एलिझाबेथ होम्सचं नाटक !

एलिझाबेथ होम्सचं नाटक !

अमेरिकेत एक जाम उदबोधक आणि रंजक नाटक घडतंय. हे नाटक म्हणजे कोर्टनाटक आहे. एलिझाबेथ होम्स या महिलेवर लोकांना फसवल्याचा आरोप आहे, आरोप सिद्ध झाला तर होम

शेती कायद्याशी देणेघेणे नाहीः रिलायन्सचे प्रत्युत्तर
जेएनयूच्या चार बंडखोऱ्या
अखेर काबूलचाही पाडाव, अध्यक्ष परागंदा

अमेरिकेत एक जाम उदबोधक आणि रंजक नाटक घडतंय. हे नाटक म्हणजे कोर्टनाटक आहे. एलिझाबेथ होम्स या महिलेवर लोकांना फसवल्याचा आरोप आहे, आरोप सिद्ध झाला तर होम्सना वीस वर्षाची शिक्षा आणि काही लाख  डॉलर्सचा दंड होऊ शकेल.

रक्ताच्या दोन थेंबात दोनशे तपासण्या करणारं यंत्रं आपण तयार करणार आहोत, केलंय, असं एलिझाबेथ खोटंच बोलल्या. तसं यंत्र ना तयार झालं होतं ना तयार होण्यासारखं होतं.  रोगी आणि कंपनीत भांडवल गुंतवणारे यांना एलिझाबेथनी थापा मारल्या, फसवलं असा आरोप एलिझाबेथ होम्स यांच्यावर आहे.

एलिझाबेथ होम्सनी २००३ साली वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी थेरॅनॉस नावाची एक कंपनी स्थापन केली. ही कंपनी रक्ताच्या फक्त दोन थेंबात दोनशे तपासण्या करून देणारं यंत्रं तयार करणार होती. कंपनी स्थापन करत असताना होम्स स्टॅनफर्ड विद्यापीठात केमिकल इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होत्या. ते वर्ष पूर्ण झाल्यानंतर अभ्यास न झेपल्यानं त्यानी कॉलेज सोडलं आणि थेरेनॉस ही कंपनी त्यांनी जोरात बाजारात लोटली.

कल्पना क्रांतीकारक होती. रक्ताची तपासणी करताना बरंच रक्त काढावं लागतं. अधिक तपासण्या करायच्या तर अधिक रक्त काढावं लागतं. रक्त काढण्याच्या वेदना आणि खिशाला पडणारी भोकं यामुळं रोगी हैराण होतो. फक्त दोन थेंब रक्त बोटाला टुच्च करून काढायचं आणि त्यातून दोनशे चाचण्या या थरारक आश्वासनामुळं लोक झटकन या कंपनीकडं आकर्षित झाले.

होम्सचे वडील एन्रॉन या कुप्रसिद्ध कंपनीत उपाध्यक्ष होते. सत्तेचं वर्तुळ काबीज करून लोकांना शेंड्या लावण्यासाठी एन्रॉन प्रसिद्ध होती.

होम्स दिसायला छान. कपडेही छान वापरत. त्यांचा वॉर्डरोबही लक्षावधी डॉलरचा. लक्षावधी डॉलर खर्च करून त्यांनी स्वतःचे फोटो काढले आणि इव्हेंट्स करून जोरदार प्रसिद्धी मिळवली. एका डबड्यापेक्षा जास्त काहीही हाताशी नसतांना त्यांचे फोटो नामांकित अमेरिकन मॅगझीनच्या कव्हरवर प्रसिद्ध झाले.

लोकांनी ७० करोड डॉलर कंपनीत गुंतवले. जॉर्ज शुल्झ आणि हेन्री किसिंजर (दोघेही अमेरिकेचे परदेश मंत्री) होम्सच्या कंपनीच्या संचालक मंडळावर गेले. अमेरिकेचे दोन संरक्षणमंत्री पेरेस आणि मॅटिझही संचालक झाले.

