साधेपणासह जगलेला उत्तुंग विचारवड

साधेपणासह जगलेला उत्तुंग विचारवड

“एखादी व्यक्ती नेहमीसाठी गुन्हेगार राहणे ही समाजासाठी लाजिरवाणी गोष्ट असली पाहिजे. सगळ्यांना सुधारण्याची संधी देणारा समाज संवादातून तयार होऊ शकतो”, असे डॉ. श्रीराम लागूंचे विचार क्रिमिनॉलॉजी करेक्शनल मेथड माहिती असलेल्या अभ्यासकाचे आधुनिक विचार आहेत.

मी आणि ‘गिधाडे’
सूर्य पाहिलेला माणूस गेला
कार्यकर्ते डॉ. लागू

देवाचे अत्यंत तटस्थ परीक्षण करून देवालाच माणूस करणारे श्रीराम लागू यांचे ‘देवाला रिटायर्ड करा’ हे विचारवाक्य माझ्यासह अनेकांना भावले. मनाचा ठाव घेणारी अनेक वाक्ये असू शकतात पण मनाचा व डोक्याचा एकाच वेळी ताबा घेऊन सद्सद्वविवेकाला जागे करणारे वाक्य मला डॉ. श्रीराम लागू यांच्या प्रेमात पाडणारे ठरले.

काल्पनिक श्रीराम आवळत जगणाऱ्यांना झिणझिण्या आणणारे हे वाक्य त्यांच्या जीवनाचा सूत्रविचार ठरला. श्रद्धा जोपासण्याचा स्वातंत्र्याचा अर्थ कोणत्याच श्रद्धा न जोपासता जगण्याचा हक्क असा सुद्धा आहे हे ठसविण्यासाठी त्यांचे जीवनच त्यांनी उदाहरण म्हणून प्रस्थापित केले. धर्म न मानणाऱ्यांच्या जगातील हा बादशाह माणूस सगळ्या सामाजिक परिवर्तनाच्या कामांशी नाळ जोडून उभा असतांना आपण बघितला.

मला त्यांनी नेहमी खूप सहकार्य केले. कारागृहात गरीब व गरजू कैद्यांसाठी काम करतांना मला मार्गदर्शन करणारे विजय तेंडुलकर, श्रीराम लागू व निळू फुले यांच्या सोबत झालेले संवाद मला तर्कसंगत करण्यासाठी कारणीभूत ठरले. विजय तेंडुलकरांना मी कारागृहातील कार्यक्रमांसाठी नेण्यात अपयशी ठरलो पण डॉ. श्रीराम लागू आवर्जून आले त्यानंतर एकदा निळू फुलेंना व सदाशिव अमरापूरकर यांना सुद्धा घेऊन गेलो होतो.

पुण्याच्या येरवडा जेलमध्ये भारतात सर्वप्रथम कैद्यांसाठी गांधी विचार परीक्षा सुरू केली. कैद्यांच्या मानसिक पुनर्वसनाचा प्रयोग म्हणून ही परीक्षा महत्त्वाचा मापदंड ठरली आहे. प्रसिद्ध व्यक्तींनी कारागृहात यावे, ज्यांच्या चेहऱ्यांना महत्त्व व ओळख आहे अशा लोकांनी कैद्यांशी संवाद साधतांना त्यांना माणूस भेटावा आणि चांगल्या वागणुकीची प्रेरणा मिळावी असा उद्देश होता. डॉ लागू आले, कैद्यांशी मनसोक्त संवाद साधला.

“तसे पाहिले तर आपण सगळेच कशाचे ना कशाचे गुन्हेगार आहोत. जे पकडले जात नाहीत त्यांना आपण गुन्हेगार म्हणत नाही. एखादी वाईट कृती जर गुन्हा असेल तर त्याची जाणीव होताच ती वागणुकीतून काढून टाकता येते. एखादा गुन्हा घडल्यावर जाणीव झाली तर मनापासून त्याचे वाईट वाटणे ही पहिली पायरी चढावी लागते. स्वतःशी तडजोड केली नाही तर स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणता येते. अनेकदा माणसांना त्यांना अपेक्षित असलेले जीवन सुद्धा नीट जगता येत नाही तेव्हा ते बेकायदा तसे जीवन मिळविण्याचा प्रयत्न करतात. गरिबी जर गुन्हेगारीची जननी असेल तर क्रांतीला जन्म देणारी सुद्धा गरिबीच आहे हे विसरू नका. स्वतःतील गुन्हेगारीचे समर्थन करणे आपल्याला थांबविता आले तर खरा समाज निर्माण होईल. बेकायदेशीरपणा वेगाने वाढतो, नेहमीसाठी कुणीतरी गुन्हेगार राहणे हा त्या व्यक्तिवरील कलंक आहेच पण एखादी व्यक्ती नेहमीसाठी गुन्हेगार राहणे ही समाजासाठी लाजिरवाणी गोष्ट असली पाहिजे. सगळ्यांना सुधारण्याची संधी देणारा समाज संवादातून तयार होऊ शकतो,’’ असे खूप छान प्रवाही विचार डॉ. लागूंनी कारागृहातील कार्यक्रमात मांडले होते.

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, माझे वडील बाळासाहेब सरोदे या वेळी उपस्थित होते. डॉ श्रीराम लागू यांनी त्यावेळी कैद्यांसमोर मांडलेले विचार म्हणजे क्रिमिनॉलॉजी करेक्शनल मेथड माहिती असलेल्या अभ्यासकाचे आधुनिक विचार मला वाटले.

२००७ मध्ये जेव्हा पुण्यात सुरेश कलमाडी खूप सक्रिय आणि ताकदवान होते व ते पिंपरी-चिंचवड मधील राजकारण सुद्धा हाताळत होते. तेव्हाच्या काळात सिनेसृष्टीतील अनेकांना निवडणूक प्रचारात आणण्याचा पायंडा त्यांनी पाडला. पिंपरी येथून एक तृतीयपंथी सुनील उर्फ दलजीत हा/ही महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर त्यांनी मला आग्रह केला की आपला प्रचार जोरात झाला पाहिजे असे काहीतरी करा. मी तेव्हा एचआयव्ही आणि कायदा तसेच तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी सुद्धा काम करीत होतो. मी डॉ. श्रीराम लागू यांना विनंती केली की तुम्ही या व्यक्तीच्या प्रचाराला यावे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मी कोणत्याच पक्षाची बाजू घेत नाही पण समाजातील वंचित आणि बहिष्कृत समजण्यात आलेल्या तृतीयपंथीयाने समाजाचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करणे ही सामाजिक अभिसरणाची सुरुवात आहे त्यामुळे मी प्रचारासाठी येईन असे ते म्हणाले. आम्ही एका खुल्या जीपमध्ये त्या उमेदवारासोबत पिंपरी चिंचवड भागात डॉ. लागूंना उभे करू रॅली काढली होती. तो उमेदवार निवडून येणार नाही हे माहिती असूनही प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे आणि कुणाच्या लैगिकतेच्या व्यक्तिगत निर्णय स्वातंत्र्याचा आपण इतर सगळ्यांनी आदर करावा हे ठासून सांगण्यासाठी डॉ. लागू स्वतः उघड्या जीप वर उभे राहून फिरले. समाज परिवर्तन छोट्या छोट्या अनेक गोष्टींमधून होईल याचा प्रचंड विश्वास त्यांना होता.

एकदा अमेरिकेतील महाराष्ट्र फौंडेशनचे सुनील देशमुख यांनी विविध क्षेत्रातल्या पुण्यातील काही युवकांना पॅनकार्ड क्लब येथे एका पार्टीसाठी बोलाविले होते. त्यावेळी डॉ. श्रीराम लागू, डॉ. नरेंद्र दाभोलकर सुद्धा होते. माझ्यासह सिनेक्षेत्रातील किरण यज्ञोपवित, अभिनेता संदेश कुलकर्णी, भक्तीप्रसाद देशमाने, मनीषा सबनीस, माझा भाऊ अमित सरोदे असे अनेकजण होते. पार्टी सुरू झाली, सगळेजण एकमेकांशी बोलत होते. तेव्हढ्यात तेथे दोन साधू व काहीजण अचानक आले. त्यांनी खूप मोठ्या आवाजात आरडाओरडा करीत विचारणे सुरू केले ‘कुठे आहेत डॉ. लागू? ते इथे आले आहेत असे आम्हाला कळले.’ आज त्यांच्याशी बोलायचेच आहे आम्हाला, देवाच्या विरोधात आहेत ना ते, देवाला रिटायर्ड करा म्हणून देवाचा व धर्माचा अपमान करतात कुठे आहेत ते? चमत्काराचा विरोध करतात, आम्ही चमत्कार करून दाखवितो त्यांना. त्यावर डॉ. दाभोलकर, मी व इतर काही मध्ये पडलो आणि त्यांना समजावले की असा आरडाओरडा करू नका, नंतर बोलू इत्यादी.

पण डॉ. लागू स्वतः पुढे आले ते म्हणाले मी आहे डॉ. श्रीराम लागू, माझ्याशी बोला. ते उद्धट सारखे प्रश्न विचारणे आणि त्यांच्या अंगावर गेल्यासारखे त्या साधू लोकांचे तेथे येणे डॉ. लागूंना आवडले नव्हतेच. डॉ. लागू त्यांना म्हणाले की मी देव चमत्कार इत्यादी मानायचा की नाही हा माझा प्रश्न आहे. तुमचे काय ते तुम्ही ठरवा पण एक सांगा तुम्हाला इथे येण्याची परवानगी कुणी दिली? ही खाजगी पार्टी आहे आणि केवळ निमंत्रितांसाठी आहे आधी तुम्ही इथून बाहेर निघा…असे म्हणतांना त्यांचा संपूर्ण चेहरा लाल होऊन हलत होता, त्यांची मान डुगडुगत होती. सुनील देशमुख आणि इतर सगळे निमंत्रित यांचा तेथे घोळका झाला. प्रकरण हाताबाहेर जातेय हे लक्षात येताच डॉ. दाभोलकरांनी सांगितले की ही आपलीच माणसे आहेत, त्याचवेळी साधूंनी त्यांच्या नकली दाढ्या काढल्या. हा बनाव किंवा गमतीसाठी केलेलं नाटक डॉ. लागू यांच्या लक्षात आले नव्हते. आपली भूमिका एखाद्या अहमिकेच्या प्रसंगी सुद्धा नीडरपणाने मांडायची हे डॉ. लागू यांच्याकडून जरूर शिकावे असे त्यावेळी आणि नंतर सतत वाटले.

अभिनेते नंदू माधव यांनी महाराष्ट्रात ‘सांगड’ नावाचा एक प्रयोग केला. सगळ्या पुरोगामी, वैचारिक लोकांना एकत्र आणण्याच्या ‘सांगड’च्या कार्यक्रमाला डॉ. श्रीराम लागू प्रकृती बरी नसतांनाही आले आणि त्यांच्यासोबत दीपा लागू सुद्धा होत्या.

डॉ. श्रीराम लागू यांचा भारदस्त आवाज, संवाद फेकीचे कौशल्य, ताकदवान अभिनय अशा अनेक गोष्टींबाबत कदाचित खूप चर्चा होतील पण त्यांनी अनेक मूलभूत सामाजिक कामांना जो वैचारिक आधार दिला, स्वतःचा चेहरा अशा अनेक रचनात्मक कामांसाठी अत्यंत नम्रपणे उपलब्ध करून दिला. अनेकदा त्यांच्याशी त्यांच्या घरी चर्चा झाली की ते स्वतः लिफ्टपर्यंत सोडायला यायचे. ‘डाऊन टू अर्थ’ म्हणजे काय असते त्याचा अर्थ समजलेला माणूस व त्यांच्या वागणुकीतून आपल्याला त्या शब्दाचा अर्थ समजेल अशा साधेपणासह जगलेला डॉ. श्रीराम लागू नावाचा एक उत्तुंग विचारवड आता आपल्यात नाही पण त्यांनी अनेकांना मुळं देऊन उभे केले आहे.

अॅड असीम सरोदे, मानवीहक्क वकील आणि संविधानतज्ज्ञ आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0