अमेरिकेतील अनेक राज्यांत ‘लॉक-डाउन’; स्पेनमध्ये करोनामुळे हाहाकार

अमेरिकेतील अनेक राज्यांत ‘लॉक-डाउन’; स्पेनमध्ये करोनामुळे हाहाकार

कोरोना विषाणूचे संकट जगभर अधिकाधिक तीव्र स्वरूप धारण करत चालले आहे. इटलीत कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंच्या आकड्याने (गुरुवारी ३४०५) चीनमधील मृत्

कोरोना आणि तृतीयपंथी समुदाय
घाई करू नका, सर्वांना लस मिळेल – उद्धव ठाकरे
या वर्षात एड्स, मलेरियापेक्षा कोविडचे मृत्यू अधिक

कोरोना विषाणूचे संकट जगभर अधिकाधिक तीव्र स्वरूप धारण करत चालले आहे. इटलीत कोरोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंच्या आकड्याने (गुरुवारी ३४०५) चीनमधील मृत्यूंना मागे टाकले आहे, तर जर्मनीत गेल्या २४ तासांत ३००० नवीन रुग्ण सापडले आहेत. तर स्पेनमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत अल्पावधीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अमेरिकेतही कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेत करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४,५५६ आहे, तर २१८ जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. १२५ जण या आजारातून पूर्णपणे बाहेर आले आहेत. न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक ५,७१५ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, तर ३८ जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टनमध्ये लागण झालेल्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी असली, तरी या आजाराने दगावलेल्यांची संख्या मात्र ७४ आहे.

अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्येच्या कॅलिफोर्निया राज्यातही कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे ४ कोटी लोकांना घरी थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कॅलिफोर्नियामध्ये ९००हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि १९ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. लॉस एंजेलिस व सॅन फ्रान्सिस्को बे एरियात यापूर्वीच अशा प्रकारचे निर्बंध लागू झाले आहेत. कॅलिफोर्नियापाठोपाठ अमेरिकेतील कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या न्यूयॉर्कनेही जनतेला घरी राहण्याचे आदेश दिले आहेत.

कॅलिफोर्नियात १९,००० लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते आणि हे कॅलिफोर्निया राज्याच्या क्षमतेबाहेरील आहे.

कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी कॅलिफोर्नियात गुरुवारी मध्यरात्रीपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुढील दोन महिन्यांत राज्यांतील ५० टक्के लोकसंख्येला कोरोना विषाणूची लागण होऊ शकते असा अंदाज कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसम यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच लोकांना घरी थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत लोकांनी हे निर्बंध पाळावयाचे आहेत. मात्र, हा आदेश कायदेशीर स्वरूपाचा नाही. कॅलिफोर्नियातील जनता समजदार असल्याने त्यांच्यासाठी कायद्याने आदेश जारी करण्याची गरज भासणार नाही, असे गव्हर्नर न्यूसम यांनी स्पष्ट केले.

किराणामाल दुकाने, औषधे, गॅस स्टेशन्स, भाजी-फळांचे बाजार, फूड बँक्स व डिलिव्हरी रेस्टॉरंट्स सुरू राहणार आहेत. लोक अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडू शकतात तसेच अतिमहत्त्वाच्या सेवा देणारे लोक कामावर जाऊ शकतात. मात्र, त्यांनीही एकमेकांपासून ठराविक अंतर ठेवावे, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत.

स्पेनमध्ये मृत्यूच्या दरात प्रचंड वाढ

युरोपात इटलीनंतर सर्वाधिक करोनाप्रभावित असलेल्या स्पेनमध्येही कोरोना विषाणूची लागण झालेल्यांच्या संख्येत अल्पावधीत प्रचंड वाढ झाल्यामुळे नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

स्पेनमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या गुरुवारी १७,१४९ झाली, तर या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ७६७ झाला. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी स्पेन सरकारने गुरुवारी सर्व हॉटेल्स बंद करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर नर्सिंग होम्समधील सुविधाही वाढवण्याचे आश्वासन स्पेन सरकारने नागरिकांना दिले आहे.

स्पेन सरकारने साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व हॉटेल्स व पर्यटक निवास बंद केले आहेत. स्पेनमधील जनता निर्बंधाच्या आवाहनांना उत्तम प्रतिसाद देत आहे, असे स्पेनच्या परिवहन मंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाची साथ आटोक्यात ठेवण्यासाठी घातलेल्या या निर्बंधांमुळे देशातील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. स्पेनच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाचे योगदान मोठे आहे. मात्र, उद्योगांना या संकटातून  बाहेर येण्यास मदत केली जाईल, असे आश्वासन स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सँचेझ यांनी दिले आहे.

कोरोनाच्या वाढत्या साथीच्या पार्श्वभूमीवर, स्पेनने आपल्या सर्व सीमा परदेशी नागरिकांसाठी बंद केल्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0