पैसे गुंतवणारे आणि संचालक अशा सर्वांनी होम्स यांचा शोध कितपत खरा आहे, कितपत शक्य आहे, कितपत प्रत्यक्षात उतरला आहे याची चौकशी केली नाही. ही मंडळी इतकी आंधळी कशी झाली? आंधळी झाली नव्हती, त्यांचे डोळे दिपले होते. प्रसिद्धीचा झगझगाट आणि होम्स यांचं स्मार्ट,सुंदर दिसणं आणि झपाटणारा आवाज यामुळं त्यांची मती गुंग झाली.

लोकांकडून गोळा झालेला अमाप पैसा वापरून होम्स प्रसिद्धीचा आनंद घेत राहिल्या, थेरेनॉस कंपनीत ८०० माणसं नेमली आणि सिलिकॉन खोऱ्यात अॅपल आणि गुगलला खेटून त्यांनी प्रयोगशाळा आणि ऑफिस उभारलं.

एक डबडं तयार झालं होतं. त्या डबड्यात पाच सात तपासण्या होत होत्या. त्याही अचूक नव्हत्या. थेरेनॉस लोकांचं रक्त घेऊन नॉर्मल यंत्रांमधे तपासण्या करून घेत होतं.

थेरनॉसनं लोकांना सांगितलं की फायझर या कंपनीनं आपल्याला मान्यता दिलीय. पण ते खोटं होतं. फायझरच्या लेटरहेटवर या बाईनीच काहीतरी सर्टिफिकेट खरडलं होतं.

थेरेनॉसनं सांगितलं, की त्यांच्या तपासणीचा उपयोग अमेरिकन सैन्य करत आहे. तसं काहीही घडलेल नव्हतं. त्यांच्या संचालक मंडळावर एक जनरल आणि एक अडमिरल असल्यानं लोकांचा विश्वास बसला.

पैसे गुंतवणारे फसले पण रोगी मात्र संकटात सापडले. थेरेनॉसच्या तपासण्या सदोष आणि दिशाभूल करणाऱ्या होत्या याचा अनुभव अनेक रोग्यांनी घेतला. त्यांनी तक्रारी केल्या. काहींनी कोर्टात खटले गुदरले.

२०१५ साली खटले झाल्यावर थेरेनॉसनं मांडवळ केली, तोडपाणी केली. रोग्यांना नुकसान भरपाई दिली आणि काही लाख डॉलर दंड भरला, लोकांनी दिलेल्या पैशातून. पण कंपनीच्या  वर्तणुकीत सुधारणा नव्हती. यंत्रं तयार झालं नव्हतं, लोकांची फसवणूक होतच होती.

वॉल स्ट्रीट जर्नलचे बातमीदार जॉन कॅर्यू यांनी कंपनीतले लोक, वैज्ञानिक, डॉक्टर, रोगी इत्यादींच्या मुलाखती घेतल्या. होम्स यांनी बोलायला नकार दिला.ट्रेड सिक्रेट आहे ते सांगता येणार नाही असं सांगितलं. जॉन कॅर्यू यांनी  एक लेखमाला लिहून होम्स यांच्या फेकुगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला.

वॉल स्ट्रीट जर्नलचे मालक रुपर्ट मर्डॉक यांनी थेरेनॉस कंपनीत पैसे गुंतवले होते. होम्स मरडॉकना भेटल्या आणि तुम्हीच पैसे गुंतवलेल्या कंपनीची तुमच्याच पेपरातला बातमीदार वाट लावतोय अशी तक्रार केली. मरडॉक म्हणाले संपादक आणि बातमीदार यांच्या कामात आपण ढवळाढवळ करणार नाही.

जर्नल पाठोपाठ न्यू यॉर्क टाईम्सनही बातम्या छापल्या. मग एफबीआयनं दखल घेतली आणि २०१८ साली फसवाफसवीचा आरोप ठेवून थेरेनॉसवर खटला भरला. कोविडमुळं खटला लांबणीवर पडला होता, तो आता सुरु झालाय आणि दोनेक महिन्यात त्याचा निकाल लागणार आहे.

लोकांकडून भरमसाठ गोळा केलेले पैसे पुन्हा होम्स वकिलांना देणार आहेत. होम्स  यांचं म्हणणं आहे की त्या थॉमस एडिसन यांच्या तोडीच्या संशोधक आहेत. एडिसनचे  हजार प्रयोग अपयशी ठरले आणि एक हजार एकवा प्रयोग यशस्वी झाला. माझे अजून एक हजार व्हायचेत, लोकांनी धीर धरावा, असं त्यांचं म्हणणं आहे.

स्वतःच्या कुवतीबद्दलचा हा भ्रम आहे असं म्हणावं की ही त्यांची लबाडी आहे असं म्हणावं?

होम्स असंही म्हणत आहेत की रमेश बलवानी या त्यांच्या बॉयफ्रेंडनं त्यांचा गैरवापर केला. रमेश बलवानी हे गृहस्थ पाकिस्तानात जन्मले आणि अमेरिकेत वाढून स्थायिक झाले. वयानं ते होम्सपेक्षा बरेच मोठे. होम्स यांनी त्यांना आपल्या कंपनीचे मुख्याधिकारी आणि चेअरमन केलं होतं. होम्स म्हणतात की बलवानीनी आपल्याला नीट काम करू दिलं नाही त्यामुळं संशोधन खोळंबलं.

होम्स यांचं व्यक्तिमत्व, मानसिक लोचे, काय आहेत त्याचं विश्लेषण व्हायला वेळ लागेल.परंतू अमेरिकन मानसिकता मात्र या निमित्तानं पुरेपूर सिद्ध झालीय.

अमेरिकन माणसं प्रसिद्धी आणि झगझगाटाला बळी पडतात. प्रचंड पैसा खर्च करून केलेलं मार्केटिंग अमेरिकन माणसाचा मेंदु गुंगवतं, त्यांची विचारशक्ती गोठवतं. होम्सचं व्यक्तिमत्व, त्यांचे टर्टलनेक शर्ट आणि वॉर्डरोब, त्यांचा झपाटणारा पुरुषी आवाज, त्यांच्या झिंगाट पार्ट्या, त्यांच्या मुलाखती, यामुळं लोकांचे डोळे दिपले.

दोनशे तपासण्या दोन थेंबात शक्य आहेत काय याचा  विचार लोकांनी केला नाही. समजा एखादी व्यक्ती तसा दावा करत असेल तर तो दावा तपासुन पहावा असा विचार लोकांनी केला नाही. मरडॉकसारखे कसलेले  व्यापारी भुलले. किसिंजर, शुल्ज यांच्यासारखे लोकांना शेंड्या लावण्यात वस्ताद असलेले लोक गंडले. जो बायडन उपाध्यक्ष होते तेव्हां त्यांनीही या कंपनीची आणि उत्पादनाची क्रांतीकारक अशा शब्दात भलामण केली होती.

खोटं बोलायचं. रेटून खोटं बोलायचं. आकर्षक कपडे घालून खोटं बोलायचं. आकर्षक शब्द वापरून खोटं बोलायचं. सतत. सतत. माध्यमांनी ते उचलून धरायचं. समाजात प्रस्थ असलेल्यांनी त्यावर शिक्कामोर्तब करायचं.

अस्तित्वात नसलेलं यंत्रं लोक मान्य करतात. कंपनीची बाजारातली किमत ९ अब्ज डॉलर होते. काही अब्ज डॉलर लोक गुंतवतात.

हे अमेरिकन समाजाचं चित्रण आहे की जगात इतर ठिकाणीही असंच घडतंय.

लक्ष ठेवायला हवं.

जिज्ञासूनी जॉन कॅर्यू यांनी लिहिलेलं बॅड ब्लड हे पुस्तक वाचावं, एचबीओ या चॅनेलवरची इन्व्हेंवेंटर ही फिल्म पहावी. दोन्हीत एलिझाबेथ होम्स मध्यवर्ती भूमिकेत आहेत.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0