वरवरा रावांच्या पुस्तकातील ‘हिंदुत्व’ शब्द पेंग्विनने हटवला

वरवरा रावांच्या पुस्तकातील ‘हिंदुत्व’ शब्द पेंग्विनने हटवला

भीमा-कोरेगांव, एल्गार परिषद प्रकरणातील एक आरोपी व प्रसिद्ध तेलुगू कवी वरवरा राव यांनी लिहिलेल्या ‘वरवरा रावः ए रिव्होल्युशनरी पोएट’ या पुस्तकातील ‘हिंदुत्व’, ‘संघ परिवार’ व ‘हिंदुत्वकरण’ (सॅफ्रोनायझेशन) या तीन शब्दाला प्रकाशन संस्था पेंग्विन रँडम हाऊसच्या कायदेशीर टीमने हरकत घेत ते हटवले आहेत. द क्विंटने हे वृत्त दिले आहे. वरवरा राव यांचे हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही पण हे पुस्तक राव यांच्या गेल्या सहा दशकातील कवितांचा एक संग्रह असून त्याचा इंग्रजीत अनुवाद करण्यात आला आहे.

राव यांच्या कवितांमधून हिंदुत्व, संघ परिवार, हिंदुत्वकरण हे शब्द हटवण्यामागचे एक कारण हे सांगितले जात आहे की, हे शब्द पुस्तकात ठेवल्यास सरकारकडून देशद्रोह वा बदनामीचे गुन्हे पेंग्विन रँडम हाउस प्रकाशन संस्थेवर दाखल होण्याची भीती आहे. ते होऊ नयेत या प्रकाशन संस्थेच्या कायदेशीर सल्लागार टीमने शब्द हटवण्यास सांगितले आहे. या संदर्भात द वायरने पेंग्विन रँडम हाउसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांची प्रतिक्रिया अद्याप आलेले नाही.

गेल्या वर्षीही कायदेशीर सल्ला व्यवस्थित मिळत नसल्याने या पुस्तकाचे प्रकाशन लांबत चालल्याबाबत राव यांच्या कुटुंबियांनी नाराजी प्रकट केली होती. राव यांचे पुतणे एन. वेणुगोपाल यांनी सोशल मीडियावर नाराजी प्रकट केली होती. २०२०मध्ये हे पुस्तक प्रसिद्ध होणार होते पण ते कायदेशीर कारणाने पुढे ढकलण्यात आले. प्रकाशन संस्थेने २०२१च्या मध्यात हे पुस्तक प्रसिद्ध होईल असे आश्वासन वेणुगोपाल यांना दिले होते पण तसे झाले नाही. आता ऑक्टोबर २०२२ ही अंतिम तारीख करारात नमूद करण्यात आली आहे. त्या वेळी हे पुस्तक प्रसिद्ध न झाल्यास प्रकाशकांनी कराराचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वेणुगोपाल यांनी दिला आहे.

पेंग्विनची कचखाऊ भूमिका

मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पेंग्विन रँडम हाउसकडून अनेकवेळा कचखाऊ भूमिका घेण्यात आली आहे. २०१४मध्ये वेंडी डॉनिएर यांचे द हिंदूज हे पुस्तक काही हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे मागे घेण्यात आले.

गेल्या वर्षी १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती निमित्त पेंग्विनने द दलित ट्रूथ हे पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकात दलित चळवळींचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक मागोवा घेण्यात आला होता. या पुस्तकात सुखदेव थोरात, बदरी नारायण, भंवर मेघवंशी, जिग्नेश मेवानी, सुरज येंगडे आदींचे लेख प्रसिद्ध करण्यात आले होते. पण हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसांतच राव यांच्या पुस्तकावर सेन्स़ॉरसीप आणण्याचे पेंग्विनचे प्रयत्न सुरू झाल्याचे क्विंटच्या बातमीत म्हटले आहे.

८१ वर्षांचे राव यांचा १९६०च्या दशकापासून विविध सामाजिक चळवळींशी संबंध आला आहे. त्यांना २०१८मध्ये भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या ते वैद्यकीय कारणांमुळे जामीनावर आहेत.

मूळ बातमी

COMMENTS