काफ्काशी संवाद

काफ्काशी संवाद

काफ्काला अत्यंत सामान्य जीवन जगावेसे वाटे. स्वतःला तो इतर लोकांहून अत्यंत सामान्य आणि बिनमहत्त्वाचा समजत असे.

तत्त्वज्ञानाचा नकाशा कसा वापरावा?
तत्त्वचिंतनाचे शत्रू
तत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन

फ्रान्झ काफ्का या श्रेष्ठ जर्मन लेखकाला विसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या लेखकांपैकी एक मानले जाते. दोन कादंबऱ्या, दीर्घकथा आणि आणि काही लघुकथा एवढ्या तुटपुंज्या लेखनावर काफ्काने विश्वसाहित्यात अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यातही एक कादंबरी अर्धवट लिहून सोडलेली आणि दुसऱ्या कादंबरीच्या प्रकरणांचा मेळ न घालता तशीच मागे सोडलेली.

वस्तुतः काफ्का जिवंत असेतो त्याच्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कृतींपैकी ‘द मेटामॉरफॉसिस’ ही दीर्घकथा आणि ‘द जजमेंट’ या दोनच साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या होत्या. स्वतःच्या साहित्याविषयी काफ्का अत्यंत उदासीन होता. प्रसिद्धीचा त्याला सोस नव्हता. आपल्या हस्तलिखितांचे बाड त्याने मृत्यूपूर्वी मॅक्स ब्रॉड या मित्राकडे सुपूर्त केले होते. काफ्काला तारुण्यातच क्षयाने गाठले होते. सावकाश पावलाने येणाऱ्या मृत्यूची जाणीव त्याला झाली होती. मात्र आपण जिवंत असतो आपले साहित्य प्रकाशित व्हावे असे त्याला वाटले नाही. एवढेच काय आपल्या मृत्यूनंतरही ते प्रसिद्ध होऊ नये असे त्याला वाटे. आपण काही महत्त्वाचे लिखाण केले आहे, अशी त्याची भावना नव्हती. अस्तित्वाच्या पिंजऱ्यात अडकून पडलेल्या कुणा पक्ष्याचा तो केविलवाणा आक्रोश मात्र आहे असे त्याला वाटे. आपल्या मृत्यूनंतर हे सारे साहित्य नष्ट केले जावे अशी इच्छा त्याने मॅक्स ब्रॉडजवळ बोलून दाखवली होती. मात्र मॅक्स ब्रॉडने तसे केले नाही. आपल्या मृत मित्राच्या इच्छेशी प्रतारणा करण्याचे पाप त्याने केले आणि काफ्काचे सारे साहित्य त्यावर कष्टपूर्वक आवश्यक ते सोपस्कार करून त्याने प्रकाशात आणले.

‘द कॅसल’ ही कादंबरी काफ्काने अर्धवट सोडली होती. ती तशीच छापली. ‘द ट्रायल’ या कादंबरीच्या प्रकरणांचा क्रम काफ्काने दिलेला नव्हता. मॅक्स ब्रॉडने तो संपादित करून त्याला योग्य वाटेल त्या क्रमाने लावला. त्या प्रकरणांचे क्रम बदलून कादंबरीच्या रचनेचा अभ्यास आजही काफ्काचे चाहते करत असतात. या दोन पुस्तकांनी आणि काफ्काच्या हयातीतच प्रसिद्ध झालेल्या ‘द मेटामॉरफॉसिस’ या दीर्घकथेने काफ्काला अफाट मरणोत्तर प्रसिद्धी मिळवून दिली. त्याच्या साहित्याचे महत्त्व जगभर वाखाणले गेले. त्याची रोजनिशी आणि त्याच्या पत्रांनाही ग्रंथरूप देण्यात आले. त्याची पत्रे आशयघन आणि संपृक्त अशी आहेत. एक व्हिन्सेंट व्हॅन गॉ सोडला तर इतर कुणा कलावंताच्या पत्रांना एवढे नावाजले गेले नसेल.

२० व्या शतकाच्या मध्यावर काफ्काच्या साहित्याने संवेदनशील माणसाचे डोळे खाडकन उघडले गेले. त्याच्यानंतर विश्वसाहित्यात प्रयोगशील आधुनिक लेखनाची एक लाटच निर्माण होणार होती. प्रस्थापित साहित्याचे सारे रूढ संकेत झुगारून एका नव्या आणि परिणामकारक रुपात नवसाहित्याची निर्मिती होणार होती. काफ्काच्या साहित्याने या साऱ्यांसाठी पार्श्वभूमी निर्माण केली. पुढील काळातल्या अनेक लेखकांना फॉर्म आणि आशयाच्या नव्या वाटा अजाणता खुल्या करून दिल्या.

मात्र काफ्काच्या वैयक्तिक जीवनाविषयी आपल्याला फारसे ठाऊक नाही. त्याची रोजनिशी आणि त्याची पत्रे यांचा अपवाद वगळता फारसे काही हाती लागत नाही. त्याला अपवाद म्हणजे गुस्ताव यानुशने लिहिलेल्या काफ्काच्या आठवणी. गुस्ताव यानुश या लेखकाने काफ्काच्या हृदय आठवणी ‘काफ्काशी संवाद’ या छोटेखानी पण आशयसंपृक्त अशा ग्रंथांत कथन केल्या आहेत. काफ्काच्या कल्पित साहित्यातून आणि त्याच्या रोजनिशीतूनही न गवसणारे काफ्काचे अनोखे रूप गुस्ताव यानुशने जगासमोर आणले. साहित्य, कला यांविषयी काफ्काचे विचार, त्याच्या धारणा, मानवी राग-लोभादी त्याच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया, त्याच्या हृदयाची विशालता, विचारांतला खुलेपणा, त्याची तोळामासा प्रकृती, मृत्यूची त्याला झालेली जाणीव आणि मृत्यूच्या समीपही त्याकडे साक्षीभावाने पाहण्याची वृत्ती या साऱ्यांतून काफ्काच्या आत डोकावण्याची, त्याच्या निर्मितीच्या प्रेरणा आणि वेदना शोधण्याचे अनेक मार्ग गुस्ताव यानुशने या संवादातून खुले केले.

काफ्का गुस्ताव यानुशच्या वडिलांचा सहकारी होता. गुस्ताव रात्र रात्र कविता लिहीत बसतो. सतत काहीबाही वाचत असतो. हे त्याच्या वडिलांनी पाहिलं होतं. अगदी लायब्ररीत जाण्यासाठी म्हणून शाळेला दांडी मारतो हेही त्यांच्या ध्यानी आलं होतं. आपल्या मुलाची काफ्कासोबत ओळख व्हावी म्हणून त्यांनी गुस्तावची काफ्काशी ओळख करून दिली. गुस्ताव आणि काफ्काची प्रथम ओळख झाली तेव्हा गुस्ताव एक शाळकरी मुलगा होता. साहित्याच्या प्रांतात उत्साहाने प्रवेश करू पाहत होता. पहिल्या भेटीतच काफ्काने त्याला प्रभावित केले. त्यानंतर बौद्धिक जगतात नुकताच कुठे विवरू लागलेला हिरव्या कच्च्या मनोवृत्तीचा गुस्ताव त्याचे असंख्य प्रश्न घेऊन काफ्काकडे जाई. एका नव्या मैत्रीची सुरवात झाली आणि गुस्तावचे आयुष्य त्याने उजळून निघाले. काफ्का आणि गुस्तावच्या वयात मोठेच अंतर असले तरी काफ्का गुस्तावशी समवयस्क मित्राशी बोलावे तसे बोले. त्याचे ऐकून घेई. त्याच्या मतांचा आदर करी. एकदा संभाषणाच्या ओघात गुस्तावने म्हटले, “कवी हा जमिनीवर पाय असलेला पण ज्याचे विचार आकाशापर्यंत पोहोचले आहेत असा असामान्य मनुष्य असतो.’ नुकताच कविता लिहू लागलेल्या शाळकरी मुलाची धारणा अशीच असणे साहजिक असते. मात्र अशा कुठल्याही प्रकारच्या भ्रमात गुस्तावने राहू नये असे काफ्काने त्याला सांगितले. काफ्का म्हणाला, “वस्तुतः कवी ज्या समाजात राहतो त्या समाजातील सामान्य माणसाहून अधिक क्षुद्र आणि दुर्बल असतो. त्यामुळे त्याला अस्तित्वाचा भार इतर लोकांहून अधिक प्रकर्षाने आणि जोरकसपणे जाणवतो. त्याच्यासाठी त्याचे गाणे (कविता) म्हणजे एक प्रकारचा आतंक असतो. कलावंतासाठी कला म्हणजे केवळ यातनाच असतात. या कलेतून तो स्वतःची एका यातनेतून मुक्तता करून घेतो आणि दुसऱ्या यातना झेलण्यासाठी सामोरा जातो. कवी कुणी महान मनुष्य असत नाही, अस्तित्वाच्या पिंजऱ्यातील तो केवळ एक मनोहारी पिसे असलेला पक्षी असतो.’

