कोल्हापूर उत्तरमधील विधानसभा पोटनिवडणूक बऱ्याच बाजूंनी चर्चेची आणि चुरशीची असेल यात वाद नाही. महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप या सोबतच पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यात ही चुरस असणार आहे. तर कोल्हापूरमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाटील आणि महाडिक गटासाठी देखील ही निवडणूक चुरशीची असणार आहे.
विधानसभेची कोणतीही पोटनिवडणूक ही प्रत्येक पक्षासाठी खूप महत्त्वाची असते. साधारणपणे विद्यमान आमदार ज्या पक्षाचा असतो त्याच्याच कुटुंबियातील एका व्यक्तीला उमेदवारी देऊन सहानुभूतीच्या लाटेखाली निवडणूक जिंकणे हे सर्वच पक्षांकडून होते. काही ठिकाणी सहानभूतीची मात्रा कामी येत नाही. जसे की पंढरपूर येथील पोटनिवडणुकीत झालेला प्रकार. सध्या राज्याचे लक्ष कोल्हापूरमधील एका पोटनिवडणुकीकडे लागले आहे. कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे या जागेवर ही पोटनिवडणूक होत असून गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.
ही निवडणूक बऱ्याच बाजूंनी चर्चेची आणि चुरशीची असेल यात वाद नाही. महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप या सोबतच पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यात ही चुरस असणार आहे. तर कोल्हापूरमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाटील आणि महाडिक गटासाठी देखील ही निवडणूक चुरशीची असणार आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतांची आकडेवारी मोठी असणार यात शंका नाही. या मतदारसंघात शिवसेनेचा मोठा वर्ग आहे. हा वर्ग काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करतोय की नोटाला मतदान करून भाजपला फायदा करून देईल हे निकालानंतर स्पष्ट होईल. पण आजवरचा इतिहास पाहता कट्टर शिवसैनिक काँग्रेसला पाठिंबा देणार का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण कारण शिवसेनेचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ही जागा काँग्रेसकडे जाण्यावरून नाराजी व्यक्त केली होती. १९९० पासून २००४ आणि २०१९चा अपवाद वगळता या जागेवर कायम शिवसेना निवडून आली आहे. २०१४मध्ये शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनीच काँग्रेसचे सत्यजित कदम यांचा पराभव केला होता. भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हेच कदम सध्या भाजपचे उमेदवार आहेत. आणि ते कोल्हापूर दक्षिण मधील उमेदवार असूनही भाजपने त्यांना उत्तर मधून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून या मतदार संघात दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. ज्या जागेवर ज्या पक्षाचा आमदार होता. त्याच पक्षाकडे ती जागा कायम राहणार असल्याचं महाविकास आघाडी सरकारचे सूत्र आहे. असं असतानाही कोल्हापूर उत्तर मतदार संघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा संघर्ष निर्माण होणार असल्याची चिन्ह होती. कोल्हापूर उत्तर मतदार संघ काँग्रेसला सोडण्यावरून राजेश क्षीरसागर यांनी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली होती. या मतदार संघात भाजपचा पराभव करण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार असावा अशी मागणी करत शिवसेना समर्थकांनी क्षीरसागर यांच्या घरासमोर घोषणाबाजी केली. त्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणा असं सांगितल्याने या वादावर तूर्तास तरी पडदा पडला आहे.
यापूर्वी डिसेंबरमध्ये विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करत भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. पण या वेळी मात्र सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या बिनविरोध करण्याच्या प्रयत्नाला भाजपने साथ दिली नाही. उलट सत्यजित कदम यांच्या रूपाने तुल्यबळ उमेदवार दिला. एकीकडे चार राज्यांत मिळालेल्या यशामुळे भाजप जोमात आहे. त्यातच शिवसेनेतील कुरबुरीचा पडद्यामागून भाजपला फायदा होईल का हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रत्येक दिवशी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यावर होणाऱ्या कारवाई आणि आरोपांमुळे काँग्रेससह इतर पक्षांना अडचणीत आणण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. चार राज्यातील विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात भाजपच्या ताब्यात एकही जागा नाही त्यामुळं भाजपकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार आहेत.
काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना अण्णा म्हणून ओळखले जायचे. कोरोना काळात आरोग्य सुविधांसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या जाधव यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा दाखला देत काँग्रेसक़डून भावनिक आवाहन केले जाण्याची शक्यता आहे. यासाठी ‘अण्णांच्या माघारी आता आपली जबाबदारी’ अशी टॅगलाईन सध्या प्रचाराचे आकर्षण आहे. पण असे असले तरी केवळ सहानुभूतीच्या जोरावर विजय मिळण्याबद्दल ठाम सांगणं अवघड आहे. यामागं राष्ट्रवादी काँग्रेसचा पंढरपूरमध्ये झालेल्या पराभवाचा अनुभव लक्षात घ्यावा लागेल. सत्ता आल्यानंतर कोरोनाच्या काळात कुणालाही फार ठोस कामगिरी करता आली नाही. त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक सोपी नाही. परिणामी विकासाच्या मुद्द्यावर फार काही ठाम बोलण्यासारखे सध्या तरी मोठे मुद्दे नाहीत. त्यात भाजपची आक्रमक भूमिका धोक्याची घंटा आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला सोबत न घेता भाजप निवडणुकीच्या मैदानात किती यश मिळवते याची ही चाचपणी असणार आहे.
भाजपचे उमेदवार सत्यजित कदम हे महापालिका राजकारणातील अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. कदम यांच्या घराण्याला कित्येक वर्षांचा राजकीय इतिहास आहे. २०१४च्या निवडणुकीत कदम हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी कदम यांचा पराभव केला होता. केंद्रातली सत्ता, चार राज्यातील विजय, शेतकरी कायदे, ईडी सारख्या यंत्रणांचा वापर अशा अनेक मुद्यांमुळे भाजप आक्रमक आहे. तर या निवडणूकीत सहानुभूतीचा फायदा काँग्रेसला होईल अशीही शक्यता काही राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. चंद्रकात जाधव यांच्या अकाली निधनाने त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याची साद काँग्रेसकडून घातली जाईल. या सहानुभूतीला खास करून महिला वर्ग प्रतिसाद देईल असे सांगितले जाते.
एकीकडे महाविकास आघाडीतील सर्व पक्ष विरूद्ध भाजप असा संघर्ष सुरू असताना ही पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष ताकदीने निवडणूक मैदानात उतरणार. शरद पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह सरकारमधले मंत्री, आमदार इथं प्रचाराला येणार आहेत. तर भाजपकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर विजय मिळवण्याची जबाबदारी असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर याच वेळी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहे. सध्या सुरू असलेल्या या घडामोडींचा परिणाम या पोटनिवडणुकीवर होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार असला तर पूर्णच महाविकास आघाडी सर्व ताकदीनिशी या मैदानात उतरणार अशी चिन्हे दिसत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि आमदार यांच्यासह लोकसभा खासदारांनी कोल्हापूरसाठी आणलेल्या निधीचा प्रचार मध्ये उल्लेख होईल. काँग्रेसकडून रस्ते, पाणी योजना असे विकासाचे मुद्दे पुढे केले जातील. तर भाजपकडून भ्रष्ट कारभारावर टिका करण्यात येईल. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याचा पुरेपूर वापर करण्यात येईल असे राजकीय जाणकारांना वाटते.
कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या या जागेसाठी १२ एप्रिलला मतदान होणार असून १६ एप्रिलला मतमोजणी होईल. मंगळवेढा मतदार संघात दिवंगत आमदार भारत भालके यांच्या मुलाचा भाजपने पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं या मतदार संघात मोठं नाव होते. त्यांनी तिथं कामंही केली होती. असं असताना भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांचा भाजपच्या समाधान आवताडे यांनी पराभव केला. हा अनुभव पाहता कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक काँग्रेससाठी अटीतटीची लढाई होणार आहे.
अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार आहेत.
COMMENTS