‘इंपॉर्टन्स ऑफ लिव्हिंग’

‘इंपॉर्टन्स ऑफ लिव्हिंग’

‘इंपॉर्टन्स ऑफ लिव्हिंग' या पुस्तकात लिन युतांग आपल्या सभोवतालच्या लोकांचे अंधानुकरण करत धावण्यापेक्षा आपण जिथे आहोत तिथे थांबण्याचा आणि भवतालाचे अवलोकन करण्याचा सल्ला देतात.

‘नावा’तली स्त्रीमुक्ती
इस्लाम ज्ञात आणि अज्ञात – अब्दुल कादर मुकदम
वंशवाद आणि वंशद्वेष

२१व्या शतकातील जीवन कमालीचे वेगवान आणि धकाधकीचे असे झाले आहे. प्रगत राष्ट्रांबरोबरच विकसनशील देशांतही परिस्थिती फारशी भिन्न नाही. जीवनाला आलेल्या या प्रचंड वेगामुळे निर्माण झालेली तीव्र स्पर्धा आणि त्यातून आलेली असुरक्षिततेची भावना यांनी मानवी जीवन अधिकाधिक गुंतागुंतीचे आणि निराशाजनक होत चालले आहे. तीव्र रक्तदाब, मधुमेह, एकटेपण, नैराश्य यांचे वाढते प्रमाण या रोगांची मुळं बदललेल्या जीवनशैलीत आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार येत्या दशकभरात जगभर लठ्ठपणाला बळी पडलेल्या लोकांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक होईल. मानवी इतिहासात पहिल्यांदाच भूकबळींपेक्षा जास्त खाऊन मरणाऱ्या लोकांची संख्या अधिक होईल.

अमेरिकेसारख्या देशात प्रत्येक तीनपैकी एक प्रौढ व्यक्ती तीव्र रक्तदाबाचा सामना करते. मुबलक वैद्यकीय सेवा आणि विपुल औषधं उपलब्ध असणाऱ्या आजच्या काळात निर्माण झालेल्या आणि वाढत चाललेल्या आरोग्यविषयक समस्या, संपर्क माध्यमं विकासाच्या उच्च स्तरावर असताना तरूणवर्गात निर्माण झालेले भयाण एकटेपण चंगळवादातून आणि जगण्याविषयी चुकीच्या धारणांतून निर्माण झाल्या आहेत.

अत्यंत अस्तावस्त्य आणि धकाधकीचे जीवन जगत असताना आपल्या जीवनाचे प्रयोजनच हरवून बसलेल्या या काळात आपण  थोडे मागे वळून पाहण्याची आणि एकूण जीवनाच्या प्रयोजनाची विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे जीवनाला आलेल्या या तीव्र वेगाचे काय करायचे याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अशा स्थितीत योग्य जीवनशैलीचे अवलंबन करण्याबाबत आपल्याला कोण मार्गदर्शन करू शकेल? याचे सर्वात चांगले माध्यम ग्रंथ आहेत. या विषयाला वाहिलेले ग्रंथ बाजारात विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत; मात्र त्यांचे स्वरूप या वेगवान जगात आपण अधिक वेगवान, अधिक स्पर्धात्मक कसे व्हावे, कमी श्रमात अधिक धन कसे कमवावे अशा प्रकारचे आहे. याचा अर्थ हे ग्रंथ आजच्या समस्येला उत्तर न देता उलट दिशाभूल करणारे असेच आहेत. या समस्यांची उत्तरे त्यांच्याकडे असल्याचा ते दावा करत असले तरी. या ग्रंथाच्या लेखकांनी आणि तथाकथित उत्तेजनपर व्याख्याने करणाऱ्या वक्त्यांनी अशा प्रकारच्या समस्यांवर भाष्य करण्याची कुवत गमावलेली असते.

लीन युतांग, विकिपीडियावरून साभार

लीन युतांग, विकिपीडियावरून साभार

मात्र ‘लिन युतांग’ यांचे ‘इंपॉर्टन्स ऑफ लिव्हिंग’ हे २०व्या शतकात लिहिलेले पुस्तक सुखद धक्का देणारे आहे. वर्तमान काळात या पुस्तकाच्या वाचनाची आणि त्यात लेखकाने मांडलेल्या संकल्पनांवर विचार करण्याची कधी नव्हे तेवढी आज निकड निर्माण झाली आहे. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत लिन युतांग लिहितात, “या पुस्तकातील विचार हे माझ्या जीवन आणि अनुभवांतून आलेले वैयक्तिक विचार आहेत.’ पुढे ते असेही सांगतात की, हे सारे विचार माझे नाहीत तर पूर्वेच्या आणि पश्चिमेच्या अनेक विचारवंतांनी वारंवार व्यक्त केलेल्या कल्पना आहेत. मी केवळ त्यांची संगतवार मांडणी केली आहे. हे पुस्तक मुख्यतः प्राचीन चिनी विचारवंतांनी जीवनावर केलेल्या भाष्याचे संकलन आहे.
एकाच बैठकीत वाचून काढावे असे हे पुस्तक नाही. तसेच, सुरवातीपासून ते शेवटपर्यंत क्रमवार वाचत जावे असेही या पुस्तकाचे स्वरूप नाही. लिन युतांग यांनी पुस्तकाची रचना अशी केली आहे की, वाचकाने कुठलेही पान उघडावे आणि जिथे नजर स्थिरावेल ती ओळ, तो परिच्छेद वाचत जावे.

