ऐकावा ‘बॉम्बे रोझ’, पहावा ‘बॉम्बे रोझ’

ऐकावा ‘बॉम्बे रोझ’, पहावा ‘बॉम्बे रोझ’

कदाचित म्हणूनच इथे विद्रोह नाही. विस्फोट नाही. नाईलाजानी का होईना, आयुष्याचा समंजस स्वीकार आहे. स्वप्नांना मोकळा अवकाश देणारा समुद्र समोर आहे. आपापल्या क्षमतेनुसार, स्वप्नांनुरूप, आयुष्याला झळाळी आणायची आशा आहे. आत्मविश्वास आहे. फुलमंडईतली मावशी छोट्या ताराला कौतुकाने 'फटाका s s s ' म्हणते, तर तारा दरवेळी तिला निक्षून सांगते, 'नाही, मी तारा'. 'तारा!' ‘तारा!' ‘तारा!'

सलीम आणि माईक, ‘बॉम्बे रोझ’चा हिरो आणि व्हिलन, बांद्र्याच्या नंदी टॉकीजमध्ये  शेजारी शेजारी बसून ‘प्यारका अफसाना’ नावाचा एक हिंदी सिनेमा पाहतात. अर्थात हा योगायोग ‘बॉम्बे रोझ’ दुसऱ्यांदा पाहताना आपल्या लक्षात येतो. तिथल्या चंदेरी पडद्यावर नको त्या वेळी सिक्स पॅक अॅबवाला एक हॅण्डसम हिरो नेमका एन्ट्री मारतो. हिरोईनवर होऊ घातलेला एक रंगतदार अतिप्रसंग होता होता राहून जातो. नंतर हिरो हिरोईनमधल्या अतिउत्कट चुंबन दृश्याचाही सेन्सॉरबोर्डामुळे विचका होतो. घोर निराशा झालेला माईक चडफडत बाहेर पडतो. हिरोने पडद्यावर केलेल्या हिरोगिरीच्या संमोहनात सलीम त्याच्या उरातलं स्वप्न कुरवाळतो.

गजबजलेल्या एका फुलमंडईत अशा एकेका स्वप्नाचं फुल, फुलांच्या ढिगात हरवून जाताना दिसतं. तिथल्या रंगीबेरंगी आणि सुगंधी जगावर रोखठोक व्यवहाराची, रोजच्या आयुष्यातल्या ताणतणावाची छाया आहे. फुलांची टोपली डोक्यावर घेऊन पायातल्या पैंजणांच्या तालात जाता जाता कमला स्वप्नांची फुलं अलगद टिचक्या मारून जागी करते. जीवात खोलवर रुतणारे स्वानंद किरकिरेचे शब्द आणि सायली खरेचे सूर, स्थळ काळ वेळ पार करत कमलाला थेट एका सोनेरी स्वप्नात घेऊन जातात. येता-जाता उठता-बसता कमला स्वप्नातल्या रेवा रियासतीत रमून जाते, तेव्हा तेव्हा गिधाडासारखा भुत्कारत पंख मारून माईक तिला कठोर वास्तवात खेचून आणतो.

रस्ता कापता कापता शर्ली काळ वेळ पार करते.

रस्ता कापता कापता शर्ली काळ वेळ पार करते.

शर्ली डिसूझा, उमेदीच्या काळात हिंदी सिनेमात काम करणारी एक बुजुर्ग अभिनेत्री, बरेचदा बोलता बोलता ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाच्या फिल्मी भूतकाळात, त्या काळच्या दिलखेचक गाण्यांमध्ये, तरुण वयातल्या तारुण्यसुलभ गमतीजमतीत, हरपलेल्या जोडीदाराच्या स्वप्नवत सोबतीत दंग होते. बाकी वेळात ती तारासारख्या तिच्या चुणचुणीत विद्यार्थीनीचं चमकदार भविष्य लहान लहान संभाषणांमधून घडवत रहाते. आता फारशी मागणी नसलेल्या अँटिक वस्तूंचं एक दुकान अँथनी परेरा नेटानी चालवतो. कमला आणि ताराचे अपंग आजोबा घड्याळ दुरुस्तीचं छोटंसं दुकान चालवतात. दुकानातल्या भिंतींवर वेगळ्या वेगळ्या वेळा दाखवणारी नवी जुनी अँटिक घड्याळं जणू अस्तित्वाचा लंबक स्वप्न आणि सत्यात झुलवतात.

‘बॉम्बे रोझ’ मधल्या बॉम्बेतलं वास्तव काट्याकुट्यांनी भरलेलं आहे. इथं लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन कमलाचा सौदा करणारा दारुडा बाप आहे. बालविवाहाच्या आगीतून उपरेपणा आणि अनिश्चिततेच्या फुफाट्यात पडलेली कमला आहे. कमलासारख्या भोळ्या भाबड्या गरजू मुलींना पैशांसाठी विकू पाहणारे दलाल आहेत. अम्मी-अब्बूला युनिफॉर्ममधल्या लोकांच्या गोळ्यांना बळी पडताना बघितलेला सलीम आहे. परक्या प्रदेशात शिक्षणाअभावी नशिबी आलेली बेरोजगारी आहे. कमलाच्या प्रेमात पडलेल्या सलीमला केवळ आपल्या मतलबासाठी धर्माचा बडगा दाखवणारा माईक आहे. डान्स बारमध्ये काम करणाऱ्या बायकांच्या पोटावर पाय आणणारं सरकार आहे. अटक केलेल्या बारडान्सरवर हात टाकणारे पोलिस आहेत. सत्यासारखा मुका बहिरा अनाथ बालमजूर आहे. गरीब अनाथ मुलांकडून कमी पैशात खूप काम करून घेणारा आणि पोलिसाला लाच देणारा हॉटेल मालक आहे. बालमजूरांना रिमांड होमरुपी शोषणाच्या खाईत लोटणारे पोलिस आहेत. बाकावर बसून युनिफॉर्ममध्ये पेंगणारा चौकीदार आहे.

धंदा ऐसेही होता है क्या बिना पैसोंके? या किडनी बेच दूं?

धंदा ऐसेही होता है क्या बिना पैसोंके? या किडनी बेच दूं?

दुःखाच्या नेसत्या वस्त्रानिशी, आपापली स्वप्नांची गाठोडी उराशी घट्ट धरून परक्या प्रदेशात आसरा शोधणाऱ्या माणसांच्या पुढ्यात बॉम्बे हे काय काय वाढून ठेवते? पैशासाठी हुज्जत घालणाऱ्या गिऱ्हाइकाला फुलं  विकताना सलीम स्वतःशीच पुटपुटतो, ‘काँटे फ्री में हैं’. बॉलिवूडनी जागवलेल्या सलीमच्या स्वप्नांना बॉलिवूड मुळीच भीक घालत नाही. पोलिसांना चुकवत आपला जीव घेऊन पळत असताना जखमी झालेल्या सलीमला मरणाच्या दारात सोडून ‘प्यारका अफसाना’चा हिरो राजाखान पळ काढतो. पण खरंच, सलीमला नेमकं कोण मारतं? किंवा, सलीम कशाने मरतो? कुठून सुटलेले तीर सलीमला घायाळ करतात?  इथे शत्रू कोण आहे? किंवा, शत्रू कोण आहेतं? व्यक्ती की व्यवस्था? बॉलिवूड की बॉलिवूड हिरो? सरकार की पोलिस? बेरोजगारी की माईक सारखे दलाल? विरोध करायचा तर कुणाचा करावा? कशाचा करावा? कसा करावा? आणि केव्हा करावा? इथं साला वेळ कुणाला आहे!

कदाचित म्हणूनच इथे विद्रोह नाही. विस्फोट नाही. नाईलाजानी का होईना, आयुष्याचा समंजस स्वीकार आहे. स्वप्नांना मोकळा अवकाश देणारा समुद्र समोर आहे. आपापल्या क्षमतेनुसार, स्वप्नांनुरूप, आयुष्याला झळाळी आणायची आशा आहे. आत्मविश्वास आहे. फुलमंडईतली मावशी छोट्या ताराला कौतुकाने ‘फटाका s s s ‘ म्हणते, तर तारा दरवेळी तिला निक्षून सांगते, ‘नाही, मी तारा’. ‘तारा!’ ‘तारा!’ ‘तारा!’

