‘एसेज ऑन कंटेम्प्ररी इंडिया’ – समकालीन भारताच्या प्रश्नांची चर्चा

‘एसेज ऑन कंटेम्प्ररी इंडिया’ – समकालीन भारताच्या प्रश्नांची चर्चा

सद्यस्थितीमध्ये भारतीय राज्यघटनेपुढे निर्माण झालेली आव्हाने, स्वातंत्र्य लढ्याचे विकृतीकरण, स्वातंत्र्य लढ्यातील सहभागी व्यक्तींबाबत पराकोटीचा द्वेष तयार करणे, ही आव्हाने भारतीय लोकशाही समोर निर्माण झाली आहेत. या सर्व कट्टरतावादाचा मुकाबला कसा करायचा, वैचारिक लढाई कशी करायची याबाबत “एसेज ऑन कंटेम्प्ररी इंडिया” हा ग्रंथ लोकशाही सबळ आणि समृद्ध करण्यासाठी विविध चर्चा करतो. म्हणूनच हा ग्रंथ मराठीत येण्याला निश्चितच महत्त्व आहे.

भारतीय इतिहासाचे भाष्यकार प्राध्यापक बिपन चंद्र यांच्या ‘एसेज ऑन कंटेम्प्ररी इंडिया’ या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचा विजय तरवडे यांनी केलेला अनुवाद चेतक प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. या ग्रंथाची पहिली आवृत्ती आणि दुसरी आवृत्ती यामध्ये काही फरक आहे, दुसऱ्या आवृत्तीमध्ये काही महत्त्वपूर्ण विषयावरील लेखांची भर पडलेली आहे. त्यामुळे ही आवृत्ती अधिक प्रश्नावर चर्चा करणारी ठरली आहे. या अनुवादित ग्रंथामुळे मराठी साहित्यातील सामाजिक, राजकीय  विषयावरील अनुवादित साहित्यात महत्त्वपूर्ण भर पडली आहे.

या ग्रंथाच्या अनुवादाचे महत्त्व दोन कारणांनी आहे. एक म्हणजे भारतीय इतिहास लेखनामध्ये प्राध्यापक बिपन चंद्र यांचे असलेले महत्त्वाचे स्थान आणि दुसरे म्हणजे ‘एसेज ऑन कंटेम्प्ररी इंडिया’ या अनुवादित झालेल्या ग्रंथाचे महत्त्व. प्राध्यापक बिपन चंद्र हे आधुनिक भारताचा, स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास लिहिणारे एक अत्यंत महत्त्वाचे असे इतिहासकार आहेत. त्यांच्या ग्रंथांचे अनेक भाषांत अनुवाद झालेले आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अनेक पैलू आणि त्याच बरोबर स्वतंत्र भारतातला या लढ्याचा वारसा याबाबत बिपन चन्‍द्र यांनी अनेक पिढ्यांचे ज्ञान समृद्ध केलेले आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि म. गांधी त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढा आणि नेहरू, समाजवादाची संकल्पना, वसाहतवादाचा विकास, धार्मिक कट्टरतावाद अशा अनेक संदर्भामध्ये त्यांचे इतिहास लेखन आहे. विशेष करून ‘राईज अंड ग्रोथ ऑफ इकॉनोमिक नॅशनालिझम’ या अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तकात वसाहतवादावर टीका केलेली आहे.

भारतीय इतिहास हा विविध दृष्टिकोनातून लिहिला जातो. अगदी प्राचीन काळापासून ते सद्यस्थिती पर्यंत अनेक दृष्टिकोनातून भारताचा इतिहास देशी व परदेशी इतिहासकारांनी लिहिलेला आहे. विशेष करून स्वातंत्र्योत्तर काळाबद्दल बरेच संदर्भ उपलब्ध असल्याने या काळाबद्दल बरेच महत्त्वपूर्ण लिखाण झाले आहे. या लिखाणामध्ये प्राध्यापक बिपन चंद्र यांच्या विविध ग्रंथाचा समावेश करावा लागेल.

इतिहासाला अलीकडच्या काळात राजकीय महत्त्व ही आलेले आहे. संकुचित राष्ट्रवादी दृष्टिकोनातून इतिहासाचे विकृतीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बिपन चंद्र यांचे इतिहास लेखन निश्चितपणे हे विकृतीकरण खोडण्यासाठी, त्याचा प्रतिवाद  करण्यासाठी सहाय्यभूत होते. बिपन चंद्र यांनी विपुल इतिहास लेखन केलेले आहे. भारताचा स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष आणि त्याचा वारसा याबद्दलचा समज त्यांच्या इतिहास लेखनामुळे खूप स्पष्ट होत जातोच पण त्याचबरोबर समृद्धही होत जातो. मार्क्स आणि गांधी या दोघांबद्दलही त्यांना आपुलकी आहे. भारतीय राष्ट्रवाद आणि स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीमध्ये या राष्ट्रवादाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. बिपन चंद्र हे लोकप्रिय प्राध्यापक होते. परंतु त्यांचा निधार्मिकतेवर प्रचंड विश्वास होता आणि एक विचारवंत म्हणून त्यांनी कायमच कट्टरतावादाचा विरोध केला. कट्टरतावादाचे योग्य आकलनच धर्मांध राजकारणाचा पराभव करू शकेल असा त्यांचा विश्वास होता. या संदर्भातील “आधुनिक भारतातील संप्रदायवाद” हे त्यांचे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे, राजकीय कार्यकर्त्यामध्ये ते लोकप्रिय आहे. वसाहतवाद आणि धर्मावर आधारित राजकारणाबरोबरच स्वातंत्र्योत्तर भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नही इतिहासाच्या संदर्भात त्यांना महत्त्वाचे वाटत राहिले. एका धर्मनिरपेक्ष राष्ट्रांमध्ये हे प्रश्न कसे तयार झाले याचीही त्यांनी स्पष्ट मांडणी केली आहे आणि हे लेखन राजकारणी, राजकीय पक्ष, इतिहासाचे विद्यार्थी, धोरणकर्ते सर्वांनाच कायम दिशा देणारे राहिले.

९०च्या दशकापासून भारतीय समाजामध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या रूपाने मोठ्या प्रमाणावर बहुसंख्याकांचा कट्टरतावाद वाढीला लागला. २०१४मध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर या मूलतत्ववादाचे नवे आक्रमक आणि क्रूर स्वरूप दिसू लागले. या सर्व काळात भारताचा वसाहतकाळ, राष्ट्रवादाची संकल्पना, भारतीय राज्यघटना, घटनात्मक मूल्ये, जातीव्यवस्था आणि जातीय अत्याचार, वाढत्या जातीय अस्मिता अशा अनेक प्रश्नाबरोबरच भारतीय इतिहासाबद्दल त्याची मोडतोड करून इतिहासाचे विकृतीकरण करून धर्माधर्मात तेढ वाढविण्याचा अत्यंत आक्रमकपणे प्रयत्न चालू आहे. इतिहासाचे अभ्यासक्रम, शालेय व महाविद्यालयीन पातळीवरचे  अभ्यासक्रम बदलण्याचाही यामध्ये समावेश आहे. यामुळे भारताची सर्वसमावेशक संस्कृती, भारताची घटनात्मक मूल्ये, बंधुता, सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता या सर्वालाच आव्हान तयार झाले आहे आणि म्हणून भारताच्या इतिहासाचे आकलन, समज याबद्दल नवी आव्हाने तयार झाली आहेत. ही आव्हाने वसाहत काळापासूनही होती परंतु आता त्याला एक नवे परिमाण प्राप्त झाले आहे.

इतिहास लेखनाचे विविध दृष्टिकोन आहेत. ब्राह्मणी इतिहास लेखन, संकुचित राष्ट्रवादातून केलेली इतिहासाची चुकीची मांडणी या पार्श्वभूमीवर बिपनचंद्र हे कायमच त्यांच्या लिखाणातून राष्ट्रीय एकता, निधार्मिकता, कट्टरतावादाचा विरोध, व्यापक सर्वसमावेशक राष्ट्रवाद याबाबत मार्गदर्शन करत राहतात. आज नवीन शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली जेव्हा अभ्यासक्रम बदलण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि इतिहास विषयक पुनर्लेखन होणार आहे अशा काळामध्ये बिपन चंद्र यांची अनेक पुस्तके मार्गदर्शक ठरणार आहेत. पुनर्लेखनाविषयी प्रश्न करताना, या पुनर्लेखनातील सत्य तपासताना ती मार्गदर्शक ठरणार आहेत. म्हणूनच बिपन चंद्र यांच्या लेखनाचे महत्त्व केवळ इतिहासाचे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी यांच्या पुरते मर्यादित न राहता आजच्या मू कट्टरतावादाला आणि संकुचित राष्ट्रवादाला वैचारिक मार्गांनी तोंड देताना त्यांचे लिखाण सहाय्यकारी, मार्गदर्शक राहते. त्यांचे लिखाण केवळ महाविद्यालयीन अभ्यासक्रमांसाठी उपयुक्त होते असे नाही तर शालेय अभ्यासक्रमासाठीही त्यांनी एनसीईआरटीतर्फे इतिहासाची पाठ्यपुस्तके व अभ्यासक्रम तयार केले आणि आज हे सर्व बदलण्याचा खटाटोप चालू आहे. बिपनचंद्राचे महत्त्व हे त्यांच्या लिखाणातून व्यापक राष्ट्रवादी जाणिवेचे नागरिक व विद्यार्थी घडवणे, शिक्षक घडविणे यामध्ये आहे आणि म्हणून त्यांची पुस्तके मराठीत येणे ही खरोखरच एक महत्त्वाची घटना आहे.

एसेज ऑन कंटेम्प्ररी इंडिया’ या ग्रंथात तीन खंड असून या तीनही खंडात समकालीन भारतातील प्रश्नांची चर्चा केलेली आहे. समकालीन म्हटलं गेलेला हा कालखंड १९४७ ते १९९०च्या दशकापर्यंत आहे. या कालखंडात निर्माण झालेले सामाजिक, राजकीय आणि आर्थिक प्रश्न गंभीर रूप घेऊन १९९० नंतरच्या काळामध्ये अवतरलले आहेत त्यामुळे या कालखंडातील प्रश्नांची चर्चा ही आत्ताचे प्रश्न, त्याची मुळे समजून घेण्यामध्ये अत्यंत मार्गदर्शक ठरते.

पहिल्या खंडामध्ये प्रामुख्याने जात आणि जातीयवादाविरुद्ध संघर्ष तसेच भारतीय राष्ट्रवाद आणि बुद्धिजीवी यांची भूमिका यावर चर्चा आहे. दुसऱ्या खंडामध्ये कट्टरतावादाविषयी प्रामुख्याने चर्चा आहे. तिसर्‍या खंडामध्ये भारतातील डाव्यांसमोरची आव्हाने याचा मुख्यत: विचार केलेला आहे.

पहिल्या खंडात एकूण १० लेख असून यामध्ये १९४७ मधला भारत म्हणजे स्वातंत्र्य मिळालेल्या काळामधला भारत, त्यानंतर ४७ ते ९० या दशकात भारत याची मांडणी आहे. या काळामध्ये जात, जातीयवादाच्याविरुद्ध संघर्ष, आरक्षण आणि आर्थिक विकास हे प्रश्न तयार झाले. यावरही या पहिल्या खंडात चर्चा आहे. याच काळामध्ये दलित राजकारणाने वेगळी दिशा घेतली. त्यामुळे दलित आणि भारतातले आजचे राजकारण याबाबतची चर्चा आहे. १९९० च्या दशकामध्ये भारतीय राष्ट्रवादाला अनेक आव्हाने तयार झाली. धर्मनिष्ठ राष्ट्रवाद आला आणि जाणीवपूर्वक आणि आक्रमकपणे त्याचा प्रचार प्रसार करून समाजजीवनावर प्रभाव टाकण्याचा हिंदुत्ववादी शक्तींनी निकराचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे भारतीय राष्ट्र आणि भारतीय राष्ट्रवाद या विषयावर या पहिल्या खंडात महत्त्वपूर्ण चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतातल्या बुद्धिजीवीची भूमिका यावरही बिपन चंद्र एका लेखाद्वारे मार्गदर्शन करतात.

खंड २ मध्ये कट्टरतावादाविषयी एकूण १६ लेख आहेत. यामध्ये कट्टरतावादाच्या विविध पैलूंची चर्चा केली आहे. स्वतंत्र भारतातील कट्टरतावाद विशेष करून अलीकडील काळातील रामजन्म आणि बाबरी मशीद संबंधीच्या गुंतागुंतीची सविस्तर चर्चा केली आहे. याच संदर्भात अयोध्येनंतर पुढे काय याविषयीही चर्चा केली आहे. मूलतत्व वाद व कट्टरतावादातील फरक दाखवून दिला आहे. कट्टरतावादाची चर्चा करताना आरएसएस आणि भाजपविषयी चर्चा आवश्यक आहे. बिपनचंद्र ती करतात. कट्टरवादाचा विचार करताना इतिहासाची आणि पाठ्यपुस्तकातला इतिहास याची चर्चा अपरिहार्य आहे आणि या खंडात ती सविस्तरपणे केली आहे. या ग्रंथातील दुसरा खंड सद्यस्थितीत निर्माण झालेली आक्रमक  धर्मांधता, राज्यसंस्थेचा व केंद्रातील सत्ताधार्‍यांचा पाठिंबा व अल्पसंख्याकाबाबतचा द्वेष या संदर्भात निश्चितपणे महत्त्वाचा आणि मार्गदर्शक आहे.

खंड तिसरा हा प्रामुख्याने भारतातील डाव्या चळवळी, चीन आणि एकूणच समाजवाद  याविषयी चर्चा करणारा  आहे. यामध्ये एकूण ६ लेख आहेत. आणि नव्या सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर भारतासमोरील आव्हाने याची चर्चा करणारा आहे. या खंडात चीनमधील विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि गांधींच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन याची तुलना केली आहे. या मधील सर्वात महत्त्वाचा लेख म्हणजे समाजवाद एका स्वप्नाची अखेर? हा आहे. समाजवाद संपला असे वाटत असताना दृष्टिकोन म्हणून समाजवाद शाश्वत आहे, १९९०चे दशक हे समाजवादाची अखेर नसून आरंभ आहे असे प्रतिपादन त्यांनी केले आहे हे नक्कीच महत्त्वाचे आहे. समाजवादाविषयी त्यांनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले  आहे.फक्त कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांनी समाजवाद स्वीकारला नसून गांधी, नेहरू आणि सुभाषचंद्र बोसांनीही स्वीकारला आहे. त्यामुळे नवी समाजवादी चळवळ यांनाही श्रेय देईल. त्यांचे हे निरीक्षण सद्यस्थितीत खूप महत्त्वाचे आहे. समाजवादाविषयी, त्याच्या आशयाविषयी त्यांनी लिहिले आहे.

सद्यस्थितीमध्ये भारतीय राज्यघटनेपुढे निर्माण झालेली आव्हाने, स्वातंत्र्य लढ्याचे विकृतीकरण, स्वातंत्र्य लढ्यातील सहभागी व्यक्तींबाबत पराकोटीचा द्वेष तयार करणे, ही आव्हाने भारतीय लोकशाही समोर निर्माण झाली आहेत. या सर्व कट्टरतावादाचा मुकाबला कसा करायचा, वैचारिक लढाई कशी करायची याबाबत हा ग्रंथ लोकशाही सबळ आणि समृद्ध करण्यासाठी विविध चर्चा करतो. म्हणूनच हा ग्रंथ मराठीत येण्याला निश्चितच महत्त्व आहे.

विजय तरवडे हे स्वतः एक सिद्धहस्त ललित लेखक आहेत. त्यामुळे या अनुवादामध्ये एक ओघवती शैली राहिली आहे. राजकीय आणि सामाजिक टिपणी असलेल्या गंभीर विषयावरच्या  लेखनाचा हा अनुवाद निश्चितपणे विषयाला न्याय देतोच परंतु ओघवत्या शैलीमुळे तो रटाळ न वाटता अत्यंत वाचनीयही झाला आहे. बिपन चंद्र यांची इंग्रजी लिखाणाची शैली ही सोपी, सहज आणि ओघवती आहे. मूळ लिखाणाचा ओघ जसाच्या तसा आणण्यास विजय तरवडे यांनी खूपच कष्ट घेतलेले दिसतात. हा ग्रंथ मराठीत आल्यामुळे तो जसा स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, इतिहासाचे विद्यार्थी यांना उपयुक्त आहे तसाच, सहजसोप्या मराठीमध्ये अत्यंत गंभीर प्रश्नांची चर्चा आल्यामुळे मराठी भाषिक राजकीय कार्यकर्त्यांनाही हा ग्रंथ निश्चितपणे संदर्भासाठी उपलब्ध झालेला आहे.

अनुवाद सहज सोपा करण्यामध्ये अनेकदा मूळ आशयातील तर्कसंगती, केलेल्या विवेचनातील मुख्य मुद्दा हरवण्याची, त्याचा वेगळा अर्थ मांडला जाण्याची शक्यता असते, परंतु तरवडे यांनी मूळ लिखाणातील ही तर्कसंगती तसेच विवेचनाचा मुख्य गाभा कुठेही सोडलेला नाही आणि असे करताना ओघवती शैली, सोपी भाषा, मराठीतील योग्य पारिभाषिक शब्द वापरलेले आहेत हे, या अनुवादाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

एसेज ऑन कंटेम्प्ररी इंडिया’
प्रा. बिपन चंद्र
अनुवाद : विजय तरवडे
चेतक प्रकाशन

COMMENTS