रायपूरः छत्तीसगढ राज्यातील सूरजपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांना लॉकडाऊनच्या दरम्यान एका युवकाला मारहाण करून त्याचा मोबाइल फोन तोडल्याचे प
रायपूरः छत्तीसगढ राज्यातील सूरजपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांना लॉकडाऊनच्या दरम्यान एका युवकाला मारहाण करून त्याचा मोबाइल फोन तोडल्याचे प्रकरण चांगलेच महागात पडले. राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या प्रकरणाचा व्हीडिओ व्हायरल झाल्याचे पाहून जिल्हाधिकार्याची चूक लक्षात आल्यानंतर रणबीर शर्मा यांची तत्काळ जिल्हाधिकारी पदावरून उचलबांगडी करून त्यांची रायपूरमधील मंत्रालयात बदली केली. मुख्यमंत्र्यांनी झालेल्या प्रकरणी युवक अमन मित्तल (२३) याची माफीही मागितली व त्यांचा तुटलेला मोबाइल फोन नव्याने देण्याचे आदेश दिले.
नेमके प्रकरण काय घडले?
सूरजपूरमध्ये लॉकडाऊन दरम्यान मास्क लावलेल्या अमन मित्तल यांना पोलिसांनी रोखले व कुठे निघालात अशी विचारणा केली. अमन यांनी आपल्या हातातला कागद व मोबाइल दाखवला. या दरम्यान गाडीतून जिल्हाधिकारी रणबीर शर्मा उतरले व त्यांनी अमन यांच्या कानशीलात मारली व त्यांचा फोन खाली फेकला. या घटनेनंतर रणबीर शर्मा यांनी पोलिसांना बोलावून अमन यांना काठीने मारण्याचेही आदेश दिले. त्यानुसार अमन यांना पोलिसांनी काठ्याही मारल्या. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने रणबीर शर्मा यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला गेला. अनेकांनी शर्मा यांच्यावर कठोर कारवाई करावी, त्यांची बदली करावी अशी मागणी केली. जनतेचा वाढता विरोध लक्षात आल्यानंतर शर्मा यांनी माफीही मागितली.
अमन वेगाने बाइक चालवत होते व त्यांच्याकडे लसीकरणाची बनावट स्लीप होती. त्यांनी लॉकडाउन नियमांचे पालन न केल्याने त्यांच्याविरोधात सक्त कारवाई करावी लागली पण झालेल्या प्रकाराबद्दल आपण माफी मागत असल्याचा व्हीडिओ शर्मा यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केला.
पण या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर खुद्ध मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालावे लागले, त्यांनी शासकीय जीवनात कोणत्याही अधिकार्याचे असे कृत्य चालणार नाही. या घटनेचे मला अत्यंत दुःख झाले असून त्या युवकाची व त्यांच्या कुटुंबियांना झालेल्या मनस्तापाबद्दल आपण माफी मागत असल्याचे ट्विट केले. मुख्यमंत्र्यांनी अमन यांना नवा मोबाइलही देत असल्याचे जाहीर केले.
नंतर मुख्यमंत्री कार्यालयाने रणबीर शर्मा यांची जिल्हाधिकारी पदावरून तत्काळ उचलबांगडी केली व त्यांना मंत्रालयात रुजू होण्याचे आदेश दिले.
दरम्यान या घटनेचा निषेध आयएएस असो.ने केला आहे. संघटनेने शर्मा यांच्या कृत्याचा निषेध केला असून त्यांचे असे वर्तन शासकीय सेवांचे थेट व मूलभूत सिद्धांतांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. जनतेची सेवा करणे व त्यात अत्यंत कठीण समयी जनतेप्रती सहानुभूती दाखवणे हे अधिकार्याचे कर्तव्य असल्याचे आयएएस असो.ने म्हटले आहे.
मूळ बातमी
COMMENTS