विकासाचा चेहरा- सिंगापूर

विकासाचा चेहरा- सिंगापूर

सिंगापूर हा देश म्हणजे पूर्वेकडच्या भागातील न्यूयॉर्क. मनोरंजन, चंगळवाद तरी कष्टाळू लाईफ स्टाईल, युनिव्हर्सल स्टुडिओज, नाईट सफारी यांमुळे चकाकी असणारा हा विकसित देश भारतीयांना नेहमीच आकर्षित करत आला आहे.

चिनी विकासाचे तैवान मॉडेल
व्हिलेज डायरी – सुरवात….
जम्मू-काश्मीर आणि लडाख : दुभाजनानंतरची आव्हाने

आलिशान, नयनरम्य एअरपोर्टमधून बाहेर पडल्यावर दिसणारी कमालीची शिस्त, स्वच्छ रस्ते, नीट नेटके रस्ते आणि रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथ, झाडे लक्ष वेधून घेतात. सर्व वाहने एका वेगाने वाहतुकीचे सर्व नियम पाळत पुढे जाताना दिसतात. विकासाची संकल्पना येथे पूर्ण झालेली दिसते. शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीनेही सिंगापूर अव्वल दर्जा असणारा देश आहे. त्यामुळे अनेक तरुण तरुणी येथेच शिक्षण घेतात आणि स्थायिकही होतात.

सिंगापूर हा पूर्वी मलेशियाचा भाग होता आणि एकत्र मलेशियाची पेनंग ही राजधानी होती. भारतामध्ये जसे इंग्रज हे ईस्ट इंडिया कंपनीद्वारे भारतात घुसले, तसेच त्यांनी मलेशियामध्येही केले होते.

स्टॅम्फर्ड राफेल्स या ब्रिटीश गव्हर्नरने १८१९ साली सिंगापूरमध्ये शिरकाव केला आणि संपूर्ण मलेशिया ताब्यात घेतले. त्याला ब्रिटीश मलाया म्हंटले जाऊ लागले. सिंगापूर हे बेट त्यावेळी मासेमारी करणारे एक गाव होते. जेंव्हा इंग्रज सर्वप्रथम येथे आले, तेव्हा या बेटावर फक्त एक हजार एवढीच लोकसंख्या होती. तेही मलाय आदिवासी किंवा गावकरी होते. सिंगापूर हे बेट किंवा बंदर म्हणून ब्रिटिशांना खूप फायद्याचे होते. त्यानंतर या बेटाची लोकसंख्या वाढू लागली चीनहुन अनेक लोक येऊ लागले. मिरीची लागवड सुरु झाली. रबराची शेतीही होऊ लागली आणि इंग्लंडकडे निर्यात होऊ लागली. पुढे १९४२ मध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानने सिंगापूरला ताब्यात घेतले. १९५९ साली स्वतःचे सरकार स्थापून सिंगापुर हा स्वतंत्र देश झाला. इथे प्रामुख्याने मलेशियन, तमिळ, चायनीज लोकांचा प्रभाव दिसतो. त्यामुळे भाषाही कँटनिज, मलय, तमिळ बोलल्या जातात.

सिंगापूर हे एक छोटे बेट असल्याने आणि समुद्राने वेढले असल्याने सिंगापूरची वाढ उभी होत आहे असे जाणवते. मोठ्या उंच इमारती लक्ष वेधून घेतात. बेटाचा आकार हा बेताचा असला, तरी लोकसंख्या त्या मानाने खूप आहे. लोकसंख्या वाढल्याने साहजिकच, जंगले तोडली गेली आणि पर्यावरणाचा असमतोल जाणवू लागला. तो सावरण्यासाठी अनेक इमारतींच्या गच्चीवर बागा दिसतात. काही महत्वाच्या बागा हरित पट्टे म्हणून सरकारने राष्ट्रीय संपत्ती घोषित केले आहेत. पिण्याचे पाणीही या देशाला आजूबाजूच्या देशांकडून आयात करावे लागते.

आम्ही जेव्हा एअरपोर्टवर पोहचलो, तेंव्हा आम्हाला घ्यायला तमिळ ड्रायव्हर आला होता. या देशात साधारण दहा टक्के लोक हे भारतीय वंशाचे आहेत. हा ड्रायव्हर अगदी मोजके बोलत असे. राम गोपाल वर्माच्या चित्रपटातील शूटर सारखे, त्याच्या चेहऱ्यावरील भाव अत्यंत गंभीर असायचे. आम्ही आमच्या ‘हॉटेल बॉस’मध्ये पोहचलो, तेंव्हा विविध देशातील लोक त्या ठिकाणी दिसत होते.  आता ‘विकास’ केंद्रस्थानी असल्याने जगभरातून लोक येथे उद्योग, धंदा, नोकरीसाठी आलेले आहेत त्यामुळे मिश्र संस्कृती दिसते.

सायंकाळी आम्ही नाईट सफारी नावाच्या सफरीवर निघालो. ही सफारी अतिशय लक्ष वेधून घेणारी ठरली. अस्वल, सिंह, हरीण असे जंगली प्राणी मुक्त विहार करताना दिसत होते. बग्गीमध्ये पर्यटकांना बसवून विविध देशांतून आणलेले प्राणी दाखविले जातात. ही सफारी एखाद्या अभयारण्यात आपण फिरतो आहोत असा अनुभव देते. मानवनिर्मित अभयारण्य असले, तरी तेथे असलेल्या प्राण्यांना नैसर्गिकपणे वावरता येते. पाण्याचे स्त्रोत, तलाव, झाडे झुडपे यांची रचना उत्तम केलेली आहे. ही बग्गी साधारण तासभर अभयारण्यात फिरवून आणते, या गाडीला कुठलाही लाईट नसतो आणि हॉर्नही वाजवला जात नाही, त्यामुळे प्राणीदर्शन उत्तम होते. भारतीय अभयारण्यात प्राणी पिंजऱ्यात असतात आणि माणसे मोकळी असतात, इथे मात्र नेमके उलटे चित्र होते.

कुठल्याही देशात गेलो की तिथे तासन् तास चालणे, आजूबाजूचा परिसर पाहणे, लोक कसे राहतात, कसे वागतात हे पाहणे हे निरीक्षण फार मजेशीर असते. नीटनेटके अपार्टमेंटस, पादचाऱ्यांसाठी घेतलेली योग्य ती खबरदारी अशा कितीतरी गोष्टी नोंद घेण्यासारख्या होत्या. सहज काहीतरी खाऊन कचरा टाकण्याची किंवा थुंकण्याचे प्रमाण इथे दिसत नाही. असे काही केल्यास काही हजार डॉलर्सचा दंड आणि कायम स्वरुपी व्हिसा रद्द केला जातो. रस्त्याने चालताना काही ठिकाणी पिवळ्या रंगाचे गोल आखलेले दिसले. हे गोल म्हणजे स्मोकिंग झोन आहेत, असे समजले. म्हणजे धूम्रपान तुम्ही विशिष्ट ठिकाणी थांबून केले पाहिजे. असे अनेकविध नियम येथील जनता काटेकोरपणे पाळताना दिसते.

असेच चालत चालत एका संध्याकाळी आम्ही लिट्ल इंडिया या भागात पोहचलो. या रस्त्यावर फिरत असताना असे वाटत नाही, की तुम्ही सिंगापूरमध्ये आहात. सगळी दुकाने, माणसे भारतीयच दिसतील. अगदी जंगली महाराज रोड वरील शिवसागर रेस्टॉरंटची शाखाही तिथे दिसते. आज भारतीय लोक जगातील प्रत्येक देशामध्ये आपले अस्तित्व टिकवून असताना दिसतात. हेच भारतीय तेथे सर्व स्वच्छतेचे नियम पाळताना दिसतात.

सिंगापूर म्हटले, की अजून मुख्य वैशिष्टय म्हणजे इथला युनिव्हर्सल स्टुडिओ. अगदी लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना इथे जायला पसंती असते. अनेक प्रकारच्या साहसी राईड, पाळणे, ट्रान्सफॉर्मर, इजिप्तमधील ममीच्या प्रतिकृती, त्यातील अद्भुत आणि भीतीदायक राईड मुलांना आणि मोठ्यांना हलवून टाकतात. मात्र अमेरिकेतील युनिव्हर्सल स्टुडिओच्या तुलनेत सिंगापूर मधील स्टुडिओ छोटे रूप वाटले. म्हणजे आपल्या इथे भारतात जशी जत्रेत झोक्यामध्ये, पाळण्यात बसायला झुंबड उडते, तशी श्रीमंतांची, निम श्रीमंतांची झुंबड आपल्याला इथे पाहायला मिळते. असेच अजून एक आकर्षण म्हणजे सेन्टोसा आईसलँड या थीम पार्कमध्ये असेच विविध साहसी खेळ, मादाम तुसाचे संग्रहालयही आहे. या मध्ये अनेक जागतिक कलाकार, खेळाडू, राजकीय नेते यांचे मेणाचे पुतळे पाहायला मिळतात. केबल कारने आकाशातून केलेला तासाभराचा प्रवास हा सिंगापूर आणि त्याच्या भोवतालचा अदभुत अनुभव देतो. या आयलंडवर सायंकाळी एक ‘विंग्ज ऑफ टाईम’ नावाचा लेझर शो होतो त्यामध्ये समुद्र हा रंगमंच असतो आणि निरनिराळ्या कारांज्यांमार्फत त्यावर लेझर लाईट इफेक्ट्स देऊन, तसेच आकर्षक फटाके उडवून एक सांगीतिक मलयी लोककथा-परिकथा सादर केली जाते.

पक्षी निरीक्षक मंडळींसाठी जगप्रसिद्ध ‘जुरोंग बर्ड पार्क’ आहे. हे पार्क ‘जूरोंग’ टेकडीच्या पायथ्याशी आहे. जवळ जवळ ६०० जातींचे ८ हजार पक्षी या पार्कमध्ये पाहायला मिळतात. १९७१ मध्ये सुरू केलेले हे पार्क पन्नास एकरावर उभे केले आहे. या पार्कमध्ये ‘हाय फ्लायर’ नावाचा पक्ष्यांचा शो होतो. ज्यामध्ये पक्षी विविध कसरती करून दाखवतात, माणसांप्रमाणे बोलतात.

सिंगापूरचे ‘मरिना बे’ ही जागा म्हणजे विकासाचे उत्तुंग टोक आहे, असे म्हणायला हरकत नाही. एक मोठा मॉल, निवासी हॉटेल असा पंचतारांकित जीवनाचा नमुना आणि जवळच लागून असलेला समुद्र किनारा. तिथेच जवळ असणाऱ्या ‘गार्डन्स ऑफ द बे’ या बागेत इंग्रजी पॉप संगीतावर सायंकाळी रंगबिरंगी लाईट शो होतो.

एकेकाळी सिंगापूर हा ब्रिटिश, जपान, मलेशिया यांच्या अधीन असणारा देशाला ‘ली’ या नेत्याने एक वेगळी ओळख मिळवून दिली. समाजवादी विचारांचा ‘ली’ या देशासाठी कैवारी ठरला. इस्रायल या देशाचे रोल मॉडेल ‘ली’ समोर होते. भ्रष्टाचाराला मुळापासून उपटून औद्योगीकरणासाठी ‘ली’ने प्रचंड मेहनत घेतली आणि लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. सतत होणारे परदेशी हल्ले, पारतंत्र्य या विळख्यातून बाहेर येऊन इथल्या लोकांनी भरपूर कष्ट केले. दिल्ली पेक्षाही आकाराने छोटा असणारा देश, आज विकासाच्या सर्वोच्च स्थानी गणला जातो. अगदी अमेरिकी आणि युरोपियन जनतेलाही खुणावणारा हा देश आहे. सिंगापूर हे मोठे बंदर असून, ते ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनला जोडण्याचे महत्वाचे काम करते. याचाच फायदा घेत, समुद्र व्यापारातून येणाऱ्या उत्पन्नातून सिंगापूरने सर्व प्रथम शिक्षणाला प्राधान्य दिलेले दिसते.

शहरातील सर्वात उंच पाळणा आहे. जो संथ गतीने गोलाकार फिरून शहराचे दर्शन घडवतो.  त्यात आम्ही बसलो आणि पाळणा सर्वात उंच पोहचला, तेंव्हा इंडोनेशिया देश आम्हाला दिसला. मात्र सिंगापूरमध्ये चिनचा प्रभाव खूप आहे. अनेक लोक ‘फेंग शुई’ या ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवताना दिसतात. तसेच चायना टाऊन या परिसरात छोटा चीन देश अवतरला आहे असे वाटले. एक जुने बुद्ध विहार पाहता आले. हा विहार पूर्णपणे लाकडी होता. लाकडावरील नक्षी कोरीव होती. विहाराचे छत कोकणातील घरांच्या छतासारखे उतार असणारे होते. विहाराच्या बाजूने छोट्या रस्त्यावर लाल रंगाचे चिनी कंदील लक्ष वेधून घेत होते. विविध चायनीज पदार्थांची रेलचेल दिसत होती. सर्वात प्रसिद्ध व्यंजन माश्याचे डोके घालून केलेली करी. सर्व पर्यटक थंड पेय आणि नुडल्सचा आस्वाद घेताना दिसत होते. त्याच दिवशी बुद्ध पौर्णिमा असल्याने वातावरण अगदी प्रफुल्लित झाले होते.

परदेशात सार्वजनिक वाहतूक सेवेचा अनुभव घेणे, हे आमच्या यादीत कायम स्वरुपी असते ज्यामुळे तेथील स्थानिक लोक कसे राहतात, हे पाहता येते. आम्ही चायना टाऊन ते आमचे हॉटेल हा प्रवास टॅक्सीने न करता, तेथील सब वे अर्थात मेट्रोने केला.

सिंगापूरच्या एअरपोर्टवर आलो असता, विमानाचे चेक इन स्वयंचलित पद्धतीने होत होते. बॅग घ्यायला आणि बोर्डिंग पास द्यायला, एकही मनुष्य नव्हता. आपापला पीएनआर नंबर टाकताच अगदी बॅगचे चेक इनसह सर्व कामे मशीन करत होती. परत जातानाही सिंगापूरहून विकासाची चुणूक दाखवत राहते.

धनंजय भावलेकर, हे सिने-नाट्य लेखक आणि दिग्दर्शक आहेत.

सावनी विनिता, माध्यमविषयक अभ्यासक असून, सेंट मीरा महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या व्याख्यात्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0