एन्काउंटर कायद्याप्रमाणेच : सायबराबाद पोलिस कमिशनर

एन्काउंटर कायद्याप्रमाणेच : सायबराबाद पोलिस कमिशनर

हैदराबादमधील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या प्रकरणातील चार आरोपींचे शुक्रवारी पहाटे पोलिसांनी एन्काउंटर केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले

विकास दुबे एन्काउंटरः सर्व आरोपी पोलिसांना क्लिनचीट
बनावट एन्काउंटर : अराजकाचे राज्य
उन्मादी समाजमन…आत्मघाताच्या वाटेवर!

हैदराबादमधील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या प्रकरणातील चार आरोपींचे शुक्रवारी पहाटे पोलिसांनी एन्काउंटर केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. शुक्रवारी दिवसभर या एन्काउंटरच्या समर्थनात व पोलिसांच्या कथित न्याय देण्याच्या प्रयत्नावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. केंद्रीयमंत्री मनेका गांधी यांनी झालेली घटना दुर्दैवी असून पोलिसांनी असे एन्काउंटर सुरू केल्यास न्यायालयाची गरज राहणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. तर भाजपच्या खासदार उमा भारती यांनी पोलिसांनी आरोपींचे केलेल्या एन्काउंटरमुळे मनाला समाधान मिळाल्याचे विधान केले. तर सायबराबाद पोलिस कमिशनर व्ही. सी. सज्जानार यांनी हे एन्काउंटर कायद्याप्रमाणेच घडल्याचे स्पष्ट केले.

शुक्रवारी दुपारी सायबराबाद पोलिस कमिशनर व्ही. सी. सज्जानार यांनी एक पत्रकार परिषद घेऊन झालेल्या घटनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ज्या ठिकाणी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली त्या ठिकाणी चार आरोपींना आणून तेथील पुरावे जमा करण्याचा पोलिसांचा उद्देश होता. पोलिसांचे पथक आरोपींना घेऊन साडेपाचच्या सुमारास घटनास्थळी आले. पोलिसांना मयत डॉक्टर महिलेच्या काही वस्तू मिळाल्या. या सर्व घटना घडत असताना आरोपींचे हात बांधलेले नव्हते. त्या वेळी दोन आरोपींनी पोलिसांचे पिस्तुल हिसकावले व गोळ्या झाडल्या. त्यात दोन पोलिस जखमी झाले. गोळ्या झाडल्यानंतर चारही आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असतात अन्य पोलिसांनी आरोपींवर गोळ्या झाडल्या व त्यांना ठार मारले. या सर्व घटना केवळ ५ ते १० मिनिटांत घडल्या.’

मानवाधिकार आयोग तपास करणार

हैदराबाद एन्काउंटरचे वृत्त देशभर पसरताच समाजातल्या विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली. मानवाधिकार आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेत या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलिसांचे एक पथक स्थापन करून चौकशी केली जाणार असल्याचे घोषित केले आहे. हे पथक घटनास्थळी पुन्हा जाऊन या एकूण प्रकरणाची चौकशी करेल व आपला अहवाल मानवाधिकार आयोगाला सादर करणार आहे.

दरम्यान मानवाधिकार आयोगाच्या कोणत्याही चौकशीसमोर आपण सामोरे जाण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया सायबराबाद पोलिस कमिशनर व्ही. सी. सज्जानार यांनी दिली. कायद्याप्रमाणेच सर्व घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0