सुरक्षा दलांच्या नक्षलवाद्यांशी छत्तीसगढमध्ये झालेल्या चकमकीत २२ जवानांचा मृत्यू झाला असून, १५ नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.
सुरक्षा दलांच्या नक्षलवाद्यांशी छत्तीसगढमध्ये झालेल्या चकमकीत २२ जवानांचा मृत्यू झाला असून, १५ नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.
छत्तीसगढमध्ये विजापूर येथील जंगलात शनिवारी नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये ५ जवानांचा मृत्यू झाला होता तर १४ जवान बेपत्ता होते. आज त्या जवानांचे मृतदेह सापडले. त्यामुळे या चकमकीमध्ये २२ जवानांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दलाने १५ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. त्यात एका महिलेचाही समावेश आहे.
सुरक्षा दलांचे संयुक्त पथक सुकमा आणि विजापूर सीमेवरील तारेम परिसरात शनिवारी गस्त घालत असताना ही चकमक उडाली. या संयुक्त पथकामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा पथकातील जवान, जिल्हा राखीव दलाचे आणि विशेष कृती दलाचे असे दोन हजारांहून अधिक कर्मचारी होते.
नक्षलवाद्यांनी केलेल्या अंदाधूंद गोळीबाराला जवानांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर ही चकमक झाली. त्यानंतर सुरक्षा दलाने सुकमा आणि विजापूर जंगल परिसरात शोध मोहीम हाती घेतली होती. यावेळी बेपत्ता १४ जवानांचे मृतदेह जंगलात आढळले.
या कारवाईमध्ये ३१ जवान जखमी झाले आहेत. त्यांना विजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सात जवानांना रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
‘सीआरपीएफ’चे महासंचालक कुलदीप सिंह यांनी याबद्दल माहिती दिली. त्यांनी छत्तीसढमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर माहिती दिली. बस्तरच्या दक्षिणेकडे सुकमा-विजापूर जंगल सीमाभागात नक्षलवाद्यांचा मोठा वावर असतो. त्याच भागामध्ये शुक्रवारी रात्री नक्षलविरोधी कारवाई सुरू करण्यात आली होती. शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गस्ती पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये जोनागुडा गावात चकमक सुरू झाली. ही चकमक तीन तास सुरू होती.
COMMENTS