वानखेडे यांच्याकडून ड्रग्ज प्रकरणाचा तपास काढून घेतला

वानखेडे यांच्याकडून ड्रग्ज प्रकरणाचा तपास काढून घेतला

अमली पदार्थ विरोधी विभागा(एनसीबी)चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आणि नवाब मलिक यांचे जावई समीर खान ड्रग प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला आहे.

हाथरस आरोपींवर बलात्कार व खूनाचे आरोप निश्चित
अस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध
सीबीआयचे अतिरिक्त संचालक एम. नागेश्वर राव यांची पदानवती

मुंबई अमली पदार्थ विरोधी विभागा(एनसीबी)ने मुंबईतील समुद्रात कार्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर २ ऑक्टोबरला छापा टाकून केलेली कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्या कारवाईवरुन  एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे अडचणीत आले होते. त्यांच्याकडून आज संध्याकाळी कार्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला.

कार्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणामध्ये अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला समीर वानखेडे यांनी अटक केली होती. आर्यन खान प्रकरणासह एकूण ६ प्रकरणांचा तपास मुंबई एनसीबीकडून काढून घेण्यात आला, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाबरोबरच अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे प्रकरणही समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे. आता या प्रकरणांचा तपास दिल्ली एनसीबी करणार असल्याची माहिती एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी दिली. हा प्रशासकीय निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. आता हा तपास विभागीय संचालक संजय सिंह हे करणार आहेत.

आपल्यावर अनेक प्रकारचे आरोप झाल्याने, हा तपास आपल्याकडून काढून घेण्यात यावा, अशी आपणच मागणी केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एनसीबीने क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर छापा टाकला होता. या कारवाईत अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचासह अनेकांना अटक करण्यात आली होती. लोकांना खोट्या प्रकरणात अडकवून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल करण्याची वानखेडे यांची पद्धत असल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर केला आणि त्यांचे जात प्रमाणपत्रही खोटे असल्याचा मलिक यांचा आरोप आहे. ड्रग्ज पार्टीवर छापा टाकण्यात आल्यानंतर त्या प्रकरणातील पंच यांनीही माघार घेतली आणि खंडणी मागण्यात आल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणात समीर वानखेडे यांची एनसीबीकडून खात्यांतर्गत चौकशी सुरू आहे. या चौकशीसाठी एका पथकाची स्थापनाही करण्यात आली असून, वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरही चौकशी सुरू झाली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: