थेरीगाथा : नवे आकलन

थेरीगाथा : नवे आकलन

जागतिक तत्त्वज्ञानामध्ये भारताचं योगदान पहायला गेलं तर अनेक तात्त्विक विचार दाखवता येतील. त्यांमध्ये सर्वाधिक प्रभावी विचार म्हणजे गौतम बुद्धांचं तत्त

‘आठवडी बाजारा’ची मुशाफिरी
इंडियन स्टोरी ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर
परकेपण लादलेल्या समूहाचा सम्यक वेध
जागतिक तत्त्वज्ञानामध्ये भारताचं योगदान पहायला गेलं तर अनेक तात्त्विक विचार दाखवता येतील. त्यांमध्ये सर्वाधिक प्रभावी विचार म्हणजे गौतम बुद्धांचं तत्त्वज्ञान. मानवाच्या दु:खमुक्तीची आवश्यकता रुजवणाऱ्या या विचारांचा उदय इसवी सनपूर्व पाचव्या शतकामध्ये झाला. त्या काळी प्रचलित असलेल्या सनातन धर्मविचारांविरुद्ध प्रत्येक बाबतीत विद्रोह करत गौतम बुद्धांनी आपले विचार समाजाच्या सर्व स्तरात पोचवले. विशिष्ट जात, धर्म, लिंगभाव, प्रदेश, भाषा यांचं प्रभुत्व नाकारलं. “अत्तदीपा विहरथ अत्तसरणा अनञ्ञसरणा” (महापरिनिब्बान सुत्त,२.२६) म्हणजे ‘कुणी दुसरा मार्ग दाखवेल या आशेवर राहाणं सोडून द्या. एखाद्या द्वीप म्हणजे बेटासारखे निर्लेप राहून आपला मार्ग आपण शोधा.’ असा जगरहाटीच्या प्रवाहात राहूनही स्वत:ला अलिप्त ठेवण्याची शिकवण देणारा हा विद्रोही विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरक वाटला. आणि त्यांनी स्थापनेनंतर अडीच हजार वर्षांनीही आधुनिक विचारांचं अधिष्ठान ठेवण्याइतकी वैचारिक मोकळीक देणाऱ्या बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यांच्या अनुयायांच्या, एकूणच आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीनं बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि पुनर्शोध हा व्यक्तीच्या आणि समष्टीच्याही दु:खमुक्तीसाठीच्या प्रयत्नांचा अविभाज्य भाग राहिलेला आहे. त्यातही बौद्ध तत्त्वविचारांच्या प्राचीनतम संग्रहांमधील सुत्तपिटकातील खुद्दकनिकायामध्ये असणाऱ्या थेरीगाथांचं स्थान अनन्य आहे. तत्त्ववादिनी स्त्रियांची कथनं भारतीय वाङ्मयात थेरीगाथेपूर्वीदेखील आली आहेत. परंतु ज्या प्रगल्भतेनं थेरी म्हणजे गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाच्या अनुयायी झालेल्या आदरणीय स्त्रियांनी आपले अनुभव आणि विचार गाथांमधून शब्दांकित केले आहेत, तशी अभिव्यक्ती अद्वितीयच म्हणावी लागेल.
अशा या थेरीगाथांचे वेगवेगळे आयाम अभ्यासून आजच्या जगण्याशी त्यांचा कुठेकुठे संबंध येतो हे तपासण्याचा प्रयत्न देवेंद्र उबाळे यांनी संपादित केलेल्या थेरीगाथा: नवे आकलन या पुस्तकाद्वारे केला आहे. आंबेडकरी चळवळीच्या परिप्रेक्ष्यामधून आजच्या सामाजिक वास्तवाला भिडताना थेरीगाथांचा प्रभाव कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये जाणवतो अथवा कसे याची एक तपासणी या प्रकाशनाच्या निमित्ताने ‘डॉ. आंबेडकर वाङ्मयीन अभ्यासमंडळ’ या संस्थेने केलेली आहे. प्रखर आत्मटीका आणि आत्मपरीक्षण हे आंबेडकरी चळवळीचं अतिशय मौलिक असं वैशिष्ट्य या निमित्तानं अधोरेखित व्हावं असं वाटतं. ‘लाल दिव्याच्या गाडीला हाये कुनाचं योगदान?’ अशा लोकप्रिय कलाकृती असोत, अथवा या पुस्तकाच्या निमित्तानं मांडलेला आंबेडकरी चळवळ आणि बौद्धविचार यांमधल्या अंत:संबंधांचा ताळेबंद असो – आत्मपरीक्षण करणं ही या चळवळीचं सकस असं अंत:सत्व दाखवून देणारी अभिव्यक्ती आहे असं वाटतं.
ज्ञानेश्वर पवार, श्यामल गरूड, सुनील हेतकर, सचिन गरूड, मोतीराम कटारे आणि उर्मिला पवार या अभ्यासकांनी मानसशास्त्र, आंबेडकरी स्त्रियांची आत्मकथने, संत स्त्रियांची आत्मकथने, स्त्रीमुक्तीचा इतिहास, सौंदर्यविचार आणि थेरीगाथेच्या कालजयी महत्त्वावर लेख लिहिले आहेत. ज्ञानेश्वर पवार यांनी मानसशास्त्रासारख्या आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून थेरीगाथेची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मोतीराम कटारे यांनी प्रा. रा. ग. जाधव यांनी बौद्ध सौंदर्यशास्त्र उभे करता येईल काय अशी जी अपेक्षा ‘निळी क्षितिजे’मधून व्यक्त केली होती, तिच्या दिशेने पाऊल टाकत थेरीगाथेतील सौंदर्यविचाराविषयी मांडणी केली आहे. उर्मिला पवार यांनी आपल्या अनुभवसिद्ध लेखामधून आजच्या स्त्रीपुरुषांनी थेरीगाथेतून लखलखीतपणे प्रकाशणाऱ्या समतेच्या संदेशाकडे डोळसपणे पाहण्याची गरज अधोरेखित केली आहे. आंबेडकरी स्त्रियांनी बंडखोर थेरींचा वारसा जपावा आणि आत्मसन्मानाचं शस्त्र उगारताना त्याची मुळं थेरीगाथेत शोधावी अशी अपेक्षा श्यामल गरूड यांनी व्यक्त केलेली आहे. सचिन गरूड यांच्या लेखातून थेरीगाथेचं एक अलक्षित वैशिष्ट्य समोर येतं, की स्त्रीला मोक्ष मिळवायचा तर कोणत्या तरी मार्गाने लिंगबदल होण्याची पूर्वअट थेरीगाथापूर्व विचारांमध्ये अभिप्रेत होती. परंतु‘ बुद्धांनी भिक्षुणीसंघाद्वारे भौतिक व आध्यात्मिक मुक्तीचा आदर्श उभा करून वर्णजातस्त्रीदास्यपूरक पुनर्जन्मवादाचा व तज्जन्य लिंगबदलवादाचा पराभव केला.’ यातला भाषेचा अवघडलेपणा सोडला तरी बाईला मोक्ष मिळवायचा तर बाईपण सोडावं लागण्याची गरज नाही हे थेरींच्या माध्यमातून गौतम बुद्धांनी सिद्ध केलं हे महत्त्वाचं प्रतिपादन आहे.
सुनील हेतकर यांच्या लेखामध्ये त्यांनी थेरीगाथा आणि महाराष्ट्रीय संत स्त्रियांची आत्मचरित्रे यांच्यामधील साम्यस्थळे आणि विसंगती जाणून घेण्याचा लक्षणीय प्रयास केलेला आहे. ‘ओरसा धीता बुद्धस्स’ – म्हणजे ‘आम्ही बुद्धाच्या वारसदार, त्याच्या लेकी’ आहोत हा आत्मविश्वास असणाऱ्या थेरींनी बुद्धांचा दु:खक्षालनाचा मार्ग स्वीकारत निब्बाणप्राप्ती केली. तसंच महाराष्ट्रीय संत स्त्रियांनाही पुरुष संतांमुळे मुक्तीची द्वारे खुली झाली हे साम्य त्यांनी अधोरेखित केले आहे. श्रीचक्रधरांनी ‘धर्माचिया चाडा एथ बाइया का नसाव्या? तुमचे काई जीव आन् त्यांच्या जीऊलिया’ असं म्हणून अधिकारवाणीने स्त्रीपुरुषांच्या समतेचा विचार सांगितला. परंतु प्रत्यक्षात मात्र महदाइसा, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई यांना त्यांच्या काळाच्या धारणेपलीकडे पोचणे अवघड होते. त्यांना सामाजिक व्यवहाराची चौकट न बदलता आल्याने धर्मक्षेत्रामध्ये समता मांडत असतानाच जगण्याच्या कुरुक्षेत्रात – म्हणजे व्यवहारात मात्र वर्णाश्रमधर्माच्या विषमतेच्या दावणीला बांधलेलं जगणं असं द्विधा स्थितीचं अचूक निरीक्षण हेतकर यांनी मांडलेलं आहे. या मांडणीला पुढे न्यायचं झालं तर तत्कालीन भौतिक वास्तवाचाही पाया विचारात घेणं उपयुक्त ठरेल असं वाटतं. भक्ती ही भावनाच सामंतशाहीच्या भौतिक वास्तवाची जोडीदार असल्याने व्यक्तीने आपल्या सकल निष्ठा या श्रेष्ठ मानलेल्या व्यक्ती अथवा संकल्पनेस वाहिलेल्या असणेच भक्तीमध्ये अभिप्रेत होते. त्यामुळे या मार्गाने कितीही प्रवास केला तरी तो प्रत्यक्ष समतेच्या मुक्कामी पोचणं शक्य नव्हतं आणि नाही हे अधिक स्पष्ट होऊ शकतं.
प्रा. आशालता कांबळे आणि अरविंद सुरवाडे यांचे लेख हे थेरीगाथा आणि आंबेडकरवादी विचार यांच्या सहसंबंधांचं विश्लेषण करतात. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आत्मपरीक्षण हे या विचारांना कसदार बनवणारं वैशिष्ट्य या दोन लेखांमधून विशेषत्वानं प्रतीत होतं. प्रा. कांबळे यांचा लेख आंबेडकरी स्त्रियांच्या लेखनावर थेरीगाथांचा कितपत प्रभाव पडला याची साधकबाधक चर्चा करतो.त्यात स्त्रीत्वाचा अभिमान अथवा भीती न बाळगता स्वत:कडे माणूस म्हणून पहायचं आणि कर्तृत्व, आंतरिक सामर्थ्य विकसित करायचं असा थेरीगाथेचा इत्यर्थ मांडला आहे. ‘बुद्धकन्या’ हा आपला वारसा आहे असे येथील ‘भीमकन्या’ म्हणजे आंबेडकरवादी विचारांच्या पाईक असणाऱ्या लेखिका म्हणू लागल्या असं सागून त्यांनी हिरा बनसोडे, आशालता कांबळे, गाथा सोनावणे, रूपा कुलकर्णी ‘बोधी’, सुशीला मूल-जाधव, प्रज्ञा पवार, छाया कोरेगांवकर, धम्मसंगिनी रमा गोरख, उर्मिला पवार आणि मीनाक्षी मून अशा विस्तृत पटावरील लेखिकांच्या कलाकृतींचा आणि संशोधनाचा आढावा घेतला आहे. प्रत्यक्ष थेरींवर लिहिणे आणि थेरींनी स्वीकारलेली बंडखोरीची मानव मुक्तिवादी मूल्ये प्रमाण मानून साहित्यनिर्मिती करणे अशा दोनही प्रक्रियांचा सजग धांडोळा प्रा. कांबळे यांनी घेतला आहे. तो घेताना काही लेखिकांनी भाबडेपणाने केलेल्या चित्रणाकडे लक्ष वेधून त्यांनी अधिक गांभीर्याने लेखन करण्याची गरजही त्या चिकित्सकपणे नोंदवतात.
