संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजवणार्या कोरोना विषाणूचा संहार करण्यासाठी युद्ध व यादवीग्रस्त देशांनी एकमेकांच्या विरोधातील शस्त्रास्त्रे टाकून शस्त्रबंदी,
संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजवणार्या कोरोना विषाणूचा संहार करण्यासाठी युद्ध व यादवीग्रस्त देशांनी एकमेकांच्या विरोधातील शस्त्रास्त्रे टाकून शस्त्रबंदी, युद्धबंदी पुकारावी व कोरोना महासाथीचा मुकाबला करावा असे कळकळीचे आवाहन संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अँटॅनियो गुतरेस यांनी शुक्रवारी केले. जगापुढे आलेले संकट भयंकर आहे पण याहून ते अधिक भयानक असेल अशीही भीती त्यांनी व्यक्त केली. गुंतारेस यांनी आपल्या भाषणात सीरिया, लिबिया, येमेन या यादवीग्रस्त देशांचा प्रामुख्याने उल्लेख केला. कोरोना विषाणू हा आता सर्वांच्या घरात आला आहे आणि त्याचा मुकाबला सामूहिकच केला जाऊ शकतो असे ते म्हणाले.
जगात एकूण बळींची संख्या ५३ हजार, स्पेनमध्ये २४ तासात ९३२ कोरोनाचे बळी
स्पेनमध्ये शुक्रवारीही कोरोनाने हाहाकार माजवला तेथे २४ तासात ९३२ मृत्यूंची नोंद झाली आहे तर आजपर्यंत मृतांची संख्या ११ हजार झाली आहे. शुक्रवारी जगभरात कोरोना बळींची संख्या ५३ हजारावर गेली आहे. तर सुमारे १० लाखाहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
भारतात केंद्राकडून राज्यांना ११,०९२ कोटी रु.ची मदत
भारत सरकारने देशातील सर्व राज्यांना कोरोना आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी ११,०९२ कोटी रु.चा निधी मंजूर केला आहे. हा निधी पहिल्या टप्प्यातला असेल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. दरम्यान शुक्रवारी भारतात कोरोना रुग्णांची संख्या २५४७ इतकी झाली असून एकूण मृतांचा आकडा ६२ झाला आहे. तर १६२ रुग्ण बरे झाले आहेत.
महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोना बाधित नव्या ६७ रुग्णांची नोंद झाली. त्यातील ४३ रुग्ण मुंबईतील व अन्य १० मुंबई उपनगरातील आहे. तर ६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४९० झाली आहे.
अमेरिकेत मृतांचा आकडा ६ हजारांच्या पुढे
अमेरिकेत शुक्रवारी १२०० जणांचा मृत्यू झाला असून तेथे मृतांचा आकडा ६ हजारांपेक्षा अधिक झाला आहे. गेल्या दोन दिवसांत अमेरिकेत विक्रमी अशी सुमारे ७ लाख बेरोजगारांनी केंद्रीय मजूर खात्याकडे नोंद केली आहे. अमेरिकेत बेरोजगारीचा दर ४.४ टक्के इतका वाढला आहे. २००९ साली अमेरिकेत जी आर्थिक मंदी आली होती ती परिस्थिती पुन्हा आली असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. ही परिस्थिती अधिक चिघळणार आहे, असेही बोलले जात आहे.
जगाचे आर्थिक केंद्र समजल्या जाणार्या न्यू यॉर्कमध्ये शुक्रवारी ५६२ कोरोना बाधित रुग्ण मरण पावले. त्यामुळे एकट्या न्यूयॉर्कमधील मृतांचा आकडा २,९३५ इतका झाला आहे. कोरोना बाधितांना व्हेंटिलेटर मिळत नसल्याने हा आकडा वेगाने वाढत जाणार असल्याची भीती आरोग्य खात्याकडून व्यक्त केली जात आहे. न्यूयॉर्कमध्ये मरण पावलेले बहुतांश रुग्ण निम्न मध्यमवर्गीय गटातील आहेत. संपूर्ण अमेरिकेत आता व्हेटिलेटर व मास्कची कमतरता भासत आहे. लोकांना घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे.
नेदरलँडमधील मृतांचा आकडा १,४८७
नेदरलँडमध्ये शुक्रवारी कोरोनामुळे १४८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर देशातील एकूण मृतांची संख्या १,४८७ इतकी झाली आहे. तर कोरोनाचे नवे १०२६ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५,७२३ इतकी झाली आहे.
श्रीलंकेत २ मुस्लिम कोरोना बाधित रुग्णांचे दहन
श्रीलंकेमध्ये २ मुस्लिम कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे दफन ऐवजी दहन करण्यात आल्याने अल्पसंख्याक समुदायात संतापाची लाट उसळली आहे. सरकारने मुस्लिम धर्मियांच्या परंपरेचा अनादर केल्याचे मुस्लिमांचे म्हणणे आहे. दरम्यान संपूर्ण श्रीलंकेत कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या १५१ इतकी झाली आहे.
लंडनमध्ये ४ हजार खाटांचे नवे रुग्णालय
इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये सुमारे ४००० खाटांचे रुग्णालय राजपुत्र चार्ल्स यांनी व्हिडिओ लिंकद्वारे खुले केले. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरल्यानंतर पहिलेच हे तातडीने उभे केलेले रुग्णालय आहे. या रुग्णालयाचे नाव फ्लोरेन्स नाईटिंगेल असे ठेवण्यात आले आहे.
दरम्यान येत्या रविवारी ब्रिटनमध्ये कोरोना बाधिक रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढण्याची भीती आरोग्य सचिवांनी व्यक्त केली आहे. सध्या ब्रिटनमध्ये ५० हजार रुग्णांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
फ्रान्समध्ये शवपेटी निर्मिती कारखान्यांवर भार वाढला
संपूर्ण फ्रान्स कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन असताना देशाच्या ईशान्येकडील ज्युसे या गावात शवपेटी निर्मिती कारखान्यावर मोठ्या प्रमाणात शवपेटीच्या ऑर्डर आल्या आहेत. पण मागणी अधिक असल्याने शवपेट्या वेळेवर देशभर पोहचू शकत नसल्याची परिस्थिती उद्भवली आहे. फ्रान्समध्ये कोरोना विषाणूमुळे आजपर्यंत ५,३८७ जणांचा मृत्यू झाला असून ६० हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.
इराणमध्ये कोरोना बाधिक रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ३,२९४
इराणमध्ये कोरोनाचा हाहाकार झाला आहे, देशात एकूण रुग्णांची संख्या ५३,१८३ झाली असून मृतांचा आकडा ३,२९४ झाला आहे. गेल्या २४ तासात १३४ रुग्ण मरण पावले आहेत. तर १७,९३५ रुग्ण बरे झाले आहेत.
COMMENTS