मुस्लीम जगाचा शोध

मुस्लीम जगाचा शोध

मुस्लीम जग, मुस्लीम वंश, मुस्लीम सिविलायझेशन अशी एकादी गोष्ट आहे काय? मुस्लीम संस्कृती म्हणजे एक बांधीव अरब संस्कृती आहे काय?

आयर्लंड आणि ब्रिटन : दुर्दशांची मीमांसा करणारी पुस्तकं.
अस्वस्थ करणारी कोरोनाकथा
बायडन यांचा प्रवास मांडणारे पुस्तक

मुस्लीम जग, मुस्लीम वंश, मुस्लीम सिविलायझेशन अशी एकादी गोष्ट आहे काय? मुस्लीम संस्कृती म्हणजे एक बांधीव अरब संस्कृती आहे काय?

तसं काही नाहीये असं ठाशीव उत्तर केमिलआयडिन त्यांच्या ‘आयडिया ऑफ द मुस्लीम वर्ल्ड’ ( Idea of the Muslim World) या पुस्तकात देतात.

बराक ओबामा प्रेसिडेंट झाल्यावर कैरोमधे गेले होते तेंव्हा एका भाषणात त्यानी मुस्लीम जग असा  उल्लेख केला. कारण आधीचे प्रेसिडेंट बुश यांच्यावर आरोप होत होता की ते मुस्लीम देशांवर आक्रमणं करत फिरत आहेत. त्या आधी खोमेनी १९८८ मधे आपण मुस्लीम जगाच्या वतीनं बोलत आहोत असं म्हणाले होते. त्या आधी सॅम्युएल हटिंग्टन यांनी संस्कृती (सिविलायझेशनचा) संघर्ष असा सिद्धांत मांडून मुस्लीम व ख्रिस्ती सिविलायझेशनमधे सांस्कृतीक संघर्ष आहे असं म्हटलं होतं.

नॉर्थ कॅरोलायना विश्वशाळेत इतिहास शिकवणाऱ्या प्रा. केमिल आयडिन यांनी ओबामा यांचं वक्तव्य मनावर घेतलं आणि खरोखरच मुस्लीम जग नावाची एकादी एकसंध गोष्ट आहे का याचं संशोधन करायला सुरवात केली. सुमारे ८ वर्षाच्या अभ्यासांती ते या मताला पोचले, की मुस्लीम जग नावाची एकसंध गोष्ट नाही. ढोबळ मानानं १८८० च्या सुमाराला या कल्पनेनं उचल खाल्ली आणि तेंव्हापासून ही कल्पना अत्यंत सैलपणे वापरली जाते. तशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसतानाही.

१७९८ मधे म्हैसूरचा सुलतान टिपू याला ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला भारताबाहेर घालवायचं होतं. ब्रिटिशांच्या तुलनेत टिपूची लष्करी ताकद खूपच कमी होती. त्यानं शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानं साथीदार शोधायला सुरवात केली. मुसलमान टिपूनं ख्रिस्ती फ्रेंचांची मदत मागितली. त्याच बरोबर मुस्लीम बंधू ओटोमन सम्राट सेलीम तिसरा याच्याकडं मदत मागितली. सेलीमकडं मदत मागताना आपलं मुस्लीम असणं त्यानं उल्लेखलं होतं.

सेलीमनं मदत नाकारली. उलट सल्ला दिला की ब्रिटिशांशी जुळवून घ्यावं. कारण मुसलमान सम्राट आणि ख्रिस्ती ब्रिटीश राणी यांच्यात समझौता होता.

ब्रिटीश फौजा म्हैसूरमधे घुसल्या. ब्रिटीशांनी निझाम या मुसलमान राजाचं मुस्लीम सैन्य वापरून टिपू सुलतानाच्या सैनिकांची प्रचंड कत्तल केली.

कुठं होतं मुस्लीम जग?

हॅप्सबर्गच्या लढाईत हॅप्सबर्ग सम्राटाच्या फौजेत मुसलमान होते आणि ऑटोमन सम्राटाच्या फौजेत ख्रिस्ती सैनिक होते.

१८८० च्या आधी जगात साम्राज्यं होती आणि त्या साम्राज्यात सर्व धर्माचे लोक होते. ख्रिस्ती ब्रिटीश साम्राज्यात सर्वात जास्त मुसलमान होते.

नेपोलियननं इजिप्तवर स्वारी केली तेव्हां इजिप्शियन राजाशी मैत्री करण्यासाठी त्यानं मुसलमान धर्मही स्विकारायचा विचार केला होता.

मुस्लीम माणसं इस्लाम हा धर्म मानतात. जगभरच्या मुसलमानांना जोडणारा तो एक धागा असतो. कुराणात, मुस्लीम साहित्यात उम्मा अशी एक कल्पना अनेक वेळा वापरलेली दिसते. उम्मा म्हणजे समाईक श्रद्धा असणारा समाज. पण उम्माचा सदस्य असणाऱ्या माणसांना खूप स्वतंत्र ओळखी असतात. भाषा वेगळ्या असतात, वहिवाटी वेगळ्या असतात, संस्कृती वेगळी असते एवढंच नव्हे, तर शरियाचे अर्थही जागोजागच्या उम्माचे लोक वेगवेगळे लावत असतात. ही माणसं जिथं जिथं असतात तिथं तिथं त्या त्या राज्याचे सदस्य असतात. तेंव्हा उम्मा असतं याचा अर्थ उम्मातले सदस्य मुसलमान एकसुत्री असतात असं नाही.

खलिफा हा देवाचा प्रतिनिधी. परंतू खलिफा हा सर्व मुसलमानांचा नेता होत नसतो. तो ज्या राज्याचा-देशाचा प्रमुख असतो तिथल्याच लोकांचा तो नेता असतो. अनेक मुस्लीम राज्यकर्ते स्वतःला खलिफा म्हणवत आणि ते इतर मुस्लीम राज्यांच्या खलिफांशी वैर पत्करून असत. त्यामुळं खलिफा आणि त्याचे सर्व मुस्लीम अनुयायी अशी स्थिती कधीच नव्हती.

चेमल आयडिन

केमिल आयडिन

थोडक्यात असं की जगात अनेक मुस्लीम राज्यकर्ते असलेली राज्यं होती, अनेक  मुस्लीम नसलेल्या राज्यकर्त्यांच्या राज्यांत मुस्लीम प्रजा होत्या परंतू एकसंध मुस्लीम साम्राज्य, एकसंध मुस्लीम समाज अशी गोष्ट कधीच नव्हती.

पहिल्या महायुद्धाच्या आसपास जगाचं राजकारण बदलू लागलं, साम्राज्यं आपसात भांडू लागली, साम्राज्यं खिळखिळी होऊ लागली. तेव्हां राजकारणाचा भाग म्हणून मुख्यत्वेकरून पश्चिमी-ख्रिस्ती साम्राज्यातल्या राज्यकर्त्यानी आपल्या फायद्यासाठी मुसलमानांना जवळ करण्यासाठी किंवा दूर लोटण्यासाठी एकसंधएकसूत्री मुसलमान समाज असा शब्द वापरायला सुरवात केली.

त्यातूनच एक ढोबळ मुस्लीम प्रेम आणि ढोबळ मुस्लीम द्वेष या गोष्टी आकाराला आल्या. त्यात मुस्लीम एकसंध समाज अशी एक अस्तित्वात नसलेली कल्पना केली गेली.

याच काळात याच परिस्थितीचा एक भाग म्हणून जागोजागी मुस्लीम समाजात सुधारणावादी विचार विकसित झाला. विज्ञान, आधुनिकता, स्त्रीचं महत्व या कल्पना या केवळ आपल्या देशातल्या मुसलमानानी नव्हे तर एकूणच जगातल्या मुसलमानांनी स्विकारल्या आहेत, एकूणच मुसलमान हा काळानुरुप पुढं जाणारा पुरोगामी समाज आहे असं सुधारक म्हणू लागले. म्हणजे देशाच्या पलिकडं जाऊन एकूणच मुस्लीम समाज अशी कल्पना त्यांनी केली. त्याच काळात एक असाही प्रवाह निघाला की तो सारा मुस्लीम समाज अरब आहे असंही सांगू लागला.

वास्तव वेगळंच होतं. भारतातले, इंडोनेशियातले, इराणमधले मुसलामान अरब नव्हते.

एक राजकीय गरज म्हणून मुसलमान जग अशी कल्पना केली गेली. त्यातून सरसकट मुसलमान द्वेष हा प्रवाह तयार झाला. परंतू सरसकट सारा मुसलमान एक असा प्रवाह मात्र तयार झाला नाही.

साम्राज्यं कोसळली. सार्वभौम देश निर्माण झाले. कित्येक सार्वभौम देश मुस्लीम बहुसंख्य होते, कित्येक देशात मुस्लीम मोठ्या संख्येनं पण अल्पमत झाले. ही सर्व मुसलमान माणसं त्या त्या देशांच्या हिताला बांधील असतात, मुसलमान समाज असा एकसंघ निर्णय तिथले मुसलमान घेत नाहीत.

आयसिसनं इराक आणि सीरियात मुस्लीम देश निर्माण केले. पण ते स्थापन करताना तेही विशिष्ट भूभागातल्या मुसलमानांपुरतेच ते मर्यादित राहिले आणि ते इतर  ठिकाणच्या मुसलमानांची हत्याकांडं करत राहिले. अल बगदादी हा आयसिसच्या मुस्लीम राज्याचा खलिफा झाला. अगदी मर्यादित मुसलमानांचा खलिफा.

शिया मुस्लीम देश आणि सुन्नी मुस्लीम देश एकमेकांशी कडकडीत वैर पत्करून आहेत.

लेखक विचारतात की मुस्लीम जग असा शब्दप्रयोग करणारे पत्रकार आणि राजकारणी ख्रिस्ती जग, बौद्ध जग, ज्यू जग असं कां म्हणत नाहीत? जगभरच्या काळ्यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो पण पत्रकार काळं जग असा शब्द प्रयोग का करत नाहीत?

इस्लाम ही एक स्पष्ट अशी श्रद्धा आहे. पण म्हणून मुसलमान असं एखादं एकसंध जग नाही. एका परीनं हाच विचार ख्रिस्ती श्रद्धेलाही लागू पडतो. पोप आणि व्हॅटिकन हे केंद्र असलेला ख्रिस्ती समाज जगभर पसरलेला आहे, पण त्यातून एकसंध ख्रिस्ती जग तयार होत नाही. प्रत्येक ख्रिस्ती समाजाच्या स्वतंत्र ओळखी आहेत, हितसंबंध आहेत, भिन्नता आहे.

मुस्लीम जग ही एक राजकीय कल्पना आहे आणि ती अगदीच विस्कळीत, सैल, विसविशीत आहे असा निष्कर्ष आयदान यांच्या पुस्तकातून निघतो.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेट.

THE IDEA OF MUSLIM WORLD
A GLOBAL INTELLECTUAL HISTORY
CEMIL AYDIN
HARVARD UNIVERSITY PRESS

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: