प्रवर्तन संचालनालय अर्थात ईडीचे वरिष्ठ अधिकारी राजेश्वर सिंह यांचा क्रमांक एनएसओ ग्रुप या इझ्रायली स्पायवेअर फर्मच्या एका भारतीय क्लाएंटने पाळत ठेवण्य
प्रवर्तन संचालनालय अर्थात ईडीचे वरिष्ठ अधिकारी राजेश्वर सिंह यांचा क्रमांक एनएसओ ग्रुप या इझ्रायली स्पायवेअर फर्मच्या एका भारतीय क्लाएंटने पाळत ठेवण्यासाठी निवडलेल्या यादीत आढळला आहे. द वायर आणि सहयोगी संस्थांच्या पिगॅसस प्रकल्पातून ही माहिती समोर आली आहे. सिंह यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील काही स्त्रियांचे क्रमांकही या यादीत आढळले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव म्हणून काम केलेले भारतीय प्रशासकीय अधिकारी व्ही. के. जैन यांचेही फोन क्रमांक या यादीत आढळले आहेत. याशिवाय पंतप्रधान कार्यालय व नीती आयोगाच्या प्रत्येकी किमान एका सदस्यांचे संपर्क तपशील पिगॅसस प्रकल्पामध्ये फोडण्यात आलेल्या डेटाबेसमध्ये आढळले आहेत.
राजेश्वर सिंग यांच्यावर २०१७ सालापासून २०१९ सालापर्यंत पाळत ठेवण्यात आली असावी असे डेटाबेसवरून दिसत आहे. संभाव्य लक्ष्यांच्या यादीत त्यांच्या पत्नीचा क्रमांक नंतर आला असावा. त्यांच्या दोन बहिणींचे क्रमांकही या यादीत आहेत. त्यातील एक आभा सिंह पूर्वी आयएएस अधिकारी होत्या. आता त्या मुंबईत वकिली व्यवसायात आहेत. आभा यांनी त्यांच्या हॅण्डसेटचे फोरेंजिक विश्लेषण करण्यास परवानगी दिली आहे. फोन्सचे तांत्रिक परीक्षण झाल्याखेरीज तो हॅक झाला की नाही हे सिद्ध करणे अवघड आहे हे द वायर व अन्य पिगॅसस प्रोजेक्ट सदस्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे.
राजेश्वर सिंह टूडी घोटाळ्याशिवाय अन्य अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणे हाताळत होते. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती यांचा संबंध असलेल्या एअरसेल-मॅक्सिस कराराची चौकशी तेच करत होते. सिंह यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका रजनीश कपूर नावाच्या व्यक्तीने दाखल केली होती. हा चौकशी लांबवण्याचा प्रयत्न आहे असा दावा करणारी अवमान याचिका सिंह यांनी दाखल केली होती. चिदंबरम यांच्या विरोधातील चौकशीमुळेच आपण संकटात सापडल्याचे सिंह यांचे म्हणणे होते. तत्कालीन केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांच्यावरही सिंह यांनी घोटाळेबाजांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला होता. सध्या सिंह लखनौ येथील ईडी कार्यालयात कार्यरत आहेत. सिंह हे सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांचे निकटवर्तीय समजले जात होते. वर्मा यांच्या साथीने राकेश अस्थाना यांच्या विरोधातील वातावरण तयार केल्याचा आरोप भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने सिंह यांच्यावर केला होता. अस्थाना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक वरिष्ठ भाजप नेत्यांच्या जवळचे समजले जातात.
सिंह यांचे क्रमांक पिगॅसस प्रोजेक्टच्या डेटाबेसमध्ये आढळल्यामुळे वर्मा यांना लक्ष्य करण्याचाही हा एक भाग असू शकतो अशी शंका घेण्यास जागा आहे. आमच्यापैकी प्रत्येक जण महत्त्वाची प्रकरणे हाताळत आहे, असे आभा सिंह यांनी ‘द वायर’ला सांगितले. मात्र सर्व भावंडांनी सुरुवातीपासून व्यावसायिक आयुष्य खासगी आयुष्यापासून वेगळे ठेवल्याचेही त्या म्हणाल्या. आभा स्वत: महत्त्वाच्या केसेस हाताळत आहेत आणि भाजपच्या त्या नेहमीच उघड टीकाकार आहेत. अशा पद्धतीने वकिलांचे फोन हॅक करणे हे वकील व पक्षकारांमधील संवादाच्या पावित्र्याचे उल्लंघन आहे असा आरोपही त्यांनी केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे एके काळचे मुख्य सल्लागार व्ही. के. जैन यांचाही फोन क्रमांक या यादीत आहे. २०१८ मध्ये ते मुख्यमंत्र्यांचे सल्लागार होते, त्याच काळात त्यांचा क्रमांक या यादीत आल्याचे फुटलेल्या डेटाबेसमध्ये दिसून आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या योजना राबवण्यात जैन यांचा मोठा वाटा होता. ‘द वायर’ने जैन यांच्याशी संपर्क केला पण त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. दिल्लीच्या मुख्य सचिवांवर आम आदमी पार्टीच्या दोन आमदारांनी केलेल्या कथित हल्ल्यानंतर लगेचच जैन यांचा क्रमांक या यादीत आल्याचेही दिसत आहे. जैन यांनी मार्च २०१८ मध्ये कौटुंबिक कारणांसाठी सेवेचा राजीनामा दिला होता.
केंद्र सरकारची धोरणे निश्चित करणाऱ्या नीती आयोगाच्या एका वरिष्ठ सदस्यांचा क्रमांक या यादीत आढळला आहे. ‘द वायर’ने या व्यक्तीशी बोलून क्रमांकाची पुष्टी करून घेतली आहे. मात्र, सध्या ही व्यक्ती सरकारच्या यंत्रणेमध्ये काम करत नसल्याने तिच्या विनंतीवरून तिचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.
सध्या पंतप्रधानांच्या कार्यालयात उपसचिव म्हणून कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचा क्रमांकही पिगॅसस यादीत आढळला आहे. या व्यक्तीची संभाव्य लक्ष्य म्हणून २०१७ साली निवड करण्यात आली असावी असा अंदाज आहे. एनएसओ ग्रुपच्या भारतीय क्लाएंटने या व्यक्तीमध्ये रस दर्शवला, तेव्हा तिच्यावर पंतप्रधानांच्या दौऱ्यांची सर्व जबाबदारी होती.
या नोंदींमध्ये आढळलेल्या मोबाइल क्रमांकावरच ‘द वायर’ने या व्यक्तीशी संपर्क साधला. मात्र, ही यादी अचूक आहे की नाही व आपला क्रमांक यात आहे की नाही हे माहीत नाही, असा दावा या अधिकाऱ्याने केला. आपल्यावर पाळत ठेवली जावी एवढे महत्त्वाचे आपण नाही, असेही हा अधिकारी म्हणाला.
COMMENTS