कोविड-१९ वर परिणामकारक एचसीक्यूएसचा तुटवडा

कोविड-१९ वर परिणामकारक एचसीक्यूएसचा तुटवडा

हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सल्फेट हे औषध मलेरियाबरोबर रूमाटाइड आर्थरायटिस, ल्युपस व जोरेम्स सिंड्रोम अशा आजारांवर वापरले जाते. पण गेल्या किमान १५ दिवसांपासून हे औषध भारतभरात कुठेही उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे

पीएम केअर फंड एनआरआय, विदेशी देणगीदारांसाठी खुला
मोदींचे उथळ भाषण व जमिनीवरील वास्तव
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये संथ वाढ

कोविड-१९ मध्ये प्रतिबंधक उपचारांसाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मान्यताप्राप्त केलेल्या हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सल्फेट (एचसीक्यूएस) या औषधाचा पुरवठा अमेरिकेला करण्यावरून मागील आठवड्यात गदारोळ माजला होता. हे औषध मलेरियावरील उपचारांसाठी तर वापरले जातेच पण रूमाटाइड आर्थरायटिस, ल्युपस आणि जोरेम्स सिंड्रोम अशा आजारांवर दीर्घकालीन स्वरूपात अनेक रूग्णांसाठी वापरले जाते. मागील किमान १५ दिवसांपासून हे औषध भारतभरात कुठेही उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे.

आर्थरायटिसच्या रूग्णांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे हे औषध लवकर उपलब्ध न झाल्यास त्यांनाही कोविड-१९ चा धोका संभवतो. दरम्यान, राज्य शासनाने धारावीतील कोरोना विषाणूच्या हॉटस्पॉटमध्ये प्रायोगिक तत्वावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे औषधवाटप करायचे ठरवले आहे.

रूमाटाइड आणि इतर काही आजारांमध्ये आजाराचे व्यवस्थापन आणि डिसिज मॉडिफाइंग असे दोन प्रकारे उपचार केले जातात. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सल्फेट (एचसीक्यूएस) हे औषध आजाराच्या व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. रूग्ण रोज या औषधाच्या एक किंवा दोन गोळ्या अनेक वर्षे घेतात. भारतात रूमाटाइड आर्थरायटिसचे सुमारे ०.९५ टक्के म्हणजे जवळपास ५० लाख रूग्ण आहेत. हा आजार ऑटो इम्यून प्रकारचा असून शरीरातील पेशी एकमेकांवर हल्ला चढवत असल्यामुळे मुख्यत्वे सांधे आणि हाडे त्यात कमजोर होतात आणि अनेक वर्षे आजार राहिल्यामुळे हात-पाय- बोटे वाकडी होऊ शकतात. ऑटो इम्यून आजारांनी ग्रस्त असलेल्या या रूग्णांची प्रतिकारशक्ती प्रचंड कमी असते. या औषधामुळे हिमोग्लोबिनही कमी होत असल्याने रूग्णांना नियमितपणे हिमोग्लोबिन घेणे आणि डोळे तपासून घेणे या गोष्टी करत राहाव्या लागतात. या आजारावर कायमस्वरूपी कोणताही उपचार उपलब्ध नाही. कोरोना विषाणू प्रतिकारशक्ती कमी असलेल्या आणि इतर आजार असलेल्या रूग्णांसाठी अतिशय घातक असल्याचे जगभरात दिसून आले आहे. त्यामुळे आता हे औषध उपलब्ध होत नसल्याने रूग्णांची प्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोका संभवतो आहे.

महाराष्ट्रात कोविडचे रूग्ण सापडायला सुरूवात झाल्यापासून म्हणजे साधारण १५ मार्चपासून हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सल्फेट (एचसीक्यूएस) हे औषध शेल्फवर नसल्याचे दिसून आले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्विटरवर ‘एचसीक्यूएस नॉट अव्हेलेबल’ असा ट्रेंड सुरू असून भारतभरात सर्वच ठिकाणी हे औषध उपलब्ध नसल्याचे दिसते आहे. २१ मार्च रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एचसीक्यूएस आणि अझिथ्रोमायसिन या औषधांना एकत्र करून वापरल्यास कोविडसाठी ते ‘गेम चेंजर’ ठरेल असे घोषित केले. २२ मार्च रोजी आयसीएमआरने कोविड-१९ च्या रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर तसेच सेवाकर्त्यांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे औषध सुचवले. परंतु त्यापूर्वीच हे औषध बाजारातून गायब झालेले होते. त्यानंतर २६ मार्च रोजी या औषधाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आणि त्याचा गैरवापर टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्याला औषध आणि प्रसाधन नियमावली १९४५ नुसार शेड्यूल एच१ चा दर्जा दिला. याचाच अर्थ हे औषध डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय ‘ओव्हर दि काऊंटर’ खरेदी करता येणार नाही. तसेच, औषध विक्रेत्यांना हे औषध कोण खरेदी करते याची नोंद ठेवावी लागेल.

भारतात या औषधाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जात असून इप्का फार्मास्युटिकल्स आणि झायडस या दोन कंपन्या ते बनवतात. इप्का लॅबोरेटरीजचे सह व्यवस्थापकीय संचालक अजित कुमार जैन यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीकडे २० टन एचसीक्यू एक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडिएंट (एपीआय) बनवण्याची क्षमता असून त्यातून १० कोटी गोळ्यांची निर्मिती केली जाईल. यातलो दोन महत्त्वाचे स्टार्टिंग घटक भारतातच निर्माण केले जातात. आम्ही ते कुठूनही आयात करत नाही आणि निर्यातही करत नाही. आम्ही अंतिम उत्पादन जगभरात निर्यात करतो. आपण १६ मार्चपासून सुमारे ४ कोटी गोळ्या केंद्र आणि राज्य सरकारांना पाठवलेल्या असून आणखी एक कोटी गोळ्या केंद्र सरकारला पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे १५ एप्रिलपर्यंत एकूण पाच कोटी गोळ्या पाठवलेल्या असतील, असे जैन यांनी सांगितले.

जगातल्या एचसीक्यूएस या मलेरियावरील उपचारांसाठीच्या औषधांचा ७० टक्के पुरवठा भारताकडून केला जातो. त्यात इप्का आणि झायडस कॅडिला यांच्यासारख्या कंपन्या आघाडीवर आहेत. अमेरिकेला या औषधाचा पुरवठा पुढील आठवड्यापासून केला जाईल, असे मत इंडियन फार्मास्युटिकल अलायन्सचे महासचिव सुदर्शन जैन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाने धारावी या कोविड-१९च्या नवीन हॉटस्पॉटमध्ये एचसीक्यूएसच्या गोळ्या प्रतिबंधक उपाययोजना म्हणून पाठवण्याचे ठरवले आहे. रविवारपर्यंत धारावीमध्ये ४३ नवीन संशयित रूग्ण सापडले असून अनेकजण विलगीकरणात आहेत. विलगीकरणात असलेल्या रूग्णांसाठी तसेच धोक्यामध्ये असलेल्या रूग्णांसाठी हे औषध दिले जाणार आहे. या औषधाचा वापर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर केला जाणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

एकूणच या औषधाचा जास्तीत जास्त वापर सरकारकडून केला जाणार असल्यामुळे हे औषध बाजारातून नाहीसे झालेले आहे. वर्षानुवर्षे उपचारांसाठी वापरले जाणारे हे औषध इतक्यात तरी नेहमीच्या रूग्णांसाठी उपलब्ध होईल असे चित्र दिसत नाही. राज्य शासन आणि केंद्राच्या देखरेखीखाली कोविड-१९ च्या उपचारांसाठी हे औषध प्रामुख्याने वापरले जाईल. औषधविक्रेते हे औषध आता लॉकडाऊन पूर्णपणे संपल्यावरच उपलब्ध होऊ शकेल असे सांगत आहेत. त्यामुळे ऑटो-इम्यून आजारांनी ग्रस्त असलेल्या रूग्णांचे हाल होतील अशी चिन्हे आहेत.

एचसीक्यूएस हे औषध उपलब्ध होत नसल्यास रूग्णांनी लॅरिएगो/ रिसोचिन २५० मिलिग्रॅम या गोळ्यांचा वापर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तात्पुरत्या स्वरूपात करावा, असे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे माजी सदस्य डॉ. सुहास पिंगळे यांनी सांगितले आहे. हा रूग्णांसाठी तात्पुरता दिलासा असला तरी हे औषध बाजारात लवकर उपलब्ध न झाल्यास रूग्णांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0