ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका रोमहर्षकरित्या जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी उंचावेल अशा आशा पल्लवीत झाल्या असतानाच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय खेळाडूंचे चुकले कुठे याचा परामर्श घेणारा हा लेख..
इंग्लंडचे गेल्या काही मालिकेतील स्पृहणीय यश, कर्णधार जो रुटची तळपती बॅट, नुकताच झालेला श्रीलंकेचा यशस्वी दौरा या पार्श्वभूमीवर वर्षाच्या सुरवातीचा इंग्लंड – भारत दौरा चर्चेत आहे. भारताच्या ऑस्ट्रेलियावरील कुरघोडीमुळे (तीही नवख्या खेळाडूंना घेऊन) दोन्ही यशस्वी चमूत होणारी झुंज चांगलीच रंगणार ही चाहत्यांची अपेक्षा आणि जाणकारांचे भाष्य ठरते आहे. इंग्लंडकडे रूट, स्टोक्स, बटलर सारखे फलंदाज, जोफ्रा आर्चर, अँडरसन सारख्या द्रुतगती गोलंदाजांच्या साथीला बेस, लिच सारखे फिरकी गोलंदाज असल्याने कुठल्याही खेळपट्टीवर आपले अधिराज्य ते सहज गाजवू शकतील असा विश्वास इंग्लिश कॅम्पला नक्कीच आहे. भारत घरगुती मैदानावर खेळणार आणि जुन्या खेळाडूंची वापसी होणार त्यामुळे भारतीय कंपूमध्येही आत्मविश्वास असणे साहजिकच. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी स्पर्धा शेवटच्या टप्प्यावर असल्याने व स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी इंग्लंड – भारत कसोटी मालिकेवरच अवलंबून असल्याने या कसोटी मालिकेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. रूट, स्मिथ, विलियम्सन आणि कोहली हे जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज, त्यातील दोघे एकमेकांविरुद्ध खेळणार आणि तेही कर्णधार म्हणून, ही चुरस सुद्धा रंगणार हेही निश्चितच. क्रिकेट हा नवनवीन विक्रम प्रस्थापित करण्याचा खेळ, तेही या मालिकेचे आकर्षण ठरणार. अशा आकर्षक पार्श्वभूमीवर ५ फेब्रुवारीला मालिकेचा श्रीगणेशा प्रेक्षकाशिवाय चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झाला. पहिल्या दोन कसोटी चेन्नई तर उर्वरित सामने अहमदाबाद इथे आयोजित होणार आहेत.
चेन्नईची खेळपट्टी सुरवातीपासूनच फिरकी गोलंदाजांना साथ देते असा इतिहास असल्याने कुठलाही संघ चौथ्या डावात फलंदाजी करण्याची गरज भासू नये असा विचार करणे योग्यच. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेणे हा कार्यभाग रुटच्या पदरात पडला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी निवडली. चेपॉकच्या खेळपट्टीने भारतीयांना आपला रंग दाखविणे सुरू केले. पहिल्या दिवशी खेळपट्टीने द्रुतगती तसेच फिरकी गोलंदाजांना साथ दिली नाही. अधेमधे चेंडू खाली राहणे याशिवाय काहीच घडत नव्हते. सुरवातीला आश्विन आणि बुमराहने बर्न्स आणि लॉरेन्सला लवकर बाद करून भारताचा वरचष्मा राखण्याचा प्रयत्न केला. रुटने सिबलीला साथीला घेऊन पहिल्या दिवशीच्या शेवटी इंग्लंडच्या धावसंख्येला आकार दिला. स्वतःच्या शंभराव्या कसोटीत शतक झळकावून रूटने श्रेष्ठता सिद्ध केली. खेळपट्टीवर बराच वेळ काढून त्याने उर्वरित फलंदाजांचे काम सोपे केले. दुसऱ्या दिवशी सिबली, रूट, बटलर, बेस ह्याच्या योगदानामुळे इंग्लंडने ५७८ धावांचा डोंगर रचला. रुटने द्विशतक (२१८) ठोकले आणि शंभराव्या कसोटीत सर्वोच्च धावा काढणारा विक्रमवीर ठरला. भारताची सुमार गोलंदाजी आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण इंग्लंडच्या मदतीला धावून आले. रुटचे द्विशतक बऱ्याच काळापर्यंत लक्षात राहील. ज्या अभ्यासूवृत्तीने रूट खेळला ते खरोखरीच कौतुकास्पद. पहिल्या डावात भारताची गोलंदाजी प्रभाव पाडू शकली नाही. विराट कोहलीने तिन्ही DRS चा वापर केला पण एकही यशस्वी राहिला नाही, त्यावरून गोलंदाजीतील निष्प्रभता आणि गडी बाद करण्याची अगतिकता दिसून आली.