अरविंद सुरवाडे यांचा लेख थेरीगाथांच्या आंबेडकरवादी साहित्यावरील प्रभावाची चर्चा करतानाच एकूणच या चळवळीच्या मूल्यभानाची, अधिष्ठानाची समीक्षा करतो. धम्मचक्रप्रवर्तनानंतर बुद्ध तत्त्वज्ञान आणि डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असणारी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांना साहित्यनिर्मितीत स्थान देणे क्रमप्राप्त असताना आक्रोशाला अधिक महत्त्व दिले गेले. आणि पहिल्या पिढीतील आंबेडकरवादी साहित्यिकांनी डॉ. आंबेडकरांनी समोर ठेवलेल्या पर्यायी व्यवस्थेची अपरिहार्यता जोरकसपणे अभिव्यक्त केली नाही अशी खंत लेखक व्यक्त करतात. सुशिक्षित आणि ऊच्चशिक्षित असतानाही या साहित्यिकांनी ‘बौद्ध आयडेंटिटी’ऐवजी ‘दलित आयडेंटिटी’ स्वीकारल्याने बौद्ध संस्कृतीतील मूल्यकल्पनांवर साहित्यनिर्मिती होऊ शकली नाही अशी त्यांच्यासारख्या जुन्याजाणत्या अभ्यासक कार्यकर्त्याने मांडलेली कारणमीमांसा विचारार्ह आहे. त्यामानाने आताच्या काळात अधिक सजगपणे ही उणीव भरून काढली जात असल्याचे निरीक्षणही ते नोंदवतात. प्रेमानंद गज्वी, अरुण मिरजकर, अशोक हांडोरे, योगीराज वाघमारे, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, देवेंद्र उबाळे, संजय डोंगरे, सिद्धार्थ देवधेकर अशा नव्या-जुन्या साहित्यिकांनी केलेला बौद्ध तत्त्वज्ञान आणि मिथकांचा वापर ते अधोरेखित करतात. बुद्ध तत्त्वज्ञानातून प्रसवणारा मानवी कल्याणाचा अंत:प्रवाह वाहता ठेवून समकालीन जगण्याला भिडणाऱ्या कलाकृतींची निर्मिती होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.
या सर्व लेखांना संपादक देवेंद्र उबाळे यांनी आपल्या प्रस्तावनेच्या सूत्रामधून यथोचित संदर्भांसह सादर केले आहे. तसेच कौतुकास्पद गोष्ट म्हणजे संपादकाने बहुतेक सर्व लेखांमध्ये गरज लागेल तसतशा ससंदर्भ तळटीपांमधून व्यक्ती किंवा ग्रंथांची योग्य ती पूरक माहिती दिली आहे. मुखपृष्ठावर दिसणारा कापलेल्या प्राचीन वृक्षाच्या खोडामधून वाढू पाहणारा हिरवागार धुमारा अन्वर्थक आणि सुंदर आहे. संशोधनाच्या पद्धतिशास्त्राच्या दृष्टीने जाणवणारी एकच उणीव म्हणजे अनेक साहित्यिकांचे आणि त्यांच्या कलाकृतींचे उल्लेख लेखांमधून आले तरी त्या प्रत्येकाच्या कलाकृतींचा तपशील टीपांमधून अथवा संदर्भांमधून मिळत नाही. उदा. बहिणाबाई, चक्रधर, अशोक हांडोरे, गौतमीपुत्र कांबळे. परंतु ही जिज्ञासा जागृत करणाऱ्या या पुस्तकाच्या मूल्याला त्याने मोठा धक्का लागत नाही. थेरीगाथा आणि त्यांच्या अनुषंगाने आजच्या जगण्याचं आकलन नव्याने तपासणाऱ्या, आत्मपरीक्षण करणाऱ्या या ग्रंथाचं प्रत्येक वाचकानं स्वागत करायला हवं.
श्रद्धा कुंभोजकर, या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभाग प्रमुख आहेत.
(हा लेख मुंबई विद्यापीठाच्या ‘संभाषित’ या संशोधनपत्रिकेत मे २०२१ च्या अंकामध्ये प्रसिद्ध झाला आहे.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0