‘गावाबाहेर’च्या कविता

‘गावाबाहेर’च्या कविता

काव्य, कला, साहित्य याविषयी राहुल पुंगलिया यांची एक भूमिका आहे, जी ते पुस्तकाच्या मनोगतात आपल्यासमोर ठेवतात आणि ती त्यांच्या कवितेतून बाहेर येत राहते. साहित्य स्वायत्त असते हा परिप्रेक्ष त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. त्याचा नेमका अर्थ काय हे, ते त्याबरोबर मांडतात.

वाचनसंस्कृती आणि आपण सारे
‘मायलेकी-बापलेकी’
विज्ञान दिनानिमित्ताने विवेकाचा जागर करू या!

प्राध्यापक राहुल पुंगलिया यांचा ‘गावाबाहेर’ हा कविता संग्रह कॉपर कॉईन पब्लिशिंगने नुकताच प्रकाशित केला. गेली तीन चार दशके कविता लिहित असणारे पुंगलिया यांचा हा पहिला संग्रह प्रकाशित झाला आहे.

काव्य, कला, साहित्य याविषयी पुंगलिया यांची एक भूमिका आहे, जी ते पुस्तकाच्या मनोगतात आपल्यासमोर ठेवतात आणि ती त्यांच्या कवितेतून बाहेर येत राहते. साहित्य स्वायत्त असते हा परिप्रेक्ष त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. त्याचा नेमका अर्थ काय हे, ते त्याबरोबर मांडतात. कविता म्हणजे काय हे आपल्याला सांगता येऊ शकतं का किंवा आपल्याला त्या मार्गापर्यंत खरंच पोहोचता येऊ शकेल का, हा साहित्यातला महत्वाचा प्रश्न मनोगतात डोकावतो. साहित्य हे बदलाचे माध्यम आहे का, साहित्य-हितसंबंध यांचा परस्परसंबंध, साहित्य निर्मितीच्या जाणिवेत विविध प्रकारच्या अस्मितेचे अस्तित्व, भांडवलशाहीचा त्याबरोबरचा असलेला प्रभाव व या प्रक्रियेतून कलाकृती तयार होत असताना साहित्य आणि सामाजिकता कशी आकार घेते, याविषयी ते आपलं मत मांडतात. साहित्य व कविता हे या अस्मितेच्या, सामाजिकतेच्या व हितसंबंधीय रेट्याच्या खाली आपले स्वायत्त स्थान गमावतातच पण त्यामुळे साहित्य हे साहित्य उरतं का हा प्रश्न सतत त्या भोवती वावरत राहतो. इथे पुंगलिया साहित्यात सामाजिकता नसते, अशी मांडणी करत नाहीत वा ते तसं म्हणत नाहीत तर सामाजिकतेचे, सामाजिक भूमिकेचे आणि साहित्य विश्वाचे बदलते स्वरूप आणि त्याअनुषंगाने साहित्यमूल्य आणि त्याभोवतीचे चर्चाविश्व कसे आकार घेत जाते याविषयी ते लिहितात.

कवितेवर बोलायचे, काही लिहायचे झाले की बरेच प्रश्न पडतात. त्यावर साहित्य सिद्धांतात, सौंदर्य शास्त्रात विपुल लिखाण झाले आहे. पहिलं म्हणजे कवितेबद्दल नेमकं काय बोलावं? कविता म्हणजे नक्की काय? तो एक बराच मोठा अभ्यासाचा, साहित्य इतिहास, परंपरा, जाणीव आणि मांडणीचा प्रश्न होतो त्यामधील कविता वाचल्यावर हे प्रश्न पडत राहतात. हे पुस्तक वाचल्यावर जाणवते की कवितेसोबत ती एक भूमिका आहे. त्यात  एक कालातीत अस्वस्थता डोकावते जी आपल्याला आपल्या रोजच्या प्रवाहात जाणवत असते, पण लक्षात येत नाही, ती बऱ्याचदा निसटून जाते. व्यक्तिगत अवस्थेला, जाणीवेला आणि अनुभवाला एका वैश्विकतेकडे पुंगलिया यांच्या कविता घेऊन जातात. त्यामुळे कविता व्यक्तिगत आहेत की नाही व त्याचा आशय नक्की काय असे प्रश्न पडत नाहीत.

दुपार कशी अनोळखी झालीय
हसत नाही बोलत नाही
बघतही नाही
स्वतःच्याच संवेदनेत गर्क झालीय
पानांच्या सावलीत जसा
अडकून पडावा क्षीण एखादा कवडसा
किती दूर आलो आपण
ह्या गाण्यांच्या स्वरांमागे चालत
गावाबाहेर इथे फक्त देऊळ आहे
आणि सुकलेल्या नदीशेजारी दाट झाडी
परंतु जेव्हा आपण परत जाऊ
शहराच्या दूरवर पसरलेल्या
रस्त्यांवरून आपला मार्ग काढत
गल्लीबोळांच्या गुंतागुंतीच्या विचारांमागचा
सुप्त हेतू शोधत पोहोचू घरी
तेव्हा दुपार निसटून गेली असेल.. 

—-

अनुभव, निरीक्षण, आपली दैनंदिनता हे आपल्यासमोर वावरत असतात. आपण त्यांचा भाग होऊन जगत असतो. पण आपण एका व्यवस्थेत रहात, वावरत असताना भांबावून जातो. बऱ्याचदा थांबूनही आपल्याला आपल्या बद्दल, परिसराबद्दल, कधी वास्तवाबद्दल थांग लागत नाही. त्यासाठी बरेच मार्ग असतात. ते जाणून घ्यायला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यातल्या सत्यापर्यंत पोहोचायला प्रत्येक गोष्टीचा एक रोख, एक स्वतंत्र प्रकार असतो, असू शकतो. त्याची कारणं वेगळी असू शकतात. त्यात कवितेचा आणि साहित्याचा एक मार्ग असतो. साहित्य स्वायत्त असते त्याची समाजाकडे बघण्याची एक उपरोधिक रीत असते, ज्यामुळे ते सर्व प्रकारच्या हितसंबंधापासून दूर राहू शकते असं पुंगलिया म्हणतात.

,,

गावाबाहेरच्या लिंबानंतर कोणीही नव्हतं
आम्ही एकमेकांकडे वळून पाहिलं
ओळखीचं पुसट हसलो
ओल्या मैतीतला डांबरी रस्ता
काळा चकचकीत धुवून निघाला
इथे काहीही होऊ शकतं
आमची पाखरं होऊन उडून जातील
कुठेतरी दृष्टीआड
किंवा माती होऊन गवत उगवेल
विरघळून जाऊ ओल्या हवेत
आणि झुळूक संपेल कुठेतरी पानांमध्ये  

,,

खूप छोट्या, सध्या गोष्टी आपण जगताना अनुभवतो, किंवा आपल्याला तसं वाटते. तसा आपला भ्रम असतो. या कविता कधी कधी त्या भ्रमाला भानावर आणतात. त्याला प्रश्न विचारतात. बर्याच सहज गोष्टी आपल्या हातून निसटून जातात. कधी जाणीवेच्या पातळीला, कधी व्यवहारात अशा गोष्टींना आपण सामोरे जातो, ज्याला आपली नेहमीची भाषा कधी कधी अपुरी पडते. त्याला वाटा तयार कराव्या लागतात, त्या ताकदीने शोधाव्या लागतात. ‘गावाबाहेर’ या संग्रहात ते सहज अलगदपणे कधीतरी चमकून जातात. व्यक्ती, समज, अवकाश व स्थळ काळाचं एक स्थिर, शांत द्वंद इथे सापडत राहतं. ‘गावाबाहेरचं’ एक वैशिष्ट्य असं आहे, की या कवितांमध्ये कुठलाच दावा नाही. त्या केवळ कविता आहेत आणि तितकं असणं तिथे पुरून जातं. जर म्हणणं असलंच तर ते काव्याच्या पद्धतीनेच आपल्यासमोर येत राहते. जसं की –

,,

निळी पिवळी काळी झाडे
खूप जवळ येतात
सगळं बोलणं ऐकतात
मनातलं देखील
मुलाहिजा ठेवत नाहीत
जाहीर करतील सारेभयचकित विचार माझे
ह्यांना टाळून दूर जायला हवे
चल बंद खिडकीच्या खोलीत बसू.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0