चिदंबरम यांची अटक २६ ऑगस्टपर्यंत टळली

चिदंबरम यांची अटक २६ ऑगस्टपर्यंत टळली

आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळा प्रकरणी सध्या सीबीआयच्या ताब्यात असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळा

कोविड उद्रेक: काँग्रेस, सपाकडून प्रचारसभा रद्द
भाजपच्या अहंकाराला झारखंडचे उत्तर – शरद पवार
पवार पॉवर !

आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळा प्रकरणी सध्या सीबीआयच्या ताब्यात असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. सोमवारी २६ ऑगस्टला त्यांच्या जामीनावरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.

शुक्रवारी चिदंबरम यांच्या अंतरिम जामीनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी चिदंबरम यांचे वकील कपिल सिबल यांनी न्याय मागणे हा मूलभूत अधिकार असल्याने आम्ही दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आलो आहोत असे सांगितले.

त्या अगोदर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळ्याच्या तळाशी जाण्यासाठी चिदंबरम यांना ताब्यात घेणे गरजेचे असल्याचे न्यायालयास सांगितले. चिदंबरम यांनी आपल्या मुलाच्या कार्ती चिदंबरम यांच्या आर्थिक हितसंबंधांसाठी अर्थमंत्री या नात्याने बऱ्याच परवानग्या दिल्या होत्या. आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला. सीबीआयने या दोहोंच्या परदेशातील १० मालमत्ता व १७ बँक खाती शोधल्या आहेत असे मेहता यांनी सांगितले.

मेहता यांच्यानंतर सिबल यांनी चिदंबरम यांची बाजू मांडली. ते म्हणाले, दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायाधीशांना एक चिठ्‌ठी दिली होती. या चिठ्‌ठीमधील काही भाग हा उच्च न्यायालयाच्या निर्णयात जशाच्या तसा डकवण्यात आला आहे.

त्यावर मेहता यांनी लगेच आक्षेप घेत सिबल हे खोटे बोलत असल्याचे प्रत्युत्तर दिले . त्यावर सिबल यांनी मी खोटी विधाने करत नाही असे सांगितले.

विरोधी पक्षांचे मौन
बुधवारी चिदंबरम यांना अटक करताना जो हायव्होल्टेज ड्रामा झाला त्यावर गदारोळ उडाला असताना विरोधी पक्षांतील बहुसंख्य नेत्यांनी चिदंबरम यांच्या अटकेबाबत मौन धरले आहे. चिदंबरम यांना सीबीआयने ताब्यात घेतले तेव्हा मोजके नेते सोडता अन्य नेत्यांनी त्यांच्या अटकेच्या विरोधात वक्तव्य केले नाही.

तर पूर्वी यूपीए आघाडीत असलेले माकप, राजद, बसपा यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. गुरुवारी सकाळी द्रमुकचे प्रमुख नेते एम. के. स्टालिन यांनी चिदंबरम यांच्या अटकेविरोधात विधान केले. चिदंबरम यांना झालेली अटक एक सूड आहे असे ते चेन्नई येथे म्हणाले. त्यांनी चिदंबरम यांच्या घरात सीबीआयचे अधिकारी कसे बेजबाबदारपणे घुसले यावरही टीका केली. जून २००१मध्ये द्रमुकचे दिवंगत प्रमुख एम. करुणानिधी यांना अटक करण्यासाठी तमिळनाडूच्या तत्कालिन मुख्यमंत्री जयललिता यांनी पोलिस बळाचा वापर केला होता. पोलिस पहाटे करुणानिधी यांच्या घरात घुसले होते व त्यांना फरफटत आणले होते, या घटनेची स्टालिन यांनी आठवण करून दिली.

भाजप सरकारवर सतत तुटून पडणाऱ्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. पण जेव्हा एनडीटीव्हीच्या पत्रकारांनी त्यांना चिदंबरम यांच्या अटकेविषयी प्रश्न विचारला तेव्हा त्या, सीबीआयची पद्धत चुकीची होती असे म्हणाल्या. मी कायद्याबाबत बोलत नाही. पण चिदंबरम हे देशातील एक बडे नेते आहेत त्यांनी देशाचे अर्थमंत्री व गृहमंत्री म्हणून काम केले आहे, त्यांच्याशी अशी वर्तणूक करणे चिंताजनक असून लोकशाही आता रडत आहे असे त्या म्हणाल्या.

विरोधी पक्षांचे असे मौन धरण्याचा एक अर्थ असा की, विरोधी पक्षांमधील काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांच्या मागे ईडी लागू शकते अशी एक भीती आहे.

काँग्रेसकडून चिदंबरम यांची पाठराखण

चिदंबरम यांच्या विरोधात सीबीआय आक्रमक झालेली पाहून संभाव्य धोके पाहता काँग्रेसच्या कायदेशीर टीमने वेगाने हालचाली सुरू केल्या. तर माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापासून पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी व अन्य ज्येष्ठ नेत्यांनी भाजपवर थेट टीका केली होती. पक्ष चिदंबरम यांच्यासोबत आहे अशीही त्यांनी भूमिका मांडली.

राज ठाकरे यांच्या ईडी नोटीसीवर विरोधी पक्ष एकवटले

चिदंबरम यांच्या अटकेवरून वातावरण तापले असताना महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्यानंतर राज्यातले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष भाजपच्या राजकारणाविरोधात एकवटले. या सर्व विरोधी पक्षांनी भाजप सरकार ईडीचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करत असल्याचा आरोप केला. तोंडावर विधानसभा निवडणुका आल्या असताना ईडीचा ससेमिरा लावण्यात येत असल्याचेही अनेक पक्षांचे म्हणणे होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: