गो परिक्षेच्या अभ्यासक्रमात अशास्त्रीय दाव्यांचा सुळसुळाट

गो परिक्षेच्या अभ्यासक्रमात अशास्त्रीय दाव्यांचा सुळसुळाट

राष्ट्रीय कामधेनू आयोग ही गायींच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेली सरकारी यंत्रणा २५ फेब्रुवारी रोजी देशभरात गायींवर आधारित एक परीक्षा घेणार आहे. या

१५ वर्षांत मध्य प्रदेशात एकही गोशाळा नाही
सांस्कृतिक विकृतीकरणाची नवी रुपे!
उद्योगांच्या सामाजिक बांधिलकी निधीचा राजकीय फायद्यासाठी वापर

राष्ट्रीय कामधेनू आयोग ही गायींच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेली सरकारी यंत्रणा २५ फेब्रुवारी रोजी देशभरात गायींवर आधारित एक परीक्षा घेणार आहे. या परीक्षेचा विषयच गाय हा आहे.

कामधेनू गौ-विज्ञान प्रचार-प्रसार परीक्षा असे नाव या परीक्षेला देण्यात आले आहे. यामध्ये चार प्रवर्गांतील परीक्षार्थींसाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाईल. यातील तीन प्रवर्ग हे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन अशा शैक्षणिक स्तरांनुसार करण्यात आले आहेत, तर चौथा प्रवर्ग सर्वसाधारण जनतेसाठी आहे. या परीक्षेमध्ये बहुपर्यायी तथ्यात्मक प्रश्न विचारले जाणार आहे. परीक्षार्थींना प्रमाणपत्रही प्रदान केले जाणार आहे.

राष्ट्रीय कामधेनू आयोगाने (आरकेए) याबद्दल म्हटले आहे की, केंद्रीय शिक्षणमंत्री, राज्यांचे शिक्षणमंत्री, सर्व राज्यांच्या गौसेवा आयोगांचे अध्यक्ष,  जिल्हा शिक्षण अधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमे, स्वयंसेवी संस्था आणि गायींचे देणगीदार आदींना या विशाल कार्यात सहभागी करून घेतले जाणार आहे.

विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी उत्तेजन देण्याच्या दृष्टीने सरकारी शाळांतील अधिकाऱ्यांना कोणत्या मर्यादेपर्यंत यात सहभागी करून घेतले जाणार आहे हे ज्ञात नसले, तरीही विद्यार्थी ९ महिन्यांच्या खंडानंतर प्रत्यक्ष अध्ययनास सुरुवात करत असताना तसेच त्यांची वार्षिक परीक्षा जवळ येऊन ठेपलेली असताना, ही परीक्षा घेतली जाणार आहे.

अर्थात राष्ट्रीय कामधेनू आयोगाने या परीक्षेसाठी प्रसिद्ध केलेले अभ्यास साहित्य हा यातील सर्वांत रोचक भाग आहे. आरकेएने त्यांच्या वेबसाइटवर डाउनलोड करून घेण्यासाठी एक ५४ पानांची पीडीएफ फाइल प्रसिद्ध केली आहे. याशिवाय आणखी काही ब्लॉग पोस्ट्स, व्हिडिओज तसेच साहित्य प्रसिद्ध केले जाईल, असा वायदाही आयागाने केला आहे.

या साहित्याची भाषा पाठ्यपुस्तकांत सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या भाषेहून बरीच वेगळी आहे. भूकंप होण्यामागे गोहत्या हे कारण असू शकते येथपासून ते जर्सी गाय ही भारतीय गायींप्रमाणे भावनाप्रधान नाही येथपर्यंत अनेक दावे या ‘अभ्यासक्रमात’ करण्यात आले आहेत.  ज्या परीक्षेच्या नावात ‘विज्ञान’ हा शब्द आहे, त्याच्या अभ्यासक्रमात अशा अनेक आक्षेपार्ह बाबींचा समावेश आहे.

