गोव्याचा चित्तथरारक वाङ्मयीन इतिहास

गोव्याचा चित्तथरारक वाङ्मयीन इतिहास

गोव्याची धर्मावरून शकलं पाडून संशय आणि तिरस्कार पेरण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. या पार्श्वभूमीवर गोवा म्हणजे काय, त्याचं तत्त्व काय, त्याचं स्वभाववैशिष्ट्य काय हे साऱ्या भारताला समजणं महत्त्वाचं बनलं आहे. पेशाने पत्रकार असलेले राजू नायक यांचे ‘सुशेगाद’ आपल्याला पुन्हा पुन्हा गोव्याच्या प्रेमात पाडतं. ‘सुशेगाद’मधील एक प्रकरण…

सनातन जीवनलीला
पाउलखुणांचा मागोवा
राजकीय करिष्मा : निर्मिती आणि परिणाम

“मी तीन वर्षांची कालमर्यादा त्यांना आखून देतो. या तीन वर्षांच्या मुदतीत सरसकट सगळ्यांनी पोर्तुगीज भाषेतून बोलावे आणि आमच्या प्रदेशात एकमेकांशी व्यवहार किंवा करारमदार करताना फक्त त्याच भाषेचा उपयोग करावा आणि कोणत्याही प्रकारे देशी भाषेचा उपयोग करू नये. या हुकुमाप्रमाणे जे वागणार नाहीत, त्याविरुद्ध उपाययोजना करण्यात येईल. आणि योग्य वाटतील त्या ठळकपणे नजरेत भरणाऱ्या व कडक शिक्षा देण्यात येतील…”

-व्हाईसरॉय फ्रांसिस्क द ताव्हूद, कोन्दी आल्व्होर

२७ जून १६९४ रोजीचे फर्मान

…कोणताही इतिहास हा चित्तथरारक असतो. साहित्य आणि भाषेचाही. गोव्यात पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीत भाषांनी जे सोसले ते जगातील साहित्य आणि भाषांच्या इतिहासातील एक विरळाच उदाहरण ठरावे. धर्मच्छलाच्या काळात ख्रिस्ती धर्म स्वीकारावा लागलेल्यांची संस्कृती कातडी सोलून काढावी तशी ओरबडण्यात आली. त्यातली अपरिमित हानी संस्कृतीची झाली, त्यात भाषा आणि साहित्याचाही बळी पडला. व्हाईसरॉयच्या वरील आदेशावरूनच त्या काळातील सांस्कृतिक पडझडीची कल्पना येऊ शकेल. या सांस्कृतिक अग्निप्रलयातून जे वाचले त्यानी अग्निदिव्यच केले असे म्हटले पाहिजे. याच साहित्याचा वेध, धांडोळा घेण्याचे महत्प्रयासाचे कार्य गोव्यात अनेक इतिहासकारांनी केले असून आता गोमंतक मराठी अकादमीने ‘गोमंतकीय मराठी वाङ्मयाचा इतिहास’ नावाचे हे धन वाचकांसाठी उपलब्ध केले.

या दोन खंडांचे प्रकाशन पणजीत करण्यात आले, भाषिक साहित्यिक चळवळीला भूषणावह ठरावे असेच हे कार्य मानावे लागेल. पहिल्या खंडाचे संपादन डॉ. वि. बा. प्रभुदेसाई व प्रा. रवींद्र घवी यांनी, तर प्रा. एस. एस. नाडकर्णी व डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी दुसऱ्या खंडाचे संपादन केले आहे. पहिल्या खंडात ३१, तर दुसऱ्या खंडात २० लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. या कामाला अडीच वर्षांचा कालावधी लागला व चार लाखांचे सरकारी अनुदान लाभले. बऱ्याच काटकसरीत हे काम करावे लागल्याचे मराठी अकादमीने म्हटले आहे.

पहिल्या खंडाचे एक संपादक रवींद्र घवी यांच्या मते, १९०५ साली आपल्या ‘सत्संग’ मासिकात फोंडुशास्त्री करंडे यांनी ही कल्पना मांडली होती. गोमंतकाचे साहित्य हे वेगळे आहे आणि त्याचा इतिहासही महाराष्ट्रापेक्षा वेगळा आहे, त्यामुळे त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आता १०० वर्षांनी हे काम पूर्ण होते आहे.

गोमंतकाने जे भोगले ते ब्रिटिश-इंडियाच्या वाट्याला आले नाही. पोर्तुगीजांच्या इथल्या जुलूम-अत्याचारात ताम्रपत्रे, शिलालेखांबरोबर वाङ्मयही नष्ट करण्यात आले. ज्यांच्याकडे असे साहित्य सापडले त्यांना दंड करण्यात आले.

पोर्तुगीज धर्मगुरूंनी बरेचसे असे साहित्य जप्त करून पोर्तुगालला नेेले. त्यांचा हेतू याच साहित्याचे तसेच संतसाहित्याचे विडंबन करणे व हिंदूंचा धर्म व देव यांची विटंबना करण्याचाच होता.

