हिंसाचाराविरोधात डीयूच्या विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार

हिंसाचाराविरोधात डीयूच्या विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार

२८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्गांवर बहिष्कार घातला आणि ते उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये चाललेल्या जमातवादी दंगलींच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी कलाविभागामध्ये जमले. या दंगलीत ४२ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

दंगलप्रकरणी ‘आप’च्या ताहीर हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल
‘१९८४’ची पुनरावृत्ती होऊ देणार नाही – दिल्ली हायकोर्ट
अमित शहांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसची राष्ट्रपतींकडे धाव

एक और दंगा दिल्ली में नहीं सहेंगे”ही घोषणा देत विद्यार्थ्यांनी शांतता मोर्चा काढला. रामजस कॉलेज, दौलत राम कॉलेज आणि श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयांमधून हा मोर्चा नेण्यात आला.

२५ फेब्रुवारी रोजी हिंसाचार झाला तेव्हा डीयूचे विद्यार्थी – व त्यांच्याबरोबर आंबेडकर विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी – यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयाला घेराव घातला होता. हिंसाचारामागे असलेल्यांच्या विरोधात त्वरित कारवाई करण्याची त्यांची मागणी होती. मात्र, प्रत्युत्तर म्हणून त्यांच्यावर पाण्याचा मारा करण्यात आला.

दुसऱ्या दिवशी, विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्गांवर बहिष्कार घातला आणि लेफ्टनंट जनरल यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला. त्यांनी महाविद्यालयांच्या परिसरात शांततामय निदर्शनेही केली.

काल, विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा बहिष्काराची हाक दिली आणि द्वेषाचे राजकारण तसेच सरकारची अकार्यक्षमता यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

या मोर्चात डीयूचे काही शिक्षकही सामील झाले होते.

“मी या देशातील वाढत्या हिंसाचाराच्या विरोधातील निदर्शनांना समर्थन देण्यासाठी इथे आहे. जेव्हा विद्यार्थी संघटित राहतील आणि जमातवादी शक्तींना मागे ढकलतील तेव्हाच बदल घडेल. समाजाच्या कडेला असलेल्या समूहांमधील माझ्या विद्यार्थ्यांबद्दल मला काळजी वाटते. आज, मुस्लिम आहेत. उद्या अन्य समुदाय असू शकतो,” सेंट स्टीफन्स कॉलेजच्या इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका कॅरन गॅब्रिएल म्हणाल्या.

आहान* , एक साहित्याचा विद्यार्थी, त्याचे विशेषाधिकार सोडून रस्त्यावर येण्याबाबत बोलला.

“मी आधी का बोललो नाही याबद्दल मला अपराधी वाटतंय. एकदा तर मला इतकं अपराधी आणि लाजिरवाणं वाटलं की जणू मीच हल्लेखोरांपैकी एक होतो. आपण किती स्तरांवर अपयशी ठरलो आहोत. निदर्शने करणे सोपे आहे, रचनात्मक बदल घडवणे कठीण आहे, ज्यासाठी आपल्याला खूप विचार आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.आमच्या विशेषाधिकारांमुळे आम्ही आंधळे झालो आहोत. थोड्याच अंतरावर दिवसाढवळ्या माणसांचे खून पडत असताना आम्ही सामान्य जीवन जगत राहणे हे किती विचित्र आहे,” तो म्हणाला.

रीमा*, मणिपूरची एक विद्यार्थिनी तिच्या भीतीबद्दल सांगत होती. अस्मितांवर आधारलेला हा हिंसाचार असाच चालू राहिला तर पुढचे लक्ष्य ती असू शकते अशी भीती तिला वाटते. “आमच्यासमोर आता काही पर्याय उरलेला नाही,” ती म्हणते. “मी एका लहान समुदायाची सदस्य आहे. माझी जी ओळख आहे त्यामुळे पुढचे लक्ष्य मी असू शकते याची मला भीती वाटते. जर आपण आत्ता हिंसाचाराच्या विरोधात काही भूमिका घेतली नाही, तर भविष्यात तो पुन्हा पुन्हा होत राहील.”

रानिया जुलेखा, रामजस कॉलेजमधील राज्यशास्राची विद्यार्थिनी आणि फ्रॅटर्निटी मूव्हमेंटची (बंधुता चळवळ) एक सदस्य, २५ फेब्रुवारीच्या रात्री काय घडलं ते सांगत होती. तिच्या मित्र-मैत्रिणींना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी अडकवून ठेवलं होतं आणि मारलं होतं.

“आत्ता आपल्याला जे सामान्य जीवन दिसते तो फॅसिझमचा दुसरा चेहरा आहे. या फॅसिझमच्या विरोधात भारतीय एकत्र येतील. केजरीवाल मुस्लिम, दलित, आणि उदारतावाद्यांच्या मतावर जिंकून आले आहेत, पण हिंसाचार होत असताना ते शांत राहिले. जेव्हा विद्यार्थी त्यांच्या घराभोवती एकत्र झाले तेव्हा आमच्यावर पाण्याचा मारा करण्यात आला. माझ्या ४० पेक्षा जास्त मित्रमैत्रिणींना पोलिसांनी अडकवून ठेवले आणि मारहाण केली. त्यांनी [अरविंद केजरीवाल] रस्त्यावर उतरले पाहिजे. लोक रस्त्यावर मरत असताना तरी त्यांनी आपला विशेषाधिकार वापरावा अशी मी हात जोडून त्यांना विनंती करते,” ती म्हणाली.

विद्यार्थ्यांनी मोदी सरकारवर व्यंगोक्ती करणारी आणि दिल्ली पोलिसांवर त्यांच्या निष्क्रियतेसाठी टीका करणारी प्लॅकार्ड हातात धरली होती.

हिंसाचाराच्या वेळच्या दिल्ली पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर टिप्पणी करणारी अनेक प्लॅकार्ड आणि घोषणा होत्या. त्यापैकी एक होते:‘दिल्ली पोलिस, खाकी वर्दी फेंक कर, खाकी चड्डी पहेन लो’

मोर्चा कलाविभागातील विवेकानंद पुतळ्यापाशी संपला. विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकामागोमाग एक येऊन वाढता जमातवादी हिंसाचार आणि वर्तमान सरकार यांच्याबद्दलची चिंता भाषणांमधून व्यक्त केली.

जयश्री कुमार या कवी, विद्यार्थी पत्रकार आणि अपयशी संगीतकार आहेत. 

सर्व छायाचित्रे लेखिकेने पुरवलेली आहेत.

* नावे बदलली आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0