कोरोना आणि अवनतीकडे जाणारा समाज  

कोरोना आणि अवनतीकडे जाणारा समाज  

सारं जग करोनाविरोधात शास्त्रीय पध्दतीने लढत आहे. कोणी रात्रीतून हॉस्पिटल उभारत आहेत, कोणी रात्रंदिवस लस शोधण्याचे काम करत आहेत, कोणी रुग्णालयाचे राष्ट्रीयकरण करत आहेत.

एक भारत आहे, जो मूळ समस्येवर काम करण्याऐवजी देशनेताच समस्त जनतेला कोरोनाला घालवण्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगून मध्ययूगात नेऊन अंधश्रध्देच्या खाईत लोटत आहे. गोमूत्र, शेण खाण्यानंतर करोनाला नष्ट करण्यासाठी ताट, टाळ्या वाजवून, फटाके फोडून आपण आपलं जगासमोर हसू करुन घेत आहोत. पण ही काही पहिलीच वेळ नाही .

जो समाज स्वतःच्याच अनुभवातून, चुकीतून नव्हे तर दुसऱ्याच्याही अनुभवातून चुकांतून शिकतो त्याला शहाणा समाज म्हणतात. परंतु जी व्यक्ती, समाज स्वतःच्या चुकांतून आणि अनुभवातूनही शिकायला तयार नसेल, तो ‘तद्दन मूर्ख’ असतो.

१५ व्या, १६ व्या शतकात जेंव्हा युरोपमध्ये साथीचे रोग आले, तेंव्हा या युरोपच्या लोकांकडे  ना गटारे होती ना रस्ते होते. ना त्यांच्याकडे आरोग्याच्या सुविधा होत्या. ते घाणेरडे म्हणण्यासारखे राहायचे. युरोपियन लोकांमध्ये प्लेग आला आणि हजारो लोक मेले. पण त्या प्लेगमुळे सर्व युरोपमध्ये एक नवा दृष्टिकोन आला. नवे शिष्टाचार आले. उदारणार्थ – हात धुणे, प्लेट धुणे, चमच्याने खाणे, शिंकले, की सॉरी म्हणणे, ब्लेस यु म्हणणे. नाका-तोंडावर रुमाल धरणे, ही युरोपियन लोकांची प्लेगची आठवण आहे. युरोपमध्ये प्लेगला रिस्पॉन्स म्हणून काय केलं? तर त्यांनी स्वतःचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवला. स्वतःला टोकाचे रॅशनल बनवले. कारण त्या प्लेगने त्या क्षणाला त्यांच्या लक्षात आणून दिले होते, की आपण   हजारो वर्ष चुकीची मूल्यं, चुकीचे दृष्टिकोन, चुकीच्या धारणा घेऊन जगत आलो आहोत आणि त्याची मनुष्य म्हणून भयंकर किमंत मोजली आहे. हे त्यांच्या समाज म्हणून लक्षात आलं त्या दिवसापासून त्यांनी स्वतःला अमुलाग्र बदलून घेतलं. स्वतःची मानसिकता बदलली. शहरांची रचना बदलली. प्रशासनात कमालीची शिस्त आणली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपले विज्ञान पक्के करून घेतले.

भारतीय माणसांनी काय केले. आपली प्रतिक्रिया अशा गोष्टीना काय आहे? १८९७ मध्ये उद्भवलेल्या महाभयंकर जीवघेण्या प्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या आणि प्लेगची साथ आटोक्यात आणून लाखो लोकांचे जीव वाचवणाऱ्या रँडचे उतराई होण्याऐवजी चाफेकर बंधूंनी धर्म संस्कृती बुडवतो, म्हणून त्याची हत्या केली होती.

या  प्लेगच्या साथीमध्ये हा प्लेग ऑफिसर असणारा रँड  पुण्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांच्या घरातून काढून दवाखान्यात भरती करायचा, त्यांच्यावर उपचार करायचा.

बंगालच्या दुष्काळामध्ये आम्ही साठ लाख लोकं गमावली. परंतु दुष्काळाला वैज्ञानिक पद्धतीने कसं सामोरं जायचं याबद्दलचा कोणताही नवा दृष्टिकोन आम्ही आजपर्यंत शोधू शकलो नाही. या देशात विज्ञान शिकवले जाते पण विज्ञानाचा इतिहास कधी शिकवला जात नाही. भारतीय मानसिकता दुसऱ्याच्या अनुभवातून नव्हे, तर स्वतःच्या अनुभवातून सुद्धा कधी शिकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा भारतीय माणूस प्रचंड हिप्पोक्रॅटीक ढोंगी आहे. एका बाजूला डॉक्टर आणि कामगारांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, असे म्हणत टाळ्या वाजवायच्या. परंतु दुसऱ्या बाजूला त्यांच्या जगण्या-मरण्याचा परस्थितीत सुद्धा ते कामगार कामावर आले नाहीत, म्हणून, त्यांचा जगण्या पुरता पगार ही कापायचा. या कठीण परिस्थितीतही त्याच्या मानवी अधिकाराची काळजी नाही.

टाळ्या आणि थाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी त्यांच्या सुरक्षिततेबद्दल त्यांच्या  जगण्याच्या प्रश्नाबद्दल त्याला मदत करून त्याच्या प्रती खरी कृतज्ञता दाखवता येऊ शकते. परंतु त्याच्या जगण्या मरण्याचे मूलभूत प्रश्न नाकारून, अशा फुकटच्या दातृत्वाच्या टाळ्या आणि थाळ्या वाजवून ती कृतज्ञता व्यक्त करतो. इतकी ढोंगी जमात जगाच्या पाठीवर कुठेच नसेल.

या भारतीय समाजात विज्ञान शिकवले जाते. परंतु विज्ञानाचा इतिहास कधी न शिकवल्यामुळे भारतीय माणूस विज्ञान आणि आधुनिक मूल्यापेक्षा कायम आपल्या धर्माचे.रूढी परंपरेचे आणि  संस्कृतीचे गोडवे गात आला आहे. आमच्या रूढी धर्मपरंपराच कशा वैज्ञानिक आहेत. वैश्विक आहेत. अशा शेंगा झोडत राहतो. आम्ही हजारो वर्षे कसे देशात टिकून आहोत, अशी आपलीच बढाई मारत आला आहे. यांच्या या वृत्तीबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी यांना सुनावले आहे,  “तुम्ही भलेही या देशात हजारो वर्षांपासून टिकून असाल, परंतु तुमच्या टिकण्याची, तुमच्या जगण्याची, तुमच्या माणूस म्हणून विकसित होण्याची गुणवत्ता काय आहे?” आणि आजही  21 व्या शतकामध्ये माणूस म्हणून ज्या “वैज्ञानिक आणि सामाजिक चेतनेचा विकास” पाहता तुमच्या टिकून राहण्याची काय गुणवत्ता आहे? केवळ टिकून राहणे एवढीच एक गोष्ट महत्त्वाची नसते. त्या जगण्याची गुणवत्ता ही महत्वाची असते.

कोरोनाला घालवण्यासाठी कोरोनला गोमूत्र पाजत आणि स्वतः ही पीत आणि त्याला खीर पुरी खाऊ घालत ‘गो कोरोना गो’ म्हणत, आपण ज्या टाळ्या आणि थाळ्या वाजवून आपली गुणवत्ता काय आहे, हेच पुन्हा एकदा विज्ञान आणि नव्या तंत्रज्ञानाच्या युगात सिद्ध केले आहे.

या टाळ्या आणि थाळ्या यांचे राजकारणही समजून घेतलं पाहिजे. या टाळ्यातून थाळ्यातून नरेंद्र मोदी यांनी मुलभूत गोष्टींपासून लोकांना भरकटवलं आहे. या देशाचे आरोग्य धोरण काय असायला हवे? या साथीच्या आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने कोणते महत्त्वाचे उपाय ठरवले आहेत? किती पैसा यावर खर्च करणार आहे? सरकार यासाठी काय करणार आहे?

१६ मार्चला डॉ.आदर्श प्रताप सिंग या एम्स (AIIMS)च्या डॉक्टरने संचालकांना पत्र लिहून कोरोनाला सामोरे जाण्यासाठी पुरेशी साधन सामग्री नाही, असे लिहून कळवले आहे. मात्र अध्यापपर्यंत यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

हे मुद्दे जनतेने विचारण्याची ही वेळ होती. परंतु जनतेच्या अशा कोणत्याही  मुलभूत प्रश्नांना बगल देत, त्या प्रश्नांबद्दल न बोलताही या जनतेला मूर्ख बनवता येते, ही फॅसिजमची थीअरी पुन्हा एकदा तपासून पाहिली आहे.

कोरोनाच्या नावाने संपूर्ण देशाला कुलूप लावून मोदी सरकार लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन का घेत आहे? याकडे ही तेवढेच गांभीर्याने बघितले पाहिजे. काल राज्यसभेत ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे दोन शब्द भारतीय राज्यघटनेतून वगळण्यासाठी काढण्यासाठी खासदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रसारक राकेश सिन्हा यांनी खासगी विधेयक सभापतींकडे मांडले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधेयक मांडण्याच्या बाजूने असतील, अशी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राची बातमी आहे.

दुसरं म्हणजै कर्फ्यू जनतेला सेलीब्रेट करायला लावला आहे. म्हणजे उद्या जर आणिबाणी सदृश परिस्थिती आणून कर्फ्यू लावला, तर त्यालाही जनतेचं समर्थन मिळवता येईल.

म्हणून सामूहिक मुर्खपणाच्या अशा ‘व्हायरसने’ सगळ्या माणुसकीला आणि पुढच्या भविष्याभिमुख पिढीलाच बाधित करणारा हा समाज, अवनतीकडे जाणारा आहे.

केशव वाघमारे, सामाजिक बदलांचे अभ्यासक आहेत.

(लेखाचे छायाचित्र केवळ प्रातिनिधिक)

COMMENTS