शर्ली  आणि अँथनीची जुनी मोडकी खेळणी पाहून ताराचे आजोबा ऐलान करतात, ‘मैं सब ठीक कर दूंगा’. आणि ते सगळी खेळणी ठीक करतात. आपला जीव धोक्यात घालून सत्या एका मनीमाऊचा जीव वाचवतो. तारा मुक्याबहिऱ्या सत्याला पोलिसांपासून (!) वाचवते. अशी लहान मोठी फत्ते झाल्यावर खुशीनी दिलेल्या हाय-फाय टाळ्या इथे आहेत. तारा म्हणते ‘वो भी हिरो, मै भी हिरो’. सगळेच हिरो! मग बॉलिवूड हिरो हवा कशाला? सिनेमाच्या पहिल्या दृश्यात झळकणारं ‘प्यार का अफसाना’चं पोस्टर शेवटच्या दृश्यात ‘बॉम्बे रोझ’च्या झगमगीत साइन बोर्ड पुढे फिकं दिसतं.

मन के अंदर समुंदर का सैलाब हो तो समुंदर कौन जाता है! सत्या तू खेकडे पकड़ने जात है?

मन के अंदर समुंदर का सैलाब हो तो समुंदर कौन जाता है! सत्या तू खेकडे पकड़ने समुंदर जाता है?

आपली हिरोईन, कमला, बसल्या बसल्या सतत हातानी फुलांचे गजरे गुंफताना दिसते. आजोबांना हॉस्पिटलमध्ये सोबत करतानाही धाकट्या ताराला मांडीवर झोपवून लहानगी कमला सुयांनी लोकर विणताना दिसते. कोळी जसं इथे नाहीतर तिथे, तिथे नाहीतर अजून कुठेतरी, कोळिष्टकं विणत राहतात, तसं. हातात पडेल ते काम करून आपलं आयुष्य सावरता सावरता, भारतभरातून आलेले कामगार आणि कारागीर एकेक वीट बांधून बॉम्बे नावाची महानगरी उभी करतात. सिनेमाच्या सुरुवातीला असलेल्या श्रेयनामावलीच्या जोडीला लोकसंगीताच्या तालावर उलगडणाऱ्या दृश्यात हे खुबीनं दाखवलंय. मुंबईच्या तळागाळातल्या तिच्या निर्मात्यांना दिलेली ‘बॉम्बे रोझ’ ही एक उत्स्फुर्त मनमोकळी दाद आहे.

आपला व्हिलन, माईक, तरुण मुलींना कामासाठी दुबईत पाठवण्याचं काम करतो. कमलाला दुबईचं तिकीट फाडताना पाहून संतापतो. हतबल होतो. ते पाहून त्याची कीव येते. तोही तर त्याला सापडलेल्या एकमेवं कोपऱ्यात त्याच्या वाटणीचं कोळिष्टक विणत असतो. स्वतःला माईक म्हणवतो आणि गंध लावतो. त्यालाही एक भूतकाळ असणार. त्याचीही एक गुंतागुंतीची कहाणी असणार. बॉम्बेत येता येता माणसांचा भूतकाळ, भूगोल, मूल्यांचा ठेवा मागे राहून जातात हेच खरं. पानवाले मिश्राजी म्हणतात तसं, ‘बम्बई में सब बम्बईवाले होते हैं, कोई किसी के गाँव का  नही होता’. जुन्या मूल्यांची जागा आयुष्याचे काही नवे ठोकताळे घेतात. अब्बू सलीमला सांगतात, ‘सिगारेट पीनेसे बुरा है चोरी करना’. पण बेकार सलीम पोटापाण्यासाठी दफनभूमीतली फुलं चोरून ती विकतो. स्वतःचा लाजिरवाणा दारुण भूतकाळ कमला सलीमपासून लपवू पहाते तेव्हा तिला एक साधा सरळ व्यावहारिक सल्ला मिळतो. ‘तू झूट मत बोल, मगर सच भी मत बता’. संधी मिळताच, शार्लीच्या पुरातन मोडक्या खेळण्यांसारखी, विस्मरणात धूळ खात पडलेली मूल्यं पुन्हा उजळतात. दुरुस्त होतात. त्यांना चलती येते. कबरस्तानातून चोरलेली फुलं, कमलाची मर्जी राखण्यासाठी, सलीम त्या त्या थडग्यांवर परत नेऊन ठेवतो.

