद्वच खरेतर त्यांचा लेखनासाठी प्रेरणास्रोत बनले.

इंग्रजी साहित्यातील नामवंत साहित्यिक मुल्क राज आनंद नेहरूंच्या साहित्याविषयी लिहितात “The phenomenon of an Indian, born in an exalted nineteenth century Europeanized household, educated in England, becoming an Indian Writer of the highest excellence in the English language is strange and inexplicable’.

जगप्रसिद्ध इतिहासकार अर्नौल्ड टॉयन्बी नेहरूंबद्दल लिहितात ‘When a noble soul takes on itself the burden of political leadership for politics are always in need of redeeming’ पण नेहरूंनी हे दोन्ही बाजूंवर यशस्वीपणे केलं. राजकीय व्यासपीठ आणि सुधारणावाद याची अवघड सांगड त्यांनी यशस्वी केली. ते पुढे म्हणतात, ‘नेहरूंच्या या इंग्रजी भाषेमुळे आणि लेखनशैलीमुळे त्यांची लोकप्रियता साहित्यिक क्षेत्रात एक प्रतिभावान इतिहास लेखक आणि तत्वज्ञ राजकारणी म्हणून असल्याचे म्हटले आहे.

प्रख्यात भौतिक शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनी नेहरूंच्या ‘डिस्कव्हरी इंडिया’ या पुस्तकाचे वर्णन ‘gives an understanding of glorious intellectual and spiritual tradition of a great country’ असे केले. शिवाय नेहरूंबद्दल ते म्हणाले ‘We the worshipers of science are today looking up to Nehru – for leadership in mankind’s resolute stand to the implications of atomic war.’

१९५८ साली इ. एम.फोर्स्टर या राजकीय विचारवंताने अशी कल्पना केली की व्हॉल्टेअर पुन्हा जन्माला आला आणि त्याला समस्त मानवी जीवनाचे भवितव्य कोण्या एखाद्या जागतिक नेत्याच्या हाती सोपवायचे असेल तर तो कोणाला पत्र लिहिलं? जगभरातून सर्वांना डावलून जे नाव समोर आले ते नेहरूंचे होते!

नेहरूंचे स्थान आजही जागतिक इतिहासात आणि समस्त भारतीयांच्या मनात अजरामर आहे, संकुचित वृत्तीने त्यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न केला तर तो त्या संकुचित लोकांच्या कुपमंडूक वृत्तीचे प्रदर्शन आहे. मोठेपणा पाहण्यासाठी मनोवृत्ती नि डोळेही मोठे असावे लागतात. कोत्या मनोवृत्तीला वा बौद्धिक अंधत्व असणा-यांना व्यापक, विस्तीर्ण व महान पाहण्याची कुवत नसते. अशांना चांगली बुद्धी नि दृष्टी मिळावी हीच शुभेच्छा!

राज कुलकर्णी, हे नेहरु अभ्यासक व समाज-इतिहास-संस्कृती व राजकारणाचे विश्लेषक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0