मोदींची झोप, मुमकीन है!

मोदींची झोप, मुमकीन है!

कोल्हापुरच्या चंद्रकांत पाटील यांनीच काढलाय हा विषय.

चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे आमदार.

पाटील म्हणाले की नरेंद्र मोदी दोन तास झोपतात. पाटीलबुवांना कळलंय की मोदींनी चोविस तास झोपेशिवाय रहाण्याचा प्रयोग आरंभलाय. म्हणजे उरली सुरली दोन तासाची झोपही ते भविष्यात कटाप करणार आहेत. हे सारं मोदी का करत आहेत तर त्यांना हिंदुंचा देश स्थापन करायचाय. या आधी दोनच वेळा हिंदूंचा देश होता, महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराजांच्या काळात. आता पुन्यांदा मोदी हिंदूंचा देश तयार करणार आहेत. त्यासाठी २०२४ निवडणुक त्यांना जिंकायची आहे असंही पाटीलबुवा म्हणाले.

मोदी खरोखर किती तास झोपतात याची चौकशी करायचा प्रयत्न केला. मोदींच्या आसपास वावरणारे डझनावारी शरीरक्षक,  मोदी ज्या शाखेत जात होते त्या शाखेतली माणसं, मोदी प्रचारक म्हणून जिथं जिथं गेले तिथली माणसं, पंतप्रधान कार्यालयातली माणसं, मोदींचं विमान चालवणारी माणसं, मोदींचे कपडे शिवणारी माणसं, मोदींचा मोर पाळणारा माणूस. कोण्णी कोण्णी मोदी किती तास झोपतात, किती वाजता झोपतात आणि किती वाजता उठतात ते सांगत नाहीत.

मोदींबद्दल कोणालाच काहीही माहित नाही.

मोदी कमीत कमी वेळ लोकसभेत असतात. त्यांचा बहुतेक वेळ निवडणुक मोहिमेत भाषण करण्यात जातो, कारण देशात सतत निवडणुका चाललेल्या असतात. बंगाल संपलं. उत्तर प्रदेश संपलं. आता गुजरात. गुजरात संपतंय तोवर महाराष्ट्र. तोवर पुन्हा लोकसभा. निवडणुक चक्र निरंतर सुरुच असतं. मोदी सतत या मंचावर किंवा त्या माईकपाठी. स्थळ बदलतं, वेळ बदलते आणि अर्थातच स्थळाच्या गरजेनुसार कपडे बदलतात, बोलणारे मोदी हा कॉमन फॅक्टर.

मोदी फक्त दोनच तास झोपतात? मोदी बोलता बोलता तर झोपत नसतील? मोदी भाषण करतायत तरीही झोपलेत असं तर घडत नसेल? मोदींच्या तोंडातून शब्द बाहेर पडताहेत, त्यांचे हात हलत आहेत, त्यांचे डोळे प्रेक्षकांना शोधत फिरत आहेत, तरीही मोदी झोपलेले असं तर घडत नाही ना?

पाटील यांनी सांगितलं त्यानुसार ते शक्य आहे. डोळे उघडे ठेवून बोलत असतांना झोप काढण्याची सिद्धी मोदींनी तपश्चर्या करून मिळवली असण्याची शक्यता आहे. ते मागं एकदा बर्फाच्या गुहेत ध्यानधारणा करतांना दिसले होते. तेव्हांपासून निद्रेवर नियंत्रणाचा प्रयोग सुरु झाला असेल? भारतासारख्या प्राचीन देशात काहीही शक्य असतं. कुंभकर्ण म्हणे सहा महिने झोपत असे आणि सहा महिने टक्क जागा रहात असे.

भारत है तो मुमकीन है!

मोदी चोवीस तास भाषणं करणार; जनतेला ती सिद्धी प्राप्त झालेली नसल्यानं जनतेनं त्यांची भाषणं ऐकताना सोयीनं झोपून घ्यायचं.

झोपेबाबत पाटील यांची समजूत आणि उरलेल्या जगाची समजूत यात फरक आहे.

बाकीचे लोक, त्यात डॉक्टर आणि वैज्ञानिक येतात, म्हणतात की माणसाला सुमारे सहा तास झोप आवश्यक असते. झोप झाली की माणसाचा मेंदू ताजा तवाना होतो, नीट काम करतो. झोप कमी झाली की माणसाच्या प्रकृतीवर परिणाम होतो, माणसाची विचारशक्ती बिघडते.

बाकीचे लोक म्हणतात की माणसाला झोप यावी अशी तजवीज शरीरात करून ठेवलेली असते. माणसाला झोप आणणारी रसायनं मेंदू तयार करतो, माणसाला झोप लागते. त्या रसायनांचं बिनसलं की झोपेचं बिनसतं. झोपेचं बिनसणं ही एक डिसॉर्डर असते असं लोकं म्हणतात. अशी डिसॉर्डर झाली की सामान्य माणसं म्हणतात की माणसाचं डोकं बिघडलंय. खेड्यातली माणसं म्हणतात की माणसाचा एक आटा ढिला झालाय. ती डिसॉर्डर घालवण्याचा प्रयत्न लोकं सतत करत असतात. त्या रसायनांची नावंही लोकांनी ठरवलीत. ते रसायन मेंदूत तयार व्हावं यासाठी औषधंही लोकांनी तयार केलीत.

एक नामांकित, उत्तम व्यावसायीक इंजिनियर होते. तेही मोदींसारखेच अगदी कमी झोपत असत. कमी झालेली झोप भरून काढण्यासाठी औषधं घेत, डॉक्टरांची मदत घेत. तरीही झोप लागत नसे. मग ते दिवसरात्र काम करत असंत, धरणांची डिझाईनं करत असत, सिंचन व्यवस्थांची डिझाईनं करत असत. डिझाईनं अर्थातच उत्तम असत. पण डिझाईनं अमलात आली  की भारतात क्रांती होणार, सुबत्ता येणार, समता येणार वगैरे सांगत. माणसं त्यांचा डिझाईनांचा भाग ऐकत आणि बाकीचा भाग सोडून देत. त्यामुळं धरणं-बांध वगैरे तयार झाले पण त्यांच्या क्रातीतून मात्र लोकांची सुटका झाली. त्या इंजिनयरांना पंतप्रधान केलं असतं तर देशाचं काही खरं नव्हतं.

मुद्दा असा की उपलब्ध आधुनिक वैज्ञानिक माहिती नुसार कमी झोपणारा किवा न झोपणारा माणूस नीट विचार करू शकत नाही, त्याच्या हातून, नव्हे नव्हे डोक्यातून, चुका होण्याची शक्यता फार असते.

डोनल्ड ट्रंप यांच्या डोक्यात बिघाड आहे, त्यांच्या हाती सत्ता असणं अमेरिकेच्या व जगाच्या हिताचं नाही असं पत्रक अमेरिकेतल्या मेंदू-मन विषयाचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांनी काढलं होतं.

वरील मनोडॉक्टरांचं पत्रक आणि चंद्रकांत पाटील यांचं  विधान एकत्र वाचलं तर मोदी यांच्या नोटबंदी धोरणाचा काहीसा उलगडा होऊ शकतो.

ते जाऊं द्या.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यातून अनेक फुटवे संभवतात.

भाजपच्या बूथ पातळीवरच्या कार्यकर्त्यांचे निद्रा अभ्यासवर्ग आयोजित होतील. भारतीय निवडणुक पार्टीच्या प्रभावाखालची लोकं कमी झोपायचा विचार करू लागतील. बाबा रामदेव यांना एक नवं काम मिळेल. झोप उडवणारे काढे, मलमं आणि गोळ्या बाबा रामदेव बाजारात आणतील. शिक्षण खात्यातर्फे एक आदेश निघेल, भारतातल्या विद्यापीठात झोप ही एक नवी ज्ञानशाखाही उघडली जाईल. ज्ञानशाखेचं नेतृत्व रघुनाथ माशेलकर यांना दिलं जाईल. निद्राज्ञानासाठी आवश्यक पूर्वतयारीचं कंप्यूटर कंत्राट विजय भटकर यांना दिलं जाईल. कधीही न झोपणारे सनदी अधिकारी तयार करण्याचं कंत्राट अविनाश धर्माधिकारी यांना दिलं जाईल.

किती रोजगार निर्माण होईल.

लवकरच भारत देशाला रात्री नऊ वाजता एक भाषण ऐकायला मिळेल. हे भाषण सर्व चॅनेल्स आणि आकाशवाणीच्या सर्व केंद्रांना प्रसारित करण्याचं बंधन असेल. मोदी म्हणतील, ”मित्रों, निद्रा हा माणसाचा शत्रू आहे हे भारताला सात हजार सातशे त्रेपन्न वर्षांपासून माहित आहे. सारं जग झोपलं होतं तेव्हां भारताला निद्रा कशी वाईट होती ते चांगलं माहित होतं. निद्रा या रिपूचं निर्दालन करण्याचा महात्वाकांक्षी कार्यक्रम मी आज रात्री नऊ वाजल्यापासून जाहीर करत आहे. तीन लाख कोटी रुपये या कार्यक्रमावर खर्च होतील. यातून सोळा कोटी लोकांना दिवसाचे चोविस तास काम मिळेल. या कार्यक्रमामुळं पुढल्या निवडणुकीपर्यंत देशातल्या अकरा कोटी सत्तावन्न लाख लोकांची झोप उडालेली असेल. चला आपण सर्व मिळून या निद्रानिर्दालन कार्यक्रमात आज रात्रीपासून सामिल होऊ या…”

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS