‘मायलेकी-बापलेकी’

‘मायलेकी-बापलेकी’

‘मायलेकी-बापलेकी’ हे राम जगताप-भाग्यश्री भागवत यांनी संपादित केलेलं पुस्तक या आठवड्यात प्रकाशित होत आहे. डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकात वेगवेगळ्या क्षेत्रातील नऊ आयांनी आणि आठ बापांनी आपल्या लेकींबद्दल लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे. त्यातील हा एक लेख संपादित स्वरूपात…

मीरा

योगेश गायकवाड

मी कलाकार वृत्तीचा, कलंदर माणूस आहे. घड्याळ आणि कॅलेंडर यांच्याशी माझं भांडण आहे. त्यांनी माझी दिनचर्या ठरवलेली मला अजिबात आवडत नाही. मी दिवसा छान झोपू शकतो आणि रात्री अधिक परिणामकारक पद्धतीने काम करू शकतो. त्यामुळे ‘लवकर निजे लवकर उठे, त्यास धन-आरोग्य लाभे’ या जीवनपद्धतीला मानणाऱ्या बहुसंख्य लोकांपेक्षा माझी वाट वेगळी आहे. बाजाराने स्वत:च्या फायद्यासाठी लादलेले नियम पाळणाऱ्या लोकांपेक्षा माझी वाट नक्कीच वेगळी आहे.

हिंदू आणि बौद्ध असे दोन्ही प्रकारचे धार्मिक संस्कार लहानपणी माझ्यावर झालेले आहेत. पण शुभंकरोती आणि त्रिशरण यांचा डोक्यातला गुंता वाढत गेल्याने, बुद्धीशी प्रामाणिक राहत, मी दोन्ही गोष्टी फेकाटून दिल्या आणि ‘नास्तिक’ म्हणून मोकळेपणाने जगू लागलो. अशा वेळी ‘आस्तिक’ असलेल्या साधारण सत्त्याण्णव टक्के लोकांपेक्षा माझी वाट वेगळी आहे.

कलाकार हा निसर्गत:च बिनधास्त असतो आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात असतो. त्यामुळे तिथेही व्यवहारी जगाच्या वाटेपेक्षा माझी वाट वेगळीच होती.

या असल्या वागण्यामुळेच कुटुंबाने आणि समाजाने ‘वाया गेलेला’ असा शिक्का मारला होता. त्या अर्थाने बायको म्हणून भेटलेली पण ‘वाया गेलेली’च होती. अशा दोन वाया गेलेल्या लोकांनी मिळून मग एक लेक जन्माला घातली. ती जशी गुण दाखवू लागली, तशी आसपासची मंडळी म्हणू लागली, ‘पक्की बापाची लेक आहे!’ त्या वेळी फार भारी वाटायचं. पण या वाक्याचा अर्थ जसजसा आत झिरपत गेला, तसतसं लक्षात येऊ लागलं की, हा साचेबंद समाज तिलापण ‘वाया गेलेल्या बापाची लेक’ म्हणूनच बघणार होता. कारण आई-बापावर अवलंबून असेपर्यंत तीपण कळत-नकळत आमचंच बोट धरून याच ‘वेगळ्या’ वाटेवर चालणार होती. अशी सगळी जाणीव झाल्यानंतर मात्र ही ‘वेगळी वाट’ मी खऱ्या अर्थी गंभीरपणे घेऊ लागलो. कारण त्या वाटेवरचा सगळा संघर्ष आता माझ्या निष्पाप लेकीच्या वाट्यालाही येणार होता. म्हणून मग तिचे हात घट्ट धरत आणि आपले पाय जमिनीवर ठेवत आम्ही ही वाट चालू लागलो. अशा वेगळ्या वाटेवर धडपडणाऱ्या, आम्हा वाया गेलेल्या बाप-लेकीचा हा प्रवास…

मालिकांच्या आणि चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रात ‘क्रिएटिव्ह हेड’ म्हणून मी काम करतो. बायकोपण व्यवसाय म्हणून लिखाण-काम करते. त्यामुळे आम्हा दोघांचा नैसर्गिक स्वभाव प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारणारा आणि तिची चिकित्सा करणारा आहे. कलाकार प्रवृत्तीचा कोणताच माणूस ‘लोक काय म्हणतील?’ याची पर्वा करत नाही. तो प्रयोग करून पाहतो, चुकतो आणि त्याचे परिणाम स्वत:च्या जबाबदारीवर भोगतो; पण स्वत:च्या आनंदात स्वतंत्रपणे जगतो आणि समाधानाने संपून जातो. आम्ही दोघंही कमी-अधिक फरकाने असेच आहोत.

अर्थात, चुकून इंजिनियरिंगच्या वाटेला गेल्याने माझ्यातल्या या कलंदर वृत्तीपासून मी कित्येक वर्षं लपत फिरत होतो. आत्ता आत्ता कुठे स्वत:ला ‘कलाकार’ म्हणून स्वीकारण्यात मला यश आलं आहे; पण त्या लपाछपीत खूप वेळ वाया गेला. माझ्या मुलीचं तसं होऊ नये, तिला स्वत:ची खरी ओळख वेळीच पटावी, यासाठी तिला या सर्व प्रस्थापित व्यवस्थांपासून दूर ठेवणं, हे एक बाप म्हणून माझं कर्तव्य आहे, असं मी मानतो.

करिअर म्हणून बेभरोशाची वेगळी वाट निवडल्यावर तुम्हाला त्या कामाला जास्त वेळ द्यावा लागतो. त्याच वेळी तुमच्या पाल्यालापण त्याच वाटेवर घेऊन जायची तुमची धडपड असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला घरीपण जास्त वेळ द्यावा लागतो. परिणामी, दोन्हीकडे चांगलीच गोची होते. पण आम्ही मुलीला प्राधान्य देण्याचं ठरवलं. दोघांनीही करिअरचा वेग थोडा कमी केला. मुलीला आणि एकमेकांना जास्तीत जास्त वेळ दिला.

आम्हा कलंदर लोकांच्या घरात कोणत्याही भिंतीवर रेघोट्या मारायला परवानगी आहे. चित्रातला सूर्य निळा आणि नदी पिवळी रंगवण्याला आमच्या घरात प्रतिष्ठा आहे. रंगपेटीत एवढे रंग असतात! ज्याला जे रंग हवेत, ते त्याने मुक्तपणे वापरावेत. ‘दारं-खिडक्या बंद करून मोठ्या आवाजात गाणं ऐकणं’ हा आमच्या जगण्याचा महत्त्वाचा भाग आहे. शीचं चित्र काढायला आणि त्यात पिवळा, चॉकलेटी रंग भरायला माझ्या लेकीला सगळ्यात जास्त आवडतं. घरी पाहुणे आले की, लेक हॉलच्या अगदी दर्शनी भागावर रंगवलेली शी पाहुण्यांना आवर्जून दाखवते आणि शीचा रंग, वास यांवर सविस्तर गप्पापण मारते. ‘‘आता लहान आहे म्हणून ठीक आहे, पण मोठी झाल्यावर जड जातील हे प्रयोग!’’ माझा सल्लागार मित्र अजूनही काळजीने सल्ले देतो. कारण तो हमरस्त्यावरून जाणाऱ्यांपैकी आहे आणि वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अशा वाटेवरच्या प्रवाशांमध्ये कमीपणाच्या मानल्या जातात.

मित्र, नातलग, घरची माणसं असे सगळे माझ्या लेकीला त्यांच्या चाकोरीत ओढायचा प्रयत्न करत असले, तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात राग नाही. कारण त्यांची वाट मला मान्य नसली, तरी त्यांच्या हेतूंबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. मात्र या बाजार व्यवस्थेबद्दल मला प्रचंड तिरस्कार वाटतो. कारण ही व्यवस्था स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी माझ्या लेकीला गर्दीच्या रस्त्यावर चालायला भाग पाडते आहे.

रंगांशी मैत्री असलेली माझी लेक अंगावर शक्य तेवढे वेगवेगळे रंग परिधान करून असते. एकदा बाहेर जाताना तिने परस्परांशी रंगसंगती अजिबात न जुळणारे कपडे घातले होते. एवढंच नाही, तर तिने दोन्ही शेंड्यांना रबर बँड्सपण हट्टाने वेगळ्या रंगांचे लावले होते आणि पायातले मोजेपण दोन वेगळ्या रंगांचे घातले होते. ‘ड्रेसिंग सेन्स’ असलेल्या मोठ्या माणसांपैकी कोणीतरी तिला – ‘जोकर’ आणि ‘ख्रिसमस ट्री’सारखी दिसते आहेस!’ म्हणून हसलं. एकाच वेळी दोन वेगळ्या रंगांचे रबर बँड्स लावणं, दोन वेगळ्या रंगांचे मोजे घालणं किंवा पाचही बोटांची नेलपेंट्स वेगवेगळ्या रंगांची लावणं वाईट दिसतं, हे कोणी ठरवलं? तर बाजार व्यवस्थेने! कारण त्याशिवाय पिवळ्या ड्रेसवर ‘मॅचिंग’ पिवळ्या, हिरव्यावर हिरव्या अशा वेगवेगळ्या अ‍ॅक्ससरिज आपण विकत घेतल्या नसत्या.

आमच्या घरात चहाचे कपपण वेगवेगळ्या रंगांचे आहेत. ‘बाजार व्यवस्थेला साचेबद्ध उत्पादनं तयार करणं फायद्याचं ठरतं, म्हणून आपण का साच्यात जगायचं? आपलं जगणं आपल्याला हवं तसं रंगीबेरंगी असलं पाहिजे, आणि त्याकरता बाजाराच्या आहारी जाण्याची गरज नाही’ हे तिला शिकवताना माझी सगळ्यात जास्त दमछाक होणार आहे, याची मला कल्पना आहे. कारण माझ्या कैक पट जास्त ताकदीने बाजार तिच्यावर आपली उत्पादनं थोपवणार आहे. या बाजाराचे गुलाम असलेले हमरस्त्यावरचे लोक तिलापण त्या गुलामीत खेचण्याचा प्रयत्न करणार आहेत.

रोजच्या मालिकांमधल्या कमर्शियल ब्रेकमध्ये तिची आजीपण तिच्यावर स्वच्छतेचे संस्कार करून घेते. स्वत:ची उत्पादनं विकण्यासाठी बाजाराने निर्माण केलेली ‘किटाणूं’ची भीती आजी नातीच्या मनात पेरते. आताशा पोरंही दप्तराला सॅनिटायझरची बाटली अडकवून शाळेत येऊ लागली आहेत. मित्राशी हात मिळवल्यानंतर सॅनिटायझरने हात लगेच सुवासित करून घ्यायला शिकली आहेत. अशा वातावरणात, ‘कोरड्या जागेत पडलेला केकचा तुकडा पाच सेकंदांच्या आत उचलून खाल्ला, तर काही बिघडत नाही. धुळीचे चार कण पोटात गेले, तर इतका काही फरक पडत नाही’ असं आम्ही आमच्या मुलीला शिकवू पाहतो आहोत. कारण ‘स्वच्छतेचा अति आग्रह’ ही एक प्रकारची मनोविकृती असल्याचं मानसशास्त्राने सिद्ध केलं आहे.

‘किटाणू म्हणजे जंतू आपले शत्रू असतात’ असं या व्यवस्थेने माझ्या मुलीवरही बिंबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकदा खेळताना तिला काळ्या मुंग्यांची रांग सापडली, तेव्हा किडे म्हणून तिने त्या मुंग्या फटाफट चिरडायला सुरुवात केली. त्याचा आजीला प्रचंड त्रास झाला. म्हणून ‘या मुंग्या देवाच्या असतात. त्यांना मारू नये’ असा नियम आजीने घालून दिला. त्यानंतर कधीतरी लेकीला लाल मुंग्यांची रांग सापडली. ‘देवाच्या मुंग्या’ म्हणून ती जवळ गेली आणि त्या तिला कडकडून चावल्या. यावर आजी गप्प, बायकोचा संताप आणि लेकरू गोंधळात…

‘आपल्या दिसण्याला फारसं महत्त्व द्यायचं नसतं’ हे आमच्या जगण्यातलं आणखी एक महत्त्वाचं तत्त्व आहे. कारण ‘आपण सुंदर दिसतो’ असा ग्रह झाला की, मुली मैदानावर खेळणं सोडून त्वचेची काळजी करत घरात बसताना आम्ही पाहिल्या आहेत, आणि याउलट हमरस्त्यावर चालणाऱ्या गर्दीच्या नियमाप्रमाणे ‘आपण सुंदर दिसत नाही’ असा ग्रह झालेल्या मुली आत्मविश्वास गमावून बसलेल्यापण बघितल्या आहेत. ‘सुंदरा बाईच्या’ या फेऱ्यात आपली पोरगी अडकू नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. मात्र केवळ तीस सेकंदांची एक आकर्षक जाहिरात तयार करून हा बाजार आमच्या पोरीला सावळा आणि गोरा या रंगांमधला भेद शिकवून जातो! त्यामुळे आमच्या जगण्यातल्या मूळ तत्त्वांवर छुपा हल्ला करणाऱ्या या बाजारपेठेपासून मला माझ्या लेकीला वाचवायचं आहे.

पारंपरिक संस्कार व्यवस्था, स्पर्धेचे उंदीर तयार करणारी शिक्षण व्यवस्था, मुलींच्या स्वातंत्र्याचा गळा दाबणारी समाज व्यवस्था आणि आपल्या जगण्यावर नियंत्रण ठेवू पाहणारी बाजार व्यवस्था या आणि इतरही काही व्यवस्थांना विरोध करत करत आजच्या काळात मूल वाढवायचं, ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. पण ‘आम्ही वेगळा विचार करतो’ असं सतत म्हणत ‘आपण ‘वेगळा विचार’ करणाऱ्या नवीन व्यवस्थेच्या आहारी तर जात नाही आहोत ना?’ असा विचारही आताशा मनात घोळू लागला आहे.

‘धोपट वाट सोडून वेगळी वाट शोधायला आपण लेकीला शिकवतोय खरं, पण पुढे जाऊन या वाटेवर ती एकटी तर पडणार नाही ना? जोवर आई-बाबा तिच्या भावविश्वाचा मोठा भाग आहेत, तोवर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तिला सर्वोत्तम वाटत राहतील, पण थोडी मोठी झाल्यावर पीयर प्रेशरखाली ती दबून तर जाणार नाही ना? जसा प्रत्येक ‘ऑफ बीट’ काही काळाने ‘बीट’ वाटायला लागतो, तसा हा ‘वेगळा’ वाटणारा मार्ग कालांतराने ‘धोपट महामार्ग’ झाला तर? आणि त्यावरच्या ‘हटके’ लोकांनी त्यांच्या पद्धतीने तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला सुरुवात केली तर? वेगळ्या वाटेने जाण्याच्या अट्टाहासात जवळची माणसं तिला दुरावली तर? ‘वाया गेलेल्या बापाची जगावेगळी लेक’ म्हणून तिला त्याच जगात सोडून देण्याने ती जास्त गोंधळून जाईल का? जाणती झाल्यावर, ‘तुम्ही मला या भलत्याच रस्त्यावर का आणलंत?’ असा सवाल तिने केला तर?’

असे असंख्य प्रश्न आतून लाथा मारायला लागले की, मग आम्ही वेड्या कलाकारांच्या जगात डोकावून पाहतो. हमरस्ता नाकारून, ‘वेगळी वाट’ निवडून त्यावर चालणारी वेगवेगळ्या वयोगटातली माणसं आनंदी असल्याचं बघून मग धीर येतो. जगाच्या दृष्टीने ‘वाया गेलेली असली’, तरीही ही माणसं याच जगात वेगळ्या पद्धतीने जगत आहेत. त्यांच्यापैकी सगळी आनंदी असतीलच, असं अजिबात नाही, पण समाधानी नक्कीच असतील. कारण वेगळ्या वाटेवरचा प्रत्येक निर्णय त्यांनी स्वत:च्या मनाला साक्षी ठेवून घेतलेला असणार. कोणतीही व्यवस्था तो निर्णय त्यांच्यावर लादू शकली नसणार. त्यामुळे त्या निर्णयाच्या चांगल्या-वाईट परिणामांची जबाबदारी सर्वस्वी त्यांचीच राहील.

अशा लोकांना भेटून एक गोष्ट मात्र मी शिकलो आहे – या सगळ्या मांडणीतून ‘आपण काहीतरी वेगळं करतो आहोत’ हा भाव वजा करून टाकायचा, आणि ‘तू जगावेगळं काहीतरी कर’ यापेक्षा ‘तू तुला हवं ते कर’ असं लेकीला शिकवायचं. कारण जग काय, रोजच बदलत असतं. आज ते व्यवस्थांनी जखडलेलं आहे, उद्या प्रत्येकाला मोकळं जगू देणारं जग आसपास असेल. अशा परिस्थितीत स्वत:च्या मनाचा आवाज ऐकत हवं तसं जगण्याचा प्रयत्न करत राहण्याची ताकद आता मी माझ्या लेकीला देणार आहे. जेणेकरून मोठी झाल्यावर ‘वाया गेलेल्या बापाची लेक’ म्हणून ओळख असण्यापेक्षा ‘स्वत:चा मार्ग स्वत: निवडणारी स्वतंत्र मुलगी’ म्हणून ती मजेत जगेल.

‘मायलेकी-बापलेकी’ : संपादक – राम जगताप-भाग्यश्री भागवत,
डायमंड पब्लिकेशन्स, पुणे 
पाने – २४०, मूल्य – २९५ रुपये.

COMMENTS