सिद्धूच्या राजीनाम्याने पंजाब काँग्रेस अडचणीत

सिद्धूच्या राजीनाम्याने पंजाब काँग्रेस अडचणीत

चंदीगढः पंजाब काँग्रेसमधील सुंदोपसुंदी मंगळवारी पुन्हा उजेडात आली. मुख्यमंत्रीपदावरून अमरिंदर सिंग यांना हटवल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद

राफेल व्यवहाराची पुन्हा चौकशी व्हावीः काँग्रेस
दिल्लीत केजरीवाल यांची हॅटट्रिक ; जनमत चाचण्यांचा निष्कर्ष
मेघालयात काँग्रेसला खिंडार; १२ आमदार तृणमूलमध्ये दाखल

चंदीगढः पंजाब काँग्रेसमधील सुंदोपसुंदी मंगळवारी पुन्हा उजेडात आली. मुख्यमंत्रीपदावरून अमरिंदर सिंग यांना हटवल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू व त्यांच्यातील वाद शमेल असे वाटत असताना खुद्ध सिद्धू यांनीच पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून एकाएकी राजीनामा दिला आणि पक्षाला धक्का दिला. मंगळवारी दुपारी ३ वाजता ट्विटरवरून सिद्धू यांनी आपल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर रात्री राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री रझिया सुलताना यांनी राजीनामा दिला. सुलताना या सिद्धू गटातील समजल्या जातात.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनाम्याच्या पत्रात सिद्धू यांनी आपण पंजाबच्या भविष्याबाबत व या राज्याच्या कल्याणाबाबत तडजोड करू शकत नाही असे स्पष्ट करत आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. पण या पुढे काँग्रेससाठी काम करत राहू असेही त्यांनी सांगितले.

सिद्धू यांच्या निकटच्या काही जणांनी द वायरला या घटनाक्रमाबाबत सांगितले की, पंजाबच्या मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांची झालेली निवड यावर सिद्धू नाराज झाले होते. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने ज्या पद्धतीने चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले त्याचा धक्का सिद्धू यांना बसला होता. त्याच बरोबर चन्नी यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात केलेल्या बदलामुळेही सिद्धू नाराज झाले होते. वादग्रस्त राणा गुरजित सिंग यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने सिद्धू यांचे पक्षातील व सरकारमधीलही महत्त्वही कमी झाले होते. राणा गुरजित सिंग हे वाळू माफिया म्हणून पंजाबात कुप्रसिद्ध आहेत. अमरिंदर सरकारमध्ये मंत्रिपदावर असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराविरोधात बोलणार्या सिद्धू यांच्यापुढे राणा गुरजित सिंग यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने अडचण तयार झाली होती.

सिद्धू यांच्या काही निकटवर्तीयांच्या मते मुख्यमंत्र्यांनीच राणा गुरजित सिंग यांच्या नावाला आग्रह धरला होता. त्याला पक्षानेही अनुमोदन दिले होते, त्यावरही सिद्धू नाराज होते.

राणा गुरजित सिंग यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाविरोधात ७ आमदारांनी सिद्धू यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. भ्रष्टाचार्यांना मंत्रिपद दिल्याने पक्ष कार्यकर्ते व आम जनता यांच्यामध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे या आमदारांचे म्हणणे होते.

सिद्धू व चन्नी यांच्यातील मतभेद

मुख्यमंत्री झाल्यानंतर नव्या मंत्रिमंडळात चन्नी यांनी नियुक्त केलेले अरुणा चौधरी यांच्याबाबतही सिद्धू नाराज होते. सिद्धू यांना मंत्रिमंडळात मजहबी समुदायाचे प्रतिनिधित्व करणारा नेता हवा होता. हा समुदाय पंजाबमधील एकूण लोकसंख्येच्या ३३ टक्के अनु. जातीमधील सर्वाधिक समुदाय आहे. पण चन्नी यांच्या काही निकटवर्तीय सूत्रांच्या मते दलित रामदासिय समाजाने मजहबी समुदायाला मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, असा आग्रह धरला होता.

काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी

काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी.

सिद्धू यांना मंत्रिमंडळात नवे चेहरे हवे होते. त्यांनी शिफारस केलेल्या काहींना मंत्रिपद मिळाले. पण ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे व अकार्यक्षमतेचे आरोप होते, त्यांना बदलण्यास काँग्रेसचा राजी नव्हते.

सिद्धू राज्याच्या अडव्होकेट जनरलपदी नियुक्त झालेले ए.पी.एस. देओल यांच्याबाबतही नाराज होते. देओल हे पूर्वी माजी पोलिस महासंचालक सुमेध सिंग सैनी यांचे वकील होते. सैनी यांनी अकाली दल- भाजप सरकार सत्तेत असताना अनेक प्रकरणात काँग्रेसला अडचणीत आणले होते. त्याचा राग सिद्धू यांना होता. सैनी यांच्या विरोधात चार फिर्यादी दाखल करण्यात आल्या होत्या पण त्यांची अटक देओल यांनी वाचवली होती, हा मुद्दाही सिद्धू यांना खटकत होता.

काँग्रेसच्या परंपरेत एखाद्या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षाने उपस्थित राहणे बंधनकारक असते. पण चन्नी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार सोहळ्यात सिद्धू अनुपस्थित होते. सिद्धू यांनी सोहळ्याला उपस्थित राहावे अशा अनेक विनंत्या चन्नी व त्यांच्या सहकार्यांनी सिद्धू यांना केल्या. सिद्धू यांच्यासाठी हेलिकॉप्टरही पाठवण्यात आले. पण सिद्धू याला बधले नाहीत. भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या बाजूने आपण नाही, असा संदेश सिद्धू यांना या निमित्ताने द्यायचा होता, असे काही सिद्धू समर्थकांचे म्हणणे आहे.

सिद्धू यांना मुख्यमंत्रीपद हवे होते का?

काही राजकीय तज्ज्ञांच्या मते पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावर सिद्धू यांना न बसवल्याचा फटका काँग्रेसला बसला. अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात सिद्धू यांनी बरीच मेहनत घेतली होती. पण सिद्धू यांची ही मेहनत काँग्रेसने बेदखल केली असे काही राजकीय तज्ज्ञांना वाटते.

सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाची इच्छा होती. पण पंजाबात अकाली दल व बसपाची युती झाल्याने काँग्रेसने चन्नी यांच्या रुपाने दलित कार्ड खेळले व त्याने सिद्धू यांच्या हाती काहीच लागले नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.

पंजाबमधील एक राजकीय विश्लेषक खालिद मोहम्मद यांच्या मते सिद्धू यांनी त्यांच्या काही कृतीमुळे पक्षात खळबळ माजवण्याचे काम केले. सिद्धू यांच्या महत्त्वाकांक्षेने पक्षात दुफळी माजली. याला काँग्रेस पक्षही जबाबदार असल्याचे मोहम्मद यांचे म्हणणे आहे.

अमरिंदर सिंग यांच्याविरोधात सिद्धू यांना काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी व माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नेहमीच मदत केली. पण जेव्हा सिद्धू यांना मंत्रिमंडळावर त्यांचे वर्चस्व हवे होते तेव्हा मात्र या दोघांनी सिद्धू यांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही, त्याने सिद्धू नाराज झाले होते.

पंजाबमधल्या विधानसभा निवडणुका सहा महिन्यावर आल्या आहेत. या परिस्थितीत काँग्रेसचे असंतोष व दुफळीने पक्षाचे मोठे नुकसान होईल ही शक्यता अधिक आहे. २०१७च्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला दोन तृतीयांश मते मिळाली होती तेवढी मजल २०२२मध्ये काँग्रेस गाठू शकणार नाही, असे खालिद मोहम्मद यांचे मत आहे.

राजकीय विश्लेषक हरजेश्वर पाल सिंग यांच्या मते सिद्धू यांच्या राजीनाम्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात लढणारा एक नेता काँग्रेसने गमावला आहे. त्याचा फटका पक्षाला आगामी निवडणुकात बसेल. प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याने सिद्धू यांची प्रतिमा अधिक उजळेल, सिद्धू निवडणुकात मोठी भूमिका निभावतील असे सिंग यांचे म्हणणे आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0