नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात विद्यापीठ प्रशासनाने घेतलेल्या काही निर्णयावर शेकडो विद्यार्थ्यांन
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात विद्यापीठ प्रशासनाने घेतलेल्या काही निर्णयावर शेकडो विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात आता काही शिक्षक संघटनाही उतरल्या आहेत. सोमवारी पदवीदान समारंभात विद्यार्थी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष पाहावयास मिळाला होता. त्यात आता शिक्षकही उतरल्याने हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत.
मंगळवारी जेएनयू टीचर्स असो.चे अध्यक्ष डी. के. लॉबियल यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या अत्याचाराविरोधात दंड थोपटले. या संघटनेने विद्यापीठाच्या आवारात एक सभा घेऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आम्ही सहभागी असल्याचे जाहीर केले. त्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरुंचाही राजीनामा मागितला. यावेळी लॉबियल म्हणाले, ‘जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील सोमवारचा दिवस काळा दिवस म्हणावयास पाहिजे. कारण आमच्या विद्यार्थ्यांना एकीकडे पदवी मिळत होती तर दुसरीकडे पोलिस आमच्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करत होते’.
लॉबियल यांच्याबरोबर सेंटर फॉर इन्फॉर्मल सेक्टर अँड लेबर स्टडिजचे प्रा. प्रदीप शिंदे यांनीही जेएनयूचे कुलगुरू हे सरकारचे बाहुले असून त्यांनी शैक्षणिक संस्थांचे नेतृत्वच करू नये, असे वक्तव्य केले. तर राज्यशास्त्राचे प्रा. अमीर अली यांनी विद्यार्थ्यांच्या या संघर्षाला आपण सलाम करत असल्याची प्रतिक्रिया दिली. जेएनयूची प्रतिमा सातत्याने मलिन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारण ही संस्था असत्याचा विरोध करत असते. हा विरोध नष्ट करण्याच्या हेतूनेच येथे प्रशासन काम करत असल्याचा अली यांनी आरोप केला.
तर सेंटर फॉर द स्टडी ऑफ रिजनल डेव्हलमेंटचे प्रा. अतुल सूद यांनी कुलगुरू हे आपला धाक असावा या पद्धतीने आपला कारभार करत असतात. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय नसते पण गरज असते ते विद्यार्थी या विद्यापीठात शिकण्यासाठी येत असतात, आणि तो त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. पण या विद्यार्थ्यांना या विद्यापीठाचा फायदा होऊ नये अशी कुलगुरूंची इच्छा असल्याचा आरोप प्रा.सूद यांनी केला.
आम्ही लवकरच कुलगुरुंशी असहकार पुकारण्याची मोहीम हाती घेणार असल्याचेही प्रा. सूद यांनी सांगितले.
मंगळवारी शिक्षक संघटनेच्या बैठकीत विद्यापीठातील ५० शिक्षक व १०० विद्यार्थी उपस्थित होते.
नेमके प्रकरण काय आहे?
जेएनयू प्रशासनाने अचानक वाढवलेली फी व विशिष्ट पोशाखाची केलेली सक्ती याच्याविरोधात गेले दोन आठवडे जेएनयूतील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. विद्यार्थी कुलपतींना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना भेट मिळत नसल्याने हे आंदोलन चिघळले आहे. विद्यापीठ प्रशासनाने नवे हॉस्टेल परिपत्रक आणले असून त्यानुसार सेवा कर म्हणून १७०० रु. तर भोजनालयाचे एकावेळचे (जे नंतर परत मिळणार आहे) डिपॉझिट साडेपाच हजार रु. ते १२ हजार रु. इतके वाढवले आहे. त्याचबरोबर सिंगल रुम शेअरिंगचे मासिक शुल्क २० रु.हून ६०० रु. तर डबल शेअरिंग खोलीचे शुल्क महिना १० रु.हून ३०० रु. इतके केले आहे. शिवाय प्रशासनाने हॉस्टेलमध्ये ड्रेस कोड व कर्फ्युची वेळही निश्चित केली आहे. त्याचबरोबर ‘पार्थसारखी रॉक्स’ भवनात विद्यार्थ्यांना बंदी व विद्यार्थी संघटनांची कार्यालयेही बंद करण्यात आली आहेत.
सोमवारी जेएनयूचा दीक्षांत समारंभ विद्यापीठातील एआयसीटीईच्या सभागृहात होता. त्या सभागृहाकडे जाण्याचा प्रयत्न आंदोलक विद्यार्थ्यांनी केला असता त्यांना सुमारे तीन किमी अगोदरच रोखण्यात आले. तरीही काही विद्यार्थ्यांनी सकाळी ११.३०च्या सुमारास बॅरिकेड तोडून एआयसीटीईच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. काहींना ताब्यात घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी यावेळी दिल्ली पोलिस परत जा, ‘कुलपती एम. जगदीश एक चोर आहे’ असे फलक फडकवले.
मूळ बातमी
COMMENTS