ममतांना अडचणीत आणण्यासाठी ओवेसी मैदानात

ममतांना अडचणीत आणण्यासाठी ओवेसी मैदानात

पश्चिम बंगालची विधानसभा निवडणुकीची अधिसूचना अद्याप निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही पण बंगालच्या भूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांचे नेते हजेरी लावत आहे

मोदींचा सुरुवातीचे प्रतिस्पर्धी हरेन पंड्या यांच्या खून प्रकरणी नवे पुरावे, जुनी असत्ये
‘आज जेवढे भय आहे ते पूर्वीही नव्हतं’
‘लष्कर ए तय्यबा’चा कमांडरचा भाजपचा सोशल मीडिया प्रभारी

पश्चिम बंगालची विधानसभा निवडणुकीची अधिसूचना अद्याप निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही पण बंगालच्या भूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांचे नेते हजेरी लावत आहेत. ही वातावरण निर्मिती सुरू आहे. दिवसेंदिवस रंगतदार आणि नाट्यमय घडामोडी घडत आहेत. एमआयएमचे सर्वेसर्वा असुद्दीन ओवेसी यांनी अचानक पश्चिम बंगालचा दौरा करून तेथील काही प्रमुख अल्पसंख्याक नेत्यांच्या भेटी घेतल्याने ममता यांच्या पुढील अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान ममता यांना चक्रव्यूहात अडकविण्यासाठी भाजपने हा डाव खेळला असून एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याची जहरी टीका ममतादीदी यांनी केली आहे. तर काँग्रेसमध्येही मोठी फूट पडण्याचा वृत्ताने खळबळ माजली आहे.

मुळातच पश्चिम बंगाल येथील ३० टक्के असलेला अल्पसंख्याक मतदार हा नेहमीच तृणमूल काँग्रेसचा पारंपरिक मतदार म्हणून ओळखला जातो. आता ओवेसी हे मैदानात उतरल्याने अल्पसंख्याक समाजाच्या मतदानात फूट पडण्याची भीती आहे. एमआयएम येथे विधानसभा निवडणूक लढविणार असून त्या दृष्टीने ओवेसी यांनी हा दौरा केला. यावेळी ओवेसी यांनी अल्पसंख्याक समाजातील काही प्रमुख नेत्यांची भेट घेऊन आढावा घेतला. कोणत्या मतदारसंघात आपला उमेदवार टक्कर देऊ शकतो याबाबत त्यांनी चर्चा केली.

दरम्यान ओवेसी यांनी पश्चिम बंगाल निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असताना ममतादीदी यांनी ओवेसी यांना एमआयएमचा प्रदेशाध्यक्ष अनवर पाशा यांना पक्षात घेत जोरदार धक्का दिला आहे. पक्ष प्रवेशावेळी पाशा यांनी ओवेसी यांच्यावर आरोप करताना ते भाजपच्या मदतीला येथे असल्याचे वक्तव्य केले आहे.

दरम्यान राज्यातील काँग्रेस पक्षात सुद्धा काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. जवळपास ११ आमदार हे पक्ष सोडणार असल्याचा दावा काँग्रेसचेच नेते भरत सिंह यांनी केल्याने खळबळ माजली आहे. काँग्रेसमध्ये उभी फूट पडू शकते असे सिंह यांनी सांगताच तातडीने पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनी त्याचे खंडन केले. पण त्यामुळे काँग्रेसमध्ये येत्या काही दिवसात काय हालचाली होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ममता बॅनर्जी अल्पसंख्यांक समाजाच्या पाठिंब्यावर पश्चिम बंगालमध्ये गेली १० वर्ष राज्य करत आहेत.

२०११च्या जनगणनेनुसार पश्चिम बंगालमध्ये २७.०१ टक्के अल्पसंख्याक होते. सद्यस्थितीत त्यांची संख्या ३० टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे.

बांगलादेश सीमेलगतच्या गावांमध्ये बहुसंख्य अल्पसंख्याक राहतात. मुर्शीदाबाद, मालदा आणि उत्तर दिनाजपूरमध्ये एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अल्पसंख्याक आहेत.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागा आहेत. त्यापैकी १०० ते ११० जागांवर अल्पसंख्याक समाजाची मतं निर्णायक ठरू शकतात. त्यातही दक्षिण आणि उत्तर २४ परगणा जिल्ह्यात मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समाज आहेत.

२००६ पर्यंत पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याक मतांवर डाव्या पक्षांची पकड होती. मात्र, त्यानंतर अल्पसंख्याक मतदार हळूहळू ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसकडे आकर्षित झाला. २०११ आणि २०१६च्या विधानसभा निवडणूकीत मुस्लिम मतदारांच्या पाठिंब्यावर ममता बॅनर्जी यांनी निवडणूक जिंकली आहे.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0