जीवनमार्गावर सुरवात करतानाच असा गुरू लाभणे हे गुस्तावच्याच काय कुणाही कलावंताच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरेल. थोरोच्या आयुष्यात राल्प वाल्डो इमर्सन आला तेव्हा त्याच्या जीवनाने एक निराळे वळण घेतले. थोरोच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची, त्याच्या विचारांच्या सुस्पष्टतेची आणि स्वतंत्रपणाची बीजं खुद्द त्याच्यातच होती हे स्पष्ट असले तरी इमर्सनच्या सहवासामुळे त्याच्या बौद्धिक जीवनाला आकार येत गेला हे विसरून चालणार नाही. गुस्तावचेही तसेच झाले. काफ्काशी मैत्री त्याचे आयुष्य संपृक्त करणारी ठरली. थोरोच्या जीवनात इमर्सनचे जे स्थान होते, आणि मिखाईल नईमीच्या जीवनात खलिल जिब्रानचे जे स्थान होते. तेच स्थान गुस्तावच्या जीवनात काफ्काचे होते. गुस्ताव आणि काफ्काची ओळख करून देण्यामागे गुस्तावच्या वडिलांची प्रेरणा गुस्तावचं साहित्यप्रेम असली तरी त्यांचे संभाषण केवळ साहित्य आणि कला इथवर मर्यादित राहिली नाही. साहित्यातून जे समजावून घ्यायचे, कलेचा उद्देश ज्याची समज अधिक समृद्ध आणि वृद्धिंगत व्हावी असा असतो ते जीवन त्यांच्या संभाषणांत अटळपणे डोकावायचे. काफ्का गुस्तावला आयुष्यभर पुरेल असा ज्ञानसंचय गुस्तावला देत होता. मात्र असे करताना आपण कुणी विशेष आहोत असे त्याला वाटत नसे. उलट ‘त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्वातून तो जणू म्हणू इच्छित असे, माफ करा पण मी अत्यंत सामान्य असा माणूस आहे. तुम्ही जर माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले तर माझ्यावर उपकारच होतील.’

काफ्काला अत्यंत सामान्य जीवन जगावेसे वाटे. स्वतःला तो इतर लोकांहून अत्यंत सामान्य आणि बिनमहत्त्वाचा समजत असे. आपण अशा तऱ्हेचे जीवन जगावे की ज्याच्या कुठल्याही खुणा मागे राहू नयेत असे तो म्हणे. त्याच्या या दृष्टीमागे त्याचे ताओ वाङ्मयाचे वाचन आणि ताओवादाविषयी त्याची आस्था होती. लाओ त्सु, चुआंग त्सु यांचे ग्रंथ काफ्का कायम सोबत ठेवत असे. ताओ तत्त्वज्ञानामुळेच त्याला तरुणपणीच येणारे मरण त्याच्या वृत्तीत कटूपणा न आणता स्वीकारणे शक्य झाले.

गुस्ताव यानुशला काफ्काचा सहवास काही वर्षेच लाभला. पण त्या वर्षांत गुस्ताव काफ्काकडून जे शिकला ते त्याला आयुष्यभर पुरेल एवढे महत्त्वाचे होते. गुस्तावने वयाची २१ वर्षे पुरी केली तेव्हा काफ्काने इहलोकाचा निरोप घेतला. ज्या दिवशी काफ्काच्या मृत्यूची बातमी गुस्तावला समजली ती तारीख गुस्तावने पुस्तकात दोन वेळा लिहिली आहे. केवळ एका तारखेच्या पुनरुक्तीने वाचकाच्या आत खोलवर कापत गेल्याचा भास होतो. केवळ गुस्तावच्या बौद्धिक आणि मानसिक विकासात काफ्काने वृद्धी केली नाही तर त्याच्या कठीण काळात त्याच्या चैतन्याला आधार देईल, असा ज्ञानसंचय दिला. गुस्ताव यानुशने हे सारे अनुभव इतक्या प्रभावीपणे नोंदवून ठेवले आहेत की हे संवाद वाचणाऱ्यालाही तसाच अनुभव यावा. काफ्काच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेले त्याचे लिखाण गुस्तावने परत वाचले नाहीत. गुस्तावच्या स्मृतीत काफ्काचे स्थान अत्यंत विशेष होते. त्याच्या स्मृतीत काफ्का एक संत होता. या प्रतिमेशी प्रतारणा होईल असे काहीही त्याला वाचायचे किंवा ऐकायचे नव्हते. काफ्काच्या ज्या स्मृती त्याच्याजवळ होत्या, तेवढ्याच आधारावर त्याने काफ्काला समजावून घेतले. काफ्कासोबत त्याचे संवाद आणि त्याच्या आठवणी गुस्तावच्या मित्रांनी अर्ध्यामुर्ध्या स्वरूपात प्रकाशित केल्या. त्या आठवणी म्हणजेच ‘काफ्काशी संवाद’ हे पुस्तक. गुस्तावने त्याच्या रोजनिशीत लिहिलेल्या काफ्काच्या सगळ्याच आठवणी प्रकाशित होतील तेव्हा एक निराळाच काफ्का आपल्याला समजण्याची शक्यता आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0