या पीडीएफ फाइलमधील मजकुरामध्ये विषयाची सामान्य अंगे समाविष्ट करण्यात आली आहेत. वेदांमध्ये नमूद करण्यात आलेले गायीचे महत्त्व, प्राचीन ग्रंथांमध्ये आलेले गायींचे उल्लेख, गायी मानवजातीसाठी देत असलेली पाच मोठी योगदाने (दूध, तूप, दही, गोमूत्र आणि शेण), गायींना अधिक चांगले अन्न कसे दिले जाऊ शकते, त्यांची अधिक चांगली काळजी कशी घेतली जाऊ शकते, भारतात किती प्रकारच्या गायी आहेत आणि त्या कुठे आढळतात याबद्दलची आणि आणखी बरीच माहिती यामध्ये देण्यात आली आहे.

देशी गायी आणि परदेशी किंवा ‘एग्झॉटिक’ गायींमधील फरक स्पष्ट करताना, देशी गायी आरोग्याच्या दृष्टीने व बायप्रोडक्ट्सबाबत श्रेष्ठ आहेत हा दावा अत्यंत तुटपुंजे संदर्भ व तर्क वापरून करण्यात आला आहे.

“जर्सी गायींच्या दुधाचा दर्जा फारसा चांगला नाही, त्या केवळ मुबलक दूध देतात” असे यात म्हटले आहे. देशी गायीच्या दुधाचा रंग किंचित पिवळसर असतो, कारण, त्यात सोन्याचा अंश असतो (जो जर्सी गायीच्या दुधात नसतो) असा दावाही या साहित्यात करण्यात आला आहे. सोने हा धातू आहे. तसेच या दाव्याच्या आधारादाखल देण्यात आलेली जुनागढ कृषी विद्यापीठातील संशोधकांची संशोधने वादग्रस्त आहेत. भारतीय गायी या वैयक्तिक स्वच्छता राखणाऱ्या आहेत असा दावाही यात करण्यात आला आहे. देशी गायी काटक असतात तसेच घाणीत बसू नये ही समज त्यांना असते. याउलट जर्सी गायी आळशी असतात व आजारांना चटकन बळी पडतात, असे यात म्हटले आहे. जर्सी गायींना होणाऱ्या आजारांना त्या स्वत:च कशा जबाबदार आहेत हे स्पष्ट करताना या पीडीएफ फाइलमध्ये म्हटले आहे की, वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी जर्सी गायींना नसल्याने त्या अनेक आजार ओढवून घेतात. भेदाचे एकूण ३८ मुद्दे यात देण्यात आले आहेत (यात पुनरावृत्तीही आहे). त्यातील सर्वांत विचित्र मजकूर पुढीलप्रमाणे:

“देशी गायीपुढे एखादी अपरिचित व्यक्ती आली की, ती लगेच उठून उभी राहते. उद्धट परदेशी गाय मात्र कोणतीही ‘भावना’ व्यक्त करत नाही.”

गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनांमुळे किंवा तिच्यापासून मिळणाऱ्या पाच पदार्थांमुळे जवळपास प्रत्येक रोग बरा होतो, असा दावा या अभ्यासक्रमात अनेकदा करण्यात आला आहे. अर्भकांचे अन्न तर दूध होतेच, शिवाय सोरायसिससारखे आजार बरे करते असे यात नमूद आहे. विशिष्ट रंगाचे केस अंगावर असलेल्या गायीपासून मिळणारी उत्पादने विशिष्ट आजार कसा बरा करतात हे या अभ्यासक्रमात स्पष्ट करून सांगण्यात आले आहे. यांमध्ये काही गंभीर विकारांचाही समावेश आहे.

