लाऊडस्पीकरवर वाजवले जाणारी सकाळची अजान बंद करण्यासाठी मंदिरांमध्ये श्री राम सेनेचे सदस्य हनुमान चालीसा आणि भक्तिगीते वाजवतील, असं इशारा श्री राम सेनेचे प्रमुख प्रमोद मुथालिक यांनी यापूर्वी दिला होता.
नवी दिल्ली: कोणते कपडे घालावेत, कोणते अन्न खावे आणि व्यवसायानंतर कर्नाटकच्या हिंदुत्व गटाने आता उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या पाठोपाठ लाऊडस्पीकरवर लक्ष केंद्रित केले आहे.
अजान, ही इस्लामिक प्रार्थना लाऊडस्पीकरवर वाजत असताना त्याविरुद्ध राज्यभरातील मंदिरांमध्ये भक्तिगीते वाजवण्यासाठी श्री राम सेने या हिंदुत्व संघटनेचे सदस्य सोमवारी, ९ मे रोजी पहाटे एकत्र आले होते. ही निदर्शने बेंगळुरू, हुब्बल्ली, बेलागावी, म्हैसूरू, चिक्कमंगलुरू, यादगीर, मंड्या आणि कोलार येथे झाली, असे पीटीआयने म्हटले आहे.
एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे, की बेंगळुरूच्या शांतीनगर येथील मंदिरात पहाटेच्या सुमारास जमलेल्या संघटनेच्या सदस्यांना अटक करण्यात आली आहे.
राज्यभरात, पोलीस अधिकार्यांनी श्री राम सेनेच्या सदस्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोठडीत टाकले आणि त्यांना हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मशिदींमध्ये लावलेल्या लाऊडस्पीकरवर कारवाई करण्यात कर्नाटक सरकारच्या अपयशी ठरल्याबद्दल अशा पद्धतीने निषेधाची सेनेचे प्रमुख प्रमोद मुथालिक यांनी धमकी दिली होती, असे वृत्त ‘द न्यूज मिनिट’ने दिले होते.
मुथालिक यांनी सांगितले, की मशिदींना सकाळी ६ वाजेपूर्वी इमारतींवर लावलेले लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी दिल्याच्या बदल्यात ‘श्री राम सेने’चे सदस्य राज्यातील एक हजार मंदिरांमध्ये पहाटे ५ वाजता हनुमान चालीसा आणि इतर भक्तिगीते वाजवतील.
“गेल्या एक वर्षापासून आम्ही सातत्याने लाऊडस्पीकरमुळे होणार्या समस्या, समाजाला होणारा त्रास, विद्यार्थी आणि रूग्ण यांच्याबाबत इशारा देत आहोत. आम्ही मुस्लिमांनाही सांगितले होते, पण काहीही बदलले नाही, नोटिसा बजावण्याशिवाय कोणतीही कारवाई झाली नाही. ते नाटक होतं. आजही मशिदींनी पहाटे ५ वाजता लाऊडस्पीकर वाजवणे बंद केलेले नाही,” असे ते म्हणाले.
परवानगी असलेल्या मर्यादेनुसार अजानचा आवाज कमी केला जात नसल्याचा दावा मुथालिक यांनी केला. ते म्हणाले, “आमचा लढा आजपासून सुरू झाला आहे. कोणतीही कारवाई न केल्यास, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू. ही तालिबान राजवट, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान नाही. हा भारत आहे, इथे संविधान आणि कायद्याचे राज्य आहे.”
मुथालिक यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दाखवली तशी हिंमत दाखवण्याचे आवाहन केले. उत्तर प्रदेशमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी धार्मिक संस्थांमधून जवळपास ५४ हजार लाऊडस्पीकर काढून टाकले आहेत.
दरम्यान, काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांच्या एका गटाने या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेतली. विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते यू.टी. खदेर म्हणाले, की ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न कोणत्याही धर्माशी किंवा समुदायाशी जोडला जाऊ नये, न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने नियम तयार केले पाहिजेत, ज्याचे सर्वांनी पालन केले पाहिजे.
बोम्मई म्हणाले, की लाऊडस्पीकरच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले आहेत.
“अझानच्या मुद्द्याबाबत, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत, जे सर्वांना लागू आहेत, त्याची अंमलबजावणी अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात झाली पाहिजे. इतर राज्यांमध्ये काय घडले ते आम्ही पाहिले आहे,” बोम्मई म्हणाले.
COMMENTS