त्याच वेळी, ‘तुम्ही आम्हाला धर्मापासून तोडले, आता आमची सांस्कृतिक पोकळी भरून काढण्यासाठी आम्हाला ख्रिस्ती धर्माचे पुरावे द्या’, अशी मागणी होऊ लागली होती. ही भूक भागविण्यासाठी फादर स्टीफन्स यांनी ‘ख्रिस्तपुराण’ लिहिले व फादर एलिआन क्रुआ यांनी सांब पेद्रू (पीटर) वर २९ हजार ओव्यांचे पुराण लिहिले.

एका बाजूला परकीयांचा अनन्वित अत्याचार, तर दुसऱ्या बाजूला लॅटिन संस्कृतीचा प्रभाव याचा परिणाम गोमंतकीय मराठी साहित्यावर झाला. पोर्तुगीज, लॅटिन, फ्रेंच यांचा संबंध प्रत्यक्ष येत होता. त्याचे प्रतिबिंब गोमंतकीयांच्या साहित्यात उतरणे स्वाभाविक होते. १९३० साली गोमंतकात वामन मल्हार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष पदावरून बोलताना शांबराव सरदेसाई यांनी त्यावर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. ‘मराठी साहित्य हे त्याच्यातील वैचित्र्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण बनले आहे. त्यात गोमंतकीयांच्या साहित्याने भर टाकली आहे,’ असे सरदेसाई यांनी म्हटले होते.

गोमंतकातले वातावरण, इथले राज्यकर्ते, समाजघडण, ग्रामसंस्थेतली वैशिष्ट्ये, येथील जमीनदारी आणि भाटकारशाही ही अनेक दृष्टीने महाराष्ट्राहून वेगळी होती. त्यामुळे समाजजीवनावर खात्रीने परिणाम झाला व साहित्यावर प्रभाव पडत गेला. या दोन खंडांत त्याचा शोध घेण्यात आला आहे.

डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर, अ. को. प्रियोळकर, लक्ष्मीकांत भेंब्रे यांनी त्यावर आधीही बरेच लिहिले आहे. देेशोधनात्मकदृष्ट्या इतिहासाच्या तळात खोल बुडी मारून बरीच मौलिक रत्ने शोधून काढली आहेत. इ.स. १५४० मध्ये पोर्तुगीजांची सत्ता तिसवाडी महालात प्रबळ झाली आणि त्या वर्षी हिंदू देवालये व हिंदूंचे धार्मिक ग्रंथ उद्ध्वस्त करण्याचे सत्र सुरू झाले. १५६५ नंतर सासष्टी व बार्देस महालातही त्याचे लोण पोहोचले.

१६८०मध्ये संभाजी महाराज मराठ्यांच्या गादीवर आल्यावर पोर्तुगीजांबरोबरचा संघर्ष त्यांनी तीव्र केला. पोर्तुगीज राजवट गर्भगळित झाली.

समभाषिकत्वाचा प्रभाव पोर्तुगालला आपल्या जन्मापासून माहीत होता. मराठ्यांचे बल वाढत चालले होते व त्या वाढीला आळा घालणे शक्य नव्हते. व्हाईसरॉयला त्या वेळी दोन उपाय सुचले. पोर्तुगाली पुरुष व एतद्देशीय बायका यांचे विवाह घडवून आणून संख्याबळ वाढविणे हा एक (पण तो दीर्घकालीन होता) व आपल्या तीनही महालांतील जनतेची भाषाच बदलून टाकणे हा दुसरा. हा उपाय त्याला शीघ्र अमलात येण्यासारखा वाटला. (कै. लक्ष्मीकांत भेंब्रे यांचे ‘अस्मिता’वरील साहित्य)

भेंब्रे म्हणतात की, तीन वर्षांच्या कालावधीत जनतेची भाषाच बदलून टाकण्याचा हा प्रयोग जगातील एकमेव असावा. ख्रिस्ती रहिवाशांवर त्याचा फारच मोठा परिणाम झाला.

या काळात धर्म साहित्य, हिंदू संस्कृतीच्या चिरफळ्या उडाल्या.

ख्रिस्त्यांच्या धार्मिक प्रवचनांना सर्वांनीच (हिंदूंनीही) उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आली.

त्यानंतर मात्र हिंदूंसमोर एक तर पळून जायचे किंवा धर्मसंस्कृतीवरील दडपशाही सोसायची असे दोनच पर्याय राहिले. अनेकांनी पलायन केले. आचार, चालीरीती व पर्यायाने संस्कृतीचे जे दोर शिल्लक राहले ते पकडून ठेवले.

या काळात गोव्यातील व्यवहार जवळजवळ बंद पडले होते. दुर्दशेचे थैमान सुरू झाले. पोर्तुगीजांना दैनंदिन व्यवहार चालविणेही कठीण बनले. दुसर्‍या बाजूला पळून गेलेले हिंदू मराठ्यांशी संधान बांधून पोर्तुगीज गोव्यावर आक्रमण करतील, अशी भीती पोर्तुगीज सत्ताधीशांना वाटू लागली. (‘पोर्तुगालच्या प्रदीर्घ राजवटीतील गोव्यातील भाषाकरण’, भेंब्रे) त्यामुळे त्यांना भाषा  व संस्कृतीविरोधी धोरणात बदल करण्यावाचून पर्याय राहिला नाही. १७३१ मध्ये संस्कृतीविषयक निर्बंध केवळ कॅथलिकांनाच लागू करण्यात आले.