गायीच्या बायप्रोडक्ट्सपासून पिकांवर फवारण्यासाठी मिश्रण कसे तयार करावे याच्या कृती या अभ्यासक्रमात देण्यात आल्या आहेत. या प्रत्येक मिश्रणाच्या लाभावर चर्चा करण्यात आली आहे. शेणाबद्दल या साहित्यात पुढील दावे करण्यात आले आहेत:

“१९८४ साली भोपाळमध्ये झालेल्या वायूगळतीमध्ये २०,००० जणांचा मृत्यू झाला. ज्या लोकांच्या घरांच्या भिंती शेणाने लिंपलेल्या होत्या, त्यांना काहीही झाले नाही.”

काही ठिकाणी अभ्यासक्रम माहितीपर वाटतो. यात प्राण्यांची योग्य काळजी कशी घ्यावी याची माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रजातींमधील विस्मयकारक वैविध्याबद्दल माहिती आहे. गायीमधील अनेक घटक हे जागतिक तापमानवाढीचा प्रतिबंध करू शकतात यावर तसेच मानवाच्या विध्वंसक उपभोगवादावरही यात प्रकाश टाकण्यात आला आहे. तरीही या साहित्यामध्ये अनेक अतिसुलभ निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. त्यामुळे ते माहितीपर होत नाही, तर प्रचारकी वाटते. खालील परिच्छेदातून हे स्पष्ट होईल:

“आफ्रिकी लोकांनी हजारो वर्षे शेणाचा उपयोग इंधन म्हणून केला. १८व्या व १९व्या शतकात मिशनरींनी त्यांना ही ‘गावठी’ पद्धत सोडून देण्यास शिकवले. मग लोक इंधनासाठी जंगलांकडे वळले आणि लवकरच संपूर्ण खंडातील झाडे तोडली गेली.”

कर्म आपल्याला गोहत्येपासून, गोमांस भक्ष्यणापासून रोखते यापासून सुरू झालेला युक्तिवाद गोहत्येचा संबंध अत्यंत भूकंपाशी जोडणाऱ्या बिनबुडाच्या व अशास्त्रीय दाव्यापाशी येऊन संपतो.

“पशूहत्या आणि भूकंपासारख्या नैसर्गिक आपदांचा परस्परांशी निकटचा संबंध आहे असा सिद्धांत भौतिकशास्त्रज्ञ एम एम बजाज, इब्राहिम आणि विजयराज सिंह यांनी मांडला असून यावरील संशोधन निबंध अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावरील कत्तल हे मोठ्या भूंकपांमागील कारण असू शकते असा हायपोथेसिस या सिद्धांतात मांडला आहे.”

“दिशांच्या ध्वनीविषयक विषमतांमुळे ख़डकांमध्ये मोठ्या प्रमाणात विषमदिक (अॅनिसोट्रॉपिक) ताण येतो. दररोज हजारो पशुंची हत्या अनेक वर्षे होत राहिल्यास मरणाऱ्या प्राण्यांच्या शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या आइनस्टायनियन पेन वेव्ह्जमुळे (ईपीडब्ल्यू) ध्वनीशी संबंधित विषमदिकता निर्माण होते. ही संचयित ध्वनीविषयक विषमदिकता खडकांवरील ताणांच्या इतिहासाशी संबंधित आहे असे दिसून आले आहे.” विज्ञानात रस असलेल्या विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता अन्य विद्यार्थ्यांच्या हाती यातून फारसे काही लागेल असे अभ्यासक्रमाच्या लेखकांनी गृहीत धरल्याची शक्यता फार कमी आहे. कत्तल होणाऱ्या प्राण्यांच्या पायांच्या आवाजामुळे भूकंपलहरी निर्माण होतात असा हायपोथेसिस यात मांडण्यात आलेला दिसतो. अभ्यासक्रमाच्या ४३ आणि ४४ क्रमांकाच्या पानांवर हा युक्तिवाद बघायला मिळेल.

एकंदर या अभ्यासक्रमांतील बराच मजकूर वादग्रस्त तथ्यांनी भरलेला आहे, तर देशातील गायी या नृशंस हिंसाचाराचे आणि हिंदुत्ववादी संघटनांद्वारे होणाऱ्या लिंचिंगच्या घटनांचे कारण ठरत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: