भाषेची हिंसा आणि लोकतांत्रिक प्रत्युत्तर

भाषेची हिंसा आणि लोकतांत्रिक प्रत्युत्तर

भाषा ही अर्थ-वहनाची इतकी विचित्र बांधणी आहे की, काही वेळा अगदी सोप्या वाटणार्‍या शब्दाचा नक्की अर्थ सांगण्यात नाकी-नऊ येऊ शकतात; आणि त्याउलट कितीतरी क

भटके विमुक्त आणि सीएए
यूपी पोलिसांचे कौर्य : जमावावर कमरेच्यावर गोळीबार
सीएए संदर्भातील सर्व याचिकांची सुनावणी ३१ ऑक्टो.पासून

भाषा ही अर्थ-वहनाची इतकी विचित्र बांधणी आहे की, काही वेळा अगदी सोप्या वाटणार्‍या शब्दाचा नक्की अर्थ सांगण्यात नाकी-नऊ येऊ शकतात; आणि त्याउलट कितीतरी क्लिष्ट वाटणार्‍या शब्दाचा नेमका अर्थ अगदी सहजासहजी सांगता येऊ शकतो. उदाहरणार्थ ‘अँथ्रोपोसिनी’ या नव्यानेच इंग्रजीमध्ये रूढ होत असलेल्या शब्दाचा अर्थ आहे ‘मानवाने पर्यावरणावर आणि प्रकृतीवर उठवलेला ठसा पर्याप्त मर्यादा ओलांडून विनाशकारी बनला ते युग’ हे ठणकावून सांगता येते. पण, जर ‘प्रकृती’ चा अर्थ शोधायचा असेल तर, शारीर-प्रकृती का निसर्ग? ह्या द्विधेमध्ये आपण अडकतो. शिवाय, निसर्ग केवळ  जीव (लाइफ) सृष्टीच्या आधी आणि नंतर असतो, का मग संपूर्ण जीवसृष्टीला धरून असतो? हा न सुटणारा प्रश्‍नही समोर उभा राहतो. शिवाय, ‘संस्कृती’ आणि ‘प्रकृती’, म्हणजे एका बाजूला मानवी इच्छा आणि बुद्धी आणि दुसर्‍या बाजूला सारे न-मानवीय, यांच्यातले सततचे परस्पर-विरोध आपल्याला आठवायला लागतात.

एकंदरीत ‘अर्थ’ कसा ‘उद्भवतो’, त्याचा चलन-व्यवहार कसा नक्की ठरतो, हे अजूनही पूर्णपणे न सुटलेले कोडे आहे.  मुळात ‘अर्थ’ या शब्दाचा अर्थच फारसा स्पष्ट नाही. आपण सामान्यत: कठीण शब्दांचे अर्थ समजून घेण्यासाठी शब्दकोशाची मदत घेतो. मी इंग्रजीमध्ये ‘मिनिंग’ या शब्दासाठी ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी उघडली तेव्हा त्यात जो ‘अर्थ’ सापडला तो असा : what is meant by a word, action or idea. मराठीत त्याचा गोषवारा होईल ‘एखाद्या शब्दाने विशिष्ट कृती, संकल्पना किंवा शब्द यांचा अभिप्रेत होत असलेला अर्थबोध’ यात पुन्हा आपण ‘अर्थबोध’ म्हणजे काय? असे त्या शब्दकोशाला विचारले, तर गोल-गोल फिरत शब्दकोश आपल्याला पुन्हा त्याच घोटाळ्यावर आणून उभा करेल. ते न विचारणेच योग्य. शब्दकोशाची निर्मिती अर्थ समजावून सांगण्यासाठी झाली असली तरीही, अर्थ शब्दाचा संपूर्ण अर्थ ते आपल्याला सांगू शकणार नाहीत. ह्यात कारण हे नाही की शब्दकोशांना भाषेच्या सगळ्या लकबी माहीत नसतात. उलट, त्या त्यांना सगळ्या माहीत असतात म्हणून ते शब्दकोश बर्‍याचशा शब्दांचे अर्थ अनुत्तरित स्वरूपात नोंद-करत असतात. त्यांना हे पक्के माहीत असते की शब्दांचे अर्थ सतत शब्दांच्या पुढे धावत राहतात, सतत बदलत राहतात.  हे झाले शब्दकोशांचे. स्वत: शब्दही बर्‍याचदा अशा रीतीने वापरले जातात की त्यांचे प्रस्थापित अर्थ मोडीत निघावेत आणि त्या नव्या वापरातून काही नवे अर्थ त्या विशिष्ट शब्दांना चिकटावेत.  गेल्या पाच-सहा वर्षांत मी कितीतरी शब्दांचे प्रस्थापित अर्थ बदललत असलेले पाहत आलो आहे. अशा शब्दांची –आणि त्यातून बनवलेल्या वाक्यांची — एक ‘धोबी-लिस्ट’ देतो. ही यादी ‘समग्र शब्दसूची’ नाही. ती एक सहज बनवलेली, केवळ अगदीच नजरेआड करता येणार नाहीत अशा शब्द-वाक्यांची आहे. सोबत त्यांचे नवे अर्थही आहेत. वाचक स्वत:ही त्यात बरीच भर घालू शकतील.

‘मनापासून पुस्तके वाचणारे, ज्ञानाच्या-कलेच्या क्षेत्रात आणि सामाजिक जीवनात आपला ठसा उमटवणारे आणि वेळोवेळी आपली मते निर्भीडपणे माध्यमातून व्यक्त करणारे’ या सगळ्यांसाठी आता ‘खानमार्केट बुद्धिजीवी’ हे लेबल वापरले जाते.

ज्यांना देशात काश्मीरपासून आसामपर्यंत कोणत्याही भागांत अन्याय झाला तर दुःख होते, जे ती वेदना जाणीवपूर्वक व्यक्त करतात त्यांना ‘तुकडे-तुकडे गँग’ म्हणण्यात येते.

जे सरकारची प्रजा-विरोधी धोरणांशी सहमत नाहीत ते ‘देशद्रोही’ आणि जे अशा जनहितविरोधी धोरणांची जबाबदारी पंतप्रधानांची आहे असे स्पष्ट बोलतात, तसे लिहितात ते ‘अर्बन नक्सलाइट’ ह्या शब्दात संबोधले जातात.

घोळके आणि झुंडी बनवून एखाद्या निरपराध व्यक्तीस जे क्रूरपणे पिटतात त्यांना ‘गौरक्षक’ म्हटले जाते. ज्या व्यक्तीस पिटण्यात येते त्या व्यक्तीस ‘ऑफेंडर’/गुन्हेगार मानण्यात येते.

‘घरमे घुसके मारुंगा’ तसेच ‘चुन-चुनके  मारुंगा’ म्हणजे ‘लोकहितदक्ष राज्यव्यवस्थेची नवी व्याख्या’; ‘आश्रितांना नागरिकत्व बहाल करणे’ म्हणजे काही विशिष्ट धर्माच्या लोकांनी देशात राहू नये अशी परिस्थिती निर्माण करणे’; ‘कपडेसे पहचान जाते है’ म्हणजे  इतिहासातील गर्दीत घरातून निसटलेले बालक चुकू नये म्हणून पाच लाखांच्या कोटावर त्याचे नाव हजारोवेळ लिहून घेणे.

‘चौकीदार’ म्हणजे ‘आपल्या आवडीच्या कोट्यधीशांना व्यवस्था करून देणारा’; ‘बेटी बचाओ’ म्हणजे बलात्कारी नेत्यांचा सार्वजनिक सत्कार करणे.

‘ऑपरेशन कमल’ म्हणजे ‘नैतिकतेला सार्वजनिक सुट्टी देणे’; ‘किसीको डरनेकी जरुरत नंही है’ म्हणजे युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांना बेदम चोपण्यासाठी गँग्स पाठवणे; ‘परदेशात प्रतिष्ठा वाढलीय ’ म्हणजे ‘सगळ्या प्रमुख परदेशी वर्तमानपत्रात भारत सरकारवर प्रखर टीकेचे लेख येतायत’; सायन्स काँग्रेसचे उद्घाटन करणे म्हणजे पुराणातल्या तद्दन अशास्त्रीय गोष्टी शास्त्रज्ञांना सांगत बसणे; ‘छप्पन इंच छाती’ म्हणजे फाशी लावून घेणार्‍या शेतकारी वर्गाची निर्मम अवहेलना सुरू ठेवण्याचे साहस; ‘परीक्षेपे चर्चा’ म्हणजे थर्डरेट व्यक्तींना व्हाईसचान्सलर म्हणून नेमणे; नेहरू सेक्युलर होते असे संसदेत सांगणे म्हणजे नेहरू मेमोरियल लायब्ररी या संस्थेची वाट लावणे; प्रधान सेवक म्हणजे लोक काय म्हणतात याकडे कायम दुर्लक्ष करणे.

निवडणूक म्हणजे आपण स्वत: हे भारत आणि इतर सारे हे पाकिस्तान असा खेळ. जवळपास युद्धच!

साहित्य विषय शिकणार्‍या कॉलेज विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत एक प्रश्‍न हमखास विचारला जातो, तो म्हणजे ‘कोणत्या युगकर्त्या कवी-लेखनाने आपल्या भाषेत किती नव्या शब्दांची भर घातली?’ आणि विद्यार्थी मोठ्या आवडीने कालिदास असो, शेक्सपियर असो, तुकाराम असो, जो महान कवी-लेखक प्रश्‍नात असेल त्याच्या शब्दसंपत्तीबद्दल लिहितात. त्या शब्दसंपत्तीच्या आधारावर, त्या त्या युगकर्त्या कवीने निर्माण केलेल्या साहित्ययुगाची प्रमुख लक्षणे अधोरेखित केली जातात.

सध्याच्या नव्या शब्दसंभारात एक खास गुण दिसून येतो, तो म्हणजे घृणा, तिरस्कार, धुत्कार यांची रेलचेल. या अभ्यासातील नियत झालेल्या पद्धतीने जायचे झाल्यास आपण या नव्या शब्दांच्या निर्मात्यांना ‘युगकार’ म्हणू शकू, आणि त्यांनी देशाला ज्या युगात फरपटत आणून पोहोचवले आहे त्याला ‘घृणायुग’ अथवा ‘तिरस्कार युग’ म्हणू शकतो. एखाद्या काळात अनेक लेखककवी काही नवीन निर्माण करत असतील तर त्यांचा उल्लेख इंग्रजीमधून ‘स्कूल’ असा केला जातो. त्या प्रमाणे आपण या नव्या वेदनेच्या कर्त्यांना ‘हेट-स्कूल’ म्हणू शकतो इतकी विपुल हेट-शब्द संपत्ती त्यांनी आपल्या सामाजिक जीवनातील परिभाषेत आणून टाकली आहे.

मनोवैज्ञानिक सिगमंड फ्रॉइडच्या पद्धतीने या नव्या हेट भाषेचे विश्‍लेषण करायचे झाल्यास, ह्या ‘हेटकी’ त ‘स्वत:च्या मनात सतत पछाडणारा न्यूनगंड आक्रमकपणाने व्यक्त करण्याची प्रबळ भावना’ दिसून येईल. ‘आजपर्यंत मला नाकारलेत काय? आता दाखवतो तुम्हाला’ –हा आवेश आणि त्यापोटी, देशाने परिश्रमातून आणि विचारपूर्वक उभ्या केलेल्या अनेक संविधानिक संस्था तोडायला लागल्या तरी त्यांची ऐसी-की-तैसी! इतिहासकारांना या नव्या भाषेचे आणि ती निर्माण करणार्‍या भाषिकांचे वर्णन करायला दिले तर ते, देश आर्थिक गर्तेत गेलेला असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून उभा केलेला शब्दिकी प्रचार या दृष्टीने पाहतील.

भाषाशास्त्र मात्र जरा वेगळ्या दृष्टीने हा प्रकार पाहील. ते याला ‘डिस्कोर्स अनालिसिस’ चे नियम लावून तपासतील.  ते, म्हणजे भाषाशास्त्री, म्हणतील ‘काहीही असो, भाषा ही शेवटी एक सामाजिक व्यवस्था असते’. एकदा कोणत्याही शब्दाचा वापर काही नव्याच अर्थाने केला गेला तर त्यानंतर तो वापर तसाच करण्याची कायम-मक्तेदारी त्या पहिल्या वापर-दाराकडे राहत नाही. सुरुवातीस, असे ‘नवे’ अर्थ शब्दात ओतताना त्या प्रथम वापरदारास आपण काही तरी महान नैतिक काम करतो आहे असे वाटणे स्वाभाविक आहे; पण नंतर जेव्हा हे सारे शब्द इतरही वापरू लागतात तेव्हा समाजात आणि भाषेत केवळ चिखलफेक आणि कचराफेक माजतात.

‘हेटकी’ ने भारतीय समाज जीवनात ही कचराफेक आणि चिखलफेक रुजवलेत. या पूर्वी, आपल्या समाज जीवनात कितीतरी महात्म्यांनी आपल्यासाठी नवीन शब्द तयार केले: गांधींनी आपल्याला दिले ‘स्वराज’, ‘सत्याग्रह’, ‘अहिंसा’, ‘असहकार’, ‘सविनय कायदेभंग’ सहयोग, बाबासाहेबांनी दिले ‘समानता’, ‘अधिकार’, ‘संविधान’ विनोबांनी ‘भूदान,’ आणि ‘जेपींनी’, ‘संपूर्ण क्रांती’. या सार्‍या शब्दात समाजमनाची उंची वाढवण्याची ताकद होती. हेटकीमध्ये ती नाही, उलट समाजाचा नीतीस्तर कितीतरी खाली ढकलण्याची खटपट त्यात आहे. रोज सकाळ-संध्याकाळ टीव्ही सेट्समधून आपल्या घरात हेटकी ओतली जाते आणि आता आपल्या घराघरात ती रुळून गेली आहे. घृणा आणि त्यातून निर्माण होणारी हिंसा या वेदनादायक आणि अनिछिनीय असतात; पण त्याहूनही जास्त दु:खद असते ते म्हणजे त्यांचे ‘नॉर्मलायझेशन’ रुळून जाणे. ते झाले आहे.

शब्दकोशांना ‘अर्थ’ शब्दाचा अर्थ पूर्णपणे माहीत नसेल, काही हरकत नाही. पण हिंसेच्या भाषेचा समाजावर सखोल परिणाम होत चालला तर त्याला कसे सामोरे जावे हे मानवी समुदायांना मात्र फार चांगले माहीत असते. भाषा ही खरोखरच एक विलक्षण सामाजिक व्यवस्था आहे. तिचा आपला एक प्रतिकाराचा प्रकार असतो. जेव्हा हिंसेचे शब्द भाषेचीही हिंसा करू लागतात तेव्हा भाषा ‘संपावर जाते’, ती तिच्या अर्थ-व्यवस्थेचे खालावलेले स्तर सांभाळून ठेवायला पुढे येते. ती काही संवाद अशक्य बनवते. हा तिचा संप. आणि काही नवे संवाद ती निर्माण करते. ही तिची कृती. भाषेच्या कोणत्याही अभ्यासकाला विचारा, तो/ती आपल्याला सांगेल की देशात उफाळून आलेला प्रोटेस्टचा महापूर हा मात्र नागरिकत्व मुद्यासाठीचा, मात्र सिटिझनशिप रजिस्टरच्या मुद्द्यालाच नाही. तो हेटकीच्या विरोधात पण आहे. मुळात तो त्यातूनच निर्माण झालेला आहे. आपल्या देशातील तरुणांनी आणि आजपर्यंत कधीही रस्त्यावर न उतरलेल्या स्त्रियांनी हेटकीला भर चौकात आणलंय. ते संविधानाच्या नावाने आणि तिरंग्याच्या छायेत संवाद मागताहेत. ते हेटकी नाकारताहेत, कारण ते हिंसेची भाषा आणि भाषेची हिंसा यापासून समाजमुक्त करायला उद्युक्त झालेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0