भेंब्रे यांचे मत असे की मधल्या काळात धर्मांतरित ख्रिश्चनांचा एकूणच हिंदू चालीरीती व मौखिक भाषेच्या वृद्धीसाठी लागणार्‍या गोष्टींशी संपर्क तुटला. त्यामुळे तिसवाडी, सासष्टी व बार्देस या महालांतील कॅथलिक जनतेची भाषा बदलली. ती अपभ्रष्ट बनली.

या काळात जनतेची सर्वसाधारण व्यवहाराची भाषा बदलली नव्हती. (ती कोंकणीच राहिली.) त्यामुळे पोर्तुगीज मिशनरी संस्थांमध्ये पेच निर्माण होणे शक्य आहे, कारण उच्चवर्णीय ख्रिस्ती पोर्तुगीज शिकू लागले, तरी बहुसंख्य जनता शैक्षणिक साधनांच्या अभावी निरक्षरअसली पाहिजे. पाद्रींमध्ये कोंकणी जाणणार्‍यांची संख्या कमीच होती. विदेशी पाद्रींना कोंकणीचा तिटकारा होता. त्यामुळे जनतेच्या भाषेतून प्रवचनेे करणे व कन्फेशन निवेदने ऐकणे ही एक मूलभूत गरज होऊन बसली.

१७८७ मध्ये फ्रांसिस्कन संप्रदायाने लिस्बन सरकारपुढे मांडलेल्या आपल्या निवेदनात मराठी भाषेची महती नोंदवली आहे, असा दावा भेंब्रे करतात. “देशी भाषेतून प्रवचने करण्यास जे ज्ञान व जी शब्दसंपत्ती लागते ती असणारे (देशी) पाद्री फार थोडे आहेत. खर्‍या विद्वतेची जी भाषा जनतेमध्ये रूढ आहे ती भाषा मराठी होय. हीच देशी भाषा आहे. आणि या भाषेतून देशी पाद्रींनी केव्हाही प्रवचने केलेली नाहीत. (गोमंतकाची सरस्वती, अ.का. प्रियोळकर) त्यानंतरच देशी पाद्री नेमण्यास सुरवात झाली.

१७६३ ते १७८८ या पंचवीस वर्षांच्या कालावधीत नवे दहा महाल (जे त्यापूर्वी मराठ्यांच्या राजवटीखाली होते.) पोर्तुगाली गोव्यात समाविष्ट झाले व १७६३ मध्ये अंत्रुज तसेच सोंदेकर राज्याच्या आधिपत्याखालील भाग यांना धार्मिक चालीरीतींना मोकळीक देणारा जाहीरनामा काढण्यात आला. महालांची लोकसंख्या सुमारे दीड लाख (इ.स. १८००) होती, पण त्यांच्यात भाषा, संस्कृतीबाबत बरेच मोठे अंतर पडले होते. नव्या महालात हिंदूंनी मराठी शाळा चालविल्या. तेथे उच्चवर्णीय विद्यार्थी शिकू लागले. शिवाय पुराण वाङ्मयाचे श्रवण, प्रवचने, नाटके, दशावतारी खेळ, ओव्या, गीते, लोकनृत्ये याद्वारे समाजाचे प्रबोधन घडत होते. हिंदू संस्कृतीची नदी अव्याहत राहण्यास मदत झाली होती.

१८३७ मध्ये परकी राजपत्रे मराठीत भाषांतरित केली जाऊ लागली. १८४३ मध्ये पणजीतील माध्यमिक शाळेत (लिसेव) मराठी भाषेचा विषय अंतर्भूत करण्यात आला. मराठी शिक्षणासाठी क्रमिक पुस्तके तयार करण्याचे काम  १८४७ मध्ये सुरू झाले.

भेंब्रे म्हणतात की, मराठी शाळेत इसवी सनाच्या अकराव्या-बाराव्या शतकापासून भारदस्त वाङ्मय तयार होत होते. तरी त्या भाषेचे व्याकरण व शब्दकोश यांची आवश्यकता अद्याप भासली नव्हती. सोळाव्या शतकात काही परकीय कॅथलिक पाद्रींना त्याची गरज भासू लागली. गोव्यात काही मराठी -पुर्तुगाली शब्दसंग्रह तयार करण्यात आले होते, पण ते छापून प्रसिद्ध करण्याचे कुणाच्याही मनात आले नाही.

गोव्यातही बरेच मराठी ग्रंथ उपलब्ध होते व इन्क्विजिशनच्या काळात त्यांची आहुती पडली असे बरेच जण मानतात. संशोधक डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांच्या मते, इ.स. १५६० मध्ये गोव्यात धार्मिक, शोध, चौकशीच्या सत्रात मराठी व संस्कृत ग्रंथ नष्ट करण्यात आले. डॉ. पिसुर्लेकर यांना पोर्तुगालच्या ब्राग येथील मुख्य वाचनालयात ज्ञानदेवकृत ‘वासिष्ठयोग’, निवृत्तीदेवकृत ‘भगवद्गीतेची टीका’, कृष्णदास शामाकृत ‘कृष्णचरित्रकथा’, विष्णुदास नामाकृत ‘महाभारतातील आख्याने’ व ‘प्रल्हादचरित्र’, ‘हरिश्चंद्र पुराणकथा’, ‘गरुडकथा’, ‘बालक्रीडा’, ‘हरणीची कथा’, ‘राजनीती ओव्या’, ‘रामाश्वमेध’, ‘सुखदेवचरित्र कथा’, ‘गुरुशिष्य संवाद’, ‘मदालसा’, ‘रुक्मिणी स्वयंवर’, ‘धर्मांश्वरमेध’, ‘कर्णपर्व’, ‘सीताहरण’, ‘कृष्णार्जुन-संवाद’ वगैरे कित्येक मराठी ग्रंथ रोमन लिपीत लिहिलेले पाहावयास मिळाले. रोमन लिपीतील या नकला जेझुईत मिशनरी लोकांना त्यांच्या आधारे मराठी भाषा शिकता यावी म्हणून करण्यात आल्या होत्या, असा उल्लेख जुन्या पोर्तुगीज कागदपत्रांत डॉ. पिसुर्लेकरांना सापडल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

व्हिदकोंदी द व्हील नोव्ह द औटे या राज्यपालांच्या कारकिर्दीत मुख्य सचिवपदी जु. येलियोदॉला द कून्य रिव्हार यांची नेमणूक झाली आणि या इतिहास संशोधकाने गोव्यात मोठे कार्य केले.

१८५८ मध्ये कून्य रिव्हारने (जोकीम हेलियोदोरो कुन्य रिव्हार हे पोर्तुगीज फिजिशियन, प्राध्यापक विचारवंत व इतिहासकार असून कोंकणी भाषेचे पुरस्कर्ते मानले जातात.) ‘अर्त द लींग्व कानारी’ (स्थॉमस स्टिफन्स यांचा कोंकणी भाषेविषयी ऐतिहासिक निबंध) या पोर्तुगालीत प्रसिद्ध झालेल्या जुन्या पुस्तकाची आवृत्ती प्रसिद्ध केली. भेंब्रे यांच्या मते, रिव्हार यांनी लोकांचा बुद्धिभेद करून आपले भाषाविषयक हेतू साध्य करण्यासाठी पुस्तकाचे नाव बदलून ते ‘ग्रामातिक द लिंग्व कोंकानी’ ठेवले. कानारी म्हणजे  ‘कोकांनी’ नव्हे, असे भेंब्रे म्हणतात. रिव्हारने १८५९ मध्ये ‘ग्रामातिक द लिंग्व कोंकानी दु नॉति’ या नावाने दुसरे पुस्तक प्रसिद्ध केले. ही ‘कोंकणी’ पुस्तके असली तरी रिव्हारने गोव्यात दोन्ही महालांत लोक कोंकणी बोलतात, असा खोटा आभास निर्माण केला, असा भेंब्रे यांचा आरोप आहे.

भेंब्रे यांचा दावा विचारात घेतला तर वाटते की, गोव्यात भाषावाद निर्माण करणारा ‘कोंकणीवादी’ कुन्य रिव्हार होता. त्यांला मराठी येत नव्हती व दहा महालांत मराठीचा पुरस्कार केला जात होता. १८ व्या शतकात गोव्यात मराठी ग्रंथ प्रकाशित झाले होते. या गोष्टी त्यांच्या खिसगणीतही नव्हत्या, असे भेंब्रे यांना म्हणायचे आहे.

कुन्य रिव्हार यांच्याबद्दल अ.का. प्रियोळकर यांचाही आक्षेप असा की, ‘खिस्तपुराण’नंतर प्रकाशित झालेले फ्रेंच पाद्री एलिएन द ला क्रुवा यांचे ‘सेंट पीटरचे पुराण’ (१६२९), पोर्तुगीज पाद्री आंतोनियु द सालदांजी यांचे ‘सांतु आंतोनीची जीवितकथा आणि जीवन वृक्षाची फळे’ (१६५९) हे दोन ग्रंथ व ‘गोमंतकीय पाद्री मानुएल ज्याकिस द नोरोन्ह’ (१७६९) यांचे ‘दिप्तीजीवन’ हे ग्रंथ मराठीत होते, त्या वेळी लोक केवळ कोंकणी बोलत, लिहिण्याचा प्रघातच नव्हता, तो प्रयत्न ख्रिस्ती पाद्य्रांनी केला, असे मत प्रियोळकर यांनी नोंदविले आहे.

इन्क्विजिशनच्या स्थापनेनंतर ५४ वर्षांनी इ.स. १६१४ साली फादर थॉमस स्टिफन्स या इंग्रज पाद्य्राने ख्रिस्ताचे चरित्र ‘ख्रिस्तपुराण’ हे मराठी भाषेत लिहिले. १०,९६२ ओव्यांचे हे ख्रिस्तपुराण मराठी भाषेचे वैभव वाढविणारे म्हणून मानले जाते. ख्रिस्ती धर्मतत्त्वांचा देशी भाषेत प्रचार करण्यासाठी हा ग्रंथ तयार करण्यात आला. त्यात सुशिक्षित नवख्रिस्तांची गरज भागविण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे मराठी भाषेत त्यांनी बरेच कोंकणी शब्द घेतले होते. ते कसे आहे ते पहा :

“जैसी हरळांमाजि रत्नकिळा

कि रत्नामाजि हिरा निळा

तैसी भासांमाजि चोखाळा

भासा मराठी

जैसी पुस्पांमाजि पुस्प मोगरी

कि परिमळांमाजि कस्तुरि

तैसी भासांमाजि साजिरी

मराठिया

पाखियाँमधें मयोरू

वृखिआमधें कल्पतरु

भासांमध्ये मानु थोरू

मराठियेसि

तारांमध्ये बारा रासी

सप्तवारांमाजि रवीससी

यां दिपीचे आं भासांमध्ये तैसी

बोली मराठीया”

१८४७मध्ये मराठी शिक्षणाचा प्रसार वाढू लागला. नव्या काबिजादीत मराठी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. १८३५ मध्ये महाराष्ट्रात रूढ झालेली नवीन शाळापद्धती गोव्यात लागू करण्यात आली. या शाळा आता लोकप्रिय होऊ लागल्या. कोंकणातून शिक्षक मोठ्या प्रमाणात येऊ लागले. या शाळातही पोर्तुगीज भाषा ‘घुसवण्याचा’ प्रयत्न सरकारने चालविला होताच, पण त्या धोरणाला विरोध झाला.

१८८५मध्ये रेल्वे मार्गाने गोवा मुंबई इलाख्याशी जोडण्यात आला व त्या भागांकडे दळणवळण वाढले. भाषावादासाठी ते खूपच उपकारक ठरले. मुंबई-पुण्याकडची वृत्तपत्रे मोठ्या संख्येने गोव्यात येऊ लागली. विद्वान लोकांची भाषणे गोव्यात आयोजित केली जाऊ लागली. ‘केसरी’सारखे वृत्तपत्र लोकप्रिय बनले. विसाव्या शताकाच्या आरंभी गोव्यात अनेक हिंदू संस्था, मराठी सांस्कृतिक संस्था स्थापन झाल्या. १६ सप्टेंबर १९२७च्या स्थानिक कायद्यात मराठी खासगी शाळांना संरक्षण देण्याचे तत्त्व मान्य करण्यात आले. या काळात पोर्तुगालात सारझारशाही अवतरली होती, पण मराठीची चळवळ आता जोमाने पुढे सरसावत होती.

१९२८मध्ये गोव्यात गोमंतक (मराठी) साहित्य सेवक मंडळाची स्थापना करण्यात आली. १९३० मध्ये १५ वे मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले. १९३४ साली सारस्वत ब्राह्मण समाजाने वाङ्मय प्रसाराला वाहिलेले संमेलन भरविले. १९३५मध्ये मडगावात गोमंत मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अधिवेशन भरविण्यात आले. त्या काळात गोव्यात २५० शाळा होत्या व विद्यार्थी होते ९,५००!

१९३५ नंतर गोव्यातील सालाझारी राजवटीने नागरिकांचे लोकशाही हक्क हिरावून घेतल्यामुळे सर्व प्रकारच्या चळवळी थंडावल्या. गो. सा. से. मंडळाचे कार्यही ठप्प झाले. दुसरे गो.म. सा. संमेलनही गोव्यात भरू शकले नाही. हे संमेलन मुुंबईत भरविण्याची कल्पना श्री. बा.द. सातोस्करांना सुचली. हे संमेलन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ६ व ७ फेब्रुवारी १९४३ रोजी झाले.

गो.म. सा. संमेलन वरील संमेलनाच्या निमित्ताने गोव्याबाहेर गेले म्हणजे एक प्रकारे ते निर्वासित झाले. हे निर्वासित संमेलन गोवामुक्तीपर्यंत गोव्याबाहेर चालू ठेवण्याची परवानगी गो. सा. से. मंडळाने दिल्यामुळे पुढील संमेलने मुंबई, पुणे, बेळगांव, मुंबई, कारवार, मालाड, विलेपार्ले, लोणावळा या ठिकाणी झाली आणि १९६१ साली गोवा मुक्त झाल्यानंतर १९६२ च्या डिसेंबर महिन्यात हे संमेलन पणजीत झाले. म्हणजे एकूण २० वर्षे हे संमेलन निर्वासित संमेलन म्हणून गोव्याबाहेर राहिले. या काळात त्याला आपलेपणाने जपण्याचे, त्याची वाढ करण्याचे काम श्री. बा. द. सातोस्कर आणि कै. ज. वि. तथा जनाप्पा कामत यांनी केले. या संमेलनातून भाषिक प्रश्न आणि गोवामुक्तीचा प्रश्न सतत गाजला.

कृष्णदास शामा हे गोमंतकाचे आद्य कवी. त्यांचाच ‘श्रीकृष्ण चरित्र कथा’ हा गोमंतकाचा आद्य ग्रंथ. त्याची रोमन लिपीतील प्रत पिसुर्लेकरांना पोर्तुगालच्या पुरातत्त्व खात्यात सापडली होती. डॉ. पिसुर्लेकरांच्या यादीत ‘श्रीकृष्ण चरित्र कथा’ या काव्यग्रंथाचा कर्ता म्हणून कृष्णदास शामा यांचे नाव आले असून ते गोमंतकीय कवी होते. हाच गोमंतकाचा ज्ञात असा आद्य मराठी ग्रंथकार असे मानतात. भागवताच्या ‘दशमस्कंधा’च्या आधारे त्यांनी हा ग्रंथ सिद्ध केला. संत एकनाथांच्या ‘एकनाथी भागवता’पूर्वी ४७ वर्षे कृष्णदास शामा यांनी आपला ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ कोठे व कधी आपण लिहिला हे त्यांनीच त्याच काव्यग्रंथात सांगितले आहे.

ते लिहितात-

‘वेय संवत्सरी। राजा शालिवाहनु राज्य करी। चौदाशी अठ्ठेचाळीसावरी वरूसें जाहली॥२४६॥ जो शकु चालता ते वरुसी॥ वैशाख मधु मधुर मासीं। शुक्लपक्षी त्रयोदशी। आरंभु केला॥२४७॥ केळशी ग्राम ब्रह्मपुरी। जेथे शांतादुर्गा परमेश्वरी. कौशिक गोत्र ऋषि माझारी। वरिष्ठ जे॥२४८॥ ते गोत्रकुळी उत्पतु। श्रीराम राजा नंदनु। विष्णुभक्ति परियेणुं। नावे सामराजु॥२४९॥ झाला कृष्णाचा दासु। तारावया संसारा गर्भवासु। भक्ति करू ऋषिकेशी॥ आराधिला॥२५०॥ तो श्रीविठ्ठल देवी आराधितां। प्रसन्न होऊनियां भक्तां. गोविंदस्वरुपें येऊन माथा॥ ठेविला करु॥२५१॥’

कृष्णदास शामांच्या वरील पंक्तींवरून त्यांनी आपला काव्यग्रंथ रचण्यास शके १४४९ वैशाख शु. १३ रोजी आरंभ केला असे मानतात. म्हणजे २५ एप्रिल इ. स. १५२६ ला त्यांनी काव्यग्रंथ लिहिण्यास आरंभ केला. हा काव्यग्रंथ ज्या केळशी गावी शांतादुर्गा देवस्थानात बसून त्यांनी लिहिला तेव्हा तो गाव पोर्तुगीजांच्या अमलाखाली नव्हता, तो आदिलशाही सत्तेखाली होता. त्यांचे खरे नाव सामराजु, परंतु त्यांना स्वत:ला कृष्णदास म्हणून घ्यायला धन्यता वाटत होती आणि सुखद अनुभव म्हणजे या ग्रंथाचे काम चालू असताना डॉ. प्रभुदेसाई यांनाच त्यांच्या काकाच्या घरी लोलये काणकोण येथे या ग्रंथाची देवनागरी लिपीतील मूळ प्रत सापडली. ‘मी त्यांच्याकडेच शिक्षणासाठी राहिलो होतो. ग्रंथाचे काम करीत असता एकदा सहज म्हणून माझे चुलते प्रभुगावकर यांना त्या आद्यग्रंथासंदर्भात विचारले आणि त्यांच्याच घरी हा ग्रंथ सापडला,’ असे वि.बा. प्रभुदेसाई यांनी म्हटले आहे.

पिसुर्लेकरांना सापडलेल्या रोमन ग्रंथातील पहिली दोन-तीन पाने गहाळ झालेल्या अवस्थेत होती. देवनागरी प्रतीतील पहिली दोन-तीन पानेही तशीच गहाळ आहेत. याच ग्रंथाची एक प्रत इंदूरला सापडली होती.

कृष्णदास शामांच्या ‘श्रीकृष्ण चरित्र कथा’वरून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते की, गोमंतकाची भाषा ही त्या काळी मराठीच होती, असे शशिकांत नार्वेकर यांनी (गोमंतक मराठी भाषकांचे मनोगत) नोंदविले आहे. ते म्हणतात: ‘गोमंतकातील मराठीची परंपरा थेट ज्ञानेश्वरीच्या काळापर्यंत मागे जाते. गोमंतकातला जुन्यातला जुना मराठी भाषेतला ताम्रपट आज उपलब्ध आहे तो शके १२२२ मधला. हा ताम्रपट खांडोळे येथे सापडला असून तो मराठी भाषेत पण कानडी लिपीत आहे. दुसरा शके, १३२४ मधला वेळूस-सत्तरी येथे सापडला असून तो मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहे. तिसरा शके १३३५ मधला श्रीनागेश बांदिवडेचा ताम्रपट मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहे. या पुराव्यावरून सिद्ध होते की, गोमंतकाची भाषा मराठीच होती! कविवर्य कै. बा.भ. बोरकर यांनी १४व्या शतकात मराठी नांदत होती, असे मत नोंदविले आहे. गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या ‘गोमंत शारदा’ (संपादक रामदास प्रभू) या गोमंतकातील १५२६ पासून १९६५ पर्यंतच्या मराठी कवितेचा वेध घेणाऱ्या ग्रंथाला १९७२ साली त्यांनी प्रस्तावना लिहिली. ‘जुन्या काळी आपल्या देशात प्रथा अशी होती की, बोलावे स्वभाषेत, पण लिहावे संस्कृतात. याचा अर्थ असा नव्हे की, लोकभाषेत साहित्यनिर्मिती मुळीच होत नसे. जी काही थोडी होई ती जानपद स्वरूपाची. सर्वसामान्य लोकांना आपल्या साहित्यनिर्मितीची ऊर्मी प्रकट करायला स्वभाषा हेच एक साधन उपलब्ध होते, पण बुद्धिमंत वर्ग कटाक्षाने संस्कृतातच साहित्यनिर्मिती करी. ही प्रथा गोव्यात त्या काळी चांगलीच प्रतिष्ठित होती. आठ संस्कृत महाशाळा तेव्हा नांदत्या-गाजल्या होत्या, पण चौदाव्या शतकाच्या आसपास संस्कृतची जागा हळूहळू मराठीने घेतलेली दिसते,’ असे ते म्हणतात.

मराठीत ‘विवेकसिंधू’ हा ग्रंथ आद्य असे मानतो तरी ‘श्रीकृष्ण चरित्र कथा’ हा ग्रंथ एकनाथापूर्वीची कथा आहे. बाराव्या शतकात मराठी भाषेत पहिला ग्रंथ लिहिला गेला असे मानले, तर गोमंतकात १४ व्या शतकात पहिल्या ग्रंथाची मुहूर्तमेढ रोवली गेली. १५१० साली पोर्तुगीजांनी गोवा काबीज केल्यानंतर मात्र, या वैभवशाली परंपरेची धूळधाण उडू लागली, पण ते पोलादी अन् राक्षसी पंजेही हे धन संपूर्णत: नष्ट करू शकले नाहीत.

सोळाव्या शतकातील महत्त्वाची घटना म्हणजे इ.स. १५५६ साली पोर्तुगीजांनी गोमंतकात पहिल्याप्रथम छापखाना आणला. भारतातील पहिला छापखाना म्हणूनही त्या घटनेला महत्त्व आहे. ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारी धार्मिक स्वरूपाची पुस्तके छापण्यासाठीच छापखाना गोमंतकात आला होता. ‘ख्रिस्तपुराण’, ‘सेंट पीटर पुराण’, ‘आंतोनीची जीवित्वकथा’ हे काव्यग्रंथ मुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत.

सोळाव्या नि सतराव्या शतकात पोर्तुगीजव्याप्त प्रदेशात (तिसवाडी, बार्देश आणि मुरगांवसह सासष्टी) धर्मच्छल चालू असतानासुद्धा मराठीतून वाङ्मयनिर्मिती होत होती. इ.स. १६५० साली समाधिस्थ झालेले, मंगेशीचे रहिवासी नायकस्वामी (शंकर मंगेश नायक करंडे) यांनी शिवगीतेवर कविताबद्ध टीका लिहिल्याची माहिती मिळते. त्यांनीच मोरोपंतांची ‘आर्या’ प्रथम गोमंतकात आणली. ‘शिवदर्पण’, ‘श्रीपूर्णप्रबोध चंद्र’ आणि ‘राधाविलास’ असे तीन काव्यग्रंथ त्यांच्या नावावर सापडतात. ‘कोंकणाख्यान’ (इ.स. १७२१) हा काव्यग्रंथ लिहिणार्‍या रघुनाथ या कवीची विशेष माहिती मिळत नाही, परंतु हा कवी गोमंतकीय असावा, असे काही विद्वानांचे मत आहे. इ.स. १७६७ साली ‘पंचपथानुभव’ लिहिणारा कवी व्यंकट हा नायकस्वामींचा शिष्य असल्याचा उल्लेख त्याच्याच वाङ्मयात मिळतो. त्याने बरेच ग्रंथ लिहिले आहेत.

अठराव्या शतकात महाराष्ट्र ‘संत-पंत’ काव्याला बहर आला होता. त्या वेळी गोमंतकातले वाङ्मयीन जीवन कसे होते याचे वर्णन पं. महादेवशास्त्री जोशी यांनी पुण्यात भरलेल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनात (१९४७) स्वागताध्यक्षीय भाषणात केले आहे. ते म्हणतात-‘देहूचे तुकाराम सदेह वैकुंठास गेल्यानंतर थोडक्याच काळात आमचे तुकारामबाबा वर्दे जुवे येथे जन्मले आणि त्यांनी द्राक्षालाही माधुर्याची दीक्षा देईल अशी कविता रचिली. ज्या वेळी बीड येथे विठ्ठल नृसिंह ‘शुकरंभा संवाद’, ‘कबीर कथा’ गात होता. ज्या वेळी ‘ज्ञात्या जनात शुकसे’ वामन पंडित ‘यथार्थ दीपिका’ लिहून साधुसभा सजवीत होते, त्याच सुमारास नायकस्वामी शिवगीतेला मराठी टीकेचे लेणे लेववीत होते. ज्या कालखंडात आमचे ‘नि:स्पृहस्य तृणं जगत’ बाण्याचे सोहिरोबा आंबिये ज्ञानवैराग्याची पदे निर्मित होते, त्या वेळी कवनाचा सागर अनंत फंदी डफाच्या थापेसरशी दिलरंगी लावणीचे चरण झोकून देत होता, ज्या काळी महिपतीबोवा प्रेमळ वाणीने ‘बरवी संत-चरित्रे’ गात होते आणि निरंजन माधव ‘अद्वैतामृत’ लिहीत होते त्याच सुमारास आमच्याकडे विद्वद्वरेण्य महेश्वर शास्त्री सुखठणकर हे अमर कोषावर ‘अमर विवेक’ नावाची टीका लिहिण्यात गढून गेले होते. जेव्हा विष्णुबुवा ब्रद्मचारी ‘भावार्थ सिंधु’ नावाचा ओवीबद्ध ग्रंथ रचीत होते, त्याच सुमारास गोव्यात सोयरुभट्टांची ‘वेदांत चूडामणी’वर समश्लोकी भाषांतर रचना चालू होती आणि कृष्णभट बांदकरांची भक्तिपर पदे जनतेच्या श्रवण-संपुष्टात पडत होती.”

संतकवी सोहिरोबानाथ आंबिये (१७१४ ते १७९२) हे नाथकवी होते. नाथ संप्रदायाचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. ते गोमंतकातील पेडणे महालातील मालपे गावचे असून त्याच गावात त्यांचे पूर्ण वय गेले. उत्तर आयुष्यात ते सावंतवाडीतील बांदे गावात जाऊन राहिले होते. भक्ती, ज्ञान, वैराग्य हे पैलू तर त्यांच्या जीविताला होतेच, पण त्याशिवाय ते नाथपंथनुयायी म्हणजे योगमार्गी होते. याबाबतीत संत ज्ञानेश्वरांच्या चरित्राशी त्यांच्या चरित्राचे साम्य दिसते, असे कविवर्य दा. अ. कारे यांनी म्हटले आहे. तीर्थयात्रेच्या निमित्ताने ग्वाल्हेरीला पोहोचले असताना बक्षीबहाद्दर जिवबादादा केरकरांनी त्यांची महादजी शिंद्यांशी गाठ घालून दिली होती. उज्जयिनीत त्यांनी मठस्थापना केल्याचा उल्लेख सापडतो. त्यांची अभंग, पदे, सवाया, कटिबंध, श्लोक वगैरे बरीचशी मराठी व हिंदुस्थानी कविता लोकांच्या तोंडी आहे. त्यांच्या सुंदर काव्यरचनेची झलक कशी आहे ते पाहा.

“हरिभजनावीण काळ घालवू नको रे! ॥ध्रृ॥

दोरिच्या सापा भिऊनी भवा । भेटी नाही जिवा शिवा ॥

अंतरींचा ज्ञानदिवा मालवूं नको रे! ॥1॥

एकोणिसाव्या शतकात, मुद्रणकलेचा प्रचार होण्यापूर्वीच्या काळात लक्ष्मण पांडुरंग केंकरे पांडबा कैसरे, पांडबा दुभाषी ह्या कवींची नावे स्फुट कविताकार म्हणून साहित्य इतिहासात दिसतात. पुढे मुद्रणकलेचा अधिक प्रसार झाल्याबरोबर हिरबा नाईक, राघोबा नायक, माधव नारायण वैद्य, दत्तात्रय तुकाराम शास्त्री पणशीकर, वासुदेव शास्त्री पणशीकर, भिषग्वर्य रामचंद्र पांडुरंग तथा दादा वैद्य, रामचंद्र वामन नायक करंडे इत्यादी कवींच्या काव्याचा उल्लेख मिळतो. विसाव्या शतकाच्या प्रारंभी एकनाथ गणेश भांडारे, विष्णू रंगाजी शेळडेकर, यशवंत सूर्यराव सरदेसाई ऊर्फ भाई देसाई, विनायक काकबा प्रियोळकर, महाबळेश्वर रुद्राजी प्रतापराव सरदेसाई, विनायक सदाशिव सुखठणकर, पुरुषोत्तम मंगेश लाड इत्यादी कवी भेटतात.

पिसुर्लेकरांनी आपल्या संशोधनात पोर्तुगीज-मराठा संबंधांवर प्रकाश टाकला आहे. पोर्तुगीजांचा पुण्याकडे पत्रव्यवहार चालू असायचा. त्या वेळी मराठ्यांना समजावे म्हणून पोर्तुगीज आपल्या पत्रातून अनेक मराठी शब्दांचा वापर करीत.

ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या प्रभावातून नंतर गोव्याचा मराठीशी संबंध कमी होत गेला. गोव्याला ते ‘पोर्तुगालचा समुद्रापारचा प्रदेश’ मानत. त्यामुळे मराठी तोडून त्यांनी गोव्याच्या जनतेवर पोर्तुगीज लादली. त्यांची मातीशी असलेली नाळ तोडण्याचा प्रयत्न झाला.

सुशेगाद
राजू नायक
अक्षर प्रकाशन
किंमत : २७५ रु.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0