दिठी : माध्यमांतराचा सशक्त अनुभव

दिठी : माध्यमांतराचा सशक्त अनुभव

सतत लागून राहिलेली पावसाची जोरदार झड, त्यामुळे वातावरणात भरून राहिलेला काळोख, प्रमुख पात्रांच्या विविध व्यथांमुळे सभोवताली साकळून असलेलं कारुण्य व अस्वस्थता, हा या चित्रपटाचा एकंदर भवताल आहे.

काश्मीरात व्हीपीएन वापरण्यावर यूएपीए कायद्याची अंमलबजावणी
लखीमपुर : दुसऱ्या गाडीत काँग्रेसच्या माजी खासदाराचा भाचा
दोन वर्षांत काश्मीरात ९६ नागरिक, ८१ जवान ठार

‘आता आमोद सुनांसि आले’ या दि बा मोकाशींच्या कथेवर आधारित असणारा, कै.सुमित्रा भावे दिग्दर्शित शेवटचा चित्रपट ‘दिठी’ प्रेक्षकाला सशक्त माध्यमांतराचा अनुभव देतो.

सतत लागून राहिलेली पावसाची जोरदार झड, त्यामुळे वातावरणात भरून राहिलेला काळोख, प्रमुख पात्रांच्या विविध व्यथांमुळे सभोवताली साकळून असलेलं कारुण्य व अस्वस्थता, हा या चित्रपटाचा एकंदर भवताल आहे.

चित्रपट सुरवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे मूळ कथेचं बोट धरून चालतो. साहित्यावर आधारित चित्रपट पाहताना असं बरेचदा दिसून येतं, की कथेचा काही भाग वगळून त्यात आपल्या सोयीनुसार बदल केले जातात. प्रॉडक्शन कमी खर्चिक आणि सोयीचे कसे होईल हे प्रामुख्याने बघितलं जातं. गरजेनुसार काटछाट केली जाते. केलेल्या बदलांमुळे अनेकदा साहित्याच्या गाभ्याला धक्का लागतो असेही पहायला मिळते. ‘दिठी’ बाबत मात्र असं होत नाही. अवघ्या बारा पानी कथेचं पूर्ण लांबीच्या चित्रपटात रुपांतर करताना सुमित्रा भावे यांनी योग्य ते बदल केले आहेत. मूळ कथा आणि तिच्या यथार्थ गाभ्याला जसंच्या तसं ठेवून चित्रपट बनवण्यात आला असला तरी, मूळ कथा वाचताना आणि चित्रपट पाहताना मनात निर्माण होणारा परिणाम, हे वेगवेगळे आहेत.

दि. बा. मोकाशींची शैली मुळात कमालीची चित्रदर्शी आहे. कमीतकमी शब्दांमध्ये ते संपूर्ण परिणाम मनात उभा करतात. कथेतील पात्रे, वस्तू, वास्तू त्यांच्या रंगपोतांसकट वाचकाच्या मनात जिवंत होतात. अशी चित्रदर्शी कथा जेव्हा एका सिद्धहस्त लेखिकेच्या मनात आकार घेते आणि त्या आकाराला ती रंगरूप देते, तेव्हा ‘दिठी’ सारखी कलाकृती भेटीस येते. ‘कथा वाचताना मला ही अशी दिसली, अशी समजली आणि त्यातून माझ्या मनात, विचारात निर्माण झालेली सृष्टी मी दाखवू पाहते आहे’ ही डोळस जाणीव अनेकदा जाणवते. मूळ कथेत जाणीवपूर्वक बदल केले गेले आहेत. काही पात्रे नवी आहेत, तर काहींचे डीटेलिंग बदलले आहे. काही वास्तू वेगळ्या आहेत, तर काही ठिकाणेच नविन आहेत. मूळ कथेमध्ये रामजीबाबाला सून नाही. पण चित्रपटातलं सुनेचं आणि नातीचं असणं, या कथेला असलेली कारुण्याची जीवघेणी किनार अधिकच गडद व जिवंत करतं. दि.बां.नी निवेदकाच्या भूमिकेतून लिहिलेलं पिशवीचं रूपक, रामजीच्या आठवणींत घडलेल्या प्रसंगात वापरणं आणि प्रसंगी रामजीलाच तृतीय पुरुषातून निवेदक म्हणून थेट प्रथम पुरुषात आणणे, हे सुमित्रा भावेच करू जाणोत.

पावसाची भयाकारी संततधार, चिखल तुडवीत, कंदिलाला झोके देत, खाचखळग्यातून, शेतातून चालणारी चिवट माणसे, अहोरात्र पावसामुळे विस्कळीत झालेलं जनजीवन, अशाही परिस्थितीत आतड्याची माया टिकवून एकमेकांच्या मदतीला झटणारी माणसे, या सर्वांना बांधून असलेला पोथीचा व तत्वज्ञानाचा अदृश्य पण बळकट धागा, केरोसीनच्या बत्त्या, कंदिलांचा गूढ प्रकाश, पात्रांच्या झरझर बदलणाऱ्या भावमुद्रा, पार्श्वभूमीवर सतत सुरु असणारा पावसाचा तालेवार कडकडाट, रोखून धरलेले श्वास, खालीवर होणारे भावनांचे आलेख, हे सारं मिळून येऊन ‘दिठी’ निर्माण होतो.

किशोर कदम यांनी आपल्या समर्थ अभिनयाच्या जोरावर ‘दिठी’ तोलून धरला आहे. थक्क करणारा परफॉर्मन्स. रामजीबाबाचं पात्र किशोर अक्षरशः जगले आहेत. मूळ कथा वाचताना रामजीबाबाचं पात्र मनात तितक्या प्रकर्षाने ठसत नाही. हे पात्र समजून घेऊन, अंगात भिनवून, संपूर्ण ताकदीनिशी किशोर उतरले आहेत. नुकत्याच झालेल्या पुत्रवियोगाचं शल्य भळभळत्या जखमेसारखं उराशी धरून ते चित्रपटभर वावरतात. त्यांचे डोळे कधी शून्यात लागलेले असतात, तर कधी घळाघळा रडत असतात, कधी ते कठोर, निष्ठूर होतात तर कधी त्यांच्यात पराकोटीची उत्सुकता दाटते. कधी माया ओसंडून वाहते. जबरदस्त देहबोली आणि अप्रतिम भावमुद्रा. ही भूमिका किशोर कदम ऐवजी कोण करू शकलं असतं असा विचार केला तर उत्तर सापडत नाही.

अंजली पाटीलने साकारलेलं पात्रही ताकदीचं. कमीत कमी स्क्रीन टाईम असूनही, वाट्याला अतिशय मोजके संवाद असूनही, केवळ भावमुद्रांच्या आधारे ही अभिनेत्री आपली छाप मनात उमटवते. अंजली पाटीलला पाहताना स्मिता पाटीलची आठवण होतेच होते. देहबोली, हावभाव, चेहरा याबाबत कमालीचा सारखेपणा आहे दोघींत.

दिलीप प्रभावळकर यांचं कास्टिंग मात्र काहीसं फसल्या सारखं वाटतं. हे पात्र खेड्यातलं वाटत नाही. त्यांचे उच्चारही कमालीचे स्वच्छ आहेत. छोट्या खेड्यात राहणाऱ्या पात्राची वाणी इतकी स्वच्छ, सदोष असेल हे पटत नाही. गिरीश कुलकर्णींच्या पात्रानेही बऱ्यापैकी निराशा केली. ही दोन पात्रे चक्क लुटुपुटूची, बेगडी भासतात. उमेश कुलकर्णींच्या गावाकडची पार्श्वभूमी असणाऱ्या ‘वळू’ मधे याच दोन कलाकारांनी किती जिवंत, अस्सल पात्रे वठवली आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘दिठी’ पाहताना या दोन पात्रांबाबत मोठा अपेक्षाभंग होते. अमृता सुभाष यांची भूमिका देखील कमालीची स्टिरीओटाईप आहे. एखादा कलाकार एखाद्या प्रकारची भूमिका साधारण कशी करेल याचे काही आडाखे आपण मनाशी बांधतो. तेच ते, त्याच-त्या प्रकारचं साचेबद्ध काम पहायला मिळतं तेव्हा कमालीची निराशा होते.

शशांक शेंडेंना छोटीशी पण महत्वाची भूमिका आहे आणि ते ती समरसून जाऊन करतात. झरझर बदलत जाणारा त्यांचा मुद्राभिनय अतिशय बोलका आहे. मोहन आगाशे आणि उत्तरा बावकर यांना अगदीच छोट्या भूमिका आहेत. वास्तविकत: ती दोन पात्रे नसती तरी काहीच फरक पडला नसता. अशा काही उणीवा ‘दिठी’ मध्ये नक्कीच आहेत. तरीही, किशोर कदम यांचा समर्थ अभिनय, दि.बा. मोकाशींची सशक्त कथा, धनंजय कुलकर्णींचे अप्रतिम छायांकन, पार्थ उमराणी यांचे परिणामकारक संगीत, साकेत कानेटकर यांचे पार्श्वसंगीत, सुमित्रा भावे यांचं दिग्दर्शन व कलादिग्दर्शन या सर्व घटकांचा मेळ सुयोग्यरित्या जमून आल्याने हा नवा चित्रपट, प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देतो.

आपण जगतोय ते विठ्ठलासाठी, ही तीस वर्षे इमानेइतबारे वारी केलेल्या रामजीची समजूत एका दु:खद क्षणी गळून पडते. ‘मीच का?’, ‘हे माझ्याच नशीबी का यावं?’ असे सर्वसामान्य देवभोळ्या माणसाला अडचणीत असताना कायमच पडतात, ते प्रश्न रामजीलाही पडतात. सुन्न झालेल्या, जगाचे भान नसलेल्या, तहानभूक हरपलेल्या रामजीला या घोर संकटातून बाहेर पडण्याकरताही विठ्ठलच मदत करतो. रामजीला पडणाऱ्या प्रश्नांमार्फत प्रेक्षकालाही वास्तवभान देतो. रामजीसोबत आपणही नकळत स्वतःचा शोध घेऊ लागतो. आपल्यासमोर असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील का, म्हणून पाहू लागतो. गाईच्या प्रसूतीदरम्यान रामजीला उलगडलेल्या विश्वाच्या रहस्यात रममाण होतो. मूळ संहितेत अत्यंत विचारपूर्वक केलेले बदल, किशोर कदम यांचा सहजसुंदर, अस्सल अभिनय, अप्रतिम पार्श्वसंगीत, तितक्याच तोलामोलाचं साउंड, लाईट वर्क यामुळे ‘दिठी’ प्रेक्षकाला वेगळ्या विश्वात नेतो. ज्ञानेश्वरीचे महात्म्य अधोरेखित करतो. वरकरणी साध्यासोप्या भासणाऱ्या पण गाभ्यात गहन असणाऱ्या आदिम प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करतो. या प्रश्नांचं प्राचीन काळापासून असणारं आस्तित्व दर्शवून कालचक्राची महती सांगतो. हा अनुभव किमान एकदा तरी आवर्जून घेण्याजोगा !

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0