शनिवारचे हत्याकांड हे अबिये अहमद यांच्या राजकीय सुधारणावादाला एका गटाकडून तीव्र विरोध असल्याचे चिन्ह असून अबिये अहमद यांची प्रशासनावरील पकडही ढिली करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.
यादवीग्रस्त इथिओपियाचे लष्करप्रमुख जनरल सिएरे मेकॉनेन हे शनिवारी देशविरोधी कट उधळवत असताना ठार झाले. इथिओपियाच्या उत्तरेकडील अम्हारा प्रांतात देशविरोधी कट रचल्याचे लक्षात आल्यानंतर सिएरे मेकॉनेन व त्यांचे सहकारी तेथे गेले होते. या सर्वांची बैठक सुरू असताना अम्हारा प्रांताचे सुरक्षा प्रमुख असामिन्यू सिगे बैठकीस्थानी पोहचले आणि त्यांनी बैठकीतील उपस्थितांवर गोळीबार केला.
या गोळीबारात लष्करप्रमुख सिएरे मेकॉनेन, इथिओपिया लष्करातील काही वरिष्ठ अधिकारी व अम्हारा प्रांताचे गव्हर्नर अम्बाच्यु मेकॉनेनेही ठार झाल्याचे वृत्त इथिओपियाच्या पंतप्रधान निवासातून देण्यात आले. इथिओपियाचे पंतप्रधान अबिये अहमद यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या हत्याकांडानंतर असामिन्यू सिगे बेपत्ता झाल्याचे काही सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान अबिये अहमद यांनी सिगे यांनाच या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार ठरवले अाहे. सिगे यांचा हा हल्ला देशाच्या घटनेवर असून बंडखोरांना शांतता प्रक्रिया उधळवयाची आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
गेल्या वर्षी इथिओपियाच्या पंतप्रधानपदी अबिये अहमद निवडून आले होते आणि काही महिन्यात त्यांनी अनेक राजकीय कैद्यांची सुटका व त्यांच्यावरील खटले मागे घेतले होते. काही राजकीय पक्षांवरची बंदीही त्यांनी मागे घेतली होती. पण इथिओपियाच्या यादवीत मानवाधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या काही लष्करी अधिकाऱ्यांवर त्यांची कारवाई सुरू होती.
शनिवारचे हत्याकांड हे अबिये अहमद यांच्या राजकीय सुधारणावादाला एका गटाकडून तीव्र विरोध असल्याचे चिन्ह असून अबिये अहमद यांची प्रशासनावरील पकडही ढिली करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते.
इथिओपियाच्या उत्तरेकडील अम्हारा प्रांतात अम्हारी भाषा बोलणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. पण या प्रांतात अम्हारा व गुमूझ अशा दोन वांशिक गटात अनेक वर्षे संघर्ष सुरू आहे. गेल्याच महिन्यात या दोन वांशिक गटात हिंसाचारहून डझनहून अधिक नागरिक ठार झाले होते.
बहुतांश हिंसाचार हे जमीन वादातून घडतात. पण शनिवारच्या घटनेला राजकीय पदर असून लष्करातील एक असंतुष्ट गटही यामागे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात लष्करातील एका गटाच्या हजारो सैनिकांनी पंतप्रधानांच्या निवासास्थानासमोर जाऊन पगारवाढीवरून निदर्शने केली होती. या सैनिकांनी मागण्या मान्य न झाल्यास पंतप्रधानांना जीवे मारण्याचीही धमकी दिली होती.
(छायाचित्र – इथिओपियाचे पंतप्रधान अबिये अहमद.)
COMMENTS