भारत इंग्लंडच्या ५७८ धावसंख्येचा दडपणाखाली फलंदाजीला उतरला. रोहित, गिल, विराट आणि रहाणेला अवघ्या ७३ धावांवर बाद करून इंग्लंडने सुरवातीची लढाई जिंकली. जोफ्रा आर्चरने पहिले दोन खेळाडू बाद करून भारतीय फलंदाजीला तडा दिला. बेसने विराट आणि अजिंक्यला बाद करून भारतावर फॉलोऑनचे सावट गडद केले. पुजारा आणि पंतच्या चांगल्या आणि आक्रमक खेळींमुळे फिरकी गोलंदाज पुढील फलंदाजांवर हावी होऊ शकले नाही. पुजाराचे नाट्यमय पण दुर्दैवी पद्धतीने बाद होणे हे इंग्लंडच्या पथ्यावरच पडले.
पंत नैसर्गिक क्रिकेट खेळतो आणि धावसंख्येला आकार देतो. अलीकडे तो सातत्याने नव्वदीत बाद होतो. मोठी खेळी खेळण्याचा संयम पंतच्या फलंदाजीत येईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. सुंदर आणि आश्विनच्या भागीदारीने फॉलोऑन टाळता येईल की काय असे वाटू लागताच आश्विन लिचच्या उत्कृष्ट चेंडूवर बाद झाला. सुंदरची एकाकी झुंज भारताची फॉलोऑनची नामुष्की टाळू शकली नाही. सुंदरच्या फलंदाजीतील संयम आणि एकाग्रता वाखाणण्यासारखी असून भारतीय चमूला एक चांगला खेळाडू मिळाला हे मात्र नक्की. इंग्लंडच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा केलेला वापर आणि क्षेत्ररक्षकांनी दिलेली साथ हाच दोन्ही संघांच्या पहिल्या डावातील फरक ठरला. रूट आणि अँडरसन यांनी घेतलेले झेल अप्रतिम होते. अशक्यप्राय झेल घेतल्याने प्रतिस्पर्ध्यावर कसा अतिरिक्त दबाव येऊ शकतो हे भारतीय क्षेत्ररक्षकांनी लक्षांत घेणे अत्यावश्यक राहील. दोनशेच्या वर बढत स्वीकारून भारताला इंग्लंडला दुसऱ्या डावात लवकर बाद करणे खूप आवश्यक होते.
इंग्लंड दुसऱ्या डावात जलद धावा करण्याचा प्रयत्न करेल हे अपेक्षित होते. नेमक्या ह्याच गोष्टीचा फायदा घेत भारताने इंग्लंडचा दुसरा डाव १७८ डावात गुंडाळला. आश्विनने दुसऱ्या डावात इंग्लंडचे सहा गडी बाद केले. इशांतने कसोटी क्रिकेटमध्ये तीनशेवा बळी लॉरेन्सला बाद करून मिळविला. भारत उण्यापुऱ्या १०० षटकात ४२० धावांचे ओझे बाळगत चौथ्या दिवशी शेवटच्या तासात फलंदाजीला उतरला. कसोटीचा पाचव्या दिवशी षटकामागे चारच्या सरासरीने धावा काढणे कठीणच. भारताने चौथ्या दिवशी ३९ धावा काढल्या, पण रोहितला गमावून.
पाचवा दिवशी काय लिहून ठेवले आहे, भारत सामना वाचवू शकेल?, इंग्लंड भारताला सर्वबाद करेल का? की ऑस्ट्रेलियातील कामगिरी लक्षात घेता भारतीय फलंदाजी ४२० धावा काढून सामना जिंकू शकेल काय? हे प्रश्न उराशी बाळगत क्रिकेट रसिक कसेबसे झोपले असतील. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे हे परत एकदा सिद्ध झाले. काय असेल पाचव्या दिवशीचा थरार…..
पाचव्या दिवशी गिल आणि पुजाराने सावध सुरुवात केली. ही जोडी जमते न जमते तोच सातव्या षटकात लिचने पुजाराला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. भारतीय फलंदाजांना खेळपट्टीवर कधी उसळणाऱ्या तर कधी खाली राहणाऱ्या चेंडूविरुद्ध खेळणे जड जाईल असे वाटू लागले. लिच आज लयीत होता. अचानक रुटने अँडरसन कडे चेंडू फेकला. अँडरसनचा अनुभव आणि रिव्हर्स स्विंगने भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. २७व्या षटकातील अँडरसनच्या दोन अप्रतिम चेंडूंनी उत्तम खेळत असलेल्या गिल आणि रहाणेचा त्रिफळा उडवून सामना इंग्लंडकडे झुकविला. भारत जिंकणार नाही हे नक्की झाले. पंत आणि आश्विन बाद झाल्यावर सामन्यात केवळ औपचारिकता उरली. कोहलीची ७२ धावांची खेळी उपयोगी ठरली नाही. भारताचा २२७ धावांनी पराभव झाला.
नाणेफेक जिंकून इंग्लंडच्या कर्णधाराने जी अविस्मरणीय खेळी केली ती निर्णायक ठरली. खेळपट्टी जाणून घेण्यास रुटला ती खेळी उपयोगी ठरली. रूटने भारताच्या दोन्ही डावात गोलंदाजांचा वापर अतिशय कौशल्यपूर्वक केला. अँडरसन आणि आर्चर यांना न थकविता योग्य वेळी गोलंदाजी दिल्याने भारतीय वातावरणात त्यांचा जोम टिकून राहिला. बेस आणि लिचने नवोदित असूनही आपले काम चोख बजावले. इंग्लंडचे क्षेत्ररक्षण अप्रतिम होते. अशक्यप्राय झेल घेऊन त्यांनी खेळावरची पकड ढिली होऊ दिली नाही. एकेकाळी फिरकी गोलंदाजी लीलया खेळून काढणारे भारतीय फलंदाज इंग्लंडच्या फिरकीसमोर नमले. खेळपट्टीवर टिकून राहणे भारतीय फलंदाजांना शक्य झाले नाही. पहिल्या कसोटीत झालेला पराभव भारताला बरेच कांही शिकवून जाणार हे नक्की. गिल सुरुवात चांगली केल्यावर पन्नाशीत बाद होतो. रोहित, अजिंक्य अपेक्षेप्रमाणे खेळू शकले नाही. भारताचे क्षेत्ररक्षण अतिशय सुमार होते. इंग्लंडच्या पहिल्या डावात भारतीयांनी सोडलेले झेल महागात पडले. रूटचे खेळातील डावपेच उजवे ठरले. सर्व क्षेत्रात इंग्लंडचे पारडे जडच ठरले. दुसरी कसोटी चेन्नईत १३ फेब्रुवारीपासून सुरू होईल, कदाचित खेळपट्टी बदलल्या जाईल. ऑस्ट्रेलियातील विजयाच्या पार्श्वभूमीवर हा पराभव चाहत्यांना जास्त जाणवेल. सर्वच क्षेत्रात भारत सुधारणा करेल अशी आशा बाळगू.
COMMENTS