इतके सगळे आणि बरेच काही कळीचे विषय कळकळीनं, कथात्मतेची कास न सोडता हाताळणाऱ्या ‘बॉम्बे रोझ’ची लेन्स माणसाचं पैलूदार जगणं अगदी जवळून, बारकाईनं समजावून घेते. शर्ली म्हणते तसं ‘त्या शिवाय त्यांच्याशी बोलता कसं येईल?’ स्वप्नदृश्य सोडली तर सिनेमाची लेन्स जमिनीची पातळी सोडत नाही. लेन्स फुटपाथवरून रस्त्याकडे पहाते. एका बाजूनी ती रस्त्याची दुसरी बाजू न्याहाळते. न्हाव्याच्या लहानशा सलूनमधून ती सत्याला पकडण्यासाठी चाललेली पोलिसांची धावपळ पाहते. बहुतांशी जिथे ‘बॉम्बे रोझ’ मधली पात्र राहतात, वावरतात, अशा रस्त्याच्या कडेकडेनीच ती फिरते. त्या लेन्समधून आताची मुंबई तेव्हाच्या बॉम्बेला निरखते. मुंबई स्वतःचं गतकाळातलं उमदं रुप आठवते. शर्ली, तिची तरुण सुंदर छबी आरशात न्याहाळत नट्टापट्टा करते, भुले बिसरे गीत पुन्हा आळवते, तशी मुंबई, ‘बॉम्बे रोझ’मधल्या बॉम्बेसारखी रंगांच्या, आवाजांच्या, आभासी कुंचल्यांनी सजते सवरते.

'शर्ली'

‘शर्ली’

अॅनिमेशनपूर्वीची सगळी मूळ दृष्यं, एकेक फ्रेम, ‘बॉम्बे रोझ’ची लेखिका आणि दिग्दर्शिका गीतांजली रावने स्वतः हाती रंगवली आहेत. सहा संपूर्ण वर्ष! त्यातले तपशील, बारकावे आणि त्यांचं देखणेपण थक्क करणारं आहे. पी. एम. सतीश आणि मनोज गोस्वामी यांनी घडवलेली ध्वनिचित्रं दृष्यांचे अनुनाद अचूक पकडतात. रहदारीची कर्कशता आणि फुलबाजारातल्या कोलाहलापासून ते पैंजणांची नाजूक छुमछुम, ओठांनी गाल टिपल्याची हलकीशी चूपपर्यंतच्या सगळ्या स्थूल, सूक्ष्म श्राव्य कळा काळजीपूर्वक कोरलेल्या दृष्य मालिकांना अभूतपूर्व सलगता आणतात. सलीमच्या भयस्वप्नात काश्मिरात झडणाऱ्या बंदुकीच्या फैरी, ती थडथड आणि तो दचकून जागा झाल्यावर ऐकू येणारी बॉम्बेतल्या लोकल ट्रेनची धडधड सगळं कसं एकसंध वाटतं. ‘बॉम्बे रोझ’ मधली अशी एकेक फ्रेम, एकेक बहुआयामी दृक-श्राव्य मालिका याबद्दल लिहावं तेव्हडं थोडंच. ती खरंतर बघण्याऐकण्याची, फ्रेम बाय फ्रेम निवांत अनुभवण्याची चीज आहे.

‘बॉम्बे रोझ’मधली चलचित्रं, ‘मुक्या बहिऱ्या सत्याच्या’ (pun intended) मितभाषी अविर्भावासारख्या ज्या अस्फुट कळा साकार करतात, त्यात विधानांचा आव नाही. उसन्या प्रतिकांचं अवसान नाही. त्यातली लक्षणीय पात्रं योजना आणि त्यांची नावं, संवाद, नर्म उपहासगर्भ विनोद, घटना, व्यवसाय, वस्तू, खरं म्हणजे, ‘बॉम्बे रोझ’ मधल्या सगळ्या विश्वालाच लौकीक, अलौकिक, अंतरलक्षी, प्रतिकात्म अशा बहुलक्षी शक्यता, संभाव्यता आहेत. सिनेमाच्या सारीपाटावर मांडलेला ओंजळभर प्रतिमांचा असा संयमित विनियोग त्यातल्या मूळच्या व्यामिश्र आशयाला काव्यात्म सखोलता बहाल करतो. सिनेमा पाहताना त्यातल्या मूठभर प्रतिमा आणि प्रतिकांचा खेळ खेळावा. एक डाव संपला की दुसरा मांडावा.

COMMENTS