व्हिलेज डायरी भाग नऊ : आणि कैफीयती

व्हिलेज डायरी भाग नऊ : आणि कैफीयती

स्टोरी चेसिंग करत फिरणारी ती भरकटली अन त्या अथांग माळावर पोचली.. विकेंड अन कामगार महाराष्ट्र दिनाच्या लागून आलेल्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत..

नाणार रिफायनरी… आता हे अति झाले!
व्हिलेज डायरी भाग ४ तिथून इथपर्यंत
व्हिलेज डायरी : सुरुवातीची अखेर
द वायर मराठी घेऊन येत आहे वेब पोर्टल वर कधी न झालेला प्रयोग एक अस्सल, प्रदीर्घ लिखाण – दर सोमवारी सकाळी

वेब पोर्टल वर कधी न झालेला प्रयोग
एक अस्सल, प्रदीर्घ लिखाण ‘द वायर मराठी’वर

स्टोरी चेसिंग करत फिरणारी ती भरकटली अन त्या अथांग माळावर पोचली..
विकेंड अन कामगार महाराष्ट्र दिनाच्या लागून आलेल्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत..
तो तिथं बसलेला एकटाच..
चंद्र बघत.
ती म्हणली तू कोण
तो म्हणला मी विरलेला आवाज
ती म्हणली तू कुठला
तो म्हणला मातीच्या खालचा
ती म्हणली तू ईथं काय करतोयस
तो म्हणला शोधतोय विरलेला आवाज बुझलेलं अक्षर मोडलेली बाराखडी अन मिटलेली लिपी
तीला त्याची मजा वाटली
ती म्हणली तुझ्याकडं सगळी उत्तरं आहेत? मग सांग शून्याचा शोध कसा लागला अन त्याचा अर्थ काय..?
तिच्या डोळ्यात त्याचे काळेभोर विवरं रोखून बघत तो सांगायला लागला गोष्ट.. म्हणला ऐक,
“कधी माणूसही राहायचा त्या तुझ्या मागच्या गुहेत..
करून खायचा..
पिकवायला राबायचा..
त्यानं पिकवलेलं एकदा धून गेलं वरनं वाहिलेल्या पाण्याच्या सैतानात, राहिलेलं जनावरानी तुडीवलं..
इथनं तो पहात हुता त्या ईजात, पूर्वजांनी जपल्यालं समदं सपाट झालेलं..
सगळं हातातनं गेलं बाकी शून्य राहीलं हे आमचा तो गुहेतला पूर्वज सुन्न नजरेनं सांगायचा प्रयत्न करायचा..
सुन्न होणं काहीच नसण्यावरचं व्यक्त होणं होतं म्हणून त्याला शून्य म्हणायचं !”
तिला म्हणला पुढच्या चंद्राला तुला गोष्ट सांगतो चुकलेल्या गणिताची अन सरकारनं शिकवलेल्या लाल बाराखडीची ..
ती म्हणली थांबवं हे
तू लिपी पुन्हा मांडतोय…
मी भरकटतेय माझ्या धारणांपासून..
तुझं धोरण सरकारी नाहीयेचं मुळी.
तो हसला..
उठला आणि म्हणला,
सरकारनं मला हुकसवलंय माझ्या ७/१२-या वरनं
विचारवंतांनी मला सारलंय माझ्या ईन्फायनाईट पसरलेल्या आठवणीवरनं..
उद्योगांनी पळवलंय माझं अगणित क्युसेक्स घामाचं पाणी
समाजानं लुटलीय माझ्या तिची अब्रू सुख चुलीवरली गाणी..
सरकार समाज पुढारी उद्योजक विचारवंतांनी मला उलटं गाडलंय माझ्या अ-आ-ई मातीवर गिरवायलेल्या पोराच्या थडग्यावर
आता शिकवणाराय मी त्याला नवीन लिपी अक्षर ..
त्याला कुठं माहितीय तो मेलाय..
जित्यापनी पाटी देता आली नाही आता दिलीय पोटाची पाटी न बरगडी ची पेंशील..
माझी बाय भेटली कुठं अडकल्याली
तर निरोप दे पोरगं शिकतंय तुझं..
काळजी करु नगं, दुख गिळून जग..
येत जा डोंगरात लै भेटतील माझ्यावनी स्टोऱ्या..
समशानाच्या राखंतल्या
अन कबरीस्तानाच्या मातीतल्या
आम्ही फरक करत न्हाई गं
म्हणून गाडलो गेलो तिच्या मंगळसूत्रासहीत
बाभळीला माझ्या हातात हुतं माझ्या बायचं डोरलं
त्यांनी निष्कर्ष काढला मी भांडून तिला मारून फास घेतला
पर खरं सांगतो कांद्याच्या पट्टीतनं ते सोडवुन आणल्यालं
मला वसुली वाल्यांनी तुडवला
लैच लागल्यावर मान पडल्यावर झाडाला बांधला
अन माझ्या सातबाऱ्या वरनं मलाचं कोरा केला..
ती बघत राहिली शून्यात त्याच्या पूर्वजानं शोधलेल्या..
उठून अंधारात वाट तुडवत तो पुन्हा बाराखडी नव्यानं लिहायला निघाला..
तो राज्याचा घटक होता…
१०% नं काढून एकरात कसातर कांदा लावला.
घागरी-घागरीनं जगवला.
बारदाण्याचं फेडायला अन उरल्यालं दिस घालवायला शेवटी एकराचा तुकडा नंदीवाल्याकडं घाण टाकून आला.
पहिल्यांदाच डाळींबाचा घाट घातला,
१२० वरनं १२-१५ वर रेट आला,
काढायला सुदिक परवडीना म्हणून रात्री दिवसाचा तोडतोय एकटाच ..
प्रधान म्हणलेले लोकांना स्वस्त खायला देतो, पलीकडच्या द्राक्ष वाल्याचा आणि याचा तिसरा लागोपाठ आला.
जनावराला टाकलेल्या कोथिंबीर शेपू मेथी टमाटी चा वास येणाऱ्या रस्त्यांनं जाणार्या गाड्यातल्या लोकांना समृद्धीचा वाटतोय..
तुरीवर जगण्याचा डाव खेळला त्यांच्या कफनाला बारदाना गेला.
जगायच्या शर्यतीत पळताना त्याला बघायला कोण नव्हतं. ना टाळ्या वाजवायला ना उचलायला.
रातच्याला वावरात गेला.
आलाच नाही.
त्याच्या जमिनीवर धरणांचा घाट घातला, त्यानं त्यासास्ठी सोडल्या जमिनी, विस्थापित झाला, आज धरण बांधील झाली उद्योगांची. जमिनी पुन्हा घेतल्या गेल्या उद्योगांना, घेतल्या जातायत अन घेतल्या जातील त्याला पाय ठेवायला शिल्लक राहणार नाही तोपर्यंत.
वीझतात या चुली त्यांच्या धनीला
पण विसावतील कायमच्या आता तिसऱ्यानंतरही
तिला फुंकर घालणारी शेवटची ती सुद्धा संपलीय
हुकसून लावलीय त्याच्या समाधीला उखडून फेकत
तिच्या पदरावरून समृद्धीचा रस्ता जाणार आहे,
अन त्याच्या थडग्यावर नवशहरं उभी राहणार आहेत.
शेवटची ती उचलून नेली जाणार आहे शहरांच्या लखलखाटात प्रदर्शित ठेवायला.
……….

त्या माळावर आंधळा म्हातारा वरडतो एक..
रोज रातीला…
राब राबून भाकरीला भाकरी जोडून नाग घेतल्याला पाच न अर्ध्या एकराचा हत्तीच्या मस्तकावनी आडवा.. त्यात डौलानं करून खाणारी षटकोनी वस्ती..
कुडातनं पत्र्यात आलेली स्वप्नं..
बैलजोडीवनी दोन उमदी पोरं..
गाव म्हणायचं तात्या-जिजीनं बांधाला पीठ पुरलंय जिझलेल्या हाडाचं..
बैलाच्या जोडीला रोटर फन फाळ आला, सायबानं जमीन करायला गळ्यात घातली..
केळीच्या सावलीत तात्या झुकल्याला अभिमानानं, गावाच्या खळ्यावरचा काड येचुन वाकल्याली जीजी सुरकतल्याल्या हातानं लालभडक कांदं निवडून बारदानं भरत व्हती..
तुरीच्या परत्येक शेंगंला पोतं लावलंय काय वं म्हणत बाया हसायच्या, माल घिऊन थोरला गेला, पोटुशी तिच्या पदराला गाठ मारून..
लाल तुरीच्या लाल कांद्याच्या लाल टमाट्याच्या लाल नोटा काय आल्या न्हाईत अन आटलेल्या लाल रक्तात उधारीचा हिशेब मिटला न्हाई..
रोजगार हटला न्हाई, संसार वधारला न्हाई..
केळीनं पाताळात गाडलं १०० पिढ्यानंतर मुंडकं वर काढलेल्या तात्या कुणब्याला…
उरलं सुरलं उताऱ्यासहीत सायबाच्या हिशोबात फिरलं..
मागच्याला मिळलं म्हणत म्हणत थोरल्यानं कासरा धरला..कासरा सोडवायला खाकीनं एकरभर माळ गिळला..
वस्तीला ऊन लागलं
पाणी जिरलं..
छावणीच्या वाटनं धाकलं उपाशी गेलं..
फकस्त कासरं म्हागारी आली..!
धक्क्यात जीजी गेली..
बांधाच्या समांधीला नजर खीळवून तात्या अंधाऱ्या बुबुळानं माळावर निजला उध्वस्त माळावरली षटकोनी वस्ती बघायच्या आधी नजर गेली देवा उपकार झालं म्हणत…
जनमभर गावाच्या खळ्यात हुब्यानं ताटल्यालं भाकरीवरचं म्हातारं उघड्या डोळ्यांनी बघितल्यालं सुख आठवत आडत्यापसनं चावडीच्या सायबाचा उद्धार करत वरडतं..
“ए आयघाल्याऊ..
बघा बघा माझी खोंडं बैलजोडी धरून देवाच्या दारातनं चालल्याती..”
आणि मग मागं राहीलेल्या थोरलीचं मुसमुसनं एका अमर दुःखाची रिदम तयार करतं..
त्या माळावर आंधळा म्हातारा वरडतो एक..
रोज रातीला…
………

मातीपाण्यातनं उजाडलाय घामात भिजल्याल्या सूर्य…
आमच्या थंड पडलेल्या हाडांना पेटवून त्या वणव्यात ढकलून देऊ या शोषक समाजसत्तेच्या बेडीला..
कधी.. कधीकाळी ही शहरं आमची भावकी होती..
शेतीच्या द्यूतात आम्ही बायका पोरं पणाला लावली आणि माती सहित सगळं सगळं हरलो..
नजरेनं रंगावरनं खताची मात्रा ठरवणारा आर्जुन, राक्षसाच्या ताक्तीचा नांगर वढत ट्रॅक्टर बैलजोडी समद्या लावजम्यात दिवसरात्र रानं तयार करत खपणारा भीम, राबणारी दोघं, राबणाऱ्या आय बहिणी बायका सासा सुना चुलत्या अन माल यार्डात ईकुन बँका सावकार मजूर कामगार भाडं बिलं सारायला स्टँड पसनं १५-१५ किलोमीटर फाटक्या चपलीत चालत फिरल्याला धर्मराज …
हांडगा भीष्म झोपलाय तसाच सत्तेच्या खिळ्यांवर, कर्ण जन्मातच विस्थापीत झाल्याला कॉन्व्हेंट ला..
या भावकीच्या शहरांनी पांडुरंगा आम्हाला देशोधडीला लावून लुबाडून वरबडून वनवासाला पाठीवला, आया बहिणींच्या आब्रूला हात घालून..
पाण्याच्या घोटासाठी धा रूपयचा च्या प्यावं लागतोय म्हणून उपाशीपोटी हात हलवत आल्याला धर्मराज तोंड दाखवायच्या नामुश्किनं अज्ञातवासात गुप्त झाला..
बंधाऱ्यांला मुडदा कुणाचातर सापडला म्हणत्याती….
या मातीपाण्यात उतरलाय त्याचा शेकडो रातपाळ्यात अंधारात आतनं पेटल्याला थंड आत्मा..
युनागूयुगे या राज्यातल्या मातीत थंड पडलेल्या आमच्या जन्मजन्मांच्या शोषित कुणब्यांच्या हाडांची आणय तुला न मला ईट्टला, तडपडत वावर लांब करत थंड झोपलेल्या धर्मराजाच्या आत्म्यावर रज ठिवलंय या समाजसत्तेनं अन्यायाचं..
त्याचं उट्टं व्याजासाहित फेडल्याशिवाय, या शहरा शहरातनं आमच्या आया बहिणीच्या पदरावरनं गेलेल्या महामार्गाला उखाडत बळीचा नांगर यांच्या उरावर चालवून त्या रक्ताचा अभिषेक राज्यभराच्या वावरत पदर ईस्कटून पडलेल्या द्रौपदीला घातल्याशिवाय मुक्ती नाही तुला न मला..
नाहीतर
नाहीतर ती आग झोपलेल्या बुद्धाला गदागदा हालवून जागं करील..
ती कंपनं लुप्त तुक्याच्या अनुरेणूंना हादरवून टाकतील..
मातीपाण्यातनं उजाडलाय रातपाळीत भिजल्याला सूर्य..
……..

टाईम टू किल मधला हॅरी वोनर म्हणजे सुखवस्तू समाजाचं एक प्राकृतिक रूप असावं, जेक वर कार्ल ली च्या केस मुळे अगदी घराच्या मूडद्यावर बसून रडण्याची वेळ येते. सर्वस्व पणाला लावलेल्या या माणसाला हॅरी म्हणतो तू ही केस सोड, ड्रॉप कर.. तू मला इंस्पायर करतोयस आणि विश्वास ठेव इंस्पायर न होण्या इतका टोकाच्या पठारअवस्थेवर पोहोचलेला मी माणूस आहे.
भारतातल्या शेतकर्यांची अवस्था जेक पेक्षा विदारक झालेली आहे, हा वर्ग इथल्या पठार अवस्था प्राप्त झालेल्या वर्गाला इंस्पायर करतोय गेल्या दशकभरापासूनच तर अधिकच. एनजीओ चा खच नि त्यातून होईल त्या प्रकारे मदत करण्याचा (?) प्रयत्न जोराला आला आहे.
३,२०,००० + आत्महत्या आजघडीला जगातील कोणत्याही फिल्ड ला ग्लॅमर मिळवून देणाऱ्या आहेत. पाण्याची साबणाची जाहिरात असो नाहीतर सरकारं असो किंवा कोणीही.
३,२०,००० + शहीद शेतकरी आहेत हे, एका एकावर एक एक सिनेमा होईल, अरबो खरपो कमाई होईल.
एका अनइंस्पायरेबल मोठ्या गटाला या आत्महत्या लुभावतायत कंटेंट म्हणून, मार्केट म्हणून, प्लॅटफॉर्म म्हणून.
काळजी नसावी, वर्षाला यात पटीत वाढ होत राहील, सर्व दुकानं चालू राहतील. सूट बुटातल्या खतं बियाणं ते ट्रॅक्टर च्या जाहिरातीत दिसणाऱ्या एक्सपर्ट्स पासून ते एनजीओ मध्ये चमकणाऱ्या टीशर्ट जीन्स मधल्या तारे तारकांपर्यंत.
शेवटचा शेतकरी मेल्यावर मात्र तुमची सोय तुम्ही लावा बा, कारण ही वाहनं खतं बियाणं मोटरा ही यंत्रसामग्री हे शेतकरी सोडून कोण घेईल?
………

हुभी फूट पडलीय
तुम्हाला दिसत अशील का नाही माहीत नाही. आयफोन महाग आहे सर्वसामान्यांसाठी नाही म्हणणारा एक मोठा वर्ग आहे आणि युरियाची पिशवी म्हाग झालीय परवडीना म्हणनारा दुसरा वर्गाय.
नेमकं कोण सामान्य तेच समजत नाहीये.
उत्पन्नाच्या १ ते १० % खर्च हा अन्नधान्य भाजीपाला यावर करताना त्यात किंचित वाढ झाली तर हगवण लागणारा एक वर्ग आहे तर एका मागं एक पिकं मातीत चालली असताना सुद्धा तोंडागांडीला फेस येईस्तोवर राबून फाटक्या पर धुतलेल्या कपड्यात छत्रपती सन्मान योजनेत फॉर्म भरायला २००-२०० रुपये देऊन लाचार थोबाड घिऊन ढोंगी आशेला बघत पुन्हा रातपाळीला पायात हाडापतुर घुसलेला काटा घिऊन मेंदूच्या झिंझिण्यात डोळं मिटून हुबारलेला एक वर्ग हाय.
फेसबुक च्या शुभ्र इभ्रतीबाहेरचा हा वर्ग जागतिक केंद्रीय किंवा राज्यातील राजकारणाच्या समाजकारणाच्या अर्थकारणच्या दृष्टीने अभ्यासाच्या पलीकडे गेलेला आहे.
सरकारं बदलली की कायतर मिळतंय पिकाला थोडंफार एवढाच राजकारणाचा अभ्यास इंटरेस्ट असणारा हा वर्ग मानवी सुखसोयी किंवा मानवी उत्क्रांतिच्या रुपरेषेपासून फार फार दूर गेलेला आहे आणि जातोय. टाईम बबल मध्ये अडकलेला हा समाजगट आहे, यांच्यासाठी उत्क्रांती काबाडकष्टाच्या पलीकडे गेलेले नाही अजूनही.
स्वातंत्र्या नंतर अजूनही हा वर्ग झगडतोय अन्न अन्न आणि अन्नासाठी, वस्त्र अन निवऱ्यासाठी झगडणं या वर्गाने सोडुन दिलेलं आहे.
भेंचोद तुम्ही प्रगती मोजताय जीडीपी, बुलेट ट्रेन, रस्ते, आरोग्य, झगमगाटात..
हा वर्ग सर्व सर्व गोष्टींच्या पलीकडे गेलाय. इव्हेंट हॉरिझॉन च्या पलीकडे असलेल्या या वर्गाला ब्लॅक होल च्या दुसऱ्या बाजूला काय घडतंय किंवा दुसऱ्या बाजूला काहीतरी शुभ्र आहे याचीही कल्पना नसलेला किंबहुना कल्पना न होऊ दिलेला हा वर्ग नक्की मानव आहे की आणखी कोणी हा विषय गंभीर अभ्यासाचा आहे..
आणि तिकडे दुसर्या बाजूला एक वर्ग आहे, आयफोन सर्वसामान्यांना परवडणारा नाही म्हणनारा. कदाचित मोठं दुखणं असावं आयफोन न परवडणं, खतं बियाणं किंवा जगणं न परवडन्यापेक्षा.
तो चाललाय सगळ्या सगळ्या पार्टीकल्स ला छेदून प्रत्येकाच्या जगण्यावर थुकून..
गुणगुणत दुःखं..
येणाऱ्या अंधाराला सरायला सरपण खांद्यावर घेऊन..

क्रमशः
आकाश शिवदास चटके सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकरी आहेत. लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

 

 

 

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0