संस्कारक्षम वयात माणसाला कशाहीपेक्षा जडणघडणीला उपयुक्त ठरणाऱ्या पोषक नि समृद्ध कौटुंबिक-समाजिक वातावरणाची सर्वाधिक गरज असते. जिथे ती पूर्ण होते, तिथे आतले-बाहेरचे दबाव नसतात, अनावश्यक ताण नसतात, अहंकार-अहंगंडाचे द्वंद्व नसते. असतो तो परस्पर विश्वास, असते ती कुतूहल आणि जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन देणारी आचार-विचारांची मोकळीक, थोरांचे थोरपण आणि लहानांची निरागसता जपण्याची सहजवृत्ती. त्यातूनच पुढे जावून ‘सर्कलची वर्तुळे’ सारखे वाचनीय पुस्तक आकारास येते...
आताचा काळ हा व्यक्तिमत्व विकास कार्यशाळांचा आहे. प्रेरक वक्त्यांचा आणि यशप्राप्तीच्या क्लृप्त्या सांगणाऱ्या पुस्तकांचा आहे. अर्थातच प्रत्येक काळाच्या म्हणून काही गरजा असतात, त्या चुकीच्या असतात असे नाही. खरे तर कशाच्या तरी उणिवा भरून काढण्यातून त्या निर्माण होतात. जे सहजपणे घडत होते, ते कालौघात लुप्त झाले, पण महत्त्वाचे होते, या जाणिवेतून त्या पुरवल्या जातात. सुलक्षणा महाजनलिखित राजहंस प्रकाशन प्रकाशित- ‘सर्कल’ची वर्तुळे- हे चरित्रात्मक पुस्तक वाचून पूर्ण झाल्यानंतर एका कुटुंबाच्या समृद्ध जगण्याचा पट नजरेसमोर येतो आणि पूर्वीच्या काळी व्यक्ती, कुटुंब आणि समष्टीच्या अनुषंगाने सहजपणे काय घडत होते, काय लुप्त झाले नि काय महत्त्वाचे होते, याची जाणीव झाल्यावाचून राहात नाही.
नासिकमधल्या ‘सर्कल’ आणि ‘विकास’ या दोन सिनेमागृहांची मालकी असलेल्या रावसाहेब ओक आणि त्यांच्या बहुश्रुत कुटुंबाचे हे चरित्र आहे. लेखिका या रावसाहेबांच्या ज्येष्ठ कन्या. एरवी कोणी सिनेमा धंदेवाईक असतो तेव्हा तो उच्चशिक्षित, उदारमतवादी, तरक्कीपसंत, प्रयोगशील उद्योजक-शेतकरी आणि मुख्य म्हणजे विज्ञानप्रेमी असतोच असे नाही. परंतु हा दुर्मिळ योग स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगवास भोगलेल्या आणि नेहरु-गांधी विचारांचे संस्कार झालेल्या रावसाहेब ओकांच्या ठायी जुळून आलेला असतो. आपल्या या उद्यमशील पित्याचे, त्यास साथ देणाऱ्या करारी स्वभावाच्या उच्चशिक्षित भाषातज्ज्ञ आईचे व्यक्तिचित्र रेखाटताना लेखिकेने या जुळून आलेल्या योगामागील पदर उलगडून नासिक आणि परिसरात आई-वडिलांनी निर्माण केलेल्या समृद्ध अशा प्रतिसृष्टीचे दर्शन घडवले आहे.
यात आई-वडिलांचे आर्थिक-सामाजिक भान, विविध जातसमूहांना आपल्या उद्योग-व्यवसायात सामावून घेण्यातली त्यांच्यातली सर्वसमावेशता, विविध क्षेत्रांतल्या धुरिणांना आपलेसे करणारी त्यांच्यातली संवादप्रियता, बहुविध संस्कृती-परंपरांचा आदर करणारी त्यांच्या मनाची उदारता, सोबतच्या व्यक्तींचे, आपल्या जडणघडणीत साथ देणाऱ्या समाजाचे जागतिक भान विस्तारावे यासाठी प्रसंगी नुकसान सोसून प्रबोधनाच्या-जनजागृतीच्या पातळीवर चाललेली त्यांची सततची धडपड, स्वातंत्र्य-समता आणि सहिष्णुता या मूल्यांचा अंगीकार करत आपल्या मुलाबाळांना आयुष्याची दिशा ठरवण्याची त्यांनी दिलेली पूर्ण मोकळीक, नात्यागोत्यातला जिव्हाळा जपण्यातली त्यांनी अखेरपर्यंत राखलेली सहृदयता, समाजवादी विचारांची पाठराखण करत उद्यमशीलतेचा त्यांनी राखलेला आदर्श अशा स्वप्नवत गुणवैशिष्ट्यांची वाचकांना ओळख होत जातेच, पण लेखिकेचा आणि तिच्या भावंडांचा हेवाही वाटत राहतो. तो अर्थातच लेखिकेवर बालपण आणि तारुण्यात झालेल्या संस्कार आणि प्रभावामुळे वाटत राहतो. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणे निषिद्ध मानल्या गेलेल्या काळात, सिनेमा दाखवणे आणि पाहणे हे वाया गेल्याचे लक्षण ठरलेल्या काळात दीनदुबळ्यांचा आधार असलेल्या मेहेरबाबांनी काही अनुयायांच्या सोबतीने अध्यात्माच्या प्रसारासाठी सिनेमा थिएटरची उभारणी केली, आता आपले वडील सिनेमा थिएटरचे मालक आहेत, तरीही व्यवसायापलीकडे जाऊन अभियांत्रिकी, भाषाशास्त्र, विज्ञान, कला, शेती, शिक्षण आदींची घरात सदोदित चर्चा घडते आहे, नवतेला-प्रयोगशीलतेला प्रोत्साहन आहे आणि त्या घरातले आपण एक आहेत, हे चित्र तेव्हा काय आतादेखील बऱ्यापैकी नॉवेल्टी असलेले आहे. संस्कार-प्रभावाचा कोणत्याही क्लासमध्ये न जाता, कोणतेही समुपदेशन न घेता सहज परिणाम साधण्याची क्षमता त्यात आहे. ही प्रचलित शाळेबाहेरची घर, थिएटर, प्रिंटिंग प्रेस, पारसी बेकरी, फेरीवाले, शिंपी, लोहार, माळी, सिनेमाची पोस्टर्स रंगवणारे चित्रकार अशा सगळ्या घटकांनी मिळून आकारास आलेली खुल्या वातावरणातली शाळाच आहे. या शाळेत कळत-नकळत चित्रकलेचे, तंत्रज्ञानाचे, वास्तूकलेचे, पाककलेचे, संभाषणकलेचे, शेतीचे बालमनावर संस्कार होत आहेत. हा स्वप्नवत परिणाम शब्दांसोबतच सुरेख रेखाचित्रांच्या माध्यमातूनही वाचकांपर्यंत पोहोचतो. लेखिका स्वतः ख्यातीप्राप्त नगरनियोजनकार असल्याकारणानेही असेल पण ऐसपैस घर आणि ‘सर्कल’च्या प्रसिद्ध आवाराचा वास्तूशास्त्राच्या अंगाने आलेला नकाशादेखील वाचकांना कल्पनेच्या राज्यात घेऊन जाणारा ठरतो. एवढेच नव्हे तर पुस्तकातली बोलकी रेखाचित्रे आणि अनुभवविश्वाचे प्रतिनिधित्व करणारी लहान-मोठ्या आकारातील मुखपृष्ठावरील वर्तुळे राहून राहून गतकाळातल्या पण आठवणीत राहिलेल्या एखाद्या आवडीच्या पाठ्यपुस्तकाची आठवण देत राहतात.
सर्कलच्या संगतीत झालेल्या संस्कारांचे दाखले देताना लेखिका, वडिलांशी असलेल्या नात्याचे पदर जितक्या आत्मीयतेने उलगडते, तितकी आत्मीयता आणि आदर राखत एक माणूस म्हणून आईमध्ये असलेल्या स्वभावदोषांवरही बोट ठेवते. माय-लेकीच्या नात्यातला एरवीचा स्टिरिओटाइप इथे गळून पडतोच, पण यामुळे अनेकांच्या भावनांनाही शब्दरुप मिळाल्यासारखे होते. संबंध पुस्तकात व्यक्ती आणि समष्टीमधला तोल लेखिका छानपैकी सांभाळताना दिसते. ‘सर्कल’चे वैभव आठवताना, नासिकचा नगरनियोजनाच्या अंगाने झालेली उत्क्रांती, प्रगती-अधोगती, त्यानुरुप शहरातल्या अवतीभवती आकारास येत गेलेली अर्थसृष्टी, त्या अनुषंगाने बदलत गेलेले समाजजीवन यावरही या पुस्तकात धोरणकर्त्यांना उपयोगी ठरावीत, अशी निरीक्षणे येतात. ५० वर्षांपूर्वी विठ्ठलराव आणि कुसुमताई पटवर्धन तसेच माधवराव आणि शांताताई लिमये यांच्या सोबतीने आदिवासी मुलामुलींच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र समाज सेवा संघ आणि रचना ट्रस्ट या दोन शैक्षणिक संस्थांच्या आजवरच्या प्रगतीचा सविस्तर तपशील पुरवत रावसाहेब-कुमुदताई ओक यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू येथे लेखिका सुलक्षणा महाजन वाचकांसमोर आणतात.
त्या अर्थाने, हा केवळ रावसाहेब ओक यांच्या कुटुंबाचा चरित्रपट उरत नाही, तर स्वातंत्र्योत्तर काळात नासिकच्या सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक क्षेत्रांत घडून आलेल्या स्थित्यंतराचा, शहराच्या बदलत गेलेल्या व्यक्तित्त्वाचा संग्राह्य असा दस्तऐवज ठरतो. नासिक आणि उत्तर महाराष्ट्राशी नाते सांगणारे अनुभवविश्व असलेला वाचक यातल्या घटना-प्रसंगांत स्वतःचे प्रतिबिंब पाहतोच, परंतु इतरही वाचकांना कालौघात मागे पडत चाललेले हे जगण्याचे समृद्ध प्रारुप मोहवून टाकते.
सर्कलची वर्तुळे
सुलक्षणा महाजन
राजहंस प्रकाशन, पुणे
रुपये २५०
(‘मुक्त संवाद’ १५ सप्टेंबरच्या अंकातून साभार)
COMMENTS