मात्र सहजगत्या वाचलेल्या कुठल्याही ओळीत वाचकाचा जीवनाकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकेल, त्यांच्या जीवनशैलीचा वाचकाला नव्याने पुनर्विचार करायला लावू शकेल अशी क्षमता या पुस्तकात नक्कीच आहे. लिन युतांग म्हणतात, “हे जग कमालीचे गंभीर झाले आहे. त्यामुळे त्याला एक शहाण्या आणि आनंदी तत्वज्ञाची गरज आहे.’ या पुस्तकातून अत्यंत शहाण्या आणि आनंदी तत्वज्ञाची गरज लिन युतांग यांनी नक्कीच पुरी केली आहे. ‘इंपॉर्टन्स ऑफ लिव्हिंग’ या शीर्षकावरून सूचित होते तसे ‘लिन युतांग’ या पुस्तकात जीवन विषयक मोठमोठे आणि क्लिष्ट तात्विक विचार मांडत नाहीत; तर सामान्य घटना, व्यक्ती यांच्या ठायी असणाऱ्या शहाणपणाविषयी लिहितात. जीवनाचा अर्थ शोधण्याविषयी अरण्यवास पत्करण्याविषयी न लिहिता बेडवर पडून एका कुशीवर वळून आणि एक हात डोक्याखाली घेऊन केवळ आजच्या दिवसाचा विचार करायला सांगतात. जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे याच स्थितीत आपल्याला मिळू शकतील असे लिन युतांग लिहितात. या पुस्तकात लिन युतांग आपल्या सभोवतालच्या लोकांचे अंधानुकरण करत धावण्यापेक्षा आपण जिथे आहोत तिथे थांबण्याचा आणि भवतालाचे अवलोकन करण्याचा सल्ला देतात. एकावेळी एकच गोष्ट पण पूर्ण अवधानाने आणि त्या गोष्टीचा संपूर्ण आस्वाद घेत करण्याविषयी लिहितात. वानगीदाखल, केवळ चहा कसा करावा, चहा करण्याची योग्य पद्धत काय असावी आणि तिचा आस्वाद कसा घ्यावा यावर लिन युतांग यांनी एक प्रकरण लिहिले आहे.
मुख्य म्हणजे लिन युतांग स्वतःसाठी वेळ द्यायला सांगतात. आजच्या काळात जगणे म्हणजे स्वतःला अधिकाधिक कामात गुंतवून घेणे, अशी कल्पना रूढ झाली आहे. पण सदैव कुठल्या तरी कामात गुंतून राहण्यापेक्षा कधीकधी कुठले काम न करता रिकाम्या वेळेचा आस्वाद घेणे चांगले असते असे सांगतात. “जर तुम्ही एक अर्थशून्य आणि रिकामी दुपार संपूर्ण अर्थशून्य पद्धतीने व्यतीत करू शकत असाल तर तुम्ही कसं जगावं हे शिकला आहात.’ या ओळीवरून लिन युतांग स्वतःला वेळ देण्याविषयी किती गंभीरपणे सांगतात ते लक्षात येते. पण स्वतःला वेळ देणे याचा अर्थ कर्मशून्य होणे असा नाही, तर मनुष्याची कार्यक्षमता वाढविणे आणि ती अधिक सर्जनशील होणे यासाठी स्वतःला पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे.

भौतिक संपत्तीलाच सर्वस्व मानणाऱ्या लोकांसाठी तर या पुस्तकाचे वाचन अपरिहार्य आहे. जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला निसर्गाकडे वळायला हवे. पौर्णिमेच्या रात्री उघड्या मैदानावर अथवा घराच्या छतावर उभे राहून पूर्ण चंद्र पाहण्याच्या आनंदाची तुलना इतर कुठल्याच गोष्टीशी करता येणार नाही. दवभरल्या गवतावरून अनवाणी पावलांनी चालत जाणे, रस्त्याच्या कडेला उमललेल्या रानटी फुलाचे सौंदर्य न्याहाळणे, भुरभुरता पाऊस अंगावर घेणे, कोवळ्या उन्हात झाडाची देखभाल करणे या आणि अशा छोट्या गोष्टी जगणे सार्थकी लावतात. ज्या वेळेचं काय करावं हे न समजून निरर्थक धावपळीत आपण तो व्यतीत करतो, त्या वेळेचा संपूर्ण आणि अर्थपूर्ण उपभोग निसर्गाच्या सान्निध्यातच आपल्याला घेता येईल हे लिन युतांग विलक्षण काव्यमय भाषेत लिहितात, ते सारे मुळातून वाचण्यासारखे असेच आहे.

लिन युतांग लिहितात, “आनंदी जीवनाचे खरे रहस्य जगण्याच्या साधेपणात आहे. आपण कशा प्रकारचं जीवन जगायला हवं? आणि जीवनाचा पूर्णअंशाने आनंद कोण घेऊ शकेल? जीवनाची मेजवानी आपल्या समोर आहे, प्रश्न आहे तो आपण त्या मेजवानीचा कसा आस्वाद घेतो याचा. जीवनाचा खरा आनंद घेण्याची क्षमता ही मनुष्याच्या आंतरिक समृद्धीत आहे. जगण्याच्या साधेपणावर ज्याचे निरातिशय प्रेम आहे, केवळ त्याच मनुष्याप्रती अशी आंतरिक समृद्धी निर्माण होऊ शकते. जगण्याचा आनंद घेण्यासाठी पुरेसे जीवन आपल्या समोर पसरलेले आहे. तो आनंद घेण्यासाठी आपण सदैव तयार असले पाहिजे.’

दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींपासून ते जीवनातील सर्वात महत्त्वाच्या घटना इथवर प्रत्येक बाबीकडे पाहण्याचा एक निराळा, सुगम आणि महत्त्वपूर्ण दृष्टिकोन मांडत असतानाच, लिन युतांग आपल्या सांस्कृतिक भावविश्वाचे महत्त्व विशद करतात. संस्कृतीचे महत्त्वाचे अंग असलेल्या वाचनाविषयी युतांग यांनी अतिशय मौलिक भाष्य केले आहे.

ते लिहितात, “ग्रंथवाचन अथवा वाचन आनंदाकडे सुसंस्कृत समाजाकडून नेहमीच आदराने पाहिले आहे. नेहमी वाचन करणारा मनुष्य आणि अजिबात न वाचन करणारा मनुष्य या दोघांमधील फरक लक्षात घेतला तर हे समजणे सोपे आहे. वाचन न करणारा मनुष्य त्याच्या सभोवतालच्या स्थळ-काळात अडकून पडलेला असतो. त्याचे संपूर्ण जीवन दैनंदिनीच्या नित्यक्रमात अडकून पडलेले असते. मोजक्याच परिचितांशी आणि मित्रावर्गाशी त्याचे संभाषण मर्यादित असते. या मर्यादित तुरुंगातून त्याची सुटका होणे शक्य नसते. पण ज्याक्षणी हा मनुष्य पुस्तक हातात घेईल, त्याक्षणी तो एका संपूर्ण निराळ्या विश्वात प्रवेश करतो. आणि ते पुस्तक जर चांगलं असेल, तर जगातील सर्वात चांगल्या आणि गप्पीष्ट व्यक्तीसोबत त्याचे संभाषण सुरू होते. स्थळ-काळाची सारी बंधने पार करून वाचक त्या व्यक्तीसोबत म्हणजे लेखकासोबत आत्मीय नाते स्थापित करतो. वाचकाची सुख-दुःखे, त्याच्या समस्या, त्याच्या आनंदाचे क्षण साऱ्यात त्याला लेखकाचा आवाज ऐकू येतो.’ वाचन या प्रक्रियेविषयी इतके आत्मीयतेने दुसऱ्या कुणी लिहिल्याचे स्मरत नाही.

वाचनाबरोबरच लिहिण्याविषयी लिन युतांग यांनी मांडलेले विचार प्रत्येक लेखकाने पुन्हा पुन्हा वाचावेत आणि आपलेसे करावेत असे आहेत. लेखकाने आपली लिहिण्याची शैली अथवा तंत्र यांवर कष्ट न घेता आपल्या स्वच्या खोलीत डोकावून पाहायला हवे, अस्सल साहित्यिक व्यक्तिमत्व अंगी बाणवायला हवे, त्यानंतर लेखक जे लिखाण करेल त्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाचा अंश उतरलेला असेल. तंत्र आणि शैली आपसूक त्या लिखाणात उतरलेले असतील.

केवळ लेखकच नव्हे तर कुठलाही उद्योग करू पाहणाऱ्या व्यक्तीला लिन युतांग यांचे विचार मार्गदर्शक ठरावेत असे आहेत.
लिन युतांग वाचन आणि लिखाण यांविषयी केवळ सुंदर विवेचन करून थांबले नाहीत. ‘इंपॉर्टन्स ऑफ लिव्हिंग’नंतर त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक ग्रंथात लिन यांनी ते विचार कसोशीने पाळले आहेत. ‘मोमेंट इन पेकिंग’, ‘लीफ इन द स्टॉर्म’, ‘चाईनाटाऊन फॅमिली’ या कादंबऱ्या असोत की, ‘माय कंट्री, माय पीपल’ सारखे वैचारिक ग्रंथ, या साऱ्या ग्रंथाना लिन युतांग यांच्या खास प्रतिभेचा स्पर्श झाला आहे. लिन युतांग यांचे ग्रंथ वाचणे म्हणजे जगण्याचा उत्सव साजरा करण्यासारखे आहे. आजच्या अतिवेगवान जीवनात त्यांचे ग्रंथ विलक्षण सुंदर सुरावटीसारखे सोबतीला असायला हवेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0