लोकशाहीतले दिनू रणदिवे!

लोकशाहीतले दिनू रणदिवे!

नि:स्वार्थ पत्रकारितेचा आदर्श मानले जाणारे बुजुर्ग पत्रकार-अभ्यासक दिनू रणदिवे यांचे आज १६ जून २०२० रोजी दादर येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. पहिले पंतप्रधान पं. नेहरूंपासून ते नरेंद्र मोदींपर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडातील सामाजिक-राजकीय स्थित्यंतरे त्यांनी अनुभवली होती. गेल्या वर्षी ३१ मार्चला ‘दै. दिव्य मराठी’च्या ‘रसिक’ पुरवणीत त्यांचा मुलाखतवजा संवाद प्रसिद्ध झाला होता, तो पुन्हा ‘दै. दिव्य मराठी’च्या सौजन्याने वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

खांद्याला शबनम, डोळ्यावर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा, किंचित वाढलेले दाढीचे खुंट अन् सैलसर झब्बा अशा वेशात ‘सिंहासन’(१९७९) चित्रपटात निळू फुलेंनी रंगवलेला दिगू टिपणीस हा पत्रकार मनात घट्ट बसलेला आहे. गावच्या जत्रेत कळत्या वयात ‘सिंहासन’ बघितलेला. आज त्यातल्या दिगूला म्हणजे दिनू रणदिवे या खऱ्याखुऱ्या नायकाला, परंतु आता विस्मृतीत गेलेल्या पत्रकाराला भेटायचा योग होता. वय झालंय, त्यांनी मुलाखती देणं बंद केलंय, असं कळलं होतं. नाही तर नाही…पाया तरी पडून येऊ, म्हणत दादरला पोहोचलो. रणदिवे राहत असलेली घामट टेरेस इमारत सहज शोधून काढली. दादर रेल्वे स्टेशनला अगदी खेटून ही इमारत उभी आहे. सर्व मजल्यावरच्या सर्व खोल्यांत दुकानेच दुकाने. दुकानदारांना वयोवृद्ध पत्रकार माहीत असणं मुश्कील होतं. वॉचमनला शोधून काढलं. आप कौन, कहाँ से आये हो, म्हणत त्यानं उलटतपासणी घेतली. रणदिवे यांचे काम आहे, मंत्रालयातून आलोय, असं म्हटल्यावर तो मला दुसऱ्या मजल्यावर एका बंद घरासमोर घेऊन गेला. बेल वाजवली. आतून काही प्रतिसाद नाही. दहाएक मिनिटांनंतर कधी काळी रंग लावलेला तो दरवाजा किलकिला झाला. नव्वदएक वर्षांच्या आजीबाई पुढे आल्या. दिनू रणदिवेंच्या या पत्नी हे लक्षात आलं. ‘ते पाय घसरून पडलेत, बोलू शकत नाहीत’ असं म्हणाल्या. तरीपण ‘त्यांना’ विचारते, म्हणत आत गेल्या.

भिंतीचा आधार घेतघेत पुन्हा दाराशी आल्या. या…दोनच मिनिटं बोला, असं म्हणून त्यांनी घरात घेतलं. दहा बाय दहाच्या दोन खोल्या. पहिल्या खोलीत स्वयंपाकघर. पण कित्येक महिने तिथला एक डबाही हलला नसावा, अशी स्थिती. दुसऱ्या खोलीत, दोन छोटे दिवाण. एका बाजूला ओळीने मांडलेले धूळ बसलेले अनेक पुरस्कार, सन्मानचिन्हं. दुसऱ्या बाजूला,वर्तमानपत्राच्या कात्रणांचा ढीग, थोडी पुस्तकं. हे सारंच एखाद्या पुराभिलेखागारात आल्याचा भास देणारं. कळकट मळकट भिंती. पंख्याची घरघर अन् रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्यांच्या हॉर्नचा कर्कश आवाज इतकाच या घराचा अन् जगाचा संबंध.

एका दिवाणावर ९४ वर्षांचे ध्येयवादी दिनू रणदिवे बसलेले. हात जोडून म्हणाले, आजारी आहे, मुलाखत नको. म्हणून मग थोडं बोलून निघायचं ठरवलं. दिनूंच्या पत्नी बोलायला लागल्या. ‘पत्रकार येतात, मुलाखती घेतात. पुन्हा फिरकत नाहीत. चार मुख्यमंत्र्यांनी यांचा गौरव केला. आमचा प्रश्न आहे, तिथेच आहे. नातेवाईक करोडपती आहेत, पण कोणी फिरकत नाही.’

‘आता आम्हाला जिने उतरता येत नाहीत. वॉचमनकडे पैसे देतो. तो दूध, पेपर आणतो. दादरमध्ये आहोत, पण व्यवस्थित पोळीभाजी मिळत नाही. सगळ्या हॉटेलांत पंजाबी भाज्या. काय खायचं? हे स्वातंत्र्यसैनिक आहेत. पण, धर्मादाय रुग्णालयं कॉट रिकामी नाही, म्हणतात. माझं वय आता ८९ आहे. उठत बसत, डाळ भात करते. रोज रोज तेच खाववत नाही. पण, सांगायचं कुणाला?’

नंतर रणदिवेंनी खूण केली. तशा त्या शांत झाल्या. काय विचारायचंय, असं ते मला म्हणाले. मी म्हणालो, ‘तुम्ही पहिली सार्वत्रिक निवडणूक बघितली असेल, त्याविषयी सांगा?’ मिश्कील हसले. खोल श्वास घेतला आणि एका लयीत काळाचा पट उलगडू लागले.

‘माझा जन्म १९२५ सालचा. मी तेव्हा ‘लोकमान्य’ दैनिकात उमेदवारी करत होतो. समाजवादी पक्षाचा कार्यकर्ताही होतो. तो भारावलेला काळ होता. तरुणांसाठी तर मंतरलेले दिवस होते. समाजवादी पक्षात तरुणांची संख्या अधिक होती. विरोधकांच्या सभा मोठ्या होत.’ ‘अशोक मेहता, मधु लिमये, एस. एम. जोशी आमचे मुंबईतले नेते होते. समाजवाद्यांना वाटायचे, आमचे नेते हुशार आहेत. आमच्याकडे कार्यकर्ते आहेत. भांडवलवादाविरोधी कार्यक्रम आमच्याकडे आहे. आम्हीच जिंकणार. झाले उलटे. समाजवादी पक्षाने सपाटून मार खाल्ला. काँग्रेसचा मोठा विजय झाला. तेव्हा कळले, समाज बेरकी असतो. जाहीर कौतुक एकाचं करतो आणि दुसऱ्यालाच मतपसंती देतो. काँग्रेसकडे अनुभवी लोक होते, निवडणुकांचा पूर्वानुभवही होता.’

‘त्या निवडणुकीवेळी वर्तमानपत्रं जास्त नव्हती. अगदी चारपाच असावीत. मालक स्वत: संपादक होते. पण, विरोधी पक्षांना आपल्या वर्तमानपत्रांत अधिक स्थान देण्याकडे त्यांचा कटाक्ष असे. विरोधक हे सामान्यांचे प्रतिनिधी आहेत, असे तेव्हा मानले जाई.’

‘मला वाटतं, तेव्हा दहाबारा पक्ष होते. प्रत्येक पक्षाची स्वतंत्र मतपेटी असे. त्याच पेटीत मतपत्रिका टाकावी लागे. फार नंतर सामायिक मतपत्रिका आल्या. त्यावर चिन्ह व उमेदवारांची नावे एकत्रित होती. टीकमार्क अर्थात खूण करून मतदान करावे लागे. त्या काळी एका मतदारसंघात एकापेक्षा अधिक जागा असत.’

‘पहिल्या निवडणुकीत पं. नेहरु यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने साडेतीनशेच्या आसपास जागा जिंकल्या. कम्युनिस्ट पार्टी दुसरा मोठा पक्ष ठरला. त्यानंतर समाजवादी पार्टी नंतर प्रजा पार्टी, हिंदू महासभा, जनसंघ आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन यांना एकदोन जागा मिळाल्या होत्या.’
‘पहिल्या निवडणुकीतल्या पराभवाने समाजवादी पक्षांतर्गत टीकेचे मोहोळ उठले होते. ‘जयप्रकाश यांच्या धोरणामुळेच पक्षाचा पराभव झाला. जेपी व नेहरु यांची मैत्री पक्षाला भोवली’, असे आरोप झाले. पराभवास जबाबदार धरल्याने जेपी व्यथित झाले होते.’

हे सर्व सांगत असताना मी मध्येच त्यांना तोडत म्हणालो. ‘तुम्ही आता पेपर वाचता.’ ‘तर..लिहीत नाही. पण, रोज दोनचार पेपर वाचतोच.’ आजच्या निवडणुका कशा वाटतात? मी पुढ्यात प्रश्न टाकला. ते सांगू लागले, ‘मी १९८५ ला ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून निवृत्त झालो. त्या दरम्यान निवडणुकांचा बाज बदलू लागला होता. विचाराची जागा पैशाने घ्यायला सुरुवात झाली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांना पक्षांतरचा पर्याय जवळपास नव्हता. एकदा पक्षाचा, विचारधारेचा टीळा लावला की लावला.

मध्येच सविता सोनी (रणदिवे) आल्या. ‘आम्ही कुणाला पैसे मागत नाही. यांना इतके पुरस्कार मिळाले. एका पुरस्काराची रक्कम घरी आणली नाही. मी शाळेत शिक्षिका होते. त्याचे पेन्शन मिळते. त्यावरच चाललंय. इतके मुख्यमंत्री आले. सगळे पत्रकार संघाचे लोक आले. करतो करतो म्हणाले. नंतर कोणी फिरकलं नाही. आम्हाला धड वृद्धाश्रम मिळत नाही. नव्वदीच्या पुढच्या वृद्धांना आश्रमात घेत नाहीत, म्हणे. पनवेलला समाजवाद्यांनी चालवलेला वृद्धाश्रम आहे. तिथेही नकार मिळाला. कॉ. डांगे यांच्या अखेरच्या आजारपणात हे दोन महिने हिंदुजा हॉस्पिटलात त्यांची सोबत करायला जात. पण डावेही आमच्याकडे फिरकेनासे झाले.’

पत्नीच्या त्या उद्वेगावर दिनू रणदिवे मिश्कील हसले. माझ्याकडे काही उत्तर नव्हतं. मी खजील झालो. विमनस्क होऊन बाहेर पडलो. त्यांचे ते मिष्किल हसणं, मला ‘सिंहासन’ चित्रपटाच्या शेवटी दिगू टिपणीस जनतेच्या अनुत्तरित राहणाऱ्या प्रश्नावर मंत्रालयाबाहेर जसा खदा खदा हसतो, तसं वाटलं. त्यानंतर चित्रपटात एकमेव गाणं असलेले सुरेश भटांचं ते गाणंही आठवलं…
उष:काल होता होता, काळरात्र झाली…

००००

प्रचाराचे कंपनीकरण झाले आहे…
आधीच्या काळात प्रचार राजकीय-पक्ष-नेत्यांच्या पातळीवरची आक्रमकता कशी अनुभवास येत होती?

> याचं उत्तम उदारहरण जॉर्ज फर्नांडीस याचं घ्या. जॉर्ज सभेसाठी व्यासपीठावर येताना लोकांतून यायचा. तेव्हा प्रचाराचं कंपनीकरण झालेलं नव्हतं. जॉर्जने १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबईचा बादशहा असलेल्या स. का. पाटलांचा पराभव केला. त्या निवडणुकीत ‘यू कॅन डिफिट इट’ ही लोकप्रिय घोषणा ठरली, जॉर्जने स्वत: ती बनवली होती.

निवडणुकीचं म्हणून अर्थकारण असतं. त्याचा मतदारांना वश करण्यात आज सर्रास उपयोग केला जातो. या संदर्भातलं तेव्हाचं चित्र काय होतं?
>कार्यकर्ते सामान्य घरातले होते. पंचतारांकित राहणीमान तेव्हा नव्हतं. नेते एसटी, बस, लोकल, जीपने प्रवास करत. हल्ली निवडणुकांत उद्योगपतींचा दबदबा असतो. तेव्हा कामगार नेत्यांचा असे. सभा-अधिवेशने जिवंत वाटत. त्याला लोक स्वत: पदरमोड करून हजर राहत.

गेल्या काही वर्षांत निवडणूक हा अपप्रचाराचाच अधिक भाग बनत चाललाय?
> प्रसिद्धी माध्यमे तेव्हाही नेत्यांची आरती ओवाळण्याचे काम करत होतीच. आणीबाणीत नाही का, संजय आणि इंदिरा गांधी यांची भलामण करण्यात तेव्हाच्या अनेक वर्तमानपत्रांनी जराही कसर सोडली नव्हती. तेव्हा पॅकेज वगैरे प्रकार नव्हता. मालक हेच संपादक होते, त्यामुळे तेव्हाची वर्तमानपत्रे निवडणुकांत भूमिकेशी अधिक बांधील होती.

राजकीय पक्ष-संघटनांना प्रतिसाद देणाऱ्या तेव्हाच्या आणि आताच्या जनमानसाशी तुलना कशी करता येईल?
> आज कोणताही पक्ष कार्यकर्त्यांना विधायक कार्यक्रम देताना दिसत नाही. निवडणुका आल्या की कार्यकर्ते बाहेर येतात. समाजवाद्यांनी पहिल्या निवडणुकीतील पराभवानंतर पंचमढीला अधिवेशन घेतले होते. त्यात डॉ. लोहिया यांनी ‘त्रिशूळ’ (कुदळ, तुरुंग, मतपेटी) कार्यक्रम दिला होता. जेपींनी त्याला ‘विचारयज्ञ’ असे म्हटले होते.

आजच्या आणि तेव्हाच्या नेत्यांची कार्यपद्धती विषयी काय सांगाल?
>आजचे नेते कोणत्या गावी, कार्यक्रमाला गेले, तर कार्यकर्त्याशी फारसे संवाद साधत नाहीत. ते प्रसिद्धी माध्यमांशी मात्र अधिक संवाद साधतात. प्रसिद्धीकडे त्यांचा अधिक कल असतो. पण, तेव्हा असे नव्हते. पक्षात तेव्हा कार्यकर्ता महत्त्वाचा असे. प्रसिद्धी ही संघर्षातून आपसूक येते, यावर तेव्हाच्या नेत्यांची श्रद्धा होती.

अशोक अडसूळ, हे ‘दिव्य मराठी’ वृत्तपत्रातील वरिष्ठ राजकीय पